वृद्धेच्या घरात खोट्या पैशांचा पाऊस!

-

आमिष दाखवून 40 लाख रुपयांची फसवणूक; दक्षिण मुंबईतून दोन मांत्रिकांना अटक

देश हादरवून सोडणारे नांदोस हत्याकांड, भोंदू मांत्रिकांकरवी फसवणुकीची प्रकरणे वेळोवेळी पुढे येऊनही पैशांच्या पावसाचा हव्यास काही केल्या कमी होताना दिसत नाही. नागपाडा पोलिसांनी अलिकडेच एका वृद्धेची 40 लाख रुपयांना फसवणूक करणार्‍या दोघा भोंदूंना बेड्या ठोकल्या. या दोघांनी वृद्धेच्या घरात पैशांचा पाऊसही पाडला; पण या पावसात पडलेल्या नोटा खेळण्यातील (बच्चों का बँक) होत्या.

दक्षिण मुंबईत राहणारी वृद्धा मुलीच्या सासरी उद्भवलेल्या कौटुंबिक कलहांमुळे व्यथित होती. त्यातच तिच्या एका नातीचे लग्न काही केल्या जुळत नव्हते. त्यामुळे वृद्धेची चिंता आणखी वाढली. वाईटावर टपलेल्या कुणीतरी करणी केल्याने या अडचणी उभ्या राहिल्या आहेत, मांत्रिकाकरवी उतारा काढणे आवश्यक आहे, असा सल्ला तिला परिचितांपैकी एका व्यक्तीने दिला. याच व्यक्तीने एक मांत्रिकही घरी आणला. मांत्रिकाने तंत्र-मंत्र, बळी, अन्य कर्मकांडांद्वारे चुटकीसरशी या अडचणी दूर करण्याचा दावा केला. त्यासाठी पैसे खर्च करावे लागतील. जेवढे खर्च कराल, त्यापेक्षा जास्त पैशांचा पाऊस घरी पाडण्याचे प्रलोभनही त्याने दाखवले. अडचणींवरील हा उपाय फुकटात पडेल आणि दोन पैसे गाठीलाही जोडता येतील, या विचाराने तिने या मांत्रिकाला होकार दिला. दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने या मांत्रिकाने वृद्धेकडून दागिने, रोख रक्कम मिळून 40 लाख रुपये उकळले. त्यासाठी वृद्धेने सर्व दागिने विकून पैसे उभे केले.

मांत्रिक आणखी पैसे मागू लागला. पण वृद्धेकडे मांत्रिकाला देण्यासाठी काहीच उरले नव्हते. तिने तसे सांगताच मांत्रिकाने पैशांचा पाऊस पाडणार. पाऊस पडला की, त्यातली काही रक्कम पुढील कर्मकांडांसाठी द्यावी लागेल, असे वृद्धेकडून वदवून घेतले. ठरल्या दिवशी वृद्धेच्या घरात अन्य एका साथीदाराला घेऊन मांत्रिक थडकला. अंधार करत त्याने पैशांचा पाऊसही पाडला. जमिनीवर पडलेल्या नोटा वृद्धेने गोळा केल्या आणि कपाटात ठेवल्या. ही बाब तिने जावयाला सांगितली. त्याने तपासणी केली, तेव्हा त्या खेळण्यातील नोटा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर जावयाने विचारणा केली, तेव्हा वृद्धेने दोन वर्षांपासून मांत्रिकाकरवी घरात सुरू असलेल्या कर्मकांडांचा खुलासा केला. वृद्धेची कहाणी ऐकून जावयाने नागपाडा पोलीस ठाण्यात मांत्रिकाविरोधात तक्रार दिली.

पोलिसांनी हनीफ शेख या मांत्रिकासह साथीदाराला अटक केली. पोलिसांनी त्यांची माहिती दक्षिण मुंबईतील वस्त्यांमध्ये पसरवली आहे. या दोघांकडून फसवणूक झालेल्या व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या प्रकरणाचा पाठपुरावा अंनिस कायदा विभागाच्या सहकार्यवाह अ‍ॅड.तृप्ती पाटील, नंदकिशोर तळाशीलकर, विजय परब यांनी केला.

नांदोसच्या आठवणी जाग्या

2003 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदोसच्या घनदाट जंगलात पोलिसांना दोन लहान मुलांसह 10 जणांचे कुजलेले मृतदेह आढळले. या प्रकरणाचा तपास करणार्‍या पोलीस पथकाने संतोष चव्हाणसह त्याच्या साथीदारांना अटक केली. पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यातून या व्यक्तींना संतोष व त्याच्या साथीदारांनी नांदोसच्या जंगलात आणले होते. जेवढे पैसे या कर्मकांडासाठी खर्च कराल, त्याच्या कैकपटीने पैसे खाली पडतील, असे आरोपींनी या व्यक्तींना सांगितले होते. या आमिषाला भुलून शक्य तेवढे पैसे, दागिने घेऊन जंगलात आलेल्या मंडळींची आरोपींनी हत्या केली. पैसे, दागिने घेऊन आरोपींनी पोबारा केला होता. न्यायालयाने याप्रकरणी चौघांना फाशीची शिक्षा ठोठावली होती.

साभार दै. लोकसत्ता


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ]