के. वीरमणी – पेरियार यांचे मुख्य वैचारिक वारसदार

रुपाली आर्डे-कौरवार -

आपण लढतोय ती लढाई मोठी आहे, परंतु त्यावर मात करण्याचा मार्ग डॉ. दाभोलकरांनी आपल्याला दाखवला आहे!

के. वीरमणी (राष्ट्रीय अध्यक्ष, द्रविड कळघम)

के. वीरमणी हे पेरियार यांचे मुख्य वैचारिक वारसदार म्हणून द्रविड कळघमची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. ते द्रविड कळघम या सामाजिक संघटनेचे तिसरे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. (पहिले अध्यक्ष पेरियार, दुसरे पेरियार यांच्या पत्नी मनिअम्माई.) महाराष्ट्र फौंडेशन अमेरिका यांनी ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार २०२१’ देऊन त्यांना सन्मानित केले होते. आता त्यांचे वय ९२ वर्षे आहे. त्यांनी त्यांचे आरोग्य खूप चांगले राखले आहे. आम्ही त्यांना ज्या दिवशी भेटलो त्याच्या आदल्याच दिवशी ते जपानच्या दौर्‍यावरून परतले होते; पण तरीदेखील त्यांच्या चेहर्‍यावर थकव्याचा लवलेशही नव्हता. आम्ही त्यांच्याशी जवळजवळ दीड तास संवाद साधला. आमच्या सर्व प्रश्नांची त्यांनी अगदी विस्तारितपणे उत्तरे दिली.

के. वीरमणी तुमच्याशी बोलताना मला खूप आनंद होत आहे. मी तुम्हा सर्वांचे तामिळनाडूच्या या पेरियार भूमीमध्ये स्वागत करतो. ही भूमी सामाजिक न्यायाची भूमी आहे. ही अशी भूमी आहे, जिथे तर्क आणि विवेकवाद यांची जपणूक होते.

प्रश्न तुम्ही पेरियार यांच्या संपर्कात कसे आलात आणि त्यांच्या चळवळीशी कसे जोडले गेलात?

वीरमणी मी जेव्हा प्राथमिक शाळेत होतो तेव्हा आम्हाला शिकवायला जे शिक्षक होते, ते पेरियार यांच्या विचारांना मानणारे होते. ते आम्हाला शालेय शिक्षणासोबतच पेरियार यांच्या विचारांची शिकवण देत असत. ते स्वतः सेल्फ रिस्पेक्ट चळवळीच्या तत्त्वज्ञानाशी आणि एकूणच द्रविड कळघमच्या विचारांशी जोडले गेले होते. ते शाळेतल्या काही निवडक हुशार विद्यार्थ्यांना स्वतःच्या घरी बोलवून त्यांची शिकवणी घेत असत. त्यामध्ये मीदेखील होतो. शिकवणीमध्ये ते आमच्या शालेय अभ्यासाचा अतिरिक्त सराव करून घेत असत, आणि त्याबरोबरच आत्मसन्मान आणि विवेकवादाची बीजे आमच्या मनामध्ये पेरत असत. त्यांच्यासाठी शिक्षण फक्त पाठ्यपुस्तकापुरतेच मर्यादित नव्हते.

शालेय वयात मी बोलायला थोडा हुशार होतो, त्यामुळे शिक्षकांनी मला वक्तृत्वाचे धडे देण्यास सुरुवात केली. मला तेव्हा जेवढे कळत होते, त्याच्याच जोरावर मी हळूहळू भाषण करू लागलो. मी छोटा असल्याने ते मला टेबलवर उभा करीत आणि बोलण्यास लावीत. माझ्यात लाजरेपणा अजिबात नव्हता. लोकांना मी बोललेलं आवडायचं आणि ते टाळ्या वाजवायचे. त्याने मला पण उत्साह यायचा.

१९४३ मध्ये पेरियार यांचे कट्टर सहकारी अण्णादुराई यांनी सुरू केलेल्या साप्ताहिक पत्रासाठी पब्लिक फंड गोळा करण्याच्या निमित्ताने एक पब्लिक मीटिंग बोलावली होती. त्या कार्यक्रमांमध्ये मी टेबलवर उभे राहून माझे पहिले जाहीर भाषण दिले. तेव्हा मी फक्त दहा वर्षांचा होतो. मोठ्या समुदायापुढे दिलेले ते माझे पहिले भाषण होते. त्यानंतर मी खूप क्रियाशीलतेने भाषणातून अंधश्रद्धा तसेच जाती निर्मूलनाचे आणि जनजागृतीचे काम करू लागलो. त्यानंतर अशाच एका कार्यक्रमाला पेरियार आणि मनिअम्माई देखील आले होते. तेव्हाच मी पेरियारना पहिल्यांदा भेटलो. त्यांनी आणि अण्णादुराईंनी माझे भाषण ऐकले. पेरियारनी मला बोलावून घेतले आणि ‘छोटा विवेकवादी जवान’ म्हणून सर्वांसमोर माझे कौतुक केले. (या प्रसंगाची दखल घेऊन त्यावेळेच्या वर्तमानपत्रात आलेल्या बातमीचे जपून ठेवलेले कात्रण तेव्हा त्यांनी आम्हाला दाखवले.)

नंतर मी माझ्या गावापासून ५० कि.मी. अंतरावर असलेल्या मनिअम्माई विद्यापीठामध्ये शिकायला गेलो. तिथेदेखील मी माझे काम सुरू ठेवले. तिथे माझ्या सोबत शिकलेले कितीतरी स्कॉलर विद्यार्थी नंतर मोठ्या मोठ्या पोस्टवर गेले, काही मंत्री पण झाले. तशा चांगल्या स्कॉलर विद्यार्थ्यांना बोलावून आम्ही त्यांची व्याखाने आयोजित करायचो. आम्ही देवाधर्माच्या विरोधात बोलयचो. ते स्वतःला धर्मवादी म्हणवणार्‍या काही लोकांना आवडायचे नाही. ते लोक दगडफेक करून आमच्या कार्यक्रमामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करायचे. आमच्यावर शेणसुद्धा फेकायचे. यातूनच हळूहळू मी द्रविड कळघम चळवळीचा कणखर कार्यकर्ता बनत गेलो.

सेल्फ रिस्पेक्ट चळवळ (स्वाभिमान चळवळ) सुरू करण्यामागील पेरियारांची मूळ कल्पना काय होती?

के. वीरमणी आमचे मार्गदर्शक पेरियार हे एक महान क्रांतिकारक होते आणि ते डॉ. बी. आर. आंबेडकरांचे चांगले मित्र होते. त्यांची विचारधारा एकच होती. पेरियार ठणकावून सांगायचे की, ‘त्यांचे आणि आंबेडकरांचे विचार म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.’

पेरियार यांचे सामाजिक जीवन साधारणपणे १९१७ पासून सुरू झाले. इरोड येथील एका श्रीमंत व्यापारी कुटुंबामधून येऊनदेखील त्यांनी स्वतः जातव्यवस्थेचे चटके अनुभवले होते. त्यामुळे त्यांच्या मनात जात आणि वर्णव्यवस्थेबद्दल कमालीची चीड होती. महात्मा गांधींपासून प्रेरित होऊन त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेेश केला होता. जवळजवळ ५ वर्षे त्यांनी काँग्रेसमध्ये बरीच पदे भूषवली होती. गांधीजींच्या खादी चळवळीमध्ये त्यांनी हिरिरीने भाग घेतला. इरोडमधल्या ताडीपासून बनवलेल्या दारू विक्रीच्या विरोधात त्यांनी त्यांच्या पत्नी आणि बहिणीसोबत मोठे आंदोलन उभे केले होते, ज्याला गांधीजींनी पूर्ण पाठिंबा दिला होता; परंतु पुढे पक्षांतर्गत जातिभेदाचा जेव्हा त्यांना अनुभव आला तेव्हा त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आणि पूर्णपणे सामाजिक कामामध्ये स्वतःला झोकून दिले.

पेरियार यांच्या सामाजिक कामाचा मुख्य उद्देश होता जात निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन आणि सामाजिक न्याय. त्यामागे कोणताही राजकीय हेतू नव्हता. या सामाजिक कार्यक्रमाला त्यांना चळवळीचे स्वरूप द्यायचे होते आणि कोणत्याही प्रकारच्या राजकारणापासून दूर ठेवायचे होते.

आपल्या भारत देशाचे हे एक वैशिष्ट्य आहे की, आपल्याकडे जी जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्था आहे ती तुम्हाला जगात अन्यत्र कुठेही पाहायला मिळणार नाही. त्याचप्रमाणे ‘सेल्फ रिस्पेक्ट चळवळ’ अशा प्रकारचे नावही तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेच आढळणार नाही. जातव्यवस्था, वर्णव्यवस्था आणि अस्पृश्यता या गोष्टी आपल्या हिंदू धर्मातच आहेत. बाकीच्या धर्मात त्या इतक्या प्रमाणात दिसत नाहीत.

मानवप्राण्याचे एक वैशिष्ट्य आहे की, त्याला आत्मसन्मान असतो, जे दुसर्‍या कोणत्याही प्राण्यामध्ये पाहायला मिळत नाही. तसेच माणसामधली तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमतादेखील त्याला अन्य प्राण्यांपेक्षा वेगळे बनवते. त्यामुळे आत्मसन्मान नसलेल्या माणसाची गणना आपण अन्य प्राण्यांमध्ये केल्यासारखे आहे. ठरावीक जातीच्या लोकांचे असे अमानवीकरण करणारी ही जातव्यवस्था त्या काळात प्रचलित होती. केवळ अपघाताने एखाद्या जातीमध्ये जन्माला आला, म्हणून त्या व्यक्तीला सेल्फ रिस्पेक्ट म्हणजेच आत्मसन्मान बाळगता येऊ नये, ही समाजातील काही मूठभर लोकांनी बनवलेली मानसिकता मोडून काढण्यासाठी या चळवळीचे नाव ‘सेल्फ रिस्पेक्ट चळवळ’ म्हणजेच ‘आत्मसन्मान चळवळ’ असे नाव पेरियार यांनी ठेवले. अशा प्रकारे या चळवळीच्या नावामधूनच त्या चळवळीचा पाया रचला गेला. वर्षानुवर्षे कित्येक पिढ्यांवर लादलेल्या जातिव्यवस्थेने पिचलेल्या लोकांचे पुनर्मानवीकरण करण्याचे काम या चळवळीने केले.

जाती-जातीमधील भेदभावाबरोबरच स्त्रियांना दिली जाणारी असमानतेची वागणूक हीदेखील कायम या चळवळीच्या पटलावर राहिली आहे. त्या काळात अगदी उच्च जातीतल्या स्त्रियांनादेखील ‘नमोशूद्र’ असे म्हटले जायचे. मग बाकी जातीतल्या स्त्रियांच्या परिस्थितीचा आपण विचारच करू शकत नाही. मनुधर्म सांगतो की, जन्मापासून मृत्यूपर्यंत स्त्रीला वडील, नवरा आणि मग मुलगा या पुरुषांच्या वर्चस्वाखाली राहिले पाहिजे. मुलगा असेल तरच त्या स्त्रीला मृत्यूनंतर स्वर्ग मिळेल. ह्या कल्पनेतूनच मग मुलीचा जन्म ही आईवडिलांसाठी एक शिक्षा होऊन बसली. १०० वर्षांनंतर आजही ही परिस्थिती आहे की, स्त्रीला जन्म घेण्यासाठी देखील झगडावे लागते, कारण गर्भातच मुलींना मारून टाकणारे लोक आहेत. त्यावेळेस स्त्रियांना शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती, ज्यामुळे त्या कायम शोषणाच्या बळी ठरायच्या. पेरियारना सेल्फ रिस्पेक्ट चळवळीच्या माध्यमातून स्त्रियांवरील या सर्व भेदभावाविरुद्ध आवाज उठवणे महत्त्वाचे वाटले. जाती आणि वर्णव्यवस्थेतून समाजात आलेल्या भेदभाव आणि अस्पृश्यतेचे उच्चाटन करण्यासाठी, तसेच स्त्री-पुरुषांना समानतेच्या पातळीवर आणण्यासाठी १९२५ मध्ये ही सेल्फ रिस्पेक्ट चळवळ सुरू झाली आणि आता ती शंभराव्या वर्षात पदार्पण करतेय.

पेरियार यांनी स्वतः शालेय शिक्षण खूप कमी घेतले; पण त्यांच्या मानवतावादी क्रांतिकारक विचारांची बैठक आणि त्यामागचे तत्त्वज्ञान पक्के होते. त्यांच्या संवेदनशील मनाला समाजाचे तुकडे करणारी जातिव्यवस्था आणि स्त्रियांना कायम दुय्यम बनवणारी धर्मव्यवस्था कधीच पटली नाही. त्यातूनच त्यांनी देवाला प्रश्न विचारले आणि त्याची उत्तरे न मिळाल्यामुळे देवाच्या अस्तित्वाविषयीच रास्त शंका उपस्थित केल्या. पेरियार यांच्यासाठी समाज म्हणजे एक प्रयोगशाळाच होती.

पेरियार यांच्या‘सेल्फ रिस्पेक्ट चळवळी’चे स्वरूप कसे होते?

के. वीरमणी कोणतीही चळवळ ही मूळ तत्त्वे आणि त्यातून अंगीकारलेली धोरणे यांच्या आधारावर चालत असते. त्या चळवळीची तत्त्वे कायम अबाधित राहतात; परंतु काळानुरूप, परिस्थितीप्रमाणे आणि गरजेप्रमाणे तिच्या धोरणामध्ये बदल होत असतो. सेल्फ रिस्पेक्ट चळवळीचे स्वरूप पण असेच आहे. चळवळीच्या १०० वर्षांच्या प्रवासामध्ये तत्त्वे अबाधित राखत, तिच्या धोरणांमध्ये आणि पद्धतीमध्ये काळानुरूप बदल होते गेलेले आहेत.

मुख्य गोष्टी पाहायच्या झाल्या तर पेरियार तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार हे चळवळीचे पहिल्यापासूनचे धोरण राहिले आहे. चळवळीने कायम शांततापूर्ण मार्गाने आंदोलने केली आहेत. आंदोलने मग ती सरकारविरोधी असोत, समाजाच्या काही घटकांविरुद्ध असोत किंवा बुवा-बाबांच्या विरोधात असोत, द्रविड कळघम चळवळीने कधीही कायदा हातात घेऊन हिंसक मार्ग अवलंबला नाही. ठिकठिकाणच्या सभांमधून लोकांना संबोधित करून लोकांना विचार पटवून देण्याचे काम पेरियार फार चांगल्या पद्धतीने करायचे. आमचे नेते सी.एन. अण्णादुराई म्हणायचे की, ‘पेरियार हे सर्वांत पहिले समाजशिक्षक होते, जे लोकांचा तर्कशास्त्र आणि विवेकवाद या विषयांचा क्लास घेऊन त्यांना शहाणे करून सोडायचे.’ पेरियार त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सतत राज्यभर फिरत लोकांना संबोधित करत राहिले. पेरियार यांच्यानंतर आम्हीपण तेच करत राहिलो. एक एक विषय घेऊन आम्ही त्यावर पूर्ण तामिळनाडूमध्ये एकाच वेळेला १०० च्या वर ठिकाणी सभा घेतो. त्यामध्ये संविधान शिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन कसा विकसित करायचा, तर्कसंगत तपास कसा करायचा, अंधश्रद्धा निर्मूलन व त्यामध्ये नागरिकांचा सहभाग आणि कर्तव्ये यासारखे आणखी अनेक विषय चर्चिले जातात.

शाळा कॉलेजमध्ये जाऊन आम्ही तरुण विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनाचे धडे देतो. आमच्या आताच्या कार्यकर्त्यांपैकी खूप कमी जणांनी पेरियारना पाहिले आहे. बर्‍याच जणांच्या आधीच्या पिढीतील वाडवडिलांनी पेरियारच्या सोबत चळवळीमध्ये काम केले आहे. त्यातील कित्येक कुटुंबं सेल्फ रिस्पेक्ट मॅरेजमधून आंतरजातीय विवाहांमधून बनलेली आहेत.

पूर्वीच्या काळात होणारे बालविवाह आणि त्यातून तयार होणार्‍या बालविधवा हा एक ज्वलंत प्रश्न होता. त्या काळात पेरियारनी याबाबतीत आवाज उठवला. त्यांच्या बहिणीच्या ९ वर्षांच्या मुलीला जेव्हा वैधव्य आले, तेव्हा तिच्या कट्टर कुटुंबीयांच्या विरोधाला मोडून काढत तिचा पुनर्विवाह त्यांनी लावून दिला होता. विधवा पुनर्विवाह हा सेल्फ रिस्पेक्ट चळवळीचा एक महत्त्वाचा भाग होता. कोणताही विचार मांडताना पेरियारनी तो स्वतः प्रथम अंमलात आणला. फक्त कोरडा उपदेश करत बसण्यापेक्षा कायम स्वतःच्या व्यावहारिक वागणुकीतून त्यांनी लोकांना संदेश दिला.

पेरियार यांनी लग्न विधीमध्ये केली जाणारी सप्तपदी आणि लग्न लावण्याची ब्राह्मण पुरोहितांची मक्तेदारी याला कायम आक्षेप घेतला. त्यातूनच त्यांनी ‘सेल्फ रिस्पेक्ट मॅरेज’ची संकल्पना १९२७ मध्ये मांडली आणि ती प्रत्यक्षात आणली. माझे स्वतःचे लग्न आंतरजातीय आहे आणि ते पेरियारनीच सेल्फ रिस्पेक्ट मॅरेज पद्धतीने लावून दिले होते. मीही १० हजारच्या वर सेल्फ रिस्पेक्ट मॅरेजेस लावली आहेत. डी.एम.के.च्या अण्णादुराई सरकारने १९६९ मध्ये एक कायदा पास करून सेल्फ रिस्पेक्ट मॅरेजला कायदेशीर मान्यता दिली.

बहुतेक वेळा तामिळनाडू सरकारमधील लोक पेरियार विचारांचे असले तरीही द्रवीड चळवळीला समाजाकडून भरपूर विरोध पण झालेला आहे. हे प्रवाहाविरुद्ध पोहण्याचे काम मुळीच सोपे नव्हते. पेरियारना भरपूर वेळा तुरुंगात जावे लागले. मी पण बर्‍याचदा तुरुंगात गेलेलो आहे. या चळवळीमध्ये काम करताना आम्हाला आमची सहनशीलता आणि सहिष्णुता कायम जागृत ठेवावी लागली आहे. आम्ही पेरियार विचाराचा प्रचार आणि प्रसार कायम चालू ठेवला. सामाजिक बदलाचे वातावरण जोपर्यंत तयार होत नाही आणि लोकांना ते विचार पटत नाहीत तोपर्यंत त्यांना समजावीत राहणे हा एकच मार्ग होता. सध्याच्या काळात आणि भविष्यातही आपल्याला हे करत राहावे लागणार आहे.

(पेरियार मेमोरियलमध्ये एका फोटोमध्ये पेरियार सायकल रिक्षामध्ये बसून जात असताना लोक त्यांच्यावर दगड आणि चप्पल फेकत आहेत असे चित्र आम्ही पहिले. त्या चित्रामध्ये त्यांच्यावर भिरकावलेली एक चप्पल हातात घेतलेले पेरियार रिक्षावाल्याला रिक्षा परत लोकांकडे फिरवण्यास सांगत आहेत, असे दाखवले होते. ते लोकांकडे परत जा म्हणत होते याचे कारण होते की, त्यांना त्या चप्पलचा दुसरा जोडही हवा होता, कारण एकच चप्पल ठेवून घेऊन त्याचा काही उपयोग नाही, असे ते त्या रिक्षावाल्याला सांगत होते.)

आजच्या वर्तमान परिस्थितीमध्ये पेरियार चळवळीची किती आणि कशी आवश्यकता आहे?

खरे म्हणायचे तर आजच्या परिस्थितीमध्ये पेरियार चळवळीची जास्तीत जास्त आवश्यकता आहे. ही आजच्या काळाची गरज आहे असेच म्हणावे लागेल.

पूर्वी जेव्हा पेरियारनी स्वतः हे खूप आधी जाणले होते की, धर्माने लोकांच्या डोक्यावर लादलेली जाती-वर्णव्यवस्था आणि मानेवरचे अंधश्रद्धेचे जोखड हे जर दूर करायचे असेल, तर त्यांनी शिक्षणाची कास धरली पाहिजे. स्वातंत्र्योत्तर काळात औपचारिक शिक्षणाने लोकांना शहाणे करण्याचे काम थोड्याफार प्रमाणात केलेही आहे.

पूर्वीपेक्षा आताच्या काळात शिक्षणाचा प्रसार जास्त झालेला आहे. त्यामुळे आपल्याला वाटू शकते की, शिकलेली जनता विचार करते; पण तसे नाही. आताच्या शिक्षणापुढे हे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, कारण हे तथाकथित शिकलेले लोकसुद्धा विचार करणेच विसरून गेले आहेत. औपचारिक शिक्षण घेत असताना अशा अनेक पूर्वापार चालत आलेल्या आणि मनावर कोरलेल्या गोष्टी असतात ज्या विद्यार्थ्यांच्या मनातून काढून टाकणे आवश्यक असते; पण तसे होते नाही. कधीकधी ठार निरक्षर लोकांना शिक्षण देऊन शहाणे करणे शक्य होते, परंतु साक्षर आणि शिक्षित माणसाच्या मनातून जुन्या विचारांची जळमटे काढणे महाकठीण असते. हे शिक्षित लोक डोळ्याला झापडं लावलेले शिक्षित असतात, त्यांचे ज्ञान सर्वसमावेशक नसते आणि त्यांनी ते वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासलेले नसते. त्यांच्यामध्ये एक प्रकारचा अहंकार तयार झालेला असतो. ज्यामुळे त्यांना दुसरी बाजू समजावून घ्यायचीच नसते.

आताचे लोक साक्षर आहेत; पण सुशिक्षित नाहीत, कारण ते त्यांच्या शिक्षणाचा उपयोग फक्त जगण्याचे साधन म्हणून करताहेत. त्यांना सुशिक्षित तेव्हाच म्हणता येईल, जेव्हा ते त्यांच्या शिक्षणाचा उपयोग करून तर्काने विचार करतील आणि विवेकवादाची कास धरतील. त्यादृष्टीने आपल्याला आजच्या शिक्षण व्यवस्थेचा कायापालट करणे गरजेचे आहे. आपण पाहतो आजकाल सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्तीसुद्धा त्यांचे देवाधर्माबद्दलचे विचार व्यक्त करताना, देशाच्या धर्मनिरपेक्षतेबद्दल आणि संविधानाच्या बांधिलकीप्रति प्रश्नचिन्ह उभे करतात. महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव हा ज्या पद्धतीने साजरा होतो आहे, त्यातून तो एक पॉलिटिकल इव्हेंट वाटू लागला आहे.

आता पाहा स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रात पुण्यामध्ये प्लेगची साथ आली होती जी उंदरांमुळे पसरली होती. तेव्हा ब्रिटिश सरकारने उंदरांचा नायनाट करण्याची मोहीम काढली कारण त्याशिवाय साथ आटोक्यात येणे शक्य नव्हते; पण तेव्हा पुण्यातल्या तथाकथित शिकलेल्या शहाण्या लोकांनी विरोध केला. का तर म्हणे उंदीर म्हणजे गणपतीचे वाहन, त्याला कसे संपवायचे. खुद्द टिळकांनी पण त्याबाबतीत सरकारला बोल सुनावले होते आणि पुढे जाऊन तर रॅन्ड या ब्रिटिश अधिकार्‍याचा खून केला गेला ज्याने कडक निर्बंध घालून ती प्लेगची साथ संपवली होती. खरेतर त्याने पुणेकरांच्या भल्याचेच काम केले होते; पण लोकांच्या मनावर धर्माचा पगडा एवढा मोठा होता की, त्यांना त्यांचे खरे भले कशात आहे, याचेही भान नव्हते.

महिलांमधील अंधश्रद्धा निर्मूलनासाठी द्रविड कळघमकडून काय काम केले जाते?

द्रविड कळघममध्ये एक वेगळी महिला शाखा आहे, जी फक्त स्त्रियांच्या प्रश्नांवर कार्यरत आहे. सेल्फ रिस्पेक्ट चळवळीअंतर्गत स्त्रियांमधील अंधश्रद्धांवर बरेच काम केले गेले आहे. पूर्वीच्या काळी स्त्रियांनी नवरा मेल्यावर टक्कल करून जन्मभर विधवा बनून घरकाम करत एकाकी जीवन जगायचे अशी प्रथा होती. ही प्रथा बंद करण्यासाठी आणि अशा विधवा स्त्रियांच्या पुनर्विवाहासाठी सेल्फ रिस्पेक्ट चळवळीने आवाज उठवला. पेरियार यांच्या ९ वर्षांच्या भाचीला जेव्हा वैधव्य आले, तेव्हा त्यांनी तिचे दुसरे लग्न लावून दिले. कोणत्याही परिवर्तनाची सुरुवात त्यांनी स्वतःपासूनच करून दाखवली आणि समाजाला संदेश दिला.

आपल्याला माहीत आहेच डॉ. बी. आर. आंबेडकरांनी जे हिंदू कोड बिल आणलं, त्यानुसार १९५० नंतर मुलींना आईवडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये समान हक्क दिला गेला होता; पण त्याच्या जवळजवळ २० वर्षे आधी सेल्फ रिस्पेक्ट चळवळीच्या पहिल्याच अधिवेशनामध्ये पेरियारनी याविषयीचा ठराव पास करून घेतला होता. (पेरियार यांनी स्त्री समतेविषयी केलेल्या ठरावाची चौकट वाचा) पेरियार यांनी स्त्री पुरुष समानतेचा कायम पुरस्कार केला आणि तो अमलात आणला. त्यांच्या मते स्त्रियांनी शिक्षण क्षेत्रात असले पाहिजे कारण स्त्रिया उत्तम शिक्षक होऊ शकतात. आपली आई ही आपली सर्वात पहिली शिक्षक असते. त्यांनी स्त्रियांना पोलीस आणि मिलिटरीध्ये जाण्याबद्दल देखील प्रेरित केले तसेच त्या खात्यांच्या भरतीमध्ये स्त्रियांना प्राधान्य देण्याचा आग्रह केला.

लग्न झाल्यानंतर पत्नीने मंगळसूत्र घालणे हे बंधनकारक नसावे असा त्यांचा आग्रह होता. पेरियार यांच्या मते विवाह समारंभात पुरुषाने स्त्रीच्या गळ्यात ‘थाली’(मंगळसूत्र) बांधणे म्हणजे तिला आपली गुलाम समजून म्हैस विकत घेण्यासारखे आहे. एकट्या स्त्रीच्या गळ्यात ‘थाली’ बांधण्याची प्रथा तिला गुलाम बनवते. पेरियारनी आपले हे क्रांतिकारक विचार प्रथमतः स्वतःच कृतीमध्ये आणले. १९३० मध्ये त्यांच्या पत्नी नागम्माई यांनीच सर्वप्रथम त्यांचे मंगळसूत्र काढून टाकले. त्यानंतर ही मंगळसूत्र काढण्याची एक विद्रोही पद्धत संपूर्ण दक्षिण भारतात रूढ झाली. सेल्फ रिस्पेक्ट मॅरेजमध्ये देखील त्यांनी मंगळसूत्र घालणे हे पूर्णपणे ऐच्छिक करून टाकले होते.

तमिळनाडूमध्ये देवदासी प्रथा खूप मोठ्या प्रमाणात होती. ज्याच्या विरोधात द्रविड कळघम चळवळीने खूप काम केले. तरुण मुलींना देवाच्या दासी म्हणून सोडून देणे आणि त्यातून त्यांचे शोषण होणे हे पेरियारना मान्य नव्हते. पेरियार यांच्या प्रयत्नांमुळे १९४७ मध्ये मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये आमदार असलेल्या मुथुलक्ष्मी रेड्डी यांनी आणलेले देवदासी निर्मूलन विधेयक पास झाले आणि कायद्यामध्ये रूपांतरित झाले. मासिक पाळीच्या काळात स्त्री अपवित्र होते म्हणून तिने घरामध्ये वेगळे बसणे बंधनकारक केले जायचे आणि तिला कुणाशी शिवाशिव करू दिली जात नसे. द्रविड कळघम चळवळीने यासंदर्भात प्रबोधन कार्यक्रम चालवला, ज्यामध्ये मासिक पाळीबद्दल शिक्षण दिले गेले. अशा प्रकारे स्त्रियांच्या बर्‍याच गोष्टींना धरून चळवळीचे काम सुरू आहे.

पेरियार विचारधारा तामिळनाडूच्या राजकारणात रुजवण्यासाठी आपल्या चळवळीने काय प्रयत्न केले?

के. वीरमणी तामिळनाडूमधला आताचा सत्ताधारी पक्ष द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) हा पेरियारनी सुरू केलेल्या द्रविड कळघम या चळवळीमधूनच उदयाला आलेला आहे. या पक्षाची स्थापना १९४९ मध्ये अण्णा दुराई यांनी केली, जे पेरियारांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांच्या चळवळीतून पुढे आलेले लोकनेते होते. आमची द्रविड कळघम ही संस्था जरी राजकीय नसली, तरीही ती द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) शी साधर्म्य ठेवते. आम्ही त्या पक्षासाठी प्रचार करतो आणि पक्षाची धोरणात्मक जडणघडण ठरविण्यासाठी आम्ही काम करतो. तसेच निवडणुकीच्या वेळेस लोकांमध्ये जाऊन त्यांना मार्गदर्शन करतो की, त्यांनी कोणत्या व्यक्तीला आणि का निवडले पाहिजे. लोकांवर आमचा प्रभाव पडतो. तमिळ लोक असाही विचार करतात की, आम्ही त्यालाच निवडणार ज्याला द्रविड कळघम सपोर्ट करणार.

तमिळनाडू ही पेरियार भूमी आहे. इथल्या मातीच्या कणाकणामध्ये पेरियार विचार रुजलेला आहे. या ठिकाणी पेरियारनी जे काम करून ठेवले आहे आणि असा भक्कम पाया रचून ठेवलेला आहे, की कोणताही पक्ष त्यांच्या विचारापासून दूर जाऊन राजकारण करूच शकत नाही. जसे महाराष्ट्रामध्येदेखील मानत असले-नसले तरीही सगळ्या पक्षांना आंबेडकरांच्या फोटोपुढे झुकावेच लागते. इथे सत्ताधारी पक्ष जसा पेरियारना मानतो त्याच वेळेस विरोधी पक्षदेखील त्यांचेच नाव घेत काम करतो. कुणालाच पेरियार या नावापासून फारकत घेता आलेली नाही.

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि त्यांनी सुरू केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चळवळीबद्दल तुमचे मत काय आहे?

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी समाजाच्या उन्नतीसाठी त्यांचे जीवन वाहिले. आपण त्यांना ज्या पद्धतीने गमावले ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. १० वर्षांनंतर त्यांच्या केसचा निकाल लागून प्रत्यक्ष गुन्हेगारांना शिक्षा झाली असली तरीही सूत्रधार अजून मोकाट आहेत ही मोठी शरमेची गोष्ट आहे. बुवाबाबांच्या नादाला लागलेल्या मुख्यमंत्र्यांकडून पुरस्कार नाकारण्याची हिंमत त्यांच्याकडे होती. पेरियारदेखील असेच हिंमतवान आणि बेधडक होते. १९३२ मध्ये पेरियार यांनी शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांचे पुरस्काराचे निमंत्रण धुडकावून लावले होते. तुमच्या विचाराशी माझा काहीही संबंध नाही. तुमचा पुरस्कार हा माझ्यासाठी सन्मानयोग्य नाही कारण आपले काम एकमेकांच्या विरोधात आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

डॉ. दाभोलकरांनी ख्रिस्ती धर्माचे धर्मगुरू पोपना मदर तेरेसांना संतपद बहाल केल्याच्या विरोधात जे पत्र लिहिले होते, ते बरोबरच होते. त्यांच्या या विचारपूर्वक केलेल्या कृतीबद्दल मला त्यांचे कौतुक वाटते. मदर तेरेसांनी चमत्कार करून दोन कॅन्सर रुग्णांना फक्त आशीर्वाद देऊन बरे केले ही गोष्ट सिद्ध होऊ शकत नाही. मदर तेरेसांना त्यांनी केलेल्या आरोग्य सेवेसाठी संतपद बहाल करा, असे म्हणणे योग्यच होते.

मी डॉ. दाभोलकरांच्या ‘दि केस फॉर रिझन’ या पुस्तकाचे दोन्ही भाग वाचले आहेत. या पुस्तकातून मला त्यांची वैचारिक बैठक किती खोल आणि परिपक्व होती हे दिसून आले. त्यांचे विचार पेरियारांच्या विचारांइतकेच स्पष्ट आहेत. आजकाल छद्मविज्ञानाने प्रेरित असलेल्या बुवाबाजीने धुमाकूळ घातलेला आहे. या पुस्तकातून मला छद्मविज्ञानाबद्दल खूप चांगले वाचायला मिळाले. वास्तुशास्त्र हा एक छद्मविज्ञानाचा प्रकार आहे असे माझे स्पष्ट मत आहे. काही दिवसांपूर्वी मी उटी येथील एका आर्किटेक्चर कॉलेजच्या पदवीदान समारंभामध्ये प्रमुख पाहुणा म्हणून गेलो होतो. तिथे बोलताना मी विद्यार्थ्यांना असे आवाहन केले की, तुम्ही वास्तुशास्त्रासारख्या बोगस गोष्टींना तुमच्या कामांमध्ये थारा देऊ नका. छद्मविज्ञान हे कोणत्याही मान्यताप्राप्त किंवा अधिकृत विज्ञानसंस्थेत शिकवले जात नाही. वास्तुशास्त्रदेखील तुम्ही तुमच्या आर्किटेक्चरच्या अभ्यासक्रमामध्ये शिकला नाहीत. मग तुम्ही त्याचा वापर तुमच्या कामात कसा काय करणार? असा प्रश्न मी त्या विद्यार्थ्यांना केला.

डॉ. नरेंद्र दाभोलकरांना लोकांकडून कायम एक प्रश्न विचारला गेला. तसाच प्रश्न तमिळनाडूमध्ये आमच्या द्रविड कळघम चळवळीलापण नेहमी चिथावणीखोरपणे विचारला जातो. तो प्रश्न म्हणजे, ‘तुम्ही फक्त आमच्या हिंदू धर्मालाच का टार्गेट करता?’ याचे उत्तर डॉ. दाभोलकरांनी फार उत्तमरीत्या त्यांच्या पुस्तकामध्ये दिले आहे. आम्हीदेखील आता या प्रश्नाचे उत्तर देताना डॉ. दाभोलकरांना उद्धृत करतो. कारण आमचे त्या प्रश्नामागचे विचार अगदी सारखे आहेत. माझे या प्रश्नाला उत्तर अगदी साधे आणि सरळ आहे, आपण कोणतेही स्वच्छतेचे काम करताना सुरुवात आपल्या घरापासूनच करतो ना की दुसर्‍या घरापासून? त्याचप्रमाणे आपण पहिल्यांदा आपल्या धर्मातील अनिष्ट गोष्टींबद्दल पहिल्यांदा बोलणार की दुसर्‍याच्या. आपल्या देशातील ८७ टक्के लोकांच्या धर्माबद्दल आधी बोलणार की, ११ टक्के लोकांच्या धर्माबद्दल? बर्ट्रांड रसेलने ‘व्हाय आय एम नॉट ए ख्रिश्चन’ असा निबंध लिहिला, तेव्हा त्याला कोणी जाब विचारला नाही की, तू ‘व्हाय आय एम नॉट ए हिंदू’ असा निबंध का नाही लिहिलास, जेव्हा की त्याचा देश बहुतांशी ख्रिश्चनधर्मीय आहे. मी माझ्याच देशात माझ्याच धर्माविषयी पहिल्यांदा प्रश्न विचारू शकतो. हिंदू म्हणून मला भगवद्गीतेवर प्रश्न करण्याचा अधिकार आहे. जी सांगते की, स्त्री आणि शूद्र यांचा जन्म पापयोनीतून झाला. ही गोष्ट ऐकायलाही अत्यंत लाजिरवाणे आहे.

मी कायम मनू धर्माचा कट्टर विरोधक राहिलो आहे. कारण मनूने शूद्रांना बिनबापाची अनौरस संतती ठरवले आहे आणि शेवटचे सांगायचे, तर आपण जिथे दुखते त्या ठिकाणचाच इलाज करतो की नाही? त्यामुळे माझ्या धर्मात मला जिथे प्रॉब्लेम दिसतो त्याच्यावरच मी बोट ठेवणार.

आमच्या अंनिस चळवळीसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी तुमचा काय संदेश असेल?

के. वीरमणी आपण सर्वजण एकमेकांचे सहकारी आहोत. अंधश्रद्धा आणि जातिव्यवस्थेविरुद्धच्या लढ्यात आपण एकत्र आहोत, ही भावना आपण कायम मनात ठेवून काम करूयात. पुढील वर्षी २०२५ साली आम्ही सेल्फ रिस्पेक्ट चळवळीच्या शंभराव्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहोत. ही एक चांगली संधी आहे आपल्यासारख्या लोकांनी एकत्र येऊन काम करण्याची. आपण सर्व एकाच ध्येयाने प्रेरित होऊन काम करत आहोत. आपण चर्चा करून एक सामायिक कार्यक्रम आखला पाहिजे आणि त्यानुसार हे काम पुढे नेले पाहिजे.

आजकाल इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये झालेल्या क्रांतीने एक वेगळेच स्तोम माजवले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने तयार झालेल्या या माध्यमातून अवैज्ञानिक गोष्टींचाच प्रसार होताना दिसतो आहे, जो भयानक आहे. उदाहरणार्थ कॉम्प्युटरवर काढून मिळणारी ज्योतिष-कुंडली. तंत्रज्ञानाचा हा अघोरी वापर थांबविण्याविषयी आपण काहीतरी केलं पाहिजे.

आपल्याकडे दर ४० किलोमीटरनंतर भाषा, अन्न आणि पोशाख पद्धती बदलते, त्यातूनच आपला देश विविधतेतून एकता यासाठी ओळखला जातो. या संस्कृतीबदलातून प्रत्येक ठिकाणच्या समाजाचे प्रश्न आणि अडचणी पण थोड्याफार बदलत असतील; परंतु आपले तर्कशुद्ध विचार आणि त्यानुसार आलेला तर्कसंगत विवेकी दृष्टिकोन यात काही फरक असण्याचे कारण नाही. वैज्ञानिक जागरूकता हा सर्वांत मोठा गुण आहे. लोक अवैज्ञानिक गोष्टी पसरवायला हपापलेले आहेत. आपले पंतप्रधान पण यात मागे नाहीत, जे गणेशाला हत्तीचे डोके लावलेल्याला प्लास्टिक सर्जरी म्हणून बघतात.

मी आधी म्हटल्याप्रमाणे सध्या आपल्याकडे छद्मविज्ञानाने धुमाकूळ घातला आहे. त्याच्याविरुद्धची लढाई महत्त्वाची आहे. गायीच्या शेणापासूनच रोग बरे होतात असले अवैज्ञानिक खुळचट दावे केले जातात आणि तथाकथित शिकलेले लोक त्यावर विश्वास ठेवतात. आपण लढतोय ती लढाई मोठी आहे आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी डॉ. दाभोलकरांनी आपल्याला वाट दाखवली आहे. आता आपले कर्तव्य आहे की, डॉ. दाभोलकरांनी दाखवलेल्या ज्ञानाच्या प्रकाशात आपण ही लढाई शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू!

आत्मसन्मान चळवळीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने पेरियार यांनी केलेले

विविध ठराव (१९२९ ते १९३५)

१) परिषदेमध्ये महिलांनाही मालमत्तेचा अधिकार असावा, हे जाहीर करण्यात आले.

२) महिलांना शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षिका म्हणून काम करण्याचा अधिकार असावा.

३) ज्या महिलांनी पारंपरिक अंधश्रद्धा निर्माण करणार्‍या रूढी करणे बंद केले नाही, त्यांना शिक्षकांची नोकरी देऊ नये.

४) युवकांनी विधवांशी विवाह करण्याची मानसिकता बनवली पाहिजे.

५) मुलींचा देवाशी विवाह लावण्याच्या प्रथेला तरुण युवकांनी विरोध केला पाहिजे.

६) देवदासी प्रथेमुळे वेश्या व्यवसायाची सुरुवात होते. यास विरोध केला पाहिजे.

७) देवदासींना कोणत्याही उत्सवांमध्ये नाच-गाणे करण्यासाठी बोलावणे बंद केले पाहिजे.

८) १९२७ मध्ये बालविवाहाच्या विरोधात कायदा बनवणारे रावबहाद्दूर हरविलास शारदा यांचे अभिनंदन करण्यात आले व या बालविवाह विरोधी कायद्याला पाठिंबा देण्याचे ठरले.

९) महिलांना मालमत्तेचा अधिकार असावा व त्यांचा पालकत्वाचा अधिकार पुरुषांप्रमाणे मिळावा.

१०) अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी कायदा बनवावा.

११) धार्मिक विधी न करता मुलामुलींनी कोणतेही जातीचे बंधन न ठेवता विवाह करण्याचा ठराव शासनाने करावा.

१२) विवाह कार्यात कमीत कमी खर्च करावा.

१३) नवीन मंदिरांची निर्मिती बंद व्हावी, वेद पाठशाळा, गोशाळा बंद कराव्यात व या सर्वांचे रूपांतर शाळांमध्ये करावे.

१४) आंतरजातीय विवाह मोठ्या प्रमाणात व्हावेत.

१५) हुंडा घेण्याची व देण्याची प्रथा बंद व्हावी.

१६) पुरोहिताशिवाय विवाह पार पाडण्याची प्रथा सुरू व्हावी.

१७) महिलांना मालमत्तेचा अधिकार असावा. पतीबरोबर पटत नसेल तर घटस्फोटाचा अधिकार असावा. पुनर्विवाह व विधवा पुनर्विवाहास मान्यता मिळावी.

१९) परिषदेमध्ये कुटुंब नियोजन संदर्भात समाजामध्ये जनजागृती करण्यातचे ठरविले.

२०) कुटुंब नियोजनाला विरोध करणार्‍या ख्रिश्चन पाद्य्रांचा यावेळी निषेध करण्यात आला.

कशी होती सेल्फ रिस्पेक्ट चळवळ?

सेल्फ रिस्पेक्ट चळवळ ही पेरियार चळवळीचा एक महत्त्वाचा मानबिंदू आहे. सेल्फ रिस्पेक्ट चळवळीला आपण मराठीमध्ये स्वाभिमान किंवा आत्मसन्मान चळवळ म्हणू शकतो. या चळवळीची सुरुवात पेरियार यांनी १९२५ मध्ये केली. पुढचे वर्ष, म्हणजे २०२५ हे या चळवळीचे शतकपूर्ती वर्ष आहे. १०० वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या चळवळीचे स्वरूप आज बरेच विस्तारले आहे.

स्वाभिमानाची जाणीव करून देणे

जातीनिर्मूलन करणे हाच या चळवळीचा प्रमुख उद्देश होता. पेरियारांच्या मते, स्वाभिमान आणि स्वातंत्र्य या एका साखळीच्या दोन कड्या आहेत. स्वातंत्र्यासाठी संघर्ष करीत असतानाच आपण स्वाभिमान आणि मानवी प्रतिष्ठेकडे दुर्लक्ष करू शकत नाही. स्वाभिमानाशिवाय स्वातंत्र्याची काय किंमत? स्वाभिमान आणि आत्मसन्मान या गोष्टी फक्त कोण्या एका जातीची किंवा कोण्या एका समाजघटकाची मक्तेदारी नाही. पेरियारनी या चळवळीला स्वाभिमान चळवळ असेच नाव दिले. कारण समाजाला आणि समाजातील प्रत्येकाला ‘स्व’त्वाची जाणीव निर्माण करून देणे त्यांना महत्त्वाचे वाटले. समाजातील प्रत्येक घटक मग तो कोणत्याही धर्माचा, कोणत्याही जातीचा, स्त्री अथवा पुरुष असो त्याला स्वतःचे असे अस्तित्व आहे आणि आत्मसन्मान आहे, हा विचार सर्वच समाजाने आत्मसात करणे पेरियार यांना महत्त्वाचे वाटले. समाज जेव्हा धर्मामध्ये आणि जातीमध्ये वाटला गेला होता, आणि स्त्रियांना दुय्यम मानून त्यांच्यावर संस्कृती रक्षणाचे आणि परंपरांचे जोखड लादले जात होते तेव्हा सर्वांना एका पातळीवर आणण्यासाठी सर्वांनाच स्वतःच्या स्वाभिमानाची व आत्मसन्मानाची जाणीव करून देणे, हा एक उपाय त्यांनी शोधला होता. त्यामधून मुख्यत्वेकरून समाजातील खालच्या वर्गातील आणि शोषित घटकांमध्ये, तसेच स्त्रियांमध्ये आत्मसन्मानाची मशाल पेटवली गेली. जन्माने मिळालेल्या जातीचे जोखड झुगारून देऊन माणसाला स्वाभिमानाने जगायला शिकवणारी ही चळवळ होती. सेल्फ रिस्पेक्ट चळवळीच्या माध्यमातून जातिव्यवस्थेमधून होणार्‍या शोषणाला खीळ बसवण्याचे काम केले गेले.

१९२५ मध्ये पेरियारनी कुडी अरासु (प्रजासत्ताक) या नावाने एक साप्ताहिक सुरू केले होते. दर रविवारी प्रकाशित होणार्‍या या साप्ताहिकाने सुरुवातीच्या काळात सेल्फ रिस्पेक्ट चळवळीचे मुखपत्र म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. हे साप्ताहिक चालवण्यासाठी पेरियार यांची पत्नी नागम्माई, त्यांची बहीण कन्नम्मल यांनीदेखील सहभाग घेतला. त्यांचा भाऊ ई. व्ही. कृष्णसामी यांनी प्रकाशक म्हणून भूमिका बजावली होती. ५ नोव्हेंबर १९४९ रोजी त्याचे प्रकाशन बंद झाले; पण त्या आधी द्रविड कळघमची काही दुसरी दैनिके आणि साप्ताहिके सुरू झाली होतीच. त्यामुळे द्रविड कळघमने प्रिंट मीडियाचा उपयोग करणे कधीही सोडले नाही. द्रविड कळघमची ही वेगवेगळी प्रकाशने म्हणजे आपल्या महाराष्ट्र अंनिसच्या चळवळीसाठी एक प्रेरणास्रोत आहे. आज १०० वर्षानंतर त्यांचे दैनिक आणि साप्ताहिक सुरू आहे, ज्यासाठी त्यांची स्वतःची प्रिंटिंग प्रेस आहे. भविष्यात पुढे जाऊन अंनिसला देखील असेच स्वयंपूर्ण होता आले पाहिजे.

जातीवाचक आडनावे सोडणे

तमिळनाडूमध्ये बरीचशी आडनावे असायची ती जातीवरून लावलेली असायची. म्हणजे एखाद्याचे पूर्ण नाव सांगितले की, आडनावावरून आपोआप त्याची जात सांगितली जायची. पेरियारनी जातीवाचक आडनाव लावायची ही पद्धत १९२९ मध्ये पहिल्यांदा मोडून काढली. पेरियार यांचे तमिळ आडनाव नायकर असे होते, ज्यातून ते वैश्य जातीतले आहेत हे स्पष्ट होते. त्यांनी त्यांचे आडनाव काढून टाकून फक्त इरोड वेंकटा रामासामी असे नाव धारण केले. यामध्ये इरोड हे त्यांच्या जन्मगावाचे नाव होते. त्यानंतर तमिळनाडूमध्ये आडनाव विरहित नावांची ही पद्धत रूढ झाली. आजही तमिळनाडूमध्ये ही पद्धत सुरू आहे. लोक आडनावाचे फक्त आद्याक्षर घेऊन पण नाव सांगतात म्हणजे त्यातून आडनाव पूर्ण सांगितले जात नाही. पुढे जाऊन ही पद्धत बाकीच्या द्रविड राज्यामध्ये, जसे की केरळ, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक, इथेपण स्वीकारली गेली.

विधवा विवाह लावणे

स्त्रियांवर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्यात सेल्फ रिस्पेक्ट चळवळीने महत्त्वाचे काम केले. स्त्रिया मग त्या कोणत्याही वर्गातील असोत त्या कायम शोषणाच्या बळी ठरतात. त्याकाळी स्त्रियांची लग्ने १० वर्षे वयाच्या आतच लावली जात. पुरुषांना किती पण लग्न करण्याची मुभा होती, पण स्त्रियांनी मात्र नवरा मेल्यावर टक्कल करून जन्मभर विधवा बनून नरकवास भोगायचा अशी प्रथा होती. अशा विधवा स्त्रियांची लग्ने लावून देणे हा स्वाभिमान चळवळीचा एक मोठा भाग होता. पेरियार यांच्या बहिणीच्या ९ वर्षांच्या मुलीला जेव्हा वैधव्य आले, तेव्हा त्यांनी कुटुंबाच्या विरोधाला ना जुमानता तिचे दुसरे लग्न लावून दिले. त्या मुलीला त्यांच्या काही कर्मठ कुटुंबीयांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी कित्येक दिवस अज्ञातवासात ठेवावे लागले होते.

थाली (मंगळसूत्र) तोडो मोहीम

पेरियार यांनी स्त्री-पुरुष समानतेचा कायम पुरस्कार केला आणि तो अमलात आणला. लग्न झाल्यानंतर पत्नीने मंगळसूत्र घालणे हे बंधनकारक नसावे असा त्यांचा आग्रह होता. पेरियार यांच्या मते विवाह समारंभात पुरुषाने स्त्रीच्या गळ्यात ‘थाली’(मंगळसूत्र) बांधणे म्हणजे तिला आपली गुलाम समजून म्हैस विकत घेण्यासारखे आहे. गळ्यात दोरी बांधून तिला ओढून नेण्यासारखेच आहे. एकट्या स्त्रीच्या गळ्यात ‘थाली’ बांधण्याची प्रथा तिला गुलाम बनवते आणि ती मिटवायला हवी. पेरियारनी आपले हे क्रांतिकारक विचार प्रथमतः स्वतःच कृतीमध्ये आणले. १९३० मध्ये त्यांच्या पत्नी नागम्माई यांनीच सर्वप्रथम त्यांचे मंगळसूत्र काढून टाकले. त्यानंतर ही मंगळसूत्र काढण्याची एक विद्रोही पद्धतच रूढ झाली. विवाहित स्त्रिया जाहीररीत्या कार्यक्रमांत मंगळसूत्र काढून टाकून विद्रोह करायला लागल्या. यामध्ये पेरियारच्या विचारांनी प्रेरित झालेले विवाहित पुरुषदेखील आपल्या पत्नींना घेऊन सहभागी होत.

अगदी अलीकडे म्हणजे १४ एप्रिल २०१५ रोजी आंबेडकर जयंतीच्या दिवशी तामिळनाडूमध्ये ठिकठिकाणी मंगळसूत्र काढून टाकण्याचे जाहीर कार्यक्रम घेण्यात आले होते. याच्या विरोधात तेथील हिंदुत्ववादी संघटनानी कोर्टाकडून स्थगिती आणण्याचा प्रयत्न केला होता; परंतु त्याला न जुमानता ३० ते ५० च्या वयोगटामधील २१ स्त्रियांनी चेन्नईतील पेरियार स्मारकाजवळील कार्यक्रमांत भाग घेत आपापली मंगळसूत्र काढून टाकली होती.

सेल्फ रिस्पेक्ट मॅरेज (स्वाभिमानी विवाह)

सेल्फ रिस्पेक्ट चळवळीचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट मॅरेज. महाराष्ट्रामध्ये महात्मा फुलेंनी सुरू केलेल्या सत्यशोधक विवाहासारखेच स्वरूप असलेल्या या सेल्फ रिस्पेक्ट मॅरेजने तामिळनाडूमध्ये मोठी मान्यता मिळवली आहे. पेरियारनी १९२९ मध्ये ‘सेल्फ रिस्पेक्ट मॅरेज’ ची सुरुवात केली.

‘पगुथरीव’ या साप्ताहिकात लिहिताना पेरियार या विवाहासंबंधी म्हणतात की, “प्राचीन काळातील वैदिक पद्धतीने होणारे विवाह महाग पडत असल्याने मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडणारे नव्हते. ब्राह्मणांच्या भरमसाठ बिदागीमुळे पालक वैतागले होते. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे, जसे की पहाटे लवकर धार्मिक विधी करणे, ज्याचा सर्व पाहुण्यांनाही त्रास होत असे. भरमसाठ कर्जांनी पालकांचे जीवन दयनीय केले होते. तुलनेने, स्वाभिमानी विवाह आर्थिकदृष्ट्या सोयीस्कर आहेत. त्यासाठी छोटेसे बजेटही पुरेसे आहे. विवाहप्रसंगी फुलाच्या हारांची देवाणघेवाण केली जाते. तीसुद्धा ऐच्छिक आहे. निरर्थक कर्मकांड टाळले जातात. मौल्यवान वेळ वाया जात नाही. वर आणि वधूच्या कुटुंबांना योग्य सल्ला दिला जातो. विवाह एका मान्यवरांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला जातो. औपचारिकपणे नोंदणीकृत आणि तो उत्तम प्रकारे प्रमाणितदेखील असतो. सुधारणावादी विवाहामुळे विवाहित जोडप्याला कोणत्याही प्रकारे नुकसान होत नाही. किंबहुना, धर्म, जात, पंथ, काळ आणि ग्रह-तारे यापैकी कोणाचाही विवाहाशी संबंध नसतो. हे सत्य जनतेला कळायला हवे.”

या स्वाभिमानी विवाहातून पेरियार यांनी ब्राह्मण पुरोहितांची लग्न लावण्याची मक्तेदारी मोडून काढली. त्यातून आपोआपच त्या जातीचा वरचष्मा खाली खेचला. कोणतीही मान्यताप्राप्त व्यक्ती सेल्फ रिस्पेक्ट मॅरेज लावू शकते अशी सोय केली. या विवाहामध्ये वधू आणि वराने एकमेकांना स्वीकारण्याची आणि आयुष्यभर सांभाळण्याची शपथ घेत एकमेकांना हार घालणे एवढेच त्याचे स्वरूप होते. सेल्फ रिस्पेक्ट मॅरेज थाटामाटात न करता कमीत कमी खर्चात झाले पाहिजे असा नियम होता. हे लग्न लावताना कोणत्याही प्रकारची दक्षिणा, फी आकारता येणार नाही असाही दंडक होता. या प्रकारचे मोकळेढाकळे स्वरूप देऊन पेरियार यांनी सेल्फ रिस्पेक्ट मॅरेजला धर्माच्या आणि जातीच्या चौकटीतून मुक्त केले. यामुळे सेल्फ रिस्पेक्ट मॅरेजने आपोआपच आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करू इच्छिणार्‍या जोडप्यांची वाट मोकळी करून दिली.

सेल्फ रिस्पेक्ट मॅरेज या विवाहासंबंधी अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही द्रविड कळघमचे पूर्णवेळ कार्यकर्ते प्रिन्स यांची मुलाखत घेतली. त्यांच्याशी संवाद साधताना आम्ही त्यांना विचारले की,

पेरियार यांना सेल्फ रिस्पेक्ट मॅरेज या पद्धतीची गरज का वाटली?

प्रिन्स : पेरियार म्हणत की, “जातींमध्येच होणार्‍या विवाहांमुळे जात संस्था टिकते आणि त्याचे संवर्धन होते. कारण अशा लग्नातून जन्माला आलेली त्यांची मुलेदेखील लहानपणापासून त्यांच्याच जातीच्या बंधनामध्ये वाढतात. त्यांच्या मनावर आपोआपच जातीचा पगडा राहतो. काही जणांच्यात शिक्षणामुळे तो गळून पडत असेलही, पण त्याचे प्रमाण कमी असते. आंतरजातीय विवाहामधून जन्माला आलेल्या मुलांमध्ये जातीची कल्पना पहिल्यापासूनच नाहीशी झालेली असते. त्यामुळे पुढील पिढीमधून जातीची समजूत काढून टाकायची असेल तर अधिकाधिक आंतरजातीय विवाह व्हायला हवेत. अशा रितीने आंतरजातीय विवाह हे जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी एक चांगले माध्यम आहे.”

पेरियार यांनी सुरू केलेल्या या सेल्फ रिस्पेक्ट विवाहाला कायदेशीर मान्यता आहे का?

प्रिन्स : पेरियार यांनी सेल्फ रिस्पेक्ट मॅरेज चळवळ जरी १९२९ पासून सुरू केली असली तरी, त्याला तमिळनाडूत कायदेशीर मान्यता १९६७ साली अण्णा दुराई यांच्या सरकारने दिली. अण्णा दुराई हे पेरियार यांच्याच चळवळीतून पुढे आलेले लोकनेते होते. माझे सरकार हे पेरियारनी दाखवून दिलेल्या विचारावर चालेल हे त्यांनी सत्तेवर आल्या आल्या जाहीररीत्या सांगितले होते. त्याच वचनाचा एक भाग म्हणून अण्णादुराई सरकारने सेल्फ रिस्पेक्ट मॅरेजला कायदेशीर मान्यता दिली. त्यावेळच्या कायद्याचा मसुदा कित्येक कायदेतज्ज्ञांनी तपासून पास केल्यानंतर पेरियार यांच्याकडे पाठविण्यात आला. मसुद्यामध्ये उल्लेख होता की, वधू वर शपथ घेतील आणि वर वधूच्या गळ्यात मंगळसूत्र बांधेल. त्यानंतरच लग्न ग्राह्य मानले जाईल.

पेरियारनी या एकाच वाक्याला आक्षेप घेत खालील प्रमाणे बदल केला आणि मसुदा पाठवून दिला. तो असा होता – “वधू वर शपथ घेतील आणि जर वधूची इच्छा असेल तरच वर वधूच्या गळ्यात मंगळसूत्र बांधेल. त्यानंतरच लग्न ग्राह्य मानले जाईल.” या बदलामधून पेरियारनी १९३० पासून चालत आलेल्या मंगळसूत्र विद्रोहालादेखील खतपाणी घातले होते. यातून पेरियारांच्या स्त्री-पुरुष समानतेच्या विचारांची पक्की बैठक दिसून येते.

या विवाह केंद्रामध्ये दरवर्षी किती विवाह लावले जातात?

तमिळनाडूमध्ये सेल्फ रिस्पेक्ट मॅरेज लावून देणारी सेंटर्स प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत. आतापर्यंत असे लाखो विवाह या सेंटर्समध्ये लावले गेले असतील.

फक्त पेरियार स्मारकामध्ये असलेल्या मॅरेज सेंटरचा २०२३ चा हा डेटा :

एकूण विवाह – १५७३, आंतरजातीय विवाह – १२१६

विधवा विवाह – १८, घटस्फोटित विवाह – २६

परप्रांतीय विवाह – ११२

वधू किंवा वर ब्राह्मण असलेले विवाह – ८४

यातून दिसून येते की, आता ब्राह्मण समाजदेखील सेल्फ रिस्पेक्ट मॅरेजला काही प्रमाणात मानतात आणि त्याचा अवलंब करतात.

के. वीरमणींचा आंतरजातीय विवाहदेखील पेरियार यांनी सेल्फ रिस्पेक्ट मॅरेज पद्धतीनेच लावून दिला होता. त्या पश्चात खुद्द वीरमणी यांनी देखील १० हजारांवर सेल्फ रिस्पेक्ट मॅरेज लावले असतील.

महाराष्ट्र अंनिस प्रमाणेच द्रविड कळघमदेखील कुटुंबाच्या विरोधात जाऊन आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना सेफ हाऊसेस पुरवते.

आम्ही अनुभवलेले सेल्फ रिस्पेक्ट मॅरेज

केरळमधल्या कोझिकोड येथील एका कंपनीमध्ये काम करणारे ते दोघे. तो मूळचा चेन्नईचा आणि ती कोझिकोडचीच रहिवासी. दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्याचे प्रेमात रूपांतर झाले. दोघे पण २४-२५ वर्ष वयाचे सज्ञान; लग्न करू इच्छीत होते; परंतु मुलीच्या घरून लग्नाला विरोध झाला. मग दोघांनी मनाची तयारी करून चक्क विमानाने कोझिकोडवरून चेन्नई गाठले आणि एअरपोर्टवरून थेट पेरियार स्मारकामधील सेल्फ रिस्पेक्ट मॅरेजच्या ऑफिसमध्ये येऊन धडकले. मुलाचे आईवडील आणि काही नातेवाईक त्यांचे लग्न लावण्यासाठी तिथे हजर होते. तिथेच त्यांची आणि आमची गाठ पडली.

आम्ही सेल्फ रिस्पेक्ट मॅरेजबद्दल माहिती घेण्यासाठी गेलेलो असतानाच त्यांच्या विवाहाचा सोहळा आम्हाला अनुभवता आला. वधू आणि वरांकडून फॉर्म भरून घेतल्यानंतर ते दोघे साध्याच पद्धतीने तयार झाले. तिथल्या सेल्फ रिस्पेक्ट मॅरेज ऑफिसच्या संचालिका सेंथिलकुमारी यांनी त्या दोघांना शपथ दिली. मुलाच्या आई वडिलांनीदेखील दोघांना उपदेशाचे दोन शब्द सांगितले. त्यानंतर दोघांनी एकमेकांना हार घालून विवाह पार पडला. उपस्थितांना लाडू मिठाई देऊन लग्न साजरे झाले. आम्ही देऊ केलेली पैशांची छोटीशी भेट त्यांनी आनंदाने स्वीकारली. मग वरपित्यानेही आम्हाला चेन्नईची फेमस फिल्टर कॉफी पाजली. भाषेचा अडसर असूनही आम्हाला एकमेकांच्या भावना समजत होत्या. त्या दोघांना भावी आयुष्यासाठी सदिच्छा देऊन आम्ही त्यांचा निरोप घेतला.

रुपाली आर्डे-कौरवार, राहुल थोरात, प्रा. डॉ. अशोक कदम


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]