संत समाजसुधारकांचा वारसा लोकांपर्यंत पोहोचविणारे अंनिसचे उपक्रम!

राजीव देशपांडे -

सण समारंभ, उत्सव साजरे करण्याची माणसाची भावना आदिम आहे. आपली आनंदी भावना व्यक्त करण्याकरिता हे साजरेपण येते. मग तो आनंद ऋतू बदलाचा असो — कृतज्ञतेचा असो — शेतात आलेल्या नव्या पिकाचा.. नवनिर्मितीचा असो जीवनातील या ना त्या आनंदी भावनांशी हे सण समारंभ, उत्सव जोडले गेले आहेत. त्यामुळे मानवी जीवनात या सण समारंभ उत्सवांना अनन्यसाधारण स्थान प्राप्त झालेले आहे. पण जसजसे संघटित धर्माचे प्रस्थ वाढू लागले तसतसा हा पारंपरिक सण समारंभ, उत्सवाचा मुक्त आनंद धर्माच्या संकुचित चौकटीत बंदिस्त होऊ लागला. सण उत्सवांना धार्मिक कर्मकांडांचे स्वरूप प्राप्त झाले. त्यातील निखळ आनंदाचा सर्वांना सामावून, सहभागी करून घेण्याचा भाग संपला. दुसर्‍या बाजूला विज्ञानाची प्रगती झाली, नवनवे शोध लागू लागले, कृषी संस्कृतीचे रूपांतर औद्योगिक नागरी संस्कृतीत होऊ लागले, तसतसे पारंपरिक सणांचे स्वरूप निव्वळ कर्मकांडी बनले. कारण या सणांची निर्मितीच मुळात कृषीशी निगडीत होती. आणखी एक गोष्ट घडली. सण समारंभ, उत्सवाचा संबंध प्रथमपासून बाजाराशी होताच. सणासुदीला नवे कपडे वैगेरे वैगेरे. पण व्यवस्था बाजारकेंद्री नसल्याने बाजाराचा हस्तक्षेप मर्यादित होता. बाजारच सण उत्सवांची निर्मिती करत नव्हते. पण अलिकडील काही वर्षांत सण समारंभ, उत्सवांचे बाजारू स्वरूप आपण अनुभवत आहोतच. त्यामुळे सण केवळ धार्मिक कर्मकांडीच बनले असे नव्हे, तर ते बाजारूही बनले. मग एकदा बाजार सण समारंभ, उत्सवात घुसल्यावर विचार केवळ नफ्याचा …. ना पर्यावरणाचा! ना माणसाचा ना त्याच्या सामाजिक परिस्थितीचा!

या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सर्वधर्मीय सण समारंभ, उत्सवांना बाजारू आणि कर्मकांडी स्वरूपातून बाहेर काढून मानवकेंद्री करण्यासाठी पर्यावरणपूर्वक गणपती विसर्जन, फटाकेमुक्त दिवाळी, होळीत पोळी टाकू नका सारखे कार्यक्रम हाती घेतले. नुकत्याच साजर्‍या झालेल्या बकरी ईदच्या संदर्भात अंनिस ‘कुर्बानीचे नवे रूप’ हे अभियान मुस्लिम धर्मसुधारकांसह चालवत आहे. या अभियानाबद्दलचा डॉ. हमीद दाभोलकर यांचा लेख याच अंकात आम्ही देत आहोत.

नुकतीच वटपौर्णिमा झाली. त्या निमित्ताने रायगड जिल्ह्यातील पेण अंनिस शाखेने खरंच महिलांना वटपौर्णिमा कशी साजरी करावशी वाटते? पुराणातल्या सावित्रीशी आजच्या महिला धागा जुळवू शकतात का? असे प्रश्न उपस्थित करत केलेल्या सर्व्हेक्षणावरचा लेख वाचकांना नक्कीच विचार करायला लावेल.

अजूनही सापांबद्दलच्या अंधश्रद्धा समाजमनात पक्क्या आहेत. आता नागपंचमीचा सण येईल. त्यानिमित्ताने या अंधश्रद्धांना पुन्हा उजाळा मिळेल. त्याला छेद देणारे सर्पमित्र असलेल्या अंनिस कार्यकर्त्यांचे अनुभव आम्ही देत आहोत.

सध्या आषाढी वारीचे दिवस आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर म्हणायचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संत आणि समाजसुधारकांचा वारसा चालविते. पण वारीत केवळ सहभागी होत हा वारसा चालविण्यापेक्षा प्रबोधनाच्या मार्गाने हा वारसा चालविला पाहिजे या हेतूने अंनिस लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांच्या ‘अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये संत साहित्याचे योगदान’ आणि ‘वारकरी संप्रदयातील स्त्री संत’ या दोन पुस्तिका प्रकाशित करत आहे, त्याचा परिचय करून देणारा लेख आम्ही या अंकात देत आहोत.

मेळघाटातील लहान मुलांच्या पोटावर डागण्या (डंबा) देण्याच्या अघोरी प्रथेविरोधातील प्रबोधन मोहिमेचा पहिला टप्पा १७ मार्च ते ७ एप्रिल असा यशस्वीपणे पार पडला. त्याचा वृत्तांत आम्ही मागील अंकात दिला होता. या अंकात आम्ही त्या मोहिमेच्या दुसर्‍या टप्प्याचा वृत्तांत देत आहोत. हा वृत्तांत वाचकांना मेळघाटातील आदिवासींच्या परिस्थितीची कल्पना देईल.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ] [ 143 ]