डॉ. दीपक माने -
मानवी जीवनात वेळ (काळ) अमूल्य आहे. गुहा ते अंतराळ अशा प्रगतीत माणसाने निरीक्षण, तर्क यासोबत प्रयोग, प्रचितीद्वारे मोठी मजल मारली आहे. वेळ (काळ) मोजण्यासाठी इतर गोष्टींप्रमाणेच जसे अंतरासाठी किमी, वजनासाठी केजी तसे वेळेसाठी दिवस फक्त एक एकक आहे. अर्थात, पृथ्वीचा स्वतःभोवती फेरी पूर्ण करण्याचा काळ – दिवस – २४ तास (होरा), सूर्याभोवती फिरण्याचा काळ वर्ष – ३६५ दिवस. हे सर्व मानवाने आकाशातील ग्रह, तारे यांचे सतत, सर्वत्र, अचूक, निरीक्षण, प्रयोग, प्रचितीद्वारे अनुमान काढलेले सत्य आहे. हे वैज्ञानिक दृष्टिकोन पूरक आहे. परंतु काही हितसंबंधी, मतलबी लोकांनी त्यात भीती, विचारभ्रम यांचा समावेश केला.
योग – हा पाच अंगी पुस्तिकेतील पाच अंगांपैकी एक जसे तिथी, नक्षत्र, वार, करण, योग. हा सध्या व्यवहारात वापरात नसलेला एक भाग आहे. योग म्हणजे, सूर्य आणि चंद्राचे रेखांशाच्या बेरजेचे २७ समभागात विभाजून येणारा भाग होय. अर्थात त्याला आपण गणिती सूत्र म्हणू हवे तर. या पाच अंगी पुस्तिकेतील सूर्योदय, सूर्यास्त, ग्रहणे, अमावस्या, पौर्णिमा अशी मोजकीच माहिती विज्ञानाधारित आहे. इतर बहुतांश माहिती विचारभ्रम निर्माण करून, भीती, संकटे यांचे वर्णनाने व भ्रामक अवैज्ञानिक गोष्टींची रेलचेल आहे. या माहितीची कालसापेक्ष पुनर्विचार, पुनर्लेखन, चिकित्सा झालेली दिसत नाही. वास्तविक, खगोल विज्ञानाच्या बाजारातील हा काळाबाजार आहे असेच म्हणावे लागेल. आपण काही योग नमुने तपासू.
१) गुरुपुष्यामृत योग.
२) सिंहस्थ पर्वणी योग.
१) गुरुपुष्यामृत योग –
नावातच गुरु, पुष्य, अमृत हे शब्द आहेत. यातील गुरु म्हणजे गुरुवार, पुष्य म्हणजे पुष्यनक्षत्र, अमृत – अमरत्व प्राप्तीसाठीचे द्रावण, जे पुराणात वर्णिलेले आहे. मानवाच्या उत्क्रांतीच्या लाखो वर्षांच्या इतिहासात एकही व्यक्ती अमर झाल्याचा विज्ञानसिद्ध पुरावा नाही.
खगोलशास्त्रानुसार चंद्र रोज एका नक्षत्राजवळ दिसतो. अर्थात, एका महिन्यात ढोबळपणे प्रत्येक नक्षत्र एक वेळ, गुरुवार महिन्यात ४. एकूण २७ नक्षत्रांपैकी पुष्य नक्षत्र एक आहे. चंद्र गुरुवारी पुष्य नक्षत्रात दिसतो त्या दिवसाला ‘गुरुपुष्यामृत योग’ असे म्हणतात. आता गंमत पहा, गुरुवार इतर नक्षत्रावेळी म्हणजे मृग, भरणी इ. असल्यास गुरुमृगामृत, गुरूभरणीमृत योग असे का नाही? तसेच वारांचे बाबतीत आहे. बुधवार, मंगळवार यासाठी बुधपुष्यामृत, मंगळपुष्यामृत योग असे इतर दिवस का नाहीत. यावर योगकर्ते मंडळी मौन बाळगतात.
नक्षत्रे ही तारकापुंज (तार्यांचे समूह) आहेत. अनेक तारे म्हणजे दुसरे सूर्य आहेत. यांच्याभोवती त्यांच्या त्यांच्या ग्रहमाला आहेत. तारकापुंज हे अनेक प्रकाश वर्ष दूर आहेत. त्यांच्या पार्श्वभूमीवर चंद्र हा फक्त ३.८४ लाख कि.मी.वर असल्यामुळे आपणास पृथ्वीवरून दिसतो. पुष्य नक्षत्रातील तारे ५२० प्रकाश वर्ष दूर आहेत. म्हणजे आज आपण जे तारे पाहतो ते ५२० वर्षांपूर्वीचे असतात. यातील जे तारे आहेत त्यांचा आपल्या सूर्यमालेतील आपला ग्रह पृथ्वी, या छोट्या ग्रहावरील भिन्न भिन्न ठिकाणाचे, भिन्न भिन्न वयोगट, भिन्न रचना असणार्या माणसांवर सारखाच परिणाम करतो हे तर्कविसंगत आहे. याविषयी योगकर्ते समर्पक उत्तर देत नाहीत. ग्रंथ प्रामाण्य, शब्द प्रामाण्य, पुराव्याशिवाय विश्वास हेच त्यांचे विवेचन असते.
गुरुपुष्यामृत योग प्रसिद्ध का आहे? कारण या दिवशी सोने खरेदी केल्यास भरभराट होईल, धनदौलत वाढेल, सुखशांतीयुक्त जीवन मिळेल, दैनंदिन संघर्षातून मुक्ती मिळेल अशा प्रकारचे समज लोकांमध्ये पसरवण्यात काही व्यापारी व योगकर्ते अनेक वर्षांपासून यशस्वी झाले आहेत. तर सोनेच का खरेदी ? इतर लोखंड, पितळ किंवा वस्तू का नाही ? असे प्रश्न विचारण्याचे धाडस मोहापायी, भीतीपायी बाधित लोक करत नाहीत. एकाच दिवशी मागणी वाढवून व्यापारी नीतीने जनसामान्यांचे मोठ्या प्रमाणात शोषण होते, दैववाद पसरतो. एका वर्षात ४८ गुरुवारची शक्यता, २७ नक्षत्रांचा विचार करता गणिती नियमाने वर्षातून २-३ वेळा हा प्रयोग शक्य होत असतो.
गुरु या शब्दाला आपल्या संस्कृतीत महत्त्व आहे. जसे गुरुब्रह्म, गुरुमाहात्म्य, गुरुशिष्य आणि अमृत म्हणजे संजीवनी द्रावण यामुळे कॅची लाईन गुरुपुष्यामृत ठरते. मूळ पाच अंगी पुस्तिकेत फक्त पुष्य नक्षत्रात चंद्र लाभदायक एवढाच उल्लेख आहे. काय खरेदी? काय विक्री? असे कुठेही नमूद नाही. सोने खरेदी ही मार्केटिंगची युक्ती ठरते. रोज हातावरचे पोट असणार्यांना हा योग नाही. कारण, दैनंदिन संघर्षात ते लोक व्यस्त असतात. उच्चभ्रूंचे अंधानुकरण, मध्यमवर्ग, पांढरपेशी लोक यासाठी क्षमते अभावीही कर्ज काढून पण हा योग साधण्याचा प्रयत्न करताना दिसतात. करोना काळात कधीही नेहमीची गुरुपुष्यामृत योग वेळची सोने खरेदीस उत्तम दिवस अशी जाहिरात दिसली नाही. याचा अर्थ, हा मार्केटिंगचा प्रयोग असल्याची जाणीव विवेकी मनाला होते .
२) सिंहस्थ पर्वणी योग –
गुरु ग्रहाला (येथेही गुरु शब्दाचे वलय) सूर्याभोवती फेरी पूर्ण करण्यास बारा वर्षे लागतात. म्हणजे, तो प्रत्येक राशीमध्ये एक वर्ष दिसतो. नावानुसारच गुरु ग्रह सिंह राशीत ज्या वर्षी दिसतो तोपर्यंत सिंहस्थ पर्वणी योग असतो. आता शुक्र ग्रह सिंह राशीत, मंगळ ग्रह सिंह राशीत तेव्हा सिंहस्थ का नाही यावर हे योगकर्ते चकार शब्द काढत नाहीत. या योग वेळी फक्त आणि फक्त भारत देशात एक घटना घडते. कुंभमेळा भरणे. कुंभमेळा म्हणजे पुराण कथेनुसार देव-राक्षस समुद्रमंथनावेळी आपले वैर विसरून एकत्र आले, त्या वेळी सागरातून अमृत द्रव्य असणारा घडा (कुंभ) बाहेर आला. तो कुंभ मिळवण्यासाठी ‘दानव- देव’ यांच्यात झटापट झाली. त्यामुळे काही अमृत द्रव्य थेंब पृथ्वीवरील फक्त भारतात नदीच्या संगमावरच आणि फक्त तीन ठिकाणी पडले. त्यापैकी आपल्याकडे नाशिक येथे संगमावर पडल्यामुळे बारा वर्षांनी तेथे कुंभमेळा भरतो. त्या वेळी लाखो लोक पावन, शाही स्नान करण्यासाठी डोंगर, दर्या, पर्वत, गुहा, नागरी वस्तीतून येतात. कारण हजारो वर्षांपूर्वी पडलेले पावन अमृताचे थेंब महापूर, वादळे, आपत्कालीन संकटे यामधूनही अद्याप तिथे आहेत व त्या ठिकाणी स्नान केले तर आपली गत पापे नष्ट होतात अशी धारणा (श्रद्धा) मनोमनी पकी करण्यात काही घटक यशस्वी झाले आहेत.
महाराष्ट्राचा विचार केला तर ही भूमी युगपुरुष शिवराय तसेच महान संत (ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, गाडगेबाबा इ.), समाजसुधारक (महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भाऊराव पाटील इ.) यांनी विचारांची मशागत करून मानवता, बंधुत्व, समानता आधारित कृतिशील जडणघडण केली आहे. यातील किंवा अशा विचारांच्या कोणीही शाही स्नान करण्यासाठी कुंभमेळ्यात गेल्याची इतिहासात नोंद नाही.
आपल्या महाराष्ट्रातील नाशिकचेच ज्ञानपीठ विजेते, कविश्रेष्ठ मा. वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांनी सिंहस्थाबाबत पर्वणी या कवितेत सविस्तर वर्णन केले आहे. त्यातील काही ओळी पुढे देत आहे.
व्यर्थ गेला तुका | व्यर्थ ज्ञानेश्वर ॥
रस्तोरस्ती बैराग्यांचा ढीग | दंभ शिगोशिग ॥
साधू नाहतात| साधू जेवतात|
साधू विष्ठतात| रस्त्यावरी॥
यांच्या लंगोटीला| झालर मोत्यांची ॥
चिलीम सोन्याची| त्यांच्यापाशी ॥
गांजाची आयात | टनावरी ॥
शिवकालीन संत तुकाराम लिहितात-
आली सिंहस्थ पर्वणी| न्हाव्या भटा झाली धनी॥
अंतरी पापाच्या कोडी| वरिवरी बोडी डोई दाढी॥
बोडिले ते निघाले| काय पालटले सांग पहिले (वहिले)॥
पाप गेल्याची काय खुण| नाही पालटले अवगुण ॥
(सिंहस्थ पर्वणी वेळी केस, दाढी कापणारे, पूजापाठ करणारे यांची धनी होते. मनातील पाप केस कापून जाणार का? दुर्गुण तसेच राहतात, त्याचा काय उपयोग आहे.)
आपल्या देशात संविधानाचे नियमाने कारभार चालतो. त्यामध्ये अमली पदार्थ बंदी कायदा आहे. शेतकर्यांनी शेतात अमली पदार्थ (गांजा) लागवड केल्यामुळे अटक किंवा गांजा बाळगल्यामुळे तरुणास अटक अशा बातम्या आपण वाचतो. पण सिंहस्थ वेळी कुसुमाग्रज प्रत्यक्षदर्शी लिहितात, ‘टनाने गांजा येतो, रस्त्यावर ओढला जातो, लोक भिन्न भिन्न अवस्थेत फिरतात, संस्कृतीचे रक्षक म्हणणारे मंदिरात ड्रेस कोड लावतात तेच ‘सिंहस्था’त भिन्न स्थितीतील विवस्त्र लोकांच्या दर्शनाला गर्दी करतात. त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन अनेक मरतात. करोडोंची उलाढाल होणार्या सिंहस्थ पर्वणीमध्ये या देशातील नियमित कर भरणारे करदाते त्यांचा पैसा भिन्न अवस्थेतील, अस्वच्छ, दांभिक दिसणार्या लोकांवर खर्च होताना गप्प बसतात याचे नवल वाटते. सर्व वेळा व सर्व दिशा शुभ चांगल्या असतात, हे सांगणारे संत तुकोबांचा हा अभंग-
हरीच्या दासां| शुभ काळ दाही दिशा ॥
-डॉ. दीपक माने
लेखक संपर्क : ९८६०७ ६८८७१
