डॉ. दीपक माने - 9860768871

“आकाशात हिंडणारे वायूचे गोळे पृथ्वीवर हिंडणार्या माणसाच्या कर्तव्यावर परिणाम करतात असे समजणे हा मानवी मनाला जडलेला रोग आहे. माणसाचे सामर्थ्य कमी करणारी यासारखी दुसरी भयावह गोष्ट नाही.” असे अमेरिकेतील आपल्या गाजलेल्या भाषणात स्वामी विवेकानंदांनी म्हटले होते, त्याला आता बराच काळ लोटला. त्या आधीही अगदी तुकारामासारख्या संत श्रेष्टापासून ते बहिणाबाईंसारख्या कवयित्री पर्यंत आपआपल्या परीने त्यातील दैववादावर झोड उठविली. जगभरातील शास्त्रज्ञांनी त्यातील फोलपणा शास्त्रशुद्ध पद्धतीने दाखवून दिला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या विवेकवादी संघटनांनी अनेक ज्योतिषांची बदमाशी उघड केली. तरीही आज २१व्या शतकात फलज्योतिषाच्या या मृगजळामागे माणसांचे धावणे काही कमी झालेले नाही. मानवी मनाला जडलेला हा रोग काही नष्ट झालेला नाही. त्यामुळे आपल्यालाही या थोतांडाचे भांडाफोड करावे लागत आहे. ते भांडाफोड करण्याचे काम या सदरातून वर्षभर आपण करणार आहोत.
ज्योती म्हणजे दिवे. आदिम काळापासून मानवाला कुतूहलापायी भवतालचे निरीक्षण, आकलन करण्याच्या सवयीमुळे आकाशातील दिसणार्या चांदण्या/तारे हे आपल्या घरातील दिव्यांप्रमाणे त्याला भासले. जशी आपली निवासस्थाने आहेत तशीच ती निवासस्थाने असणार असे त्याला वाटू लागले. त्या दिव्यांबाबत/तार्यांबाबतच्या आकलनामधूनच काही चांदण्यांचे समूह त्याला तात्कालीन ज्ञात असणार्या आकृती आणि पक्षी, प्राणी यांचे आकार वाटले. त्यांचे त्यांनी नामकरण केले उदा. मेष (मेंढा), वृषभ (बैल), कर्क (विंचू), मृग (हरीण), मीन (मासा), तूळ (तराजू), धनु (धनुष्य).
जगभरातील भिन्न प्रदेशातील लोकांच्या सततच्या निरीक्षणानुसार त्यांना असे समजले की, काही चांदण्यासमूहाच्या जवळ चंद्र आला की थोड्या दिवसातच पाऊस सुरू होतो, मग त्यापूर्वी शेतीची कामे उरकणे इष्ट. हे निरीक्षण कालमापनासाठीही उपयुक्त होऊ लागले. प्राप्त लिखित माहितीद्वारे ४,२०० वर्षांपूर्वी बॅबेलियोन संस्कृतीत अशा प्रकारच्या नोंदी आढळून आल्या आहेत.
रात्रीच्या आकाशात ठरावीक मार्गाने जाणार्या व जागा न बदलणार्या लुकलुकणार्या चांदण्या (तारे)आणि ठरावीक मार्गाने न जाता, जागा न बदलणार्या लुकलुकणार्या चांदण्या (भटके ग्रह) असे ढोबळ विभाजन त्या काळच्या लोकांनी केले.
आकाशातून सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसतो त्या भासमान मार्गाला आयनिक वृत्त म्हणतात. याचे दुतर्फा असणारे (तारे/ चांदण्या) यांना राशी/नक्षत्र असे संबोधले. सूर्य या एका नक्षत्रात साडेतेरा दिवस दिसतो. आयनिक वृत्ताशेजारी समांतर काल्पनिक रेषा काढल्यास १८ अंश रुंदीचा काल्पनिक पट्टा दिसतो. यातून चंद्र आणि काही स्थिर चांदण्या (ग्रह ) गगन मार्गाने जाताना दिसतात, त्या वर्तुळाच्या परिघावर चांदण्या चिकटवल्यासारख्या दिसतात त्याला नक्षत्रचक्र म्हणतात. परकीय लोकांनी ८८ तारका संघ निश्चित केले आणि आकाशाचे बारा भाग पाडले (राशी). त्यांच्या गगन मार्गास राशीचक्र म्हणतात. आपल्याकडे २७ भाग पाडले ती (नक्षत्र). चंद्र रोज एका नक्षत्रात असतो. यावरून राशी या परकीय आहे हे दिसून येते.
या सर्व आकारांना एकत्रित आकलन करताना त्यामध्ये गणित (कालमापन व अंतरे यांचा अंक अभ्यास), खगोल (आकाशस्थ चांदण्या/तारे यांचा अभ्यास) व फलज्योतिष(तारकांचे माणसावर होणारे परिणाम सांगणारे तंत्र) या विषयांचा समावेश होता. जसे जसे सविस्तर नोंदी, आकलन वाढले आणि विज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरला यामध्ये लख्खपणे गणित व खगोल हे सर्व कसोटीवर- निरीक्षण, तर्क, अनुमान, सार्वत्रिक प्रचिती, वारंवार अचूक नोंदी यावर टिकून राहिले; परंतु मानवी दैनंदिन जीवनात घडणार्या वैयक्तिक, सार्वजनिक गोष्टी या आकाशातील तार्यांचा त्यांच्या स्थानावर अगर दृश्य स्वरूपावर अवलंबून असतात किंवा त्यानुसार प्रत्येकाचे आयुष्य ठरते, बदलते आणि या तार्यांना पृथ्वीवर काही विधी, कर्मकांडे करून शांत करणे किंवा मनाप्रमाणे बदल घडविणे या बाबी कोणत्याही कसोटीवर टिकल्या नाहीत. याच्या परिणामी जगभरातील लोकांनी ही तथाकथित दर्शवलेली कालमापे, चांदण्या, तारे यांची माहिती पूर्णपणे वैज्ञानिक निकषांवर न टिकल्याने नाकारली गेली.
या सर्व प्रदीर्घ कालखंडामध्ये काही चांदण्यांच्या आदिम काळातील नोंदींवरून काही पुस्तके पाच अंगे सांगत प्रस्थापित झाली होती. त्यांनी सुधारित ज्ञान नाकारत किंवा आधुनिक ज्ञान मान्य न करत त्या ज्ञानाची चिकित्सा करणे ही नाकारले. त्यातूनच काही भासमान/काल्पनिक गोष्टींच्या कथनाने भीतीदायक परिणाम सांगणारे खडाष्टक, मृत्यूयोग, कालसर्पयोग, भयंकर साडेसाती, ग्रहांची पीडा, कडक मंगळ अशा संकल्पना (या सर्व बाबत आपण पुढे विस्ताराने पाहणार आहोतच) मांडून आयुष्यावर दुष्परिणाम घडविणारे भावी जीवनातील प्रसंग, असंबद्ध कथा, कहाण्या आणि त्यावरील तोडगे कथन करत उभे राहिलेले ज्ञान म्हणजेच फलज्योतिष होय.
ज्योतिषांची संपूर्ण मदार ग्रह/राशी/नक्षत्रे यावर आहे. विज्ञानाने सिद्ध केले आहे की गृह/तारे हे पृथ्वीपासून कोटी कोटी कि.मी. अंतरावर आहेत. त्यांचा पसारा विश्वात मुळातच अनेक दीर्घिका, लाखो सूर्य व त्यांच्या सूर्यमाला अशा स्वरूपाचा आहे. आपल्या आकाशगंगेत सूर्यापेक्षा मोठे २०० तारे आहेत. तरीही हे तारकासमूह आपले रोजचे जीवन नियंत्रित करतात हे मानणे म्हणजे वास्तव नाकारणे. ते एका एका व्यक्तीला शोधून त्यावर विपरीत किंवा चांगला परिणाम करण्यासाठी वागतात हे मान्य करणे बुद्धीला न पटणारे आहे.
ज्योतिष सांगते की ग्रह, राशींचा परिणाम व्यक्तीच्या जन्माचे वेळेवर ठरतो. जन्माच्या वेळा सात आहेत त्यापैकी कोणती नक्की जन्मवेळ हे ज्योतिष व तत्सम तज्ज्ञ ठामपणे सांगू शकत नाहीत. त्यामुळे जन्माच्या वेळेवर भावी आयुष्य ठरते, बदलते हे ठामपणे खोटे आहे.
कालमापनासाठी खगोल विज्ञानाने आपली चंद्र गणना न घेता सूर्य कालमापन गणना घेतली. कारण आपले वर्ष ३५४ दिवसांचे आहे व एक वर्ष ३६५ दिवसांचे असते, म्हणजेच सूर्याभोवती पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्यास लागणारा वेळ यामध्ये ११ दिवस आपल्या कालमापनात कमी पडतात म्हणून दर तीन वर्षांनी अधिक मास नावाने एक सोय निर्माण करावी लागली आहे. सौर कालमापनामध्ये चार वर्षातून फक्त एक दिवस फरक पडतो म्हणून ते जास्त अचूक मानले गेले आहे. त्यानुसारच पृथ्वीवरून ग्रहावर उपकरणे, साहित्य उतरवणे यांचे अचूक हिशेब करता येत आहेत.
आजच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक असुरक्षेच्या परिस्थितीत ज्योतिष विचारांना समाजात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या तथाकथित तज्ज्ञ मंडळींनी जन्मापासूनच नव्हे तर गर्भावस्थेपासून ते मृत्यूपर्यंत आणि त्यानंतरचे अनेक विधी यामध्ये अनेक फलिते सांगून समाजाला जखडून एक प्रकारे व्यवसाय मांडला आहे. त्यावर गर्भापासून एका एका कर्मकांडाचे सलग खंडन- मंडण करणे विवेकी मनाचे काम आहे. संविधानामध्ये नागरिकांची कर्तव्ये नमूद आहेत, त्यात ५१(ए) एच. कलम सांगते प्रत्येक नागरिकांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार, प्रसार, अंगीकार करावा. या कर्तव्याला स्मरूनच आपण या सदरातून फलज्योतिषाची चिकित्सा करणार आहोत. आपण सर्व जण या कृतिशील प्रबोधनाचे सहयात्री होऊ.
-डॉ. दीपक माने
लेखक संपर्क : ९८६०७६८८७१