आबा गोविंदा महाजन -
सिटी बस स्टँडवर बराच वेळ उभा होतो. मग केव्हाशी केव्हा धानोरा बस लागली. घाईघाईत सीट पकडली. खिडकीजवळची सीट मिळाल्याने काय तो आनंद. अहाहा. चेहरा पुलकित झालेला. कंडक्टर ‘तिकीट.. तिकीट’ असं बोलत माझ्याजवळ आल्यावर मी खिशात हात घातला. तिकीट काढलं. बस शहराचा रस्ता कापत सुसाट पळत होती. पहिले मोहाडी गाव आलं, मग निम्म्याहून अधिक पॅसेंजर उतरले. बसने पुन्हा जोर पकडला. दोन-तीन ठिकाणी वळणावळणाचे रस्ते पार केले. रेल्वे बोगदा ओलांडला. मग काही हिरवीगार शेतं पाहण्यात वेळ गेला. केळीचा बागा बहरल्या होत्या. काही वेळात शाळेच्या इमारतीवर जि. प. मराठी मुलांची शाळा, धानोरा असा ऑईल पेंटने रंगवलेले नाव दिसलं. मग पाराला वळसा घालून कचकन ब्रेक दाबत बस थांबली. उतरलो. या भागात मी पहिल्यांदाच आलो होतो. नेमकं इथून पुढं कसं जायचं ते माहीत नव्हतं. त्यामुळे कुणाला तरी विचारावं लागणार होतंच. टपरीजवळ उभ्या असलेल्या एका माणसाजवळ गेलो. विचारपूस केली. तेव्हा तो समोर हात करत म्हणाला, “त्या तिकडे उतरतीवरून खाली गेलं की गिरणा लागेल. गिरणा नदीचं पात्र विस्तीर्ण आहे बरं का, शिवाय त्यात साधारण गुडघाभर वाहतं पाणी आहे. काही ठिकाणी जरा गुडघ्यापेक्षाही कमी असेल. नाही असं नाही. पण घाबरू नका हं. गिरणा ओलांडली ना की समोरच खेडी लागेल. खेडी. खेडी खुर्द. हं. मग त्याने तोंडात पान कोंबलं. आता तो पुढं काही बोलणार नाही, असं समजून मी काढता पाय घेतला.
मग मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या दिशेने चालू लागलो. एक मोठा उतार उतरून खाली काठावर आलो. कच्चा रस्ता होता. फफुट्याने पाय पूर्ण माखले होते. तसाच चालत राहिलो. पाहिलं तर नदीचे पात्र खरोखर विस्तीर्ण होतं. नदीकाठाजवळ काही मुलं मासे पकडण्याच्या कामात गुंग होती. तर काही मुलं पाण्यात तिथल्या तिथे उड्या मारत पाणी उडवत होती. थोडा वेळ काठावर तसाच उभा राहिलो. पाण्यात पाय बुचकळले. वाहतं पाणी थंडगार होतं. फफुटा वाहून पाय स्वच्छ झाले. नदीच्या पाण्यात एकट्याने चालायला हिंमत होत नव्हती. समोर पाहिलं. तर काठावर उंच जागी एक टुमदार गाव वसलेलं. हेच आपलं इच्छित स्थळ. थोडी तिरपी नजर टाकली तर दुसरं गाव नजरेच्या टप्प्यात आलं.
थोडा वेळ काठावर थांबलो. तिथल्या तिथं घुटमळत राहिलो. त्यानंतर दोन माणसं, एक बाई, दोन तरुण मुलं, आणि एक म्हातारे आजोबा काठावर आले. त्यांना देखील खेडीला जायचं होतं. बरं झालं. सोबत मिळाली. जीवात जीव आला. मग मी त्यांच्या मागोमाग जाण्याचा निर्धार केला. ती सगळी मंडळी सराईतपणे पाण्यात उतरून चालू लागले. ते झपाझप पाणी कापत चालत होते. मी मात्र हळुवार पावलं टाकत चालू लागलो. वाळूत पाय रुतत होते. पायाखालून पाणी रपारप वाहात नव्हतं, तर संथपणे वाहात होतं. काही ठिकाणी हिरवं शेवाळ साचलं होतं. हिंमत करत चालत होतो. चुबुक डुबुक असा आवाज येत होता. अचानक नदीला पूर तर येणार नाही ना, अशी उगाच शंका मनात येत होती. कारण ऑगस्ट महिना सुरू होता, म्हणजे पावसाळ्याचे दिवस होते.
साधारण २५ ते ३० मिनिटांनंतर पाण्यामधून चालत चालत मी पलीकडच्या काठावर पोहचलो. जीव मुठीत धरून नदी क्रॉस केली. गुडघ्यापर्यंतची पँट पाण्याने चिंब ओली झाली होती. अशा स्थितीत शाळेत जाणं योग्य नव्हतं. म्हणून मी मुद्दामहून काठावर थांबत टाईमपास करू लागलो. पँट केव्हा सुकेल, याची वाट पहात होतो. नदीकाठावर काही बाया गोधड्या धुण्याच्या कामात व्यस्त होत्या. मधूनच हसत होत्या, बोलत होत्या. काही पुरुष मंडळी झावरी सुकवायच्या कामात निमूट व्यस्त होते. मघाशी माझ्या पुढे असलेली मंडळी आता बरेच दूर निघून गेले होते. काठावरून उगाचच इकडे तिकडे पाहू लागलो. लांबवर एक माणूस हवा भरलेल्या ट्यूबवर बसून पाण्यावर तरंगत मासे पकडत होता. त्याचे पूर्ण लक्ष पाण्यातल्या छोट्या छोट्या माशांवर होतं. त्याची उगाच गंमत पाहू लागलो. मधूनच आपलं पँटकडे पाहणं सुरू होतं.
तेवढ्यात समोरून माझ्याकडे चालत एक म्हातारा माणूस आला. उंची जेमतेम साडेचार फूट असेल. पांढरे शुभ्र धोतर, डोक्यावर गांधी टोपी. शर्टाच्या खिशात एक पेन. एका हातात धोतराचा सोगा धरून माझ्याजवळ येऊन थांबला. “रामराम” असं हसर्या चेहर्याने बोलून माझ्याकडे पहात राहिला. मी देखील “रामराम” म्हणालो. “खेडी मध्ये जायचं आहे का? कुणाकडे जायचं आहे? चला माझ्या सोबत मी घेऊन जातो तुम्हाला. मी इथलाच हे. खेडीचाच हे. तुम्ही जयगावचे दिस्ता.” टोपी सावरत बोलत होता.
मी म्हणालो, “मला झेडपीच्या मराठी शाळेत जायचं आहे.”
“झेडपीच्या शाळेत? हेडमास्तरांचे तुम्ही कोणी नातेवाईक बितेवाईक आहे का?”
मी हसलो. म्हणालो, “माझी बदली झाली आहे, खेडीच्या शाळेत.”
मग हे ऐकून ते तोंडभर हसले. हसताना त्यांचे दात अधिकच पांढरेशुभ्र दिसत होते. रंगाने ते सावळे होते असे मात्र म्हणता येणार नाही. गोरेही नव्हते. माझ्याकडे पहात ते म्हणाले, “एक सांगू का तुम्हाला? सांगू?”
मी म्हणालो, “सांगा.” माझ्याकडे बारीक डोळे करत ते बोलू लागले.
“तुम्ही तर गुरुजी वाटतबी नाही. म्हणजे कसंये ना की, आमच्याकडे सर्वच गुरुजी वयस्कर आले आहेत. म्हणून म्हटलं.”
मी मान हलवली.
“चला मग माझ्यासोबत. या हं. या.” असं म्हणून ते पुढं चालू लागले.
रस्त्यात चालता चालता येणार्या जाणार्या प्रत्येकाला स्वतःहून ते रामराम करत होते. “नवीन गुरुजी आले आहेत. त्यांना शाळा दाखवतो”, असं स्वतःहून सांगत होते. न थांबता त्यांचं बोलणं सुरू होतं. तोंडाचा पट्टा एकसारखा सुरूच होता. तेव्हा मला कळलं की, ते पंचवीस-तीस वर्षे ग्रामपंचायत शिपाई होते. आता रिटायर झाले असून पिठाची गिरणी चालवतात. गावातून चालत येऊन ग्रामपंचायत कार्यालयाच्या थोडं पुढं आल्यावर मुलांची किलबिल ऐकू आली. मग थोड्या वेळाने शाळा आली. मुख्याध्यापकांना ते भेटले. म्हणाले, “मी नदीकाठावर उभा होतो. या नवीन गुरुजींना पाहिलं. चौकशी केली आणि घेऊन आलो थेट शाळेत. थोडा थोडा चहा आणू का? आणतो.”
थोड्या वेळाने एका किटलीमध्ये चहा घेऊन ते आले देखील. “तुम्ही चहा प्या. तोपर्यंत एक गोष्ट सांगू का? सांगतोच. मग आम्ही चहा पीत असताना त्यांनी एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. तर एक माणूस असतो काय? हां. एक माणूस असतो आणि त्याला दोन बायका असतात, किती? दोन.” मग पहिल्या बायकोमुळे त्याची कशी फजिती होते ते रंगवून सांगू लागले. दोन-तीन मिनिटांचीच गोष्ट होती. गोष्ट संपली. आम्ही खूप वेळ हसलो. हसत राहिलो. मग म्हणाले, “पुढच्या वेळी दुसर्या बायकोमुळे कशी फजिती होते त्याची सांगेल गोष्ट. मग येऊ का आता? येतो.” त्यांची सांगण्याची लकब भारी होती.
“आवडली गोष्ट?”
मग ते निघून गेले. अधून मधून ते बरोबर मधल्या सुट्टीच्या वेळी यायचे. जेवण आटोपून आम्ही सगळेजण व्हरांड्यात बसलेलो असायचो. आमच्या जवळ येऊन उभ्या उभ्याने ते आम्हाला एखादी छोटीशी गोष्ट सांगायचे. खूप हसवायचे. बहुधा त्यांच्या सगळ्याच गोष्टी विनोदी असायच्या. आम्ही पोट धरून हसायचो. गोष्ट सांगण्यातला त्यांचा हातखंडा कौतुकास्पद होता.
असा हा कडूबा. सुरुवातीला अतिशय किरकोळ वाटणारा हा माणूस तसा खासच होता. अचाट कल्पनाशती लाभलेला. चिकित्सक स्वभावाचा. त्यांचा नातू माझा विद्यार्थी. तो कधी गैरहजर असला ना की मी निरोप पाठवायचो. तेव्हा थोड्याच वेळात त्याला सोबत घेऊन कडूबा हजर. त्यांचे दोन्ही हात, चेहरा पूर्ण पिठाने भरलेला. गिरणीतून थेट शाळेत. म्हणायचे, “याला शिक्षा करत जा गुरुजी. घाबरायचं नाही. जर बरोबर अभ्यास केला नाही की, रागवत जा. काही टेन्शन नाही. कुणीच तुम्हाला काही बोलणार नाही. अजिबात घाबरायचं नाही. येऊ का? येतो. शाळा सुटल्यावर गोठाण जवळ आल्यावर एक भारी गोष्ट सांगतो. आता जातो.”
मग शाळा सुटल्यावर ते वेळेवर आले आणि उभ्या उभ्या एक गोष्ट सांगितली. एक जावई लग्नानंतर पहिल्यांदा सासुरवाडीस गेल्यावर त्याची कशी धमाल उडते ते हावभावासह सांगत होते. ते ऐकून आम्ही पोटभर हसलो. मग तुरुतुरु चालत कडूबा गिरणीकडे निघून गेले.

कडूबा भेटले की, मन कसं प्रसन्न होऊन जायचं. त्यांनी अनेक सरपंच, उपसरपंच पाहिले होते. त्यामुळे त्यांना त्यांच्या अनेक भानगडी माहीत होत्या. ते मग नाव न सांगता त्यांच्या गोष्टी सांगायचे. हे मात्र कधी कधीच. एरवी मात्र जनरल गोष्टी सांगायचे. परंतु प्रत्येक वेळी नवीन गोष्ट. विनोदी गोष्ट. एकही गोष्ट त्यांनी कधी रिपीट केली नाही. एकदा त्यांनी अशीच एक छोटीशी गोष्ट सांगितली, एका चतुर माणसाची. एक धूर्त माणूस होता. अनेकांना उल्लू बनवून तो पैसा कमवायचा आणि अनाठायी खर्च देखील करायचा. माझी बायको हॉस्पिटलमध्ये आहे, असं सांगून त्याने आतापर्यंत अनेकांकडून मदत मिळवली. परंतु एके दिवशी त्याचे बिंग फुटले. विचारा कसं?” आम्ही चूप. मग कडूबा म्हणाले, “शेरास सव्वाशेर भेटतोच. तसंच झालं. नेमका काय आजार आहे, हे पाहण्यासाठी तो व्यती हॉस्पिटलमध्ये गेला. तेव्हा कळलं की त्या चतुराची बायको तिथं नर्स आहे नर्स.” खुदकन हसत मग कडूबा निघून गेले. ही गोष्ट फारच रंजक वाटली, त्यापेक्षा ती खुलवून सांगण्याची कडूबांची रीत मला आवडली.
गावात काही कार्यक्रम असला की, आमच्या सर्व शिक्षकांना पाहून कडूबा लगेच जवळ येणार. पहिल्या पंगतीत जेवायला बसवणार. “गुरुजींना बुंदी दे, बुंदी. भात टाक, तूप टाक, अजून दोन चमचे टाक बरं. ए वरणवाला, तूच. इकडे बघ, आण बरं वरण, टाक गुरुजींना. टाक. सांडू नको ना भावड्या.” असं वाढपीला सांगणार.. कमरेवर हात ठेवून सूचना करत राहणार. कडूबा म्हणजे अजब वल्ली.
शनिवारची अर्ध्या दिवसाची शाळा होती, घंटा वाजली, मुलं घरांकडे पळत सुटली. त्या दिवशी ते शाळेसमोरून जाताना दिसले. मग आम्ही हाक मारून त्यांना बोलावलं. रस्त्यावरून एक हात वर करून शून्य मिनिटात आलो, आलो, असं बोलले. नेहमीप्रमाणे धोतराचा सोगा एका हातात धरून हसत आले. दिसायला एकदम छोटूशी मूर्ती, पण कायम हसतमुख राहायचे. आल्याबरोबर त्यांनी राम राम केला. “काय कसं काय, आनंदात ना! वाजली घंटा, मिटला तंटा. शाळा सुटली आता. छान. काय गोष्ट सांगू? सांगतो. कोणती गोष्ट सांगू आज”, असं पुटपुटायचे. मग सुरू पडायचे. आज देखील ते एखादी कॉमेडी गोष्ट सांगतील अशी आम्ही मनाची तयारी केली होती.
त्यांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली. म्हणाले, “गोष्टीचं नाव आहे ‘घंटा.’ मन लावून ऐका बरं का. तर एका गावामध्ये पुंडलीक नावाचा माणूस राहायचा. कोण? पुंडलीक. पोटाला चिमटा देऊन त्याने दुमजली घर बांधलं, मुलाला शिकवलं. नोकरीला लावलं. त्याची बायको जिवंत होती, तोपर्यंत सर्व काही ठीकठाक होतं. परंतु बायको मेल्यानंतर तो खचला. मुलगा आणि सून त्याच्याकडे लक्ष देईना. पुंडलिकाचं वय झालं होतं. घरात नातू असल्यामुळे त्यांना बरं वाटत होतं. तेवढाच एक जगण्याला आधार. एकदा काय झालं, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये नातू मामाच्या गावी गेला. इकडे पुंडलीक आजारी पडले. औषधोपचार, सलाईन लावले तरी काही फरक पडेना. थोडं जरी चाललं तरी त्यांचे पाय दुखायचे. अशतपणामुळे तोंडातून शब्द देखील फुटत नव्हते. मग त्यांची वरच्या मजल्यावरील खोलीमध्ये व्यवस्था करण्यात आली. त्यांच्या मुलाने खोलीच्या दरवाजाजवळ एक घंटा बांधली, त्याची दोरी बेड जवळ होती. पुंडलिकला जर काही लागलं तर तो दोरी ओढून घंटा वाजवायचा. घंटीचा आवाज ऐकून खालच्या रूममधून सूनबाई वर येऊन त्यांना पाणी, जेवणाची व्यवस्था करून द्यायच्या. जेव्हा जेव्हा पुंडलिकास मदतीची गरज लागेल तेव्हा तेव्हा ते दोरी ओढायचे, मग घंटा वाजायची, घंटीचा आवाज ऐकून खालून कोणीतरी येणार आणि बाबांना काय हवं काय नको त्याची विचारपूस व्हायची. दहा-पंधरा दिवस सुरळीत सुरू होतं. परंतु तरीही पुंडलिकाचा आजार काही बरा होईना. अशतपणा वाढत होता. तोंडातून शब्द फुटत नव्हता. अंथरुणावर खिळलेले पुंडोबा मनातून पूर्ण खचले होते. दोरी ओढली की घंटा वाजायची आणि वेळच्यावेळी चहापाणी नाश्ता, जेवण मिळायचं. पुंडलिकाचा मुलगा सकाळी ऑफिसला जाणार. रात्री परत येणार. सूनबाई दिवसभर घरातली कामं आणि टीव्ही सिरीयल पाहण्यात मग्न. पाच-सहा दिवसापासून घंटेचा आवाजच ऐकू येईना. त्यामुळे त्यांना काही लागतंय का? हे पाहण्यासाठी सूनबाई गेल्याच नाहीत. घंटा वाजली तरच वर जायचं, हे समीकरण तिने मनाशी पकं ठरवून घेतलं होतं. नातू मामाच्या गावाहून परत आला. आल्याबरोबर तो आजोबांना भेटण्यासाठी वर गेला. पाहतो तर काय, आजोबा शांतच. बोलेना का चालेना, नातू प्रचंड घाबरला. त्याने आईला बोलावलं, सूनबाई वर आल्या. पाहतात तर काय सासरेबुवा मरण पावले होते. नातू रडू लागला. ते पाहून पुंडलिकाचा मुलगा धावतच वर आला. पाहिलं तर घंटेची दोरी तुटून पडली होती. ते पाहून तो ओक्साबोसी रडू लागला. आपल्या वडिलांच्या मरणाला आपणच जबाबदार आहोत याची खंत त्याच्या मनाला टोचू लागली. पुंडोबा गेल्याचं गावाला समजलं. जो तो हळहळ व्यक्त करू लागला. अंत्यविधीची तयारी करण्यात आली. पुंडोबाचे कपडेलत्ते, गादी, चादर इत्यादी वस्तू जाळण्यासाठी नेण्यात येणार होत्या. घंटा ही. सर्व जण घंटा शोधू लागले, परंतु घंटा कुठे सापडेना. सगळ्यांना विचारून झालं, परंतु घंटा कुठे दिसत नव्हती. शेवटी नातू पुढे झाला व आपल्या वडिलांना म्हणाला, “पप्पा, घंटा माझ्याजवळ आहे. मी ती सांभाळून ठेवणार आहे.. तुमच्या म्हातारपणापर्यंत!”
गोष्ट संपली.”
आज मात्र कडूबाची गोष्ट ऐकताना आम्ही सगळेच भावुक झालो होतो. कडूबा आज देखील एखादी कॉमेडी गोष्ट सांगतील असं मला वाटत होतं, परंतु तसं काही झालं नाही.
मी कडूबाला अनेकदा म्हणायचो, “तुम्ही पुण्या- मुंबईत राहिला असतात तर.. या कथाकथनाच्या स्किलमधून तुम्ही छान नाव आणि पैसा कमावला असता.” तेव्हा कडुबा हात जोडून फक्त गोड हसायचे आणि निघून जायचे. त्यांच्यासारखी निदान एकतरी गोष्ट आपल्याला सांगता यावी असं खूप वाटायचं.
कडूबाला भेटून साधारण वीस-बावीस वर्षे झाली होती. त्यानंतर ते पुन्हा कधीच भेटले नाहीत. तेव्हा ते वयाने साधारणतः साठीच्या आसपास होते. काल परवा मला कुणीतरी बोलता बोलता म्हणालं की खेडीचे कडूबा खूप आजारी आहेत. त्यांच्या मिसेस देखील वारल्या आहेत. खूप खचले आहेत ते. अंथरुणाला कित्येक दिवसांपासून खिळलेले आहेत. इतका गप्पिष्ट माणूस, पण आता अबोल झालाय. वरच्या मजल्यावरील एका खोलीमध्ये बेडवर निजलेले असतात. सतत गोष्टी सांगणारे कडूबा आता बोलतच नाहीत. त्यांना नीट ऐकू देखील येत नाही. फत एकटक वर पहात असतात. त्यांची अशी स्थिती ऐकून मन विषण्ण झालं.
त्यांच्या बेडजवळ घंटा आणि दोरी असू नये, एवढीच मी देवाजवळ प्रार्थना केली.
आबा गोविंदा महाजन, येवला (लेखक साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त बालसाहित्यिक आहेत.) संपर्क : ९४२३४ ९२०८८
