डॉ. नरेंद्र दाभोलकरांना ग्रंथरूपी अभिवादन!

प्रभाकर नानावटी -

डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती ग्रंथमालेतील पाच पुस्तकांचा परिचय

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीसाठी खूपच मोठे योगदान आहे. कृतिशील धर्मचिकित्सा, धर्मचिकित्सेतून मानवता, आध्यात्मिक आकलन, धर्मनिरपेक्षता, आरक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन, विज्ञाननिष्ठ मानवतावाद, लोकशाही प्रबोधन, रचनात्मक संघर्ष, संघटना बांधणी, जातपंचायतीला मूठमाती असे अनेक लेख लिहीत त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची मांडणी केली. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची निकड, समज, त्यावरील आक्षेप व त्याबाबतची वस्तुस्थिती अशा सर्वांगाने  अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याबद्दल वार्तापत्रात त्यांचे लेख आलेले होते.

डॉ. दाभोलकरांच्या निर्घृण खुनानंतर २०१३ ते २०२४ पर्यंतच्या अकरा वर्षांत अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राने दरवर्षी शहीद डॉ. दाभोलकर स्मृतिविशेषांक प्रसिद्ध केले. त्यात व इतर वेळीही अंनिसच्या अनेक कार्यकर्त्यांनी वार्तापत्रात डॉ. दाभोलकरांवर लिहिलेले लेख तसेच अनेक मान्यवर विचारवंत, हितचिंतक, कलाकार, शास्त्रज्ञ यांनी डॉक्टरांवरील प्रेम व्यक्त करणारे, त्यांच्या कार्याबद्दल लिहिलेले लेख, अंनिसच्या समविचारी संस्थांमध्ये त्यांनी केलेल्या कार्याचा परिचय करून देणारे लेख, डॉक्टरांच्या स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांनी केलेल्या भाषणांचे शब्दबद्ध केलेले लेख, दीर्घ काळ चाललेल्या डॉक्टरांच्या खुनाच्या खटल्याचा प्रवास व त्याचा निकाल लागल्यानंतर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांचे लेखही या दहा वर्षांच्या वार्तापत्रात वाचावयास मिळतील. गेल्या दहा वर्षांतील वार्तापत्रातील डॉ. दाभोलकरांच्या संबंधित लेखांचे संकलन डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती ग्रंथमालेतील या पाच पुस्तकांत केले आहे.

अपराजित योद्धा : या पुस्तकातील पानोपानी डॉक्टरांच्या आठवणी उजाळणार्‍या अनेक मान्यवरांचे लेख- प्रतिक्रिया आहेत. ही मान्यवरांची यादी भरपूर मोठी आहे. कॉ. गोविंद पानसरे, बाबा आढाव, भाई वैद्य, पुष्पा भावे, विद्या बाळ, विलास वाघ, सा. रे. पाटील, सुनील देशमुख, प्रकाश आमटे, तारा भवाळकर, सुभाष थोरात, मा. न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, न्यायमूर्ती हेमंत गोखले, न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर इत्यादी विचारवंतांचे लेख या पुस्तकात आहेत.

कलाक्षेत्रातील डॉ. श्रीराम लागू, सदाशिव अमरापूरकर, संजय पवार यांचे लेख आहेत. या सर्वांच्या हृद्य आठवणी वाचत असताना डॉ. नरेंद्र दाभोलकर खरोखरच एक अपराजित योद्धे होते, याचा प्रत्यय येतो.

निर्मळ व निर्भीड : पटकथा लेखक अरविंद जगताप यांनी म्हटल्याप्रमाणे डॉ. दाभोलकरांचा साधेपणा आणि सच्चेपणा त्यांना एवढा भावला की, त्या एका भेटीत ते त्यांचे चाहते झाले. त्यांच्या मते, आतून खूप निर्मळ आणि निर्भीड असायला लागतं आणि असं असण्याचा बाजारात कुठला कोर्स नाही. तसं जगायलाच लागतं.

‘निर्मळ व निर्भीड’ या पुस्तकात किरण माने, गिरीश कुलकर्णी, डॉ. जब्बार पटेल, अमोल पालेकर, जावेद अख्तर, सोनाली कुलकर्णी, नागराज मंजुळे, जितेंद्र जोशी या कलाकारांचे, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. नरेश दधीच, डॉ. हेमू अधिकारी, अरविंद गुप्ता, अच्युत गोडबोले, विवेक मॉन्टेरो इ. वैज्ञानिक क्षेत्रातील दिग्गजांचे व कुमार केतकर, निखिल वागळे, ज्ञानेश महाराव, संजय आवटे, उत्तम कांबळे, प्रतिमा जोशी, संध्या नरे- पवार, राजा कांदळकर, आशिष खेतान, रवीश कुमार इ. पत्रकारांचे लेख आहेत.

जादूटोणाविरोधी कायदा होण्यासाठी डॉक्टर मोठ्या प्रमाणात राजकीय नेत्यांच्या संपर्कात होते. त्यापैकी शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, सीताराम येचुरी यांनीसुद्धा प्रतिक्रिया देऊन आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे. मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अन्वर राजन, राष्ट्र सेवा दलाचे सुभाष वारे, साधनेचे विनोद शिरसाठ, आंध्र प्रदेशातील अथीस्ट सेंटरचे विजयम गोरा, ओडिशा रॅशनॅलिस्ट सोसायटीचे देवेंद्रू सुतार, पंजाबच्या तर्कशील सोसायटीचे रामस्वर्ण लक्खेवाली इत्यादींचे आदरांजलीपर लेख या पुस्तकात वाचावयास मिळतील.

नरेंद्र दाभोलकर स्मृतिव्याख्याने व कार्यक्रम :

या पुस्तकात २० ऑगस्टच्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या स्मृतिदिनानिमित्त दैनिक हिंदूचे संपादक एन. राम यांचे ‘वर्तमान भारतासमोरील तीन आव्हाने’, योगेंद्र यादव यांचे ‘कोरोना के बाद स्वराज का अर्थ’, पी. साईनाथ यांचे ‘भारतीय लोकशाही आणि विवेकवादी शक्तींसमोरील आव्हाने’, डॉ. सदानंद मोरे यांचे ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर हे खरे धर्ममित्र’, व वरुण ग्रोवर यांचे ‘नरेंद्र म्हणून आलात तर दाभोलकर बना!’ अशी दीर्घ भाषणं दिली होती. या पुस्तकात या मान्यवरांनी केलेल्या भाषणांचे शब्दबद्ध केलेले लेख आहेत.

समाजाच्या सद्य:स्थितीवर भाष्य करणारे प्रतीक सिन्हा, आशिष दीक्षित, अलका धुपकर व प्रसन्न जोशी या नव्या दमाच्या पत्रकारांच्या परिसंवादाचे चित्रण या पुस्तकात आहे. अतुल पेठे यांचे रिंगण नाट्याविषयी, अंधश्रद्धेवरील लघुचित्रपट स्पर्धेविषयी नागराज मंजुळे यांचे लेख या पुस्तकात वाचावयास मिळतील.

आम्ही सारे दाभोलकर :

डॉ. दाभोलकरांच्या निर्घृण हत्येनंतर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे ‘आम्ही सारे दाभोलकर’ अशा घोषणा देत माणसाला मारता येते, विचारांना नाही याची आठवण करून देत होते. याच शीर्षकाच्या या पुस्तकात डॉक्टर हयातीत असताना त्यांच्याबरोबर काम केलेले व डॉक्टरांच्या मृत्यूनंतर जोडले गेलेले तरुण वयातील कार्यकर्त्यांची प्रांजळ मनोगते आहेत. डॉक्टरांचे विचार वाचून वा कुटुंबातील कार्यकर्त्यांकडून प्रेरणा घेत ते अंनिसशी जोडलेले आहेत. यांची मनोगते वाचत असताना डॉक्टरांसारखी व्यक्ती इतक्या सर्व लहान मोठ्यांना कशी काय प्रेरणा देऊ शकते, त्यांच्याकडून अपेक्षित काम कसे काय करून घेऊ शकते याचे आश्चर्य वाटू लागते.

            महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्षपद सोडताना डॉ. नरेंद्र दाभोलकर म्हणाले होते, “मी समितीचा कार्याध्यक्ष असलो काय किंवा नसलो काय, माझ्या कार्यकर्त्यांच्या मनात मी आहेच. कार्यकर्ता म्हणून मी अंनिसच्या प्रवाहात आहेच व पुढेही कायमचा राहीनच.”

            आज डॉ. दाभोलकर या जगातच नाहीत, पण डॉक्टरांचे हे वाक्य किती तंतोतंत सत्य आहे याची प्रचिती सर्वच अंनिसचे कार्यकर्ते घेत आहेत. गेल्या १२ वर्षांतील एकही दिवस असा गेलेला नाही की, कार्यकर्त्यांना डॉक्टरांची आठवण झालेली नाही. डॉक्टर कार्यकर्त्यांच्या ‘मनात’ आहेत. कार्यकर्त्यांच्या या आठवणीतूनच डॉक्टरांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू समोर येत आहेत. डॉ. दाभोलकरांच्या  खुनानंतर कार्यकर्त्यांनी ‘आम्ही सारे दाभोलकर’ म्हणत महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम जोमाने आणि चिकाटीने पुढे चालू ठेवले आहे. डॉ. दाभोलकरांच्या मुशीत घडलेले कार्यकर्ते समजून घ्यायचे असतील तर हे पुस्तक तुम्हाला नकी मदत करेल.

डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून खटला आणि निकाल

हे पुस्तक डॉक्टरांच्या खुनाच्या तपासाच्या अकरा वर्षांचा मागोवा आणि सीबीआय न्यायालयाच्या निकालाचा अन्वयार्थ यावर बेतलेला आहे. या विषयावर दाभोलकर कुटुंबीय, खटला लढविणारे अ‍ॅड. अभय नेवगी वकील, प्रा. रावसाहेब कसबे, डॉ. एन. डी. पाटील, निखिल वागळे, किरण मोघे इत्यादींचे लेख या पुस्तकात आहेत. खरे पाहता पाचपैकी दोन आरोपींना शिक्षा दिलेला निकालच आश्चर्यचकित वाटणारा आहे. पोलीस तपासातील ढिलाई वा राजकीय दबावामुळे अलीकडील काही न्यायालयीन निकालांचा मागोवा घेतल्यास बहुतेक निकालात हिंदी चित्रपटातील डायलॉग प्रमाणे सर्वचे सर्व आरोपी ‘बाइज्जत बरी’ झालेले असतात. तरी डॉक्टरांच्या या खटल्यात निदान दोघांना तरी शिक्षा झाली, हेही नसे थोडके!

डॉ. नरेंद्र दाभोलकर हे २० ऑगस्ट २०१३ या दिवशी मॉर्निंग वॉकला गेलेले असताना सकाळी ७-१५ च्या सुमारास त्यांचा खून झाला. त्यांच्या खुनाला जवळपास ११ वर्षे पूर्ण झाल्यानंतर या खुनाच्या खटल्याचा न्यायालयीन निकाल दि.१० मे २०२४ लागला. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना प्रत्यक्ष मारेकरी म्हणून न्यायालयाने दोषी ठरवले. या व्यापक कटामागील सूत्रधार अजूनही पकडले गेलेले नाहीत. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून हा ‘विचाराला विचाराने उत्तर न देता, आम्ही माणूस मारून विचार संपवू, तेव्हा खबरदार!’ असे सांगण्याचा हा प्रयत्न होता.

प्रत्येक पुरोगामी वाचकांच्या संग्रही असायलाच हवेत अशी ही पाच पुस्तकं आहेत.

प्रकाशक - अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र
पाच पुस्तकांची एकूण किंमत रु. १०००/-
सवलतीच्या दरात रु. ५००/-
संपर्क – ९९७०१७४६२८


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ]