सौरभ बागडे -
प्रत्येक विद्यापीठाला एक कुलगुरू असतो आणि सर्व विद्यापीठांचा एक कुलपती असतो. तसे सर्व समाजसुधारक एका एका विद्यापीठाचे कुलगुरू मानले तर समाजसुधारणेच्या विद्यापीठांचे कुलपती हे महात्मा जोतिराव फुले आहेत.
-डॉ. नरेंद्र दाभोलकर
गोपाळ गणेश आगरकर यांनी सामाजिक सुधारणांच्या संबंधाने भूमिका असणार्या व्यक्तींचे वर्गीकरण तीन प्रकारांमध्ये केले आहे. एक, कर्ते सुधारक. दोन बोलके सुधारक. तीन सुधारणा निंदक. महात्मा जोतिराव फुले हे सर्वार्थाने कर्ते सुधारक आहेत. यंदा महात्मा जोतिराव फुले यांचे जन्म द्विशताब्दी वर्ष ११ एप्रिलपासून सुरू होत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने म. फुले यांची नऊ जुनी अल्प चरित्रे प्रकाशित करून म. फुले यांना जन्म द्विशताब्दी वर्षानिमित दिलेली पहिली मानवंदना.
महात्मा फुले यांचा जन्म १८२७ ला झाला, तर निधन १८९० साली झाले. म्हणजे एकूण ६३ वर्षांचे त्यांचे आयुष्य होते. त्यांच्या निधनानंतर पन्नास वर्षांच्या कालावधीत लिहिली गेलेली ही नऊ अल्प चरित्रे आहेत. सर्व चरित्रकार या ना त्या नात्याने जोतिरावांच्या कार्याशी संबंधित आहेत. काही चरित्रकार जोतिरावांचे समकालीन आहेत, तर काही पुढच्या पिढीतील आहेत. त्यामुळे जोतिराव फुले यांच्यावर संशोधन करणार्या संशोधकांसाठी ही अल्पचरित्रे म्हणजे प्राथमिक स्रोत आहे. विशेष म्हणजे, या चरित्रांचे संपादन करणार्या प्रा. श्रद्धा कुंभोजकर, बापूराव घुंगरगावकर यांनी ज्या काळात ही चरित्रे लिहिली गेली त्या काळातील भाषाशैलीमध्येच ही चरित्रे संपादित केली आहेत. त्यात आपल्या बाजूने आजच्या भाषाशैलीशी सुसंगत काही काटछाट केलेली नाही. त्यामुळे वाचकाला त्या काळातील भाषाशैलीचा अनुभव घेता येतो. तसेच त्यामुळे पुस्तकाचे संशोधकीय मूल्य वाढते.
या नऊ अल्प चरित्रांपैकी आठ चरित्रे मराठीत आहेत, तर एक चरित्र इंग्रजीमध्ये आहे. इंग्रजी चरित्र भालचंद्र विठ्ठल प्रधान यांनी लिहिलेले आहे, आणि ते जोतिराव फुले यांच्यावरील पहिले इंग्रजीतील चरित्र आहे. या सर्व चरित्रांचा आकार १० ते ३० पाने इतका आहे. फक्त बळीराम नागोजी कुंभार यांची लिहिलेल्या चरित्राचा आकार ७० पाने इतका आहे. ही चरित्रे आकाराने लहान असली, तरी महात्मा जोतिराव फुले यांच्या कार्यकर्तृत्वाचा सार मांडतात.
अनेकदा आपल्याकडे महात्मा जोतिराव फुले यांचे कार्य स्त्री शिक्षणापुरते मर्यादित केले जाते. मात्र, तो त्यांच्या कार्याच्या अनेक पैलूंपैकी एक पैलू आहे. पर्यायी संस्कृतीचे जनक, कामगार चळवळीचे जनक, आधुनिक मराठी कवितेचे जनक, इहवादी धर्मचिंतक, कृषी अर्थशास्त्रज्ञ, इतिहासकार अशी बहुआयामी ओळख महात्मा फुले यांची आहे. या जोतिराव यांच्या कार्याच्या अनेकविध पैलूंवर या अल्प चरित्रांनी प्रकाश टाकला आहे.
ही दुर्मीळ अल्प चरित्रे संशोधकांसाठी तर मौलिक आहेतच, मात्र सामान्य वाचक-कार्यकर्ते, तरुण मुले यांच्यासाठीही उपयुक्त आहेत. महात्मा फुले जन्म द्विशताब्दी वर्षानिमित कार्यकर्ते लहान मुलांना सुट्टीच्या दिवशी वा सोईच्या दिवशी एकत्र करून या अल्प चरित्रातील रोज एक अल्प चरित्र वाचून दाखवण्याचा उपक्रम राबवू शकतात.
पुस्तकाचे नाव :- महात्मा जोतिराव फुले यांचे नऊ जुनी अल्पचरित्रे
संपादन :- प्रा. श्रद्धा कुंभोजकर, बापूराव घुंगरगावकर
प्रकाशक :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
किंमत :- २५० रुपये
पुस्तकासाठी संपर्क :- sppuhistorylibrary@gmail.com
