अनिरुद्ध लिमये -
हे काही पुस्तकाचे गंभीर मूल्यांकन नाही. पहिल्या वाचनानंतर झालेली ही माझी मते आहेत. या पुस्तकाबद्दल मला जाणवलेली महत्त्वाची गोष्ट ही की प्रभा पुरोहित (प्रभाआत्याचे) सहृदय, समजूतदार, शांत व्यक्तिमत्व आणि निरलसपणे विधायक कार्य करण्याची तिची प्रवृत्ती यातून सतत डोकावते.
पुस्तकाचे तीन भाग आहेत. पहिला भाग आहे, ऋणानुबंध. यात प्रभाआत्याच्या विस्तृत कुटुंबातील आणि मित्रपरिवारातील काही व्यक्तींच्या अतिशय हृद्य आठवणी आहेत. दुसर्या भागाचे शीर्षक आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीतील माझा सहभाग आणि तिसर्याचे शीर्षक आहे समाजभान राजकारण. मी मुख्यतः दोन आणि तीन भागातील लेखांविषयी थोडेसे बोलणार आहे.
साधारणतः प्रागतिक, डाव्या विचारसरणीची मंडळी, विशेषतः निरिश्वरवादी व्यक्ती, धर्म आणि धार्मिक श्रद्धा बाळगणार्या लोकांबद्दल काही प्रमाणात मनात तुच्छता बाळगून असतात. ते तीव्र धार्मिक संवेदना आणि निष्ठा असलेल्या मंडळींच्या भावना आणि मूलस्रोत समजू शकत नाहीत. त्यांच्या बुद्धिप्रामाण्यवादी आणि विवेकवादी प्रवृत्तीत ‘एम्पथी’चा अभाव असतो. विशेष करून सुशिक्षित मंडळींच्या श्रद्धांबाबत. खेदाने मला हे मान्य करावे लागेल की माझी मानसिकता ही सुद्धा बरीचशी अशाच प्रकारची आहे. कृतीत अहिंसावादी आणि तात्त्विक थरावर इतरांचे मतस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य याबाबत मान्य असूनही, प्रत्यक्ष चर्चा आणि वादविवादात त्यांच्याकडून अभिनिवेश आणि आक्रमकता प्रामुख्याने पुढे येतात. त्यामुळे ‘वादे वादे जायते तत्त्वबोधः’ च्या ऐवजी ‘वादे वादे जायते कंठशोषः’ होण्याची शक्यता दुणावते.
मला अंनिसच्या कार्याबद्दल पुसटशी कल्पना असली तरी त्या संघटनेच्या कार्यपद्धतीबद्दल आणि संघटनेबद्दल अज्ञानच होते. दुसर्या भागातील प्रभाआत्याचे लेख, परिपत्रके आणि टिपणे केवळ अंनिसवर प्रकाशच टाकत नाहीत तर अंनिसची विचारसरणी, कार्यपद्धती आणि संघटनेबद्दल अतिशय उपयुक्त आणि मोलाची माहिती देतात.
कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण आणि सर्वांगीण विकास, त्यांना उपयुक्त माहिती देणे आणि प्रात्यक्षिके दाखवणे, त्यांच्यात कुतूहल जागृत करणे, वाचन, मनन, चिंतन करण्यास उद्युक्त करणे, त्यांच्याशी सततचा संपर्क ठेवणे, त्यांच्याशी चर्चा करणे, त्यांच्या शंकानिवारण करणे, त्यांच्यात इतरांबद्दल ‘एम्पथी’ आणि आदर निर्माण करणे, नियमितपणे संघटनेच्या सभा, चर्चासत्रे, परिपत्रके आणि वार्तापत्रे काढणे, कार्यकर्त्यांना इतर जनहितवादी आंदोलने आणि कार्यक्रमांशी जोडणे इत्यादी संघटना आणि चळवळीची वाढ आणि उत्कर्ष करण्यासाठी आवश्यक उपक्रमांची उपयुक्त माहिती या भागात आहे.
पुस्तकाच्या या भागातील दोन छोटी अवतरणे जी मला खूप भावली ती मी वाचून दाखवितो. अंनिस बरोबर कार्यरत असलेल्या इथल्या श्रोत्यांना या उद्धरणात कदाचित काही अपरिचित आढळणार नाही. पहिल्या अवतरणातील शब्द हे भतिमार्गावर अपार श्रद्धा असलेल्या संतपरंपरेच्या उदात्त सामाजिक न्याय आणि बंधुभाव पसरविणार्या शिकवणीच्या संदर्भात आले आहेत. ते असे.
देवधर्माशी निगडित अंधश्रद्धा झिडकारण्यासाठी धर्मच नाकारणे मला घंगाळ्यातील पाण्याबरोबर स्नान घातलेल्या बाळालाही फेकून देण्यासारखे वाटते. धर्माची ही परिवर्तनशील शक्ती जर जनहित आंदोलनकर्त्यांनी ओळखली नाही, तर ते धर्माचे राजकारण आणि स्वार्थकारण करणार्या राजकारण्यांना आणि बुवा-बाबांना आंदण दिल्यासारखे होईल.
पुढील अवतरण अंधश्रद्धा आणि धर्मांधता यांच्याविरुद्ध केवळ बुद्धिप्रामाण्यवादावर आधारलेले आंदोलन करणार्यांना वर्षानुवर्षे अपयश का येत आले आहे याची बरीचशी उकल करणारे किंवा आढावा घेणारे आहे.
अंधश्रद्धांची मुळे कुठपर्यंत गेली आहेत त्याचा शोध घेऊन ती मुळापासून उखडून टाकली तरच अंधश्रद्धांचे खरे निर्मूलन होईल. ह्या मुळांचा शोध आपल्याला धर्मग्रंथ आणि धार्मिक संस्कृतीपर्यंत नेतो. या धार्मिक पायावरच घाव घालून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एक बुद्धिप्रामाण्यवादी चळवळ सुरू करावी असा सल्ला शहाजोगपणे बरेच जण देतात. त्यांचे हे विश्लेषण बरोबर आहे. परंतु त्यांनी सुचविलेला उपाय अव्यवहारी आणि चळवळीची व्याप्ती मर्यादित करणारा आहे. इ. स. पूर्व १,००० वर्षांच्या लोकायतवादापासूनच्या सर्व विवेकवादी चळवळींचा इतिहास बघता बुद्धिप्रामाण्यवादी चळवळी वचितच जनआंदोलने झालेल्या दिसतात. ह्या वास्तवापासून बोध घेणे आवश्यक ठरते.
हे दोन उतारे मला स्वतःला उद्बोधक आणि व्यवहारी वाटतात. माझ्या वडिलांचे, मधु लिमये यांचे धर्माबद्दलचे विचार अशाच प्रकारचे होते. ते धार्मिक श्रद्धांवर उघड-उघड आघात करून अनावश्यक संघर्ष छेडण्याऐवजी धार्मिक श्रद्धा असलेल्या प्रागतिक विचाराच्या सुबुद्ध घटकांबरोबर सहकार्य करून धर्मातील अनिष्ट गोष्टी दूर करून त्यात सुधारणा आणि बदल घडवून आणण्याच्या मताचे होते.
पुस्तकाच्या तिसर्या भागातल्या विवेकवादी चळवळी व व्यक्ती आणि काही मुलाखती यामधील विवेकवादी चळवळींचा इतिहास हा लेख खूप उद्बोधक वाटला. यामुळे इतिहासातील विवेकवादी चळवळींशी अपरिचित असलेल्यांना थोडक्यात या चळवळींची तोंडओळख होते. वेदोपनिषदिक काळापासून बुद्धिप्रामाण्यवाद आणि विवेकवादाला सुरुवात झाली आणि ही परंपरा परदेशी, अर्वाचीन, संस्कृतीभंजक आणि समाजविनाशक नसून ती भारताच्या इतिहासाचा व संस्कृतीचा अविभाज्य आणि महत्त्वाचा भाग आहे हे ध्यानात येते. डॉ. अब्राहम कोवूर, र. धों. कर्वे या व्यक्तिमत्त्वांचा छोटेखानी आढावा आणि फादर फ्रान्सिस दिब्रिटो व पुष्पा भावेंच्या मुलाखती मला उद्बोधक वाटल्या, आवडल्या.
सामाजिक प्रश्नांची चर्चा – ते शिक्षणाचे समाजाच्या उत्कर्षतील प्राधान्य थोडक्यात समजावून सांगणे असो किंवा समतावादी आरक्षण, लैंगिक गुन्हे इत्यादी स्फोटक विषयांवरील समतोल उद्बोधन-विवेचन करणे असो, ही शैली या पुस्तकाचे मोठे वैशिष्ट्य आहे असे मला वाटते.
हे पुस्तक सर्वांनी अवश्य वाचावे असे मला वाटते. एका निरलस व प्रसिद्धीपराङ्मुख कार्यकर्तीच्या अनुभवातून, लेखनातून आपल्याला किती शिकता येऊ शकते, याचा हे पुस्तक छोटासा वस्तुपाठ आहे.
(लेखक ज्येष्ठ समाजवादी नेते मधु लिमये यांचे चिरंजीव आहेत.)
पुस्तकांसाठी संपर्क : सुहास मो. ९९७०१७४६२८
सवलतीच्या दरात रु. २०० मध्ये