भारतातील धर्मकलह

प्रा. प. रा आर्डे -

चार्वाकवादाचा र्‍हास होण्याऐवजी तो प्राचीन काळातच भारतात रुजून विकसित झाला असता, तर पाश्चात्य देशांच्या अगोदरच भारतात विज्ञानाचा जन्म आणि प्रसार झाला असता.

ग्रीक संस्कृतीत ‘विवेकवादा’चा विचार घुमत राहण्याचा काळ हा सुमारे इ. स. पूर्व ६०० ते इ. स. ४०० पर्यंत होता. याच्याही अगोदर भारतात वैदिक संस्कृती नांदत होती. तिचा काळ हा सुमारे इ. स. पूर्व १५०० ते इ. स. पूर्व ६०० पर्यंत मानला जातो. वैदिक संस्कृतीत मानवी परस्परसंबंध आणि एकूण विश्व यांच्यावर भाष्य करण्यात आलेले आहे. या प्राचीन काळापासून ते मध्ययुगीन काळापर्यंत भारतात विविध तत्त्वज्ञानांचा अंमल चालू होता. तत्त्वज्ञानालाच ‘दर्शन’ असं नाव आहे. या विविध ‘दर्शनां’मध्ये मोठा कलह चालू होता. वैदिक ‘दर्शनां’पासून हिंदू धर्माची निर्मिती झाली. वैदिक परंपरेत विचारस्वातंत्र्य आणि नैतिक नियमांवर सुंदर भाष्य होते. प्राचीन भारतीय परंपरेत सप्त दर्शनात विविध प्रकारे तत्त्व मीमांसा केली गेली. या दर्शनात ईश्वरवादी तसेच नास्तिक विचार मांडले गेले. परस्पर विरोधी विचार मांडणार्‍या या दर्शनात विचार स्वातंत्र्याचा पुरस्कार होता; पण पुढे भारतात पुरोहितशाहीचा उदय झाला. पुरोहितांनी मानवी जीवनाच्या संदर्भात ‘ब्रह्मंसत्यं जगन्मिथ्या’ अशी भूमिका घेतली. त्यामुळे ऐहिकतेचा विचार मागे पडून मोक्षाला महत्त्व आले. प्रभावी ठरलेल्या हिंदू पुरोहितशाहीने ऐहिक गोष्टींना महत्त्व देणार्‍या ‘लोकायत’ अर्थात चार्वाक दर्शनाला मोठा विरोध केला. वैदिक संस्कृतीतील विचार स्वातंत्र्य पुरोहितशाहीने नाकारले आणि मध्ययुगात उदय पावलेल्या जैन आणि बौद्ध धर्मांविरोधात कारस्थाने केली. ‘चार्वाक दर्शन’ तसेच जैन आणि बौद्ध दर्शन ही विवेकवादी दर्शने होत. ‘विवेकवादी’ म्हणजे नास्तिक किंवा निरीश्वरवादी; थोडक्यात, म्हणजे आर्यांचा हिंदू धर्म आस्तिक जैन आणि बौद्ध तसेच चार्वाक तत्त्वज्ञान या नास्तिक तत्त्वज्ञानातील कलह म्हणजे भारतीय धार्मिक संस्कृतीचा इतिहास होय. एकेकाळी प्राचीन भारतात सुश्रुत, आर्यभट्ट, वराहमिहीर या विचारवंतांनी विज्ञानाची परंपरा सुरू केली होती; पण विज्ञान हे ऐहिक प्रश्नांचा विचार करणारे म्हणून त्याला गौणत्व देण्यात आले. त्यामुळे भारतात विज्ञानाची परंपरा नष्ट झाली. हे जरा अधिक विस्ताराने समजून घेऊया.

चार्वाकांचा उदय व र्‍हास

इ. स. पूर्व ६०० च्या आसपास भारतात चार्वाक तत्त्वज्ञानाचा उदय झाला. पारलौकिक भ्रमाच्या पाठीमागे धावण्याऐवजी पाळण्यापासून ते थडग्यापर्यंतचे वास्तव असे मानवी जीवन याच जगात आनंदाने भरून टाकावे, असे सांगणारी इहवादी, जीवनवादी भूमिका म्हणजे ‘चार्वाक तत्त्वज्ञान.’

‘इथले म्हणजे लौकिक जीवन आणि त्यातील आनंद महत्त्वाचा आहे,’ असे सांगणारे चार्वाक तत्त्वज्ञान हिंदू वैदिक धार्मिक परंपरेला मान्य नव्हते. चार्वाकांचा काळ आणि ग्रीक विवेकवादाचा काळ एकच आहे. पण चार्वाक हे ‘विवेकवादी’ मांडणीत ग्रीक विचारवंतांच्याही पुढे होते. ग्रीक परंपरेत तर्काला प्राधान्य होते; म्हणजे ज्ञानाचे प्रमाण प्रामुख्याने ‘रिझन’ किंवा तर्कबुद्धी यालाच ग्रीकांनी महत्त्व दिले. चार्वाकांनी मात्र ज्ञानसाधनेची विविध प्रमाणे मांडून विज्ञाननिष्ठ अशा प्रचीतीला महत्त्व दिले. चार्वाकांची प्रमाणांची भूमिका नीट समजून घ्यायला हवी. पहिले प्रमाण म्हणजे शब्दप्रमाण किंवा ग्रंथप्रमाण. ग्रंथात लिहिले किंवा अधिकारी व्यक्तीने सांगितले, ते सत्य ही वैदिकांची भूमिका चार्वाकांना मान्य नव्हती. आधुनिक विज्ञानात देखील केवळ शब्दप्रमाण ज्ञानाचे साधन होऊ शकत नाही, असे मानले आहे. याच कारणास्तव चार्वाकांनी वेदांतील ज्ञानाला नकार दिला. ज्ञानाचे दुसरे प्रमाण म्हणजे अनुमानप्रमाण. यात तर्काचा उपयोग केला जातो. चार्वाकांनी अनुमानप्रमाणाचे लौकिक आणि अलौकिक असे दोन प्रकार पाडले. त्यांनी व्यावहारिक पातळीवरील अनुमान स्वीकारले आहे; पण चार्वाक विचारांचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण. प्रत्यक्ष म्हणजे प्रचीती किंवा अनुभव. विज्ञानाच्या भाषेत याला प्रयोगाचा निष्कर्ष म्हणता येईल. अनुमान पडताळ्याने सिद्ध करायला हवे, हे लक्षात घेता ‘चार्वाक तत्त्वज्ञान’ हे जवळपास विज्ञानवादीच म्हणायला हवे.

विविध प्रमाणसाधनांचा विचार करून चार्वाकांनी अतिशय स्पष्टपणे आपले तत्त्वज्ञान मांडले. ईश्वराची प्रचीती येत नाही, म्हणून त्यांनी ईश्वर नाकारला. केवळ शब्दप्रमाण मान्य नाही, म्हणून त्यांनी वेद नाकारले. चार्वाकांनी सगळे परलोकवादी तत्त्वज्ञान नाकारले. त्यांनी मोक्षाला नकार दिला आणि ऐहिक जीवनातील सुखाचे समर्थन केले. अर्थात, ऐहिक सुखाचा उपभोग संयमाने घ्यावा, हे चार्वाकांना मान्य होते. ‘कर्ज काढून तूप प्या’ (ऋणंकृत्वा घृतम् पिबेत) या श्लोकाचा दुरुपयोग करून चार्वाक हे स्वैराचारी होते, असा त्यांच्यावर आरोप करण्यात येतो; पण तो आरोप वास्तव नाही. चार्वाकांनी पुनर्जन्मही नाकारला. कारण त्यांना आत्म्याचे अस्तित्व मान्य नव्हते. ईश्वर किंवा आत्मा याची प्रचीती येत नाही म्हणून आत्म्यावर आधारित पुनर्जन्मालाही त्यांनी नाकारले. अलिकडील वैज्ञानिक संशोधनात देहभिन्न आत्म्याचे अस्तित्व सिद्ध होत नाही. त्यामुळे चार्वाकांची भूमिका ही विज्ञाननिष्ठ होती, यात शंका नाही.

धर्मावर आसूड

धर्माचे स्वरूप दुहेरी आहे. पारलौकिक सुखासाठी धर्म ही एक संकल्पना. चार्वाकांनी परलोक नाकारला. त्यामुळे त्यावर आधारित मोक्षप्राप्ती देणारा धर्मही नाकारला. यावर कोणी असे म्हणेल की, धर्मावर आधारित समाजधारणेसाठी नैतिक आचरणाचा आग्रह धर्म धरतो; पण वास्तव जगात अहिंसा, सहिष्णुता या मानवी मूल्यांची विविध धर्मांनी कशी वाट लावली आहे, हे लक्षात घेता धर्म हा नीतीला पोषक आहे, याला चार्वाकांनी नकार दिला. व्यवहारात धर्म हा ज्यांच्या हाती होता, त्यांनी त्याचा कमालीचा दुरुपयोग केला. सर्वसामान्य लोकांची दिशाभूल करून स्वत:चे ऐहिक हितसंबंध जपण्यासाठीच धर्माच्या टोळ्या निर्माण झाल्या. धर्माचा इतिहास म्हणजे ‘प्रमाद’ आणि ‘वंचना’ यांचीच कहाणी होय. ‘ऐतिहासिक धर्म म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून बेदरकार बदमाषांनी अज्ञ जनतेची निरंतर पिळवणूक करण्याकरिता जाणूनबुजून रचलेला कटच होय,’ असे व्हॉल्टेअर म्हणाला. ‘धर्मविचार ही आजारी माणसांची स्वप्नं,’ असं ह्यूमचं मत होतं. या अलिकडील तत्त्वज्ञांपेक्षाही चार्वाकांनी प्राचीन काळी धार्मिक सिद्धांतावर जोराचा हल्ला केला.

धर्माचा आधार असलेले वैदिकांचे यज्ञ आणि त्यातील कर्मकांड याला चार्वाकांनी जोरदार विरोध केला. स्वर्ग, देवता आणि इतर अदृश्य शक्ती यांवर यज्ञसंस्था उभारली गेली आहे. चार्वाकांनी या सर्व संकल्पना नाकारल्या. साहजिकच त्यांनी यज्ञही नाकारला. चिकित्सेचं शस्त्र हाती घेऊन चार्वाकांनी यज्ञातील अवास्तवता, ढोंगबाजी, पुरोहितांचे हितसंबंध, लैंगिक वामाचार, हिंसा इत्यादी अनेक गोष्टींवर हल्ला केला. यज्ञामागे पुरोहितांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. बुद्धी आणि कर्तृत्व नसलेल्या लोकांच्या उपजीविकेची सोय ‘अग्निहोत्र’ आणि ‘श्राद्धा’सारख्या कर्मकांडांमुळे केली जाते. यज्ञासाठी गायींची हत्या इतर पशूंचा बळी याचा अतिरेक झाल्यामुळेच प्रतिक्रिया म्हणून जैन आणि बौद्ध दर्शनांनी यज्ञाला विरोध केला. पण त्यांच्या अगोदर चार्वाकांनी यज्ञसंस्कृतीवर प्रहार केले होते. यज्ञामधल्या कामचेष्टांवर चार्वाकांनी आक्षेप घेतला आहे.

चातुर्वर्ण्यावर टीका

‘चार्वाकदर्शना’ने चातुर्वर्ण्याच्या संकल्पनांवर कडाडून हल्ला चढवला आहे. सर्व मानवाच्या शरीरातील विविध अवयव समान असताना वर्णाची उच्च-नीचता फोल आहे. विं. दा. करंदीकर म्हणतात –

रक्तारक्तातील| कोसळोत भिंती|

मानवाचे अंती| एक गोत्र॥

ही घोषणा चार्वाकांनी पुरातनकाळीच उच्चारली होती. आधुनिक काळात फ्रेंच राज्यक्रांतीपासून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये आकाराला आली. लोकशाहीचा उदय होऊन विविध देशांच्या घटनेमध्ये जात, धर्म आणि लिंग या भेदांवर आधारित कल्पना टाकून दिल्या गेल्या आहेत. चार्वाकांनी चातुर्वर्ण्याला नकार देऊन समतेचं मूल्य प्राचीन काळीच स्वीकारले होते.

युरोपमधील विवेकवाद आणि त्यातून आकाराला आलेली ‘ज्ञानचळवळ’ यातून जे निष्कर्ष मिळतात, त्यांच्याशी चार्वाकांचे तत्त्वज्ञान मिळतेजुळते वाटते. युरोपमधील ‘ज्ञानोदया’तून प्रकट झालेला मानवतावाद आणि चार्वाकांचा मानवतावाद समान होता. अशा या मानवी सुखसंवर्धनाचा इहवादी विचार स्वीकारणार्‍या चार्वाकांचे तत्त्वज्ञान भारतात पुढे विकसित झाले असते, तर युरोपाच्याही अगोदर आपण प्रगतिपथावर गेलो असतो; पण इथल्या गोष्टीला नकार देऊन (जगन्मिथ्या) काल्पनिक मोक्षाच्या मागे धावणार्‍या वैदिकांनी चार्वाकांचा नाश केला.

भ्रामक तत्त्वज्ञान मानणार्‍या संस्कृतीवर चार्वाक कठोर हल्ले चढवीत होते. स्वाभाविकच वैदिकांच्या मनात त्यांच्याविषयी कमालीचा तिरस्कार होता. वैदिक संस्कृतीने चार्वाकांच्या नास्तिक मताचा स्वीकार हे ब्रह्महत्या आणि सुरापान यांच्यासारखे महापातक म्हटले आहे. ‘नास्तिकांवर सामाजिक बहिष्कार टाकावा,’ असा आदेश वैदिकांनी दिला होता. त्यांनी चार्वाकांना अस्पृश्य मानले होते. चार्वाक अनुयायांपैकी एका चार्वाकाला जाळून मारल्याची नोंद महाभारतात दिली आहे. शारीरिक हल्ल्याबरोबरच त्यांचे ग्रंथही वैदिकांनी नष्ट केले असावेत; पण विचार मारता येत नाहीत. गंमत म्हणजे धर्म मानणार्‍या जैन आणि बौद्ध विचारवंतांनी आपल्या विरोधात असणार्‍या चार्वाक मतांवर कठोर टीका केली, ते साहित्य आपल्यापर्यंत पोचले आहे. त्यातून ‘चार्वाकदर्शन’ आपल्यापर्यंत पोचले.

चार्वाकांचा विजय की पराभव?

‘चार्वाक विचार’ पराभूत झाला काय, याचे उत्तर असे – इतिहासकाळात चार्वाक अनेक चकमकी आणि लढाया हरले, तरी अंतिम युद्ध त्यांनीच जिंकले आहे. चार्वाकांनी मांडलेली मूल्ये आज श्रेष्ठ मूल्ये म्हणून स्वीकारली गेली आहेत. आधुनिक विज्ञानातून चार्वाकांचे विचार सत्य ठरले आहेत. हा खरंतर चार्वाकांचा पराभव नसून विजय आहे. चार्वाकांनी ज्या यज्ञसंस्कृतीवर हल्ला चढवला, ते यज्ञ आज नामशेष झाले आहेत. चार्वाकांनी धर्मावर हल्ला चढवला आणि आज भारतीय राज्य घटनेत धर्मनिरपेक्षता स्वीकारली गेली आहे. हिंदू धर्माने स्वीकारलेला चातुर्वर्ण्य आज आपण नाकारलेला आहे, म्हणून खर्‍या अर्थाने चार्वाकांचा विजय झाला आहे.

जैन आणि बौद्ध धर्मांचा उदय का झाला?

इ. स. पूर्वी ६ व्या शतकात भारतात धार्मिक असंतोष उफाळून आला. पुरोहितशाहीची किचकट धार्मिक कर्मकांडे आणि यज्ञातील हिंसा यांना सामान्य लोक कंटाळले होते. यज्ञामध्ये बळी देण्याच्या प्रथा अतिशय महागड्या होत्या. याचबरोबर वैदिक धर्मात सामान्य लोकांचे शोषण होत होते. माणसांत भेदाभेद करणारी जातप्रथा निर्माण झाली होती. अशा विविध कारणांनी ‘विवेकवादी’ जैन आणि बौद्ध धर्माचा उदय भारतात झाला. या दोन्ही धर्मांनी ईश्वराचे अस्तित्व नाकारले आणि मानवी समाजात नैतिक आचरणाचे साधन म्हणून ‘बुद्धिवादा’चा अवलंब केला. Question Everything- कोणतीही गोष्ट प्रश्न उपस्थित करून तपासल्याशिवाय स्वीकारू नका – हा गौतम बुद्धांचा विचार वैज्ञानिक दृष्टिकोनाचेच प्रतीक आहे. जैन आणि बौद्ध धर्मांनी किचकट कर्मकांडे नाकारली, जातिभेद नाकारला, यज्ञातील हिंसेला विरोध केला. परिणामी जैन आणि बौद्ध धर्माचा भारतात वेगाने प्रसार सुरू झाला. साहजिकच हिंदू धर्म आणि जैन, बौद्ध धर्म यांच्यात संघर्ष सुरू झाला. या संघर्षातून मोठ्या प्रमाणात धार्मिक हिंसा झाली.

डी. एन. झा या भारतीय लेखकाने आपल्या ग्रंथात प्राचीन भारतातील धार्मिक हिंसेचा परामर्ष घेतला आहे. प्राचीन भारत म्हणजे सुवर्णयुग आणि शांतता, हे अर्धसत्य आहे. उलट प्राचीन भारतात मोठा धार्मिक कलह घडत होता, असा झा यांचा निष्कर्ष आहे. काही वेळा परस्परांशी जुळवून घेत असले, तरी वैदिक धर्माने जैन धर्म आणि बौद्ध धर्म यांच्या पवित्र स्थळांवर हल्ले केले आहेत.

झा यांनी आपल्या पुस्तकात या संदर्भात अनेक उदाहरणे दिली आहेत. सातव्या शतकात शशांक नावाच्या हिंदू राजाने ज्या झाडाखाली गौतम बुद्धाला आत्मसाक्षात्कार झाला, तो बोधिवृक्ष कापून नष्ट केला. बुद्धगया येथील ही घटना आहे. तेथे असलेल्या बुद्धाच्या मूर्ती उखडून त्या ठिकाणी शिवाची मूर्ती बसवली आणि त्यावर मंदिर उभे केले.

इ.स. पूर्व १८५ मध्ये पुष्यमित्र शुंग याने पाटलीपुत्र येथील बौद्धविहार नष्ट केला. सांची येथील प्रसिद्ध स्तुपाची त्याने मोडतोड केली. तसेच कोसंबी येथील बौद्धविहारही त्याने जाळून टाकला. अनेक बौद्धधर्मीय संन्याशांना त्याने निर्दयपणे ठार मारून टाकले.

गुप्तकाळातील अशोक स्तंभाचा विध्वंस करून तेथे हिंदू मंदिर उभारले गेले. नारा नावाच्या हिंदू राजाने हजारो बौद्ध विहारे जाळून टाकली. या सर्व घटनांचा उल्लेखकलहाना (घरश्रहरपर) नामक लेखकाच्या ‘राजतरंगिणी’ या ग्रंथात आहे.

वर वर्णन केलेल्या धार्मिक हिंसाचारापेक्षाही अधिक जोरदार असा वैचारिक संघर्षही प्राचीन भारतात घडत होता. उदा. संस्कृत पंडित पतंजलि याने ‘बुद्ध आणि जैनधर्मीय; म्हणजे श्रमण आणि ब्राह्मण यांचे संबंध साप आणि मुंगसासारखे आहेत,’ अशी टीका केली आहे. बाराव्या शतकातील जैन विद्वान हेमचंद्र याने ‘मनुस्मृति’वर जोरदार वैचारिक हल्ला चढविला होता. वैष्णव संतकवी तिरूमंकाईने एका स्तुपामधून बुद्धांची सोन्याची मूर्ती चोरली आणि ती वितळवली. तिच्यापासून विष्णूची मूर्ती तयार केली. लिंगायत संत बसव यांनी लिहिलेल्या संतचरित्राच्या पुस्तकात जैनधर्मियांच्या कत्तलीचा उल्लेख आहे.

मुस्लिम विरुद्ध बुद्ध

भारतावर आक्रमण करणार्‍या मुस्लिम धर्मियांनी बौद्ध धर्म नष्ट करण्यास हातभार लावला. मुस्लिम आक्रमकांनी ज्या बौद्ध विश्वविद्यालयांना लुटून नष्ट केले, त्यामध्ये नालंदा, विक्रमशीला, जगदल, ओदान्तपुरी ही विश्वविद्यालये होती. देशातील या सर्व बौद्धविहारांना मुस्लिम आक्रमकांनी नष्ट केले. जीव वाचवण्याकरिता हजारोंच्या संख्येने बौद्ध भिक्खू भारताबाहेर नेपाळ, तिबेट व इतर देशांत पळून गेले. मुुस्लिम आक्रमकांनी हजारोंच्या संख्येनी बौद्ध भिक्खूंची कत्तल केली. विन्सेंट स्मिथ या इतिहासकाराने, बिहारमध्ये मुस्लिम सेनापतींनी ११९७ मध्ये बौद्ध भिक्खूंची मोठ्या प्रमाणात हत्या केल्याचा उल्लेख केला आहे. सुरुवातीला हिंदूंनी आणि नंतर मुस्लिमांनी बौद्धविहार आणि बौद्ध भिक्खू यांचा विनाश केल्यामुळे भारतातून बौद्ध धर्म संपला; परंतु पूर्वेकडील इतर देशांत त्याचा मोठ्या प्रमाणात स्वीकार झाला. जिथे गौतम बुद्ध जन्मला, त्या देशात बौद्ध धर्माचा विनाश झाला, हे एक विदारक वास्तव आहे. समाधान याचे की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या ‘विवेकवादी’ धर्माचे भारतात पुनरुज्जीवन केले.

हिंदूमुस्लिम कलह

भारतातील धर्मकलहाचा इतिहास हा युरोपमधील धर्मकलहाप्रमाणेच रक्तरंजित आहे. युरोपमध्ये ‘अंधारयुगा’त ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मात जी आठ धर्मयुद्धे लढली गेली, त्यांचा इतिहास आपण मागे पाहिला. पुढे ‘कॅथॉलिक’ आणि ‘प्रोटेस्टंट’ अशी फूट ख्रिश्चन धर्मात पडली आणि आपापल्या पंथाच्या प्रसारासाठी या दोन पंथियांनी विविध राजसत्तांचा वापर करून परस्परांवर हल्ले केले. त्यांच्यामधील युद्ध तीस वर्षे चालू होतं. अशा युद्धामध्ये किती भयंकर मानवी संहार झाला असेल, याची कल्पना करवत नाही. धार्मिक कलहातून असाच नरसंहार आपल्या देशातही घडत राहिला. वैदिक हिंदू धर्माने चार्वाकांना संपवले; तर हिंदू आणि मुस्लिम आक्रमकांनी बौद्ध धर्मियांना संपवले. मुस्लिम सत्तेच्या काळात भारतात हिंदू आणि मुस्लिम यांच्यात तीव्र संघर्ष होत होताच. इंग्रजांनी हिंदुस्थान जिंकल्यानंतर समान शत्रू म्हणून हिंदू आणि मुस्लिमांनी स्वातंत्र्य युद्धात परस्पर सहकार्य केले; पण देश स्वतंत्र होताना आर. एस. एस., बॅ. सावरकर आणि बॅ. जीनांसारख्या राजकीय महत्त्वाकांक्षा असलेल्या नेत्यांनी हिंदू-मुस्लिम द्वेषास खतपाणी घातले. हिंदूहितरक्षक धर्मनेते आणि मुुस्लिम धर्मरक्षक यांनी दोन्ही समाजांत वैरभावाचा अग्नी तीव्र केला. याचा परिणाम म्हणून हिंदुस्थानची भारत आणि पाकिस्तान अशी फाळणी झाली. फाळणीच्या वेळी प्रत्येक जमातीला आपल्या देशात जायची मुभा मिळाली. पाकिस्तानातील हिंदू भारतात परतू लागले; तर भारतातील मुस्लिमही पाकिस्तानकडे स्थलांतरित होऊ लागले. यावेळी जे दंगे झाले, त्यांचा इतिहास अंगावर शहारे आणणारा आहे. हे दंगे होऊ नयेत म्हणून महात्मा गांधींचा प्रयत्न निष्फळ ठरला. धर्मरक्षकांनी गांधींचा खून केला.

मराठीतील प्रख्यात साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचा ‘धर्म, अंधश्रद्धा आणि तुम्ही आम्ही’ हा निबंध त्यांच्या ‘एक शून्य मी’ या ग्रंथात आहे. पु. ल. लिहितात-

‘देव, धर्म या कल्पना धूर्त सत्ताधार्‍यांनी दहशतीसाठी वापरलेल्या आहेत.’

‘सत्याचे दर्शन घडवणार्‍या वैज्ञानिकांचा देवाचे नाव घेणार्‍या धर्मगुरूंनी आणि त्यांच्या दहशतीखाली असणार्‍या अडाणी राजे लोकांनी सगळ्यात अधिक छळ केला आहे. धर्म-धर्म करणार्‍या लोकांइतके सत्याचे आणि वास्तवाचे शत्रू नसतील. धर्म आणि पंथाच्या दुराभिमानातून माणसाचे रक्त सगळ्यात अधिक सांडलेले आहे.’

भारतात परस्परांशी भांडणारे धर्मवेडे आणि राज्यकर्ते दमले आणि इंग्रजांनी हे ओळखले आणि आपली सत्ता त्यांनी विज्ञानाच्या सामर्थ्याने येथे स्थापन केली. इंग्रजी सत्तेच्या काळात भारतातील विचारवंतांना युरोपीय विवेकवादाचे नवे दर्शन झाले. भारतात प्रबोधन सुरू झाले. स्वातंत्र्यानंतर भारतात धर्मनिरपेक्ष लोकशाही अवतरली आणि ‘विवेकवादी’ विज्ञानावर आधारित मानवतेचा मार्ग सुकर झाला.

लेखक संपर्क ः ९८२२६ ७९५४६

चार्वाकांचा विजय की पराभव?

‘चार्वाक विचार’ पराभूत झाला काय, याचे उत्तर असे – इतिहासकाळात चार्वाक अनेक चकमकी आणि लढाया हरले, तरी अंतिम युद्ध त्यांनीच जिंकले आहे. चार्वाकांनी मांडलेली मूल्ये आज श्रेष्ठ मूल्ये म्हणून स्वीकारली गेली आहेत. आधुनिक विज्ञानातून चार्वाकांचे विचार सत्य ठरले आहेत. हा खरंतर चार्वाकांचा पराभव नसून विजय आहे. चार्वाकांनी ज्या यज्ञसंस्कृतीवर हल्ला चढवला, ते यज्ञ आज नामशेष झाले आहेत. चार्वाकांनी धर्मावर हल्ला चढवला आणि आज भारतीय राज्य घटनेत धर्मनिरपेक्षता स्वीकारली गेली आहे. हिंदू धर्माने स्वीकारलेला चातुर्वर्ण्य आज आपण नाकारलेला आहे, म्हणून खर्‍या अर्थाने चार्वाकांचा विजय झाला आहे.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]