भावनिक प्रथमोपचार घरच्या घरी

अनिल चव्हाण -

‘भावनिक प्रथमोपचार घरच्या घरी’ हे डॉक्टर हमीद दाभोलकर यांचे पुस्तक नुकतेच राजहंस प्रकाशनने प्रसिद्ध केले आहे. जागतिकीकरण आणि खासगीकरणानंतर मानसिक आरोग्याचा प्रश्न हा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा प्रश्न म्हणून पुढे आलेला आहे. अशावेळी स्वतः आणि कुटुंबाचे मानसिक आरोग्य कसे जपता येईल, यासंबंधीची माहिती एकत्रित देण्याचे काम या पुस्तकांनी केले आहे.

मानसिक त्रास चालू झाल्यापासून ते मानसोपचार तज्ज्ञाकडे जाण्यापर्यंत मधल्या काळात आपण आपल्या स्वतःच्या पातळीवर ज्या छोट्या-मोठ्या गोष्टी करू शकतो त्याला भावनिक प्रथमोपचार म्हणतात!

जसे आपले शरीर आजारी पडते, तसेच आपले मन देखील आजारी पडते. शरीराच्या आजारात काही सौम्य आजार हे घरच्या घरी उपचार करून बरे होतात. तीव्र त्रास असेल तर तसे ओळखून वेळीच तज्ज्ञाची मदत घ्यायला लागते. मानसिक आजारांच्या बाबतीत देखील हेच नियम लागू पडतात. मानसिक आरोग्याच्या प्रश्नांची प्रचंड व्याप्ती आणि उपलब्ध मानसिक क्षेत्रातील तज्ज्ञांची अत्यंत तोकडी संख्या पाहता, भावनिक प्रथमोपचार देण्याचे कौशल्य हे सध्याच्या काळात जीवन जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असे कौशल्य ठरते.

पुस्तकाची मांडणी सहा भागात केलेली आहे. सुरुवातीला मनाच्या प्रश्नांची तोंडओळख दिलेली आहे. त्यामध्ये मानसिक आरोग्याचे प्रश्न, मन म्हणजे काय, टेन्शन कसे येते, आणि टेन्शन वरच्या त्रासाला उतारा काय, असे लेख आहेत.

रंग बेरंग भावनांचे, या दुसर्‍या भागामध्ये काळे ढग आणि रुपेरी किनार, अपयशाला सामोरे जाताना काय करावे? अपराधी मन, राग आणि त्यावर मात कशी करावी? चिंता कशी घटवावी? अप्रिय घटनांची भीती कशी वाटते? मनाला दुखणे झाल्यावर कोणती लक्षणे दिसतात? काही वेळा जगणे नकोसे कसे होते? त्याचबरोबर लैंगिक प्रश्न, मनाचे अस्वास्थ्य आणि संशयाचा फेरा असे उपविभाग आहेत. मनाला सावरताना हा तिसरा भाग असून त्यामध्ये स्वतःला सक्षम कसे करावे आणि भावनांची नोंदवही कशी ठेवता येईल याची माहिती आहे.

नात्यागोत्यांच्या संबंधात, चौथ्या भागात नाती जुळताना आणि तुटताना, बालक पालक, तुझे माझे जमेना तुझ्याविना करमेना, आणि संध्या छाया, असे विषय हाताळले आहेत.

पाचवा भाग आहे भावनिक प्रथमोपचार पथ्य आणि मर्यादा. यामध्ये समुपदेशनाच्या मूलतत्त्वांची तोंड ओळख, सल्ला न देण्याचे कौशल्य, आणि दवा और दुवा, असे तीन उपविभाग आहेत. मनाच्या निगराणी संबंधात सहावा विभाग आहे. त्यामध्ये स्वभाव समजून घेताना, जीवन कौशल्य, आणि मानसिक आरोग्याच्या क्षितिजावर तांबडे फुटते आहे, असे तीन उपविभाग आहेत.मन आणि मनाचे आरोग्य हा विषय समजायला सोपा नाही. पण या पुस्तकामध्ये अत्यंत सोप्या भाषेमध्ये शास्त्रीय संज्ञांची तोंड ओळख करून दिली आहे. करोनाच्या काळात आपल्याला ताण तणाव जवळून पाहायला मिळाले.

औदासिन्याचा आजार आणि व्यसनाधीनता हे जागतिक पातळीवरचे पहिल्या पाचातील दोन आजार आहेत. आपल्या देशातील दहा ते पंधरा टक्के पुरुष व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. व्यसनाला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. दारूपासून कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो आणि तो वाढवण्याचा संकल्प राज्य शासन सतत करत असते. व्यसनापासून होणारे मृत्यू हे टाळता येणारे मृत्यू आहेत.

शेतकरी आणि तरुणवर्गातील आत्महत्या यालाही समाज सामोरा जात आहे. आपल्या मुलाबाबतच्या पालकांच्या अपेक्षा पालक आणि मुलांमध्ये ताण-तणाव निर्माण करतात. वृद्धांमध्ये एकाकीपणामुळे ताण निर्माण होत आहेत. एकूणच मानसिक आजार वाढत असताना त्यावर उपचार करणार्‍यांची संख्या मात्र अत्यंत कमी आहे. यातून निर्माण झालेली पोकळी तथाकथित अध्यात्मिक बाबा बुवा भरून काढत आहेत. म्हणून बुवाबाजी विरोधात कार्य करणार्‍याला मानसिक ताणतणावांची माहिती आवश्यक आहे.

मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी आपण स्वतःपासून, आपल्या कुटुंबापासून, मित्र-मैत्रिणीपासून सुरुवात करू शकतो. त्यासाठी काही कौशल्ये शिकून घेतली पाहिजेत; आपल्या मनाची ओळख करून घेतली पाहिजे; हे पुस्तक त्यासाठी मार्गदर्शन करू शकते! जेव्हा प्राप्त परिस्थितीशी सामना करण्याची व्यक्तीची क्षमता कमी पडते तेव्हा निर्माण होणार्‍या स्थितीला ताण-तणाव असे म्हणतात. आपल्या जीवनाची गती वाढलेली आहे. विरंगुळा आणि विश्रांती झपाट्याने कमी होत आहेत. जीवन जगण्यासाठी विविध संधी निर्माण झाल्या आहेत. त्यातला पर्याय निवडणे हे सुद्धा ताणदायक आहे. काही ताण आपल्याला आवश्यक असतात. उदाहरणार्थ परीक्षेपूर्वी ताण आला तर अभ्यास व्यवस्थित होतो.

मर्यादेपेक्षा जास्त ताण वाढला तर अस्वस्थ वाटणे, उदास वाटणे, मन कुठेही न रमणे, चिडचिडेपणा, चिंता, उदासीनता, छातीमध्ये धडधड, हातापायांना घाम येणे, सतत थकवा जाणवणे इत्यादी लक्षणे दिसतात. या मागची कारणे आपण शोधू शकलो तर ताण कमी करता येतो. भावनिक प्रथमोपचार करताना मित्रत्वाच्या नात्याने माहिती दिल्यास त्याचा जास्त प्रभाव पडतो. समोरच्या व्यक्तीचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले की त्याची अस्वस्थता कमी होते. व्यक्तीला एकटेपणा वाटत असेल तर आधार दिला पाहिजे.

आपल्या सभोवताली वावरताना मानसिक आरोग्य आणि उपचाराविषयी आपण खुल्या मनाने बोलावे. काहीवेळा अपराधीपणाची बोच जास्त होते. त्याचा परिणाम ताण वाढण्यावर होतो. प्रमाणशीर अपराधीपणा आवश्यक आहे; त्यातून आपण चुका दुरूस्त करतो.

अपराधीपणाची भावना कमी असेल तर गुन्हे घडू शकतात. मानवी मेंदूचा पुढचा भाग हा निर्णय क्षमता, योग्यायोग्य ठरवणे, अशी अनेक महत्त्वाची कामे करत असतो. अपराधीपणाची भावना न बाळगता खून पाडणार्‍या सिरीयल किलरमध्ये मेंदूचा हा भाग कमी आकाराचा दिसून येतो. म्हणजे अपराधीपणाची भावना कमी वाटण्यामध्ये काही जैविक घटक देखील कारणीभूत असतात. पाप-पुण्याची कल्पना ही धर्माची मनामध्ये अपराधीपणाची भावना निर्माण करण्याची पद्धत आहे. व्यक्तीला स्वतःच्या कृत्याविषयी अपराधी वाटायला लावून अपेक्षित बदल घडवून आणतात. हे काम विचार विवेकाने झाले पाहिजे.

मनाविरुद्ध घटना घडली की राग येतो. त्यावर एखादी प्रतिक्रिया देऊन राग मावळतो. पण काहीजणांना रागावर नियंत्रण ठेवता येत नाही. त्यामुळे नातेसंबंध बिघडतात. राग दाबून ठेवणे ही आरोग्याला हानिकारक असते. काहीवेळा एका ठिकाणी घडलेल्या घटनेचा राग दुसर्‍या ठिकाणी काढला जातो. दीर्घकाळ साचून राहिलेला राग मनमोकळ्या संवादाने दूर केला पाहिजे. रागावर मात करायला शिकले पाहिजे.

चिंता ही मानवाला ग्रासणारी महत्त्वाची भावना आहे. काहीवेळा चिंतेचे वादळ येते. अचानक भीती वाटू लागते. छातीत धडधडू लागते. पोटात गोळा येतो, दरदरून घाम फुटतो; सर्व शारीरिक रिपोर्ट नॉर्मल असताना अशा गोष्टी घडतात! तेव्हा त्याचे कारण चिंता असते! “चिता माणसाला मृत्यूनंतर जाळते आणि चिंता जिवंतपणी”. ब्लड प्रेशर डायबिटीस अस्थमा यासारख्या अनेक शारीरिक आजाराचे कारण अतिरिक्त चिंता असू शकते! याला मनोकायिक आजार असे म्हणतात. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली यावर उपचार करता येतात.

वृत्तपत्रात दर एक-दोन दिवसांनी आपण आत्महत्येची बातमी ऐकत असतो. आत्महत्यांची एक सुप्त साथ आज आपल्या देशात पसरली आहे. असे म्हणता येईल! आत्महत्या करण्यापूर्वीच्या आठवड्यात बहुतांश लोक आपल्या जवळच्या व्यक्तीकडे थेट किंवा अप्रत्यक्षपणे हा विचार बोलून दाखवत असतात. अत्यंत ताणाच्या प्रसंगी स्वतःला इजा करून घेण्याचे विचार ५० टक्के पेक्षा अधिक लोकांच्या मनात येत असतात, अशावेळी आपल्या जवळची व्यक्ती आपली भावनिक अस्वस्थता ऐकण्यासाठी उपलब्ध असेल तर यातून मार्ग निघू शकतो. भावनिक प्रथमोपचार ही आत्महत्या रोखण्याच्या प्रयत्नातील पहिली पायरी आहे. पुढच्या टप्प्यावर मात्र त्यांना तज्ज्ञ व्यक्तीशी जोडावे लागेल.

सतत निराश वाटणे, झोप न येणे अथवा जास्त झोप येणे, भूक कमी होणे, सारखी चिडचिड होणे, अस्वस्थता असणे, टोकाचे विचार येणे, अशी लक्षणे आपल्यामध्ये किंवा जवळच्या व्यक्तीमध्ये दिसून येत असल्यास तज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे. लैंगिक प्रश्नांचा मानसिक आरोग्याशी जवळचा संबंध आहे. अलीकडे माध्यमातून मिळणार्‍या लैंगिक माहितीत खूप वाढ झाली आहे. पण ती माहिती शास्त्रीय असेलच असे नाही. त्याचबरोबर याचे रुपांतर स्वैराचारात किंवा अपप्रवृत्तीत होऊ शकते.

लैंगिकतेसंबंधी समाजात उघडपणे बोलले जात नाही, त्याचा गैरफायदाही घेणारे वैदू आहेत. लैंगिकते विषयी प्रश्न सोडवण्यास मदत करण्यासाठी प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाची गरज असते. संशयी स्वभाव हा समाजातील अनेक संघर्षांचा मूळ धागा आहे. चारित्र्याच्या संशयावरून पती-पत्नीत बेबनाव होणे; मारहाण किंवा खून होणे; या गोष्टी नेहमीच्या आहेत. देव घालणे, चेटूक करणे, भानामती अशा तक्रारीत संशयाचे जाळे तयार झालेले दिसते. संशयाचे लक्षण दिसणारा एक महत्त्वाचा मानसिक आजार म्हणजे स्किझोफ्रेनिया. या प्रकारच्या आजाराच्या सुरुवातीलाच उपचार चालू केल्यास आजार आटोक्यात राहण्याची शक्यता अधिक असते.

आपले मानसिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी स्वतःकडे अंतर्मुख होऊन पाहाण्याची गरज असते. भावनांची नोंदवही या कामासाठी खूपच उपयोगी आहे! अशी नोंदवही कशी लिहावी याची सविस्तर माहिती या पुस्तकातून आपल्याला मिळते. भारतीय संस्कृती ही समाज केंद्रीय आहे. विविध नात्यांना त्यात महत्त्व आहे. तीव्र मानसिक आणि शारीरिक ताणाच्याप्रसंगी आपले नातेसंबंध आपल्याला तरुन जायला मदत करतात.

लेखक म्हणतात “भावनिक बंध निर्माण करण्याची गरज ही अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजाहूनही अधिक आहे!” मुलांच्या भावनिकतेवर पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रभाव हा पालकांचा पडतो. म्हणून पालकांनीच प्रयत्नपूर्वक शिकण्याची गोष्ट आहे! लग्नाला इच्छुक दोन व्यक्तींची अनुरुपता या दिशेने ती बदलण्याची अत्यंत मोठी गरज आहे!

पती-पत्नीच्या नात्यात टोकाचे ताण आलेले अलीकडे दिसतात. ती येऊ नयेत असे वाटत असेल तर त्याची सुरुवात लग्नाआधीपासूनच करणे आवश्यक आहे. लेखक म्हणतात “जोडीदाराची निवड ही अजून देखील कांदे पोहे, जात, धर्म, आणि कुंडली यामध्ये अडकून पडलेली आहे! ” पती-पत्नीच्या नात्यात तणाव निर्माण व्हायला स्त्री-पुरुष समानता नसणे ही एक गोष्ट असते. विवाहबाह्य मैत्री, प्रेम हे पती-पत्नीच्या नात्यात ताण निर्माण करणारी आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. लग्नानंतरही अधिक चांगला जोडीदार मिळण्याचा पर्याय उपलब्ध असतो, पण तो जाणीवपूर्वक थांबवावा लागतो. निवृत्तीनंतरच्या चिंता आणि ताण तणाव आणखी वेगळे असतात!

अशा विविध समस्यांचा उहापोह ‘भावनिक प्रथमोपचार घरच्या घरी’ या पुस्तकात लेखकाने केला आहे. आपल्या देशात मानसिक आजारांचे उपचार करणार्‍या प्रशिक्षित मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे! पण लेखक त्यासंबंधी निराशावादी नाहीत! ते म्हणतात, “आपले मानसिक आरोग्य जपायला आणि वृद्धिंगत करायला शिकण्याचे उपलब्ध शास्त्रीयज्ञान वापरण्याकडे लोकांचा वाढता ओढा आहे, ही आश्वासक गोष्ट आहे. शालेय जीवनापासून मानसिक आरोग्याविषयी प्रशिक्षण मिळाले तर मानसिक आरोग्याच्या अनेक प्रश्नाविषयी उत्तरे शोधणे सोपे होणार आहे!”

प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी टेन्शन येते, अपयशाला सामोरे जावे लागते, रागाचा भडका उडतो, दुःखाचा पूर लोटतो, व्याधी आणि वार्धक्य याचा सामना करावा लागतो. नाती जुळतात आणि तुटतात, लैंगिक समस्या उद्भवतात, या सगळ्याचा सांधा मनाशी जुळलेला असतो. मानसिक व्याधीसाठी डॉक्टरांकडे जाण्याच्या खूप आधी गरजवंत व्यक्तीला आधार मिळू शकतो. कुटुंबीयांकडून, नातेवाईकाकडून, हितचिंतकाकडून, शासनाकडून, अवघ्या समाजाकडून आणि सामाजिक स्वास्थ्याची, मानसिक आरोग्याची जपणूक करणार्‍या भावनिक प्रथमोपचार करणार्‍या व्यक्तीकडून भावनिक प्रथमोपचाराची माहिती कार्यकर्त्यांना, नातेवाईकांना आणि स्वत: नागरिकाला असणे आवश्यक आहे. ती गरज हे पुस्तक उत्तम प्रकारे भागवते; किंबहुना भावनिक प्रथमोपचारासंबंधी हे एक उत्तम गाईड आहे. वाचक त्याचे भरभरून स्वागत करतील, अशी अपेक्षा आहे. अर्थात तुमच्याकडून!

अनिल चव्हाण

पुस्तकाचे नाव : भावनिक प्रथमोपचार घरच्या घरी

लेखक : डॉ. हमीद दाभोलकर

प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे

किंमत : रूपये २००

सवलतीच्या दरात पुस्तकासाठी संपर्क : रेश्मा कचरे, पुणे मो. ९५६१९११३२०


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ]