डॉ. विनायक हिंगणे -
आहार आपल्या मनावर परिणाम करतो हे कुणीही सांगू शकेल. आपण आवडीची गोष्ट खाल्ल्यावर आनंदी होतो. The way to a man’s heart is through his stomach अशी म्हण सुद्धा उगाच पडलेली नाही. पण चुकीच्या आहाराचा विपरीत परिणाम मनावर होतो का ? आणि होत असेल तर कसा होतो? या प्रश्नाचे उत्तर समजून घेणे थोडे कठीण आहे. पण ते बरेच आश्चर्यकारक सुद्धा आहे.
आपल्याकडे असा समज आहे की आहार हा राजस, तामस किंवा सात्त्विक असा वेगवेगळा असतो व त्यातून रज तम आणि सत्त्व असे गुण निर्माण होतात. पण मी ह्याविषयी काहीही न बोलता, वैज्ञानिक अभ्यासाबद्दल तुम्हाला काही सांगणार आहे. नुकताच BMJ ह्या ब्रिटिश वैद्यकीय जर्नलमध्ये ‘मूड अँड फूड’ नावाचा एक शोधनिबंध नुकताच प्रकाशित झाला. Joseph Firth व त्यांच्या सहकार्यांनी हा लेख लिहिला आहे. या चमूत वेगवेगळ्या विषयातील तज्ञ आहेत. हा लेख थोडा सोपा करून त्यातील गम्मत सांगण्याचा हा प्रयत्न आहे.
खरं म्हणजे चुकीच्या आहारामुळे मानसिक आजार होऊ शकतात का हे शोधून काढणं ही एक खूप कठीण गोष्ट आहे. ह्या उलट मानसिक आजारामुळे आपल्या आहारावर विपरीत परिणाम होतो हे सहज दिसते. मानसिक आजारांमुळे बरेचदा जीवनशैलीकडे खूप दुर्लक्ष होतं. आहार, व्यायाम व झोप ह्याच्या सवयी बिघडतात. काही विशिष्ट मानसिक आजारांमध्ये खाण्याच्या सवयी वर सरळसरळ परिणाम होताना दिसतो. बरेचदा मानसिक आजारांमुळे लोक एकटे पडतात, नोकरी-व्यवसायात अपयश व आर्थिक समस्या ह्यामुळे योग्य आहार मिळत नाही. त्यामुळे मानसिक आजारांचा आहारावर परिणाम होतो हे अगदी खरंय. आता महत्त्वाचा प्रश्न आहे की आहाराचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो का? जर होत असेल तर हा एक दुहेरी संबंध झाला. ह्या दुहेरी संबंधात भर पडते ती शारीरिक आजारांची. शारीरिक आजार, मानसिक आजार व आहार ह्या तिन्ही बाबींचा एकमेकांवर प्रभाव पडत असतो. ह्या सगळ्या गुंत्यातून वैज्ञानिकांनी काही गोष्टी शोधून काढल्या आहेत. विचारपूर्वक अभ्यासांची रचना करून त्यातून माहिती मिळवत मिळवत काही निष्कर्ष आपल्यापुढे मांडले आहेत.
एकमेकांवर दुहेरी परिणाम होत असल्याने आधी पक्षी की आधी अंडे? असा संभ्रम होऊ शकतो. वाईट आहारामुळे आजार की आजारामुळे आहार बिघडला? यातून शास्त्रज्ञ उत्तर काढण्याचा प्रयत्न करतात.
आहाराच्या संशोधनात रस का यावा?
चांगल्या आहाराचे चांगले परिणाम आणि वाईट आहाराचे वाईट परिणाम मानसिक आरोग्यावर होतात असे वेळोवेळी शास्त्रज्ञांना दिसले आहेत. काही फायदे हे शारीरिक आजारांचा अभ्यास सुरू असताना दिसले.
मेडिटेरिनियन (भूमध्य समुद्राच्या जवळील प्रदेश) या भागात जो आहार घेतला जातो त्याचे शारीरिक आरोग्यावर बरेच फायदे होतात असे खूपशा अभ्यासांमध्ये दिसले आहे. (उदा हृदयविकार). ह्या आहाराचे महत्त्वाचे घटक म्हणजे, भरपूर ताजा भाजीपाला व फळे, तेलबिया व नट्स ह्यांचे मुबलक प्रमाण, डाळी कडधान्य मुबलक प्रमाणात, नियंत्रित प्रमाणात दुग्धजन्य पदार्थ व अंडी, लाल मासांचे प्रमाण खूप कमी, तेल-तूप व प्रक्रिया केलेली कर्बोदके यांचे प्रमाण खूप कमी अशा प्रकारचा आहार घेतल्याने मानसिक आरोग्याला सुद्धा फायदा होतो असे आढळून आले. नैराश्य (डिप्रेशन) चा धोका असा आहार घेतल्याने कमी होतो असे कळल्यावर ह्या संदर्भात शास्त्रज्ञांना जास्त रस वाटू लागला. BMJ मधील लेखात तज्ज्ञांनी ह्या बाबतीत झालेल्या वेगवेगळ्या अभ्यासांचा मागोवा घेतला आहे. आहाराचा परिणाम मानसिक आरोग्यावर होण्याचे तीन मार्ग आपल्याला आतापर्यंत कळले आहेत.
१. कर्बोदके आणि मानसिक आरोग्य :
कर्बोदके किंवा पिष्टमय पदार्थ हे गहू, तांदूळ, ज्वारी, इत्यादी तृणधान्य तसेच मका, बटाटा इत्यादीपासून मिळते. साखरसुद्धा व गूळ ही सुद्धा कर्बोदके आहेत. ह्यांचे प्रमाण जास्त झाले तर त्याचा मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो हे अभ्यासात आढळले आहे. आपण खाल्लेल्या कर्बोदकांमधून आपल्या रक्तातील ग्लुकोज (रक्तशर्करा) किती पटकन वाढते याला ‘ग्लायसेमिक इंडेक्स’ म्हणतात. जो पदार्थ खाल्ल्यावर रक्तशर्करा अगदी लगेच व जास्त प्रमाणात वाढते त्या पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असे म्हणतात. शिवाय एखादा पदार्थ खाल्ल्यावर त्यातील किती साखर रक्तात शोषल्या जाते, याला ‘ग्लायसेमिक लोड’ असे म्हणतात. ज्या पदार्थाच्या १०० ग्रॅम वजनापैकी जास्तीत जास्त कर्बोदके रक्तात शोषली जातात त्याचे ग्लायसेमिक लोड जास्त. धान्यावर प्रक्रिया केली की त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स आणि लोड दोन्ही वाढतात. रिफाईन्ड कर्बोदके, मैदा,पीठ व साखर-गूळ हे धोकादायक ठरतात .
शास्त्रज्ञांना असे आढळले आहे की सतत जास्त ग्ल्यासेमिक इंडेक्स व ग्लायसेमिक लोड जास्त असलेला आहार खाल्ला तर नैराश्य (डिप्रेशन) व चिंतेचा आजार (Anxiety dissorder) ह्यांचा धोका वाढतो. अगदी निरोगी लोकांना काही काळ सतत जास्त कर्बोदके असलेला आहार दिल्यावर त्यांच्यात सुद्धा नैराश्याची लक्षणे आल्याचे एका अभ्यासात दिसले.
असे का होते? : जास्त कर्बोदके घेतल्यावर शरीरातील इन्शुलीन ह्या हार्मोन (संप्रेरक) वर परिणाम होतो. रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढणे किंवा कमी होणे असे बदल घडायला लागतात. यांचा परिणाम म्हणून इतर हार्मोन्स व रसायनांवर परिणाम होतो. ह्या बदलांनी मानसिक आरोग्य धोक्यात येते. शिवाय हेच बदल लठ्ठपणा व डायबेटीस होण्यासाठी सुद्धा कारणीभूत असतात. हे दोन्ही आजार नैराश्य म्हणजे डिप्रेशनशी संलग्न आहेतच. इन्शुलीनला प्रतिकार (इन्शुलीन रेझिस्टन्स), मेंदूची रचना आणि कार्य ह्यात बदल असे शारीरिक बदल लठ्ठपणा-डायबेटीस व नैराश्य दोन्हीमध्ये समानच आढळले आहेत. जास्त ग्लायसेमिक इंडेक्स व लोड असलेली कर्बोदके शरीरभर दाह किंवा सूज निर्माण करतात (inflammation) असे सुद्धा आढळले आहे. ह्याचा परिणाम मानसिक आरोग्यावर सुद्धा होतो.
२. प्रतिकारशक्ती, दाह आणि नैराश्य :
जास्त प्रमाणात उर्जा (कॅलरी), स्निग्ध पदार्थ (तेल-तूप) व प्रक्रिया केलेली कर्बोदके ह्यांचा विपरीत परिणाम आपल्या प्रतिकारशक्तीवर होतो. आपली प्रतिकारशक्ती (Immune System) आपल्याच विरोधात काम करायला लागते. ह्याने आपल्या शरीरात सगळीकडे दाह / सूक्ष्म सूज (Inflammation) सुरू होते. जीवनशैलीशी निगडित अनेक आजार ह्यामुळे होतात. मेंदूमध्येसुद्धा बरीच इजा ह्यामुळे होऊ शकते. मेंदूचा तल्लखपणा कमी होणे, (मेंदूतील एक भाग) हिप्पोकॅम्पस ची कार्यक्षमता कमी होणे ही काही उदाहरणे झाली. सामान्य व्यक्तीचा मेंदूचा रक्तपुरवठा इतर अवयवांपेक्षा निराळा असतो. सामान्यपणे रक्तातील सगळेच घटक मेंदूच्या पेशींपर्यंत पोहोचत नाहीत. काही ठरावीक घटक फक्त पोहोचतात. ह्यामुळे मेंदू सुरक्षित राहायला मदत होते. रक्तवाहिन्यांमध्ये सतत Inflammation दाह असेल तर ह्यात समस्या येतात व मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. या सगळ्यांमुळे मानसिक आजारांचा धोका वाढतो असे तज्ज्ञांचे मत आहे.
मेडिटरिनियन पद्धतीचा आहार घेतल्याने शरीरातील दाह (Inflammation) कमी व्हायला मदत होते असे अभ्यासात दिसून आले आहे. ह्याउलट तेल-तूप, कर्बोदके, उर्जा जास्त असलेला आहार व प्रक्रिया केलेले पदार्थ ह्याने दाह वाढतो असे दिसले आहे. असा दाह कमी करणारी काही औषधे दिली असल्यास नैराश्याची लक्षणे कमी झाल्याचे सुद्धा चांगल्या दर्जाच्या अभ्यासात दिसले आहे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आहाराचा परिणाम प्रतिकारशक्ती व दाह ह्यांच्यावर होऊन परिणामी मानसिक आरोग्यावर होतो असे म्हणण्यास खूप वाव आहे. या संदर्भात अजून अभ्यासाची गरज आहे असे तज्ज्ञ सुचवत आहेत.
३. पोटातील उपयुक्त जीवाणू आणि मानसिक आरोग्य
आपल्या सगळ्यांच्या पोटात सामान्यपणे काही सूक्ष्म जीव असतात. हे आपल्यासाठी उपयोगी असतात. ह्या सूक्ष्म जीवांमध्ये विविधता असते व त्याचे प्रमाणही मुबलक असते. हे बिघडले तर बरेच शारीरिक आजार होतात असे संशोधनातून लक्षात येत आहे. डायबेटीस, लठ्ठपणा, प्रतिकारशक्तीशी निगडित आजार व पोटांचे विकार अशा वेगवेळ्या आजारांमध्ये आतडीतील जीवाणूची भूमिका ह्यावर भरपूर संशोधन सुरु आहे. आतडीतील जीवाणू निरोगी आणि वैविध्यपूर्ण असतील तर वरील आजारांचा धोका कमी होतो, हे आपल्याला कळले आहे. मानसिक आरोग्यासंबंधी सुद्धा असेच असावे असे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
आतडीतील उपयुक्त जीवाणूंचे आतडीमधील मज्जातंतू व रसायनांच्या मदतीने आपल्या मेंदूशी सुद्धा संपर्क करतात. त्यांचे आरोग्य बिघडले तर आपल्या मानसिक आरोग्यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. नैराश्य (डिप्रेशन) असलेल्या रुग्णांच्या आतडीमधील जीवाणूमध्ये विपरीत बदल घडलेले अभ्यासांमध्ये दिसले आहेत. एका प्रयोगात काही निरोगी उंदरांच्या आतडीत डिप्रेशनच्या रुग्णांच्या आतडीतील जीवाणू टाकण्यात आले. असे केल्यावर त्या निरोगी उंदरांमध्ये डिप्रेशन म्हणजेच नैराश्याची लक्षणे दिसायला लागली. आतडीतील जीवाणू सुधारणारा probiotic हा घटक दिल्यावर डिप्रेशन च्या लक्षणांमध्ये सुधार दिसला असा एक अभ्यास पुढे आला आहे. ह्याचाच अर्थ आतडीचे आरोग्य छान तर आपले आरोग्य छान!
आतडीचे आरोग्य सुधारणारा आहार म्हणजे ज्यात चोथा (फायबर), पॉलीफेनोल आणि चांगली स्निग्धाम्ले ह्यांचे प्रमाण मुबलक असेल. सोप्या भाषेत भरपूर भाजीपाला, फळे, कडधान्ये, तेलबिया व कच्चे अन्न असा आहार. वर सांगितलेला मेडिटेरिनियन पद्धतीचा आहार आतडीचे आरोग्य सुधारतो असे दिसले आहे. ह्याउलट तेलकट, तळलेले, साखर, पीठ मैदा जास्त असलेला आहार हा आतडीचे आरोग्य बिघडवणारा दिसलेला आहे. अशा आहाराने आतडीतील जीवाणूंचा दर्जा खूपच खालावतो.
सावधगिरीचा इशारा :
आपण आहार आणि मानसिक आरोग्यावरील परिणामाबद्दल बरेच बघितले तरीही एक विसरायला नको. मानसिक आजार अनेक कारणांमुळे होऊ शकतात. अगदी डिप्रेशन सुद्धा विविध कारणांमुळे होऊ शकते. ह्यातील अनेक कारणे ही आहाराशी मुळीच संबंध नसणारी असू शकतात. त्यामुळे मानसिक आजार हे फक्त चुकीच्या आहाराने होतात असे मुळीच नाही. शिवाय, फक्त आहारात बदल करून आपल्याला सगळे मानसिक आजार बरे करता येत नाहीत. मनोविकार तज्ज्ञ (सायकिअॅट्रिस्ट) व औषधोपचार हे मानसिक आजारांमध्ये खूप महत्त्वाचे आहेत. ते जीव वाचवू शकतात. त्यामुळे मनोविकार तज्ज्ञाचा सल्ला हा खूप आवश्यक आहे! वर उल्लेख केलेल्या लेखात सुद्धा हा मुद्दा मांडण्यात आला आहे. मानसिक आजारांविषयी समाजात एक पगडा असतो. त्यामुळे वैद्यकीय मदत डावलून घरगुती उपाय करण्याकडे कल असतो. असे करू नये.
वरील लेखाचा उद्देश हा निरोगी लोकांनी आहारावर भर देऊन आजार टाळायला मदत व्हावी हा आहे. सोबतच आधुनिक वैद्यक शास्त्र आहाराला किती महत्त्व देते व कसे अभ्यास सुरू असतात याविषयी माहिती व्हावी हा सुद्धा आहे.
-डॉ. विनायक हिंगणे