वेट लॉससाठी क्रॅश डाएट : फॅड्स आणि फोलपणा

प्रा. प. रा. आर्डे -

वजन कमी करण्यासाठी किंवा काहीजण वाढवण्यासाठी अधीर झालेले असतात. वजन वाढविणे किंवा कमी करणे, याचं वेड आणि मूर्खपणा जगात सर्वत्र वाढताना दिसत आहे. वजन कमी करण्याचे आधुनिक विज्ञानावर तपासून घेतलेले खात्रीशीर उपचार करण्याऐवजी बहुतांश लोक चुकीचे उपचार करवून घेतात, त्यातून वजन कायमस्वरुपी कमी होत नाहीच; उलट शरीरास आवश्यक असणारी पोषकद्रव्ये अशा चुकीच्या उपचारांत वगळली जातात, त्याचेही दुष्परिणाम शरीरावर संभवतात.

भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत तुरुंगात असताना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी इंदिरा गांधींना जी पत्रे लिहिली, ती पुस्तकरुपाने प्रसिद्ध झालेली आहेत. या पुस्तकाचे नाव आहे – ‘ग्लिम प्लेस ऑफ वर्ल्डस हिस्ट्री’ म्हणजेच ‘जगाच्या इतिहासाचे ओझरते दर्शन.’ सुरुवातीच्या एका पत्रात नेहरूंनी भारतात प्रवास करीत असलेल्या एका चिनी प्रवाशाला भेटलेल्या विचित्र माणसाचे वर्णन केले आहे. हा माणूस हातात उंच मशाल धरून चालत होता. त्याचे पोट मोठे दिसत होते. या विचित्र माणसाला पाहून चिन्याने त्याला विचारले, “अरे, तू दिवसादेखील ही जळती मशाल घेऊन का हिंडतो आहेत आणि तुझे पोट एवढे मोठे कसे? तू पोटाला वरून काहीतरी बांधलेले दिसते.” त्यावर त्या माणसाने उत्तर दिले, “भल्या माणसा माझ्या पोटात ज्ञानाचा एवढा प्रचंड साठा झाला आहे की, त्यामुळे माझे पोट फुटेल म्हणून त्याच्या संरक्षणासाठी मी तांब्याचे पत्रे पोटाभोवती बांधले आहेत आणि मशालीचे म्हणशील तर जगात एवढा अज्ञानाचा अंध:कार पसरलेला आहे की, तो दूर करण्यासाठी ही मशाल पेटवून मी लोकांना शहाणं करीत आहे.”

पोटामध्ये ज्ञान साठवणार्‍या या माणसाला तुम्ही हसाल; पण तुमच्या पोटावर साठलेल्या चरबीचं काय? आणि ती कमी करण्यासाठी किंवा काहीजण वाढवण्यासाठी अधीर झालेले असतात, त्याचं काय? वजन वाढविणे किंवा कमी करणे, याचं वेड आणि मूर्खपणा जगात सर्वत्र वाढताना दिसत आहे. वजन कमी करण्याचे आधुनिक विज्ञानावर तपासून घेतलेले खात्रीशीर उपचार करण्याऐवजी बहुतांश लोक चुकीचे उपचार करवून घेतात, त्यातून वजन कायमस्वरुपी कमी होत नाहीच; उलट शरीरास आवश्यक असणारी पोषकद्रव्ये अशा चुकीच्या उपचारांत वगळली जातात, त्याचेही दुष्परिणाम शरीरावर संभवतात.

वजन का वाढते?

आधुनिक विज्ञानात वजन वाढण्याचे कारण दिले आहे. आपण अन्नाद्वारे जे घटक शरीरात घेतो, त्याचे अन्नमार्गात चयापचय क्रियेमुळे ग्लुकोजमध्ये रूपांतर होते. हा ग्लुकोज रक्तात शोषला जातो. फुफ्फुसाद्वारे रक्तात मिसळला जाणारा ऑक्सिजन या ग्लुकोजचे मंद ज्वलन घडवून आणतो. त्यातून जी ऊर्जा निर्माण होते, ती शरीरातील सर्व पेशींना पुरवली जाते. आपण शरीराच्या केलेल्या बाह्य हालचाली म्हणजे व्यायाम आणि ज्यात शरीर हलते, अशा कार्यांसाठी या ऊर्जेचा काही भाग खर्च होतो. याशिवाय आपल्या शरीरांतर्गत जे अवयव असतात, त्यांची कार्ये चालण्यासाठी काही ऊर्जा खर्च होते. उदा. हृदयाची स्पंदने आणि त्यातून होणारे रक्ताचे अभिसरण यासाठी ऊर्जा लागते.

दोन गोष्टींचा विचार करा, अन्नावाटे शरीरास मिळालेली ऊर्जा. ही ऊर्जा उष्णतेच्या स्वरुपात असल्याने ती कॅलरीने मोजतात. बाह्य आणि अंतर्गत शारीरिक हालचालींमुळे जेवढ्या कॅलरी खर्च होतात, त्यापेक्षा अन्नावाटे शरीरात मिळालेल्या कॅलरीज जास्त असतील, तर जास्तीच्या कॅलरीज शरीरात साठविल्या जातात. या साठविलेल्या कॅलरीज म्हणजे आपल्या शरीरभर पसरलेली चरबी होय. प्रथम ही चरबी पोटावर साठविली जाते आणि ती अधिक वाढू लागली, तर ती तेथून शरीरावर पाठवली जाते. आपलं वजन वाढण्याचं हे प्रमुख कारण आहे. तुम्ही बँकेत खात्यावर पैसे ठेवता. त्यातील पैसे गरजेनुसार काढून घेता; पण काढून घेतलेली रक्कम ठेवींपेक्षा कमी असेल, तर तुमच्या खात्यावर बॅलन्स वाढत जाणार. हेच शरीराच्या बाबतीत घडते.

वजन कमी करणे कठीण का?

वरील परिच्छेद वाचून तुम्हाला वाटेल, अरे! वजन घटवणे किती सोपे आहे! कमी खा आणि जास्त हालचाल करा; पण हे बोलायला सोपे आहे. प्रत्यक्ष आचरणात आणताना अनेक अडथळे येतात. त्या अडथळ्यांचा आपण विचार करूया.

वजन घटवण्यातील अडथळे

वजन कमी करण्याच्या मार्गात येणारा एक अडथळा म्हणजे सामाजिक सवयींचा भाग. काही सामाजिक घटकांमध्ये पारंपरिकरित्या चरबी वाढवणार्‍या पदार्थांची आवड असते. उदा. इटालियन लोक मोठ्या प्रमाणात पास्ता खातात. आपल्याकडे शेतीत काम करणारे लोक तेलकट, तिखट पदार्थांवर जास्त भर देतात. उच्चवर्गीय कुटुंबामधून भातावर तुपाची धार पडायलाच हवी. अशा तेल, तूप किंवा पास्ता किंवा अलिकडेच आपल्याकडे घुसलेला पिझ्झा, बर्गर हे चरबी वाढवणारे पदार्थ होत. लहानपणापासूनच कौटुंबिक सहभोजनात वाढदिवसाच्या पार्टीमध्ये, सुट्टीच्या दिवशी मुलांना घेऊन हॉटेलमध्ये जाणे, यामुळे लहान वयापासूनच अशा अन्नाची चटक मुलांमध्ये निर्माण झालेली असते. ही चटक मोठेपणीसुद्धा सुरूच राहते. आपल्या संस्कृतीत वाढदिवसाला बायकोने नवर्‍याला गोड खाण्याचा आग्रह धरणे, विवाहप्रसंगी यजमानांनी पाहुण्यांना लाडू-जिलेबीचा आग्रह करणे, याचे कोडकौतुक होते; परिणामी गोडधोड आणि स्निग्ध पदार्थांचा मोह होणे अटळ होते आणि संयम बाजूला राहतो. लक्षात ठेवा, शरीरात कॅलरी कमी होणे हे वजन स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक आहे.

वजन वाढण्याचे दुसरे कारण आहे रासायनिक. साखरेमुळे आपल्या मेंदूची केमिस्ट्री बदलते. साखर गोड लागते, याचे कारण ती गोड असते याच्यापेक्षा ती मेंदूला गोड लागते, हे होय. त्यामुळे साखर (जिलेबी) दिसताच मुलाचा किंवा आपला मेंदू बोलायला लागतो, ‘चॉकलेट, केक, जिलेबी काय मस्तच गोड आहे!’ सारांश, काय खायचे आणि किती खायचे, याबाबतच मेंदूचा ताबा ही एक अतिशय गुंतागुंतीची क्रिया आहे.

या रासायनिक कारणांबरोबर मानसिक कारणही मदतीला येते. वजन वाढले की, त्यामुळे व्यक्तीला मानसिक ताण निर्माण होतो; पण चमचमीत खाल्ल्यामुळे त्या व्यक्तीला बरे वाटते आणि हा ताण तात्पुरता निघून जातो; पण हे एक दुष्टचक्र आहे. ‘मला ताण येतो. कारण मी स्थूल आहे, म्हणून मी मला बरं वाटावं, यासाठी चमचमीत अन्न घेतो.’ याचा परिणाम काय होतो? वजन वाढतं आणि पुन्हा त्रास वाटू लागतो. हे दुष्टचक्र भेदणं कठीण बनतं.

बर्ट्रांड रसेल या प्रख्यात तत्त्वज्ञाने विवेक माणसाला अवघड का वाटतो, याचे एक छान उदाहरण दिले आहे. ‘मी बीअर पितो. कारण ती माझे आरोग्य सुधारण्याला मदत करते,’ असा बीअर उत्पादक प्रचार करतात. लघवीचे विकार बीअरमुळे बरे होतात, असाही प्रचार केला जातो; पण हे खरे नाही. बीअरमधील अल्कोहोल हे एकूण शरीराला हानिकारकच असते, असा संशोधनाचा निष्कर्ष आहे. पण हे माहीत असूनही लोक बीअर पिण्याचे समर्थन करतात. विवेक बाजूला गुंडाळून ठेवून हे चालते. याला ‘रॅशनलायझेशन ऑफ इर्र्ॅरशनॅलिटी’ असे म्हणता येईल. (Rationalisation of Irrationality) वजन वाढलं म्हणून मनाची रूखरूख घालवण्यासाठी चमचमीत पदार्थावर ताव मारा आणि रुखरुख थांबवा, हा असाच अविवेकी प्रकार होय.

चमचमीत अतिरेकी खाण्याच्या सवयी लहानपणातच आई-वडील मुलांचे हट्ट पुरवून सुरू ठेवतात. ‘बाळ्या, तू अभ्यास केलास, तर तुला चॉकलेट’, म्हणजे मुलाला चांगल्या कामाबद्दल बक्षीस द्यायचे, हीच मानसिकता मोठे झाल्यावरही चालूच राहते. फक्त इथे मूल आणि पालक दोन्हीही आपण स्वत:च असतो. आपणच आपल्याला गोड पदार्थांचं बक्षीस जेवणामध्ये घेऊन देतो. मग शरीराला एक वाटी आमरस पुरेसा असेल, तर बायकोच्या प्रेमळपणाचा आग्रह मोडवत नाही.

वजन बदलाचे महत्त्वाचे कारण बेसल मेटॅबोलिक रेट (बी.एम.आर.)

वजनात योग्य बदल व्हावा, यासाठी जैवशरीरक्रिया शास्त्रातील एक संकल्पना नीट समजून घ्यायला हवी. या संकल्पनेचे नाव आहे – बेसल मेटॅबोलिक रेट. बेसल म्हणजे प्राथमिक महत्त्वाचं. मेटाबोलिक म्हणजे चयापचयाशी संबंधित. बी.एम.आर. म्हणजे तुम्ही विश्रांती स्थितीत असताना वापरलेल्या (शरीरात) कॅलरीज. शरीर स्थिर किंवा विश्रांती अवस्थेत असताना कॅलरी कशा जळतील, अशी शंका तुम्हाला आली असेलच; पण हे खरे आहे. शरीर बाहेरून हलताना दिसत नसले, तरी शरीरांतर्गत अवयवांमध्ये हालचाली चालू असतात. हृदय स्पंदन पावत असते, डोळ्यांच्या पापण्या लवत असतात, जठरामध्ये अन्नावर घुसळण चालू असते, मूत्रपिंडांमध्ये रक्तातून लघवीची गाळण चालू असते इत्यादी. या क्रियांसाठी ऊर्जा लागतेच आणि ही ऊर्जा आपल्याला अन्नरसापासून ऑक्सिजनशी संयोग होऊन मिळत असते. वैज्ञानिक संशोधन असे सांगते की, शरीर स्थिर स्थितीत असताना शरीरातील एकूण ऊर्जेपैकी 2/3 कॅलरीज उपयोगात आणल्या जातात; म्हणजे फक्त 1/3 कॅलरीज या बाह्य हालचालींसाठी वापरल्या जातात. (व्यायाम व शारीरिक कष्टाचे काम करणे इत्यादी) आपला बी.एम.आर. वाढत्या वयाबरोबरच कमी होत जातो. वयाच्या 30 व्या वर्षी एका दिवसात जेवढा बी.एम.आर. असतो, त्याच्याशी तुलना करता प्रतिदिन 200 कॅलरीज इतका कमी वेग 60 व्या वर्षी असतो. तुम्हाला एका दिवसाला 200 कॅलरीज हा वेग किरकोळ वाटेल; पण एका वर्षाचा विचार करता तो अंदाजे 10 किलो वजन वाढवण्याइतका असतो. याचा अर्थ असा की, वयाच्या 30 व्या वर्षी तुम्ही जेवढे आणि जे अन्न घेता, तेवढेच आणि तसलेच अन्न 60 व्या वर्षी घेत राहिला, तर एका वर्षात तुमचे वजन 10 किलोने वाढेल. (शरीर विश्रांती अवस्थेत असताना.)

आपले वय जसजसे वाढत जाते, तसतसे आपण सुखासीनतेकडे वळतो, म्हणजेच आपल्या शारीरिक हालचाली मंदावतात. वयाच्या 40 पर्यंत आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी मिळाल्याने आपली सुखासीनता तेथून सुरू होते. याचा परिणाम म्हणून शरीरांतर्गत जळणार्‍या कॅलरीजचे प्रमाण कमी होते आणि त्यामुळे आपल्या स्नायूंचे एकूण वजन कमी होत जाते. शरीराचे वजन दोन घटकांनी बनते. एक म्हणजे ‘लीन मास’ याला शरीरातील स्नायूंचे वजन म्हणतात. यात सर्व शरीर अवयव आणि हाडांच्या स्नायूचा समावेश होतो. शरीरातील दुसरा घटक म्हणजे शरीरात साठवलेली चरबी (फॅट). आपल्या शरीरातील एकूण स्नायूपेशी म्हणजेच ‘लीन मास.’ लीन मास वाढत्या वयाबरोबर कमी होत जातो. हा आपला बी.एम.आर. निश्चित करतो. याचा अर्थ असा की, ‘लीन मास’ कमी झाला की, बी.एम.आर. कमी होतो; म्हणजेच शरीरांतर्गत स्नायूक्रियेसाठी लागणार्‍या कॅलरीज जळण्याचा वेग कमी होत जातो.

बी.एम.आर. आणि वजनाचे दुष्टचक्र

आता आपल्याला आपले वजन कसे वाढते, याचं नीट आकलन होऊ शकेल. वाढत्या वयाबरोबर आपण कमी क्रियाशील हेतो; परिणामी आपल्या स्नायूपेशी नष्ट होऊन ‘लीन मास’ कमी होतो. ‘लीन मास’ कमी झाला की, बी.एम.आर. कमी होतो. बी.एम.आर. कमी झाला की, आपण विश्रांती अवस्थेत असताना कमी कॅलरीज जाळतो. ‘लीन मास’मधील ज्वलन कमी झाल्यामुळे शरीरात कॅलरीचा भरपूर साठा शिल्लक पडतो. त्यातील व्यायामाने काही कॅलरीज जळतील आणि अन्नात कमी कॅलरी घेऊन शिल्लक साठा मर्यादित करता येईल; पण तो पूर्णांशाने कमी होत नाही. याचा परिणाम म्हणून या साठलेल्या कॅलरीने वजन वाढते. चाळिशीच्या पुढचे स्त्री-पुरुष लठ्ठ व्हायला लागतात, याचे हे कारण आहे.

वजनबदलाचा खात्रीशीर उपाय

वरील विवेचनावरून तुमच्या लक्षात आले असेल की, तुमचे वजन जर वाढलेले असेल, तर सध्या तुम्ही जेवढ्या कॅलरी अन्नाद्वारे घेता, त्याचे प्रमाण कमी केले पाहिजे आणि आता तुम्ही जी शारीरिक हालचाल करता, ती वाढवली पाहिजे किंवा या दोन्हीत योग्य तो समतोल साधला पाहिजे. वजन कमी करण्याचा कळीचा उपाय म्हणजे तुमचे कॅलरीग्रहण आणि व्यायाम याचे योग्य प्रमाण ठेवणे हे होय.

असं झालं नाही तर म्हणजेच वाढत्या वयाबरोबर तुम्ही कॅलरीचे प्रमाण आणि व्यायामाचे प्रमाण योग्य ठेवले नाही तर शरीरात शिल्लक राहिलेली ऊर्जा ही रक्तातील ग्लुकोजमध्ये परिवर्तित होते; म्हणजेच ब्लड शुगर वाढते. याचा अंतिम परिणाम म्हणजे तुम्ही मधुमेह, लठ्ठपणा आणि इतर शारीरिक व्याधींना निमंत्रण देता.

सुखासिनता आणि लठ्ठपणा

सध्याच्या काळात डॉक्टर लोक आणि समाजशास्त्रीय विज्ञान असे सांगते की, जगात आणि आपल्या देशातही मधुमेह आणि हृदयविकाराचे प्रमाण सातत्याने वाढते आहे. एक काळ असा होता की, आपल्या देशात शेती संस्कृती होती. सकाळी पहाटेपासून ते सायंकाळी दिवेलागणीपर्यंत पुरुष आणि स्त्रिया कष्टाची कामे करीत. त्यावेळी ‘मधुमेह’ हा शब्द लोकांना माहीतही नव्हता. एका गावाहून दुसर्‍या गावाला माणसे पायी चालत जात. मोठ्या प्रमाणात शारीरिक हालचालींमुळे आणि खाण्यात बहुतेकवेळा चटणी, भाकर, कांदा आणि डाळीची आमटी असा आहार असल्याने कशाला ब्लडशुगर वाढेल; पण माणसांनी कष्ट वाचविण्यासाठी यंत्रे निर्माण केली. पाय चालायचे थांबले. सायकल आली, सायकल सुधारून मोटरसायकल आली. आता पायही हालायचे थांबले. संगणकापुढे दिवसभर बसून ग्लुकोज कसे जळणार? मध्यमवर्गातील उत्पन्न वाढल्याने सुखासीन बायका टी.व्ही. समोरून हलत नसतील, तर त्या लठ्ठ होणार नाहीत, तर काय? यावर उपाय साधा आहे. योग्य आहार आणि योग्य विहार. विज्ञान हे सोपे सूत्र जरा कठीण संकल्पनेतून तुम्हाला सांगत आहे; पण हे समजून घ्यायचे कुणी आणि त्याप्रमाणे वर्तन बदलायचे कुणी? योग्य आहार आणि भरपूर व्यायाम या सूत्राचा प्रामाणिकपणे, चिकाटीने अवलंब झाला, तर लठ्ठपणाची समस्याच नाहीशी होईल; पण संयम, विज्ञान आणि चिकाटी याऐवजी लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपण ‘क्रॅश डाएट’च्या शॉर्टकटकडे वळतो. ‘क्रॅश डाएट’च्या उपयोगामुळे सुरुवातीला वजन कमी होते; पण ते कायमस्वरुपी नाही. वजन वाढणे आणि कमी होणे, याचे दुष्टचक्र कायमस्वरुपी वजन नियंत्रित करू शकत नाही. ‘क्रॅश डाएट’चे इतरही मोठे दुष्परिणाम दिसून आले आहेत.

क्रॅश डाएटचा वेडेपणा व फोलपणा

कमी वेळात जास्त प्रमाणात वजन कमी करण्याचा उपाय म्हणजे ‘क्रॅश डाएट.’ पोटात कॅलरीज कमीत कमी घालवण्यासाठी ‘क्रॅश डाएट’वाले असा ‘डाएट’ उत्पादित करणार्‍या कंपन्या प्रचंड जाहिरातीचा मारा लोकांवर करतात. लोकांच्या इच्छाप्रेरित विचारांचा (विशफूल थिंकिंग) ‘क्रॅश डाएट’वाले गैरफायदा घेतात. सोपा मार्ग किंवा शॉर्टकट लोकांना हवाहवासा वाटतो. ‘एका महिन्यात दहा किलो वजन कमी करा!’ अशा जाहिराती लोकांना भुलवतात. वजन कमी करण्याचा वैज्ञानिक उपाय म्हणजे अन्नाद्वारे घेतलेल्या कॅलरीचे पुरेशा व्यायामाने केलेले ज्वलन; पण बहुतेक लोकांना व्यायामाचा कंटाळाच असतो. तेव्हा व्यायाम न करता वजन कमी करा, अशी जाहिरात लोकांना भुरळ पाडते. ‘क्रॅश डाएट’मुळे वजन कमी होते, हे अर्धसत्य आहे. वजन किती प्रमाणात किंवा किती वेगाने कमी करावयाचे, याबद्दल चुकीचे समज ‘क्रॅश डाएट’वाले करून देतात. संशोधनात ‘क्रॅश डाएट’चे अनेक दुष्परिणाम सिद्ध झाले आहेत. ‘क्रॅश डाएट’मुळे वजन कमी झाले, तरी ते कायमचे (परमनंट) कमी होत नाही; उलट कमी झालेले वजन पुन्हा वाढते. मग पुन्हा ‘डाएट’, पुन्हा कमी वजन. कमी झालेले वजन पुन्हा वाढले, हे दुष्टचक्र चालू राहते. यास ‘यो-यो परिणाम’ असे नाव आहे.

योयो इफेक्ट

अमेरिकेतील येल विद्यापीठातील केली ब्राऊनेल या वैज्ञानिकाने वजन घटणे आणि परत वाढणे या चक्राला ‘यो-यो इफेक्ट’ हे नाव दिले आहे. ‘क्रॅश डाएट’वाले ज्या पावडरी किंवा गोळ्या वजन कमी करण्यासाठी लोकांना देतात, त्यात भुकेची इच्छा होऊ नये, यासाठीची औषधे पण असतात. त्यामुळे संबंधित व्यक्ती अन्नसेवन टाळते; परिणामी वजन झपाट्याने कमी होऊ लागते; पण हा अन्नत्याग काही काळानंतर संबंधित व्यक्तीमध्ये थकल्याची आणि निराशेची भावना उद्दीपित करतो; परिणाम म्हणून ती व्यक्ती आपल्या जुन्या अन्न घेण्याच्या सवयींकडे वळते. अन्नाबद्दलची इच्छाही वाढते. परिणाम असा होतो की, व्यक्तीचा खादाडपणा नकळत वाढतो आणि वजन वाढू लागते. यावेळी मात्र ‘लीन मास’ (स्नायूंचे वजन) वाढत नाही; वाढते ती फक्त चरबी आणि हे चक्र पुन्हा-पुन्हा रिपीट झाले, तर पहिल्यापेक्षा त्या व्यक्तीच्या पोटाचा घेर अधिकच झालेला असतो. सामान्य भाषेत याला ‘थोतली’ असे म्हणतात.

योयोचे दुष्परिणाम

‘यो-यो इफेक्ट’चा एक दुष्परिणाम म्हणजे चरबी आणि स्नायू यांच्या गुणोत्तरात झालेला बदल. ‘यो-यो’मुळे चरबी भरभर वाढते; पण स्नायूंची झीज भरभर भरून निघत नाही. यातून शरीररचना, चयापचय आणि इतर शरीरक्रिया यांच्यावर वाईट परिणाम होऊ शकतात.

1) ‘क्रॅश डाएट’मुळे आलेला अशक्तपणा, यातून वाढलेली भूक व्यक्तीला अधिक अन्न सेवन करण्यास प्रवृत्त करते; परिणामी चरबी वाढून वजन पहिल्यापेक्षा अधिक होऊ शकते. ‘क्रॅश डाएट’ घेणार्‍या व्यक्तींपैकी तीनमध्ये एक व्यक्ती पहिल्यापेक्षा जास्त लठ्ठ होते.

2) ‘यो-यो परिणामा’मुळे वाढलेल्या वजनात चरबीचे प्रमाण अधिक असते. याचा परिणाम म्हणजे पुन्हा वजन कमी-अधिक अवघड बनत जाते.

3) शरीरातील स्नायूंचे वजन (लीन मास) ‘क्रॅश डाएटिंग’मुळे कमी होत जाते. याचा परिणाम आपली शारीरिक ताकद कमी होते.

4) ‘यो-यो’मुळे वाढलेली चरबी आपल्या यकृताला अधिक चरबीयुक्त बनवते. यातून ‘टाईप-2’ मधुमेहाचा धोका संभवतो.

5) स्थूलपणाचा परिणाम म्हणून मधुमेहाचा धोका वाढण्याची शक्यता जशी असते, त्याचप्रमाणे हृदयविकाराचा धोकाही वाढू शकतो.

6) वजन खाली-वर होण्याने रक्तदाबाचा विकारही संभवतो.

7) ‘यो-यो परिणामा’मुळे व्यक्तीला नैराश्य येऊ शकते.

खरा उपाय

वजनबदलासाठी ‘क्रॅश डाएट’चा उपयोग करणे हे फसवे विज्ञान आहे. वजन कमी करा आणि त्यासाठी कॅलरी कमी घ्या, हे खरेच आहे; पण कोणत्या प्रकारे कॅलरी कमी करा, यात फसवेगिरीची मेख दडलेली आहे. वजन कमी करण्याचा योग्य उपाय म्हणजे संतुलित आहार आणि प्रमाणशीर शारीरिक हालचाल किंवा व्यायाम. हे विज्ञान ‘क्रॅश डाएट’वाले लोकांना सांगत नाहीत; उलट व्यायाम न करता वजन कमी करा, असं सांगणं म्हणजे शुद्ध फसवणूक आहे. ‘क्रॅश डाएट’चे उत्पादन करणार्‍या कंपन्या आणि हे उत्पादन विकणारे सेल्समन ज्या पावडरी किंवा गोळ्या किंवा इतर रसायने विकतात, त्यांच्या किमती अव्वाच्या सव्वा असतात. असे महागडे उपाय पुन्हा-पुन्हा करवून घेणे हा शुद्ध बावळटपणा आहे; शिवाय आपला खिसा रिकामा होतो, त्याचे काय? ‘क्रॅश डाएट’वाले उत्पादक आणि विक्रेत्यांना लोकांच्या प्रबोधनाशी काही देणे-घेणे नसते. त्यांचा मुख्य हेतू असतो, काहीही विका. त्यासाठी आभासी विज्ञान लोकांच्या माथी मारा आणि पैसे कमवा. आधुनिक संशोधनानुसार योग्य आहार आणि विहार यांच्या मदतीने दर महिन्याला दोन किलोपेक्षा जास्त वजन कमी करू नये, असा सल्ला दिला जातो; पण ‘क्रॅश डाएट’वाले महिन्या-दोन महिन्यांत 5 ते 10 किलो वजन कमी करण्याचा चुकीचा उपाय लोकांना सांगतात.

शरीराचे आरोग्य नीट राहण्यासाठी कॅलरीबरोबरच जीवनसत्वे आणि खनिजे यांचीही शरीराला गरज असते. ‘क्रॅश डाएट’वाल्यांच्या आहार पद्धतीत कॅलरीबरोबर जीवनसत्त्वे आणि खनिजेही वगळली जातात. त्यातून शरीरातील चयापचय क्रियेत बिघाड होण्याचा धोका संभवतो. मानवी शरीराचा 99 टक्के हिस्सा हा मुख्यत: ऑक्सिजन, कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, कॅल्शियम आणि फॉस्फरस यांनी बनलेला असतो. याचबरोबर पोटॅशियम, सल्फर, सोडियम आणि इतर धातू शरीरक्रियेत उपयोगी पडतात. ही खनिजद्रव्ये ‘क्रॅश डाएट’मध्ये नसतात; परिणामी शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. जीवनसत्वाच्या अभावी वेगवेगळ्या शारीरिक व्याधी उद्भवू शकतात म्हणून आपल्या आहारात ‘क्रॅश डाएट’ऐवजी प्रमाणशीर कॅलरी देणारे अन्नघटक; आणि त्याचबरोबर जीवनसत्वे आणि खनिजे यांचा समावेश हवा.

समारोप

आपला प्रश्न सोडवण्यासाठी सामान्य माणूस अनेक माध्यमांच्या संपर्कात येतो. आपले मित्र, शेजारी यांच्यापासून सल्ला घेतो. वर्तमानपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे यांच्यावरची माहिती पाहतो आणि वाचतो. दूरचित्रवाहिन्यांच्या जाहिरातीत कमरेला बांधावयाच्या पट्ट्याची जाहिरात नेहमी दिसते. पट्टा लावणारी बाई तिची चरबी कशी कमी होते, हे रंगवून सांगते. आजच्या जाहिरात युगात आपला ‘रद्दड’ माल लोकांच्या माथी मारण्याचे ‘कौशल्य’ बर्‍याच कंपन्या वापरतात. ‘लक्स साबणाने आंघोळ करा आणि अभिनेत्री सारखं सुंदर दिसा,’ ही जाहिरात तुम्ही रोज पाहत असालच. लांबसडक केसांच्या जाहिरातींचा टीव्हीवर रतीबच चालू असतो. एवढंच काय, ‘अमुक-अमुक सुगंधी द्रव्य अंगाला लावा आणि प्रेयसीला जिंका,’ अशाही जाहिराती पाहायला मिळतात. वजन घटणं अथवा वाढणं यासाठीच्या प्रचंड जाहिराती या अशाच स्वरुपाच्या छद्मविज्ञानी असतात. ज्ञानाबरोबर अज्ञानाचा मारा चहूबाजूंनी आपल्यावर आदळत असताना काय निवडायचं, याचंही विवेकी भान बाळगायला हवं. शॉर्टकटपेक्षा संयम, विज्ञान आणि चिकाटी यांचा शहाणपणा वापरून लठ्ठपणाबाबतचे उपाय अंगीकारायला हवेत. समर्थ रामदासांचा एक प्रसिद्ध श्लोक आहे-

जे जे आपणांसी ठावे। ते ते लोकांसी सांगावे॥

शहाणे करूनि सोडावे। सकलजन॥

रामदासांची क्षमा मागून ‘क्रॅश डाएट’वाले काय करतात, ते आपणाला सांगता येईल.

लोकांना ‘डाएट’चे फॅड लावावे।

मग ‘क्रॅश डाएट’ त्यांना विकावे॥

लठ्ठ करुनि सोडावे। सकलजन॥

लठ्ठपणा कसा कमी करायचा, हे आता तुमचं तुम्हीच ठरवा.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ]