उमेश सूर्यवंशी -
महात्मा गांधी यांना सत्याग्रही कार्यकर्त्यांची फौज उभारता आली. या सत्याग्रही कार्यकर्त्यांंकडून गांधींनी काही लक्षवेधी कामगिरी करवून घेतली. गांधींच्या निधनानंतर अपवाद वगळता सत्याग्रही कार्यकर्त्यांची समाजातील विधायक हस्तक्षेप करण्याची ऊर्मी जणू लोपच पावली. गांधीविचार शिरोधार्य मानून काही जणांनी अत्यंत महत्त्वाचे कार्य पार पाडले. काही जणांनी गांधींचे नाव आपल्या कार्याला फारसे लावले नाही. मात्र आयुष्यभर गांधीमार्गाने चालत समाजाला विधायक पातळीवर घडविण्याची महान कामगिरी करून दाखवली. यामध्ये एक महत्त्वाचे नाव नोंदवले पाहिजे ते शहीद नरेंद्र दाभोलकर यांचे. अंधश्रद्धा समाजमन पोखरतात, मानवी मनाची गुलामगिरी वाढवतात, माणसात पशुत्वाच्या पातळ्या वाढवत नेतात. अंधश्रद्धांपासून समाजाची सुटका व्हावी आणि समाज विवेकी वर्तनाच्या पायर्या भरभर चढावा, याकरिता दाभोलकरांनी आपले आयुष्याचे ध्येयच अंधश्रध्दांचे निर्मूलन ठरवले. याकरिता संघटनात्मक पातळीवर लढा उभारला आणि शेवटी याचकरिता त्यांना शहीद व्हावे लागले. दाभोलकरांनी हा संपूर्ण लढा लढवला तो विवेकी मार्गाने. हा विवेकाचा मार्ग त्यांना गांधीवाटेकडे घेऊन जातो. गांधी आणि दाभोलकर इथे एकमेकांना भेटतात. इतकेच नाही, तर एकमय होतात. गांधींनी सत्याग्रही मार्गाचा आग्रह धरताना काही महत्त्वाचे नियम बनवले. सत्याग्रही हा जातपात न मानणारा असावा, वैयक्तिक जीवनात आणि सार्वजनिक जीवनातही सत्याग्रहीच्या वर्तनामध्ये फरक नसावा. सत्याग्रही ज्या लढ्याकरिता उभा राहतो, त्या लढ्याकरिता; प्रसंगी जीवाचे बलिदान देण्यासही मागे-पुढे पाहू नये. अत्यंत साधी राहणी आणि कमी गरजांचे जगणे हेच सत्याग्रहीचे आयुष्य असावे, प्रत्येक लढा हा अहिंसक असलाच पाहिजे; शिवाय त्या लढ्याला सत्याचे अधिष्ठान हवेच. कोणत्याही व्यसनापासून सत्याग्रही दूरच राहिला पाहिजे आणि व्यसनांचा जाहीरपणे धिक्कार देखील केला पाहिजे. अशा काही नियमवजा अपेक्षा गांधींनी सत्याग्रही कार्यकर्त्यांकडून ठेवल्या होत्या. डॉ. नरेंद्र दाभोलकर या संपूर्ण अपेक्षांना पूर्णतः उतरतात. जी अंधश्रध्दा निर्मूलनाची चळवळ दाभोलकरांनी महाराष्ट्रात बांधून दाखवली, त्यामधील बहुतांश कार्यकर्ते अगदी याच पठडीतले त्यांनी बनवून दाखवले. याचा एक मोठा फायदा झाला, तो महाराष्ट्राची एक ओळख ‘सत्याग्रही कार्यकर्त्यांची भूमी’ अशी करून द्यायला हरकत नसावी. दाभोलकरांनी महाराष्ट्राला आणि देशाला दिलेले हे सर्वोत्तम संचित आहे, असे मी मानतो.
चंगळवादाचे थैमान राजरोस सुरू असताना दाभोलकर व त्यांच्या कार्यकर्त्यांची फौज साध्या राहणीत आणि निर्व्यसनीपणात अंधश्रध्दा निर्मूलनाचा विद्रोह पेटवतात. कार्यकर्ते जातपात मानत नाहीत आणि आपल्याबरोबरीच्या साथीदाराची जात शोधत बसत नाहीत. माणूसपण ही एकच जात इथे समान असते. आपण समाजाचे देणे लागतो, ही जाणीव तसूभरही ढळू न देता कायम आपल्या कार्यात झोकून घेतलेले कार्यकर्ते आपल्या वैयक्तिक आयुष्यात जितक्या सचोटीने वागतात, तितक्याच निर्मळपणे सार्वजनिक आयुष्यात वावरतात. अंधश्रद्धा निर्मूलनाचा वणवा पेटवताना आणि समाजमन जागवताना हिंसा पूर्णपणे टाळून केवळ विवेकाच्या मार्गावरून चालत राहण्याचा आग्रह सोडत नाहीत; प्रसंगी सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी स्वत:च्या थोबाडीत मारून घेतील, स्वत:च्या रक्ताने पत्रे खरडतील, कृतज्ञतेचा वारसा जपण्यासाठी एक दिवसाचा उपवास चालवतील; मात्र चुकूनही आपल्यामुळे समाजाचे नुकसान होणार नाही, याची दक्षता वाहतील. सत्याचा मार्ग नेहमीच धरून असत्याची पाठराखण करण्याची वृत्ती ना दाभोलकरांजवळ होती, ना त्यांनी घडवलेल्या कार्यकर्त्याजवळ आजही आहे. इतकी सत्यनिष्ठ सेना बनवण्याचे बहुतांश श्रेय आहे, अर्थातच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचेच.
दाभोलकरांनी महाराष्ट्राला आणि देशाला नेमके काय दिले, या प्रश्नाचे नेमके उत्तर म्हणजे दाभोलकरांनी महात्मा गांधींना अपेक्षित असणारी सत्याग्रही कार्यकर्त्यांची फौज उभारून दाखवली. याची पूर्वअट म्हणून दाभोलकर पहिल्यांदा स्वत: सत्याग्रही बनूनच जगले आणि मग त्यांनी आपल्या संघटनेला सत्याग्रही तत्त्वाची अमूल्य चौकट घालून दिली. दाभोलकर स्वत: पहिल्यांदा निर्भय बनले आणि आपल्या संघटनेतील भीतीचा संपूर्ण श्लेष त्यांनी काढून टाकला. अहिंसेची दीक्षा प्रथम दाभोलकरांनी अंगीकारली आणि आपल्या संघटनेला हिंसेच्या मार्गापासून दूर ठेवले. ज्या तत्त्वासाठी दाभोलकरांनी शहीदपण स्वीकारले, त्याच तत्त्वांपायी त्यांच्यानंतर सत्याग्रही मावळे निग्रहाने उभे ठाकले. दाभोलकरांनी न बोलता गांधीमार्ग जिवंत ठेवला. याचकरिता डॉ. नरेंद्र दाभोलकर मला कमालीचे भावतात. महाराष्ट्र आणि भारत देशाच्या आगामी विधायक वाटचालीसाठी दाभोलकरांनी दिलेले हे योगदान कुणाला भावणार नाही?
लेखक संपर्क ः 99227 84065