डॉक्टरांच्या पत्रामुळे संघटनेशी जोडला गेलो

करंबळकर गुरुजी - 9075073800

डॉ. नरेंद्र दाभोलकर नावाच्या महापुरुषाने महाराष्ट्रात फोफावलेल्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ नावाने काम करणारी एक संघटना कार्यरत केली असल्याचे मी ऐकत होतो, वर्तमानपत्रामध्ये वाचत होतो. मी वयाच्या वीस वर्षांपासून व्यक्तिगत पातळीवर सर्व धर्मांच्या अंधश्रद्धांना विरोध करीत असल्यामुळे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारावर निष्ठा ठेवू लागलो. त्यांनी स्थापन केलेल्या संघटनेत सामील होऊन त्यांच्या कार्याला मदत करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली होती. बुद्ध, शाहू, फुले, संत तुकाराम, संत गाडगेबाबा, संत कबीर व संत बसवेश्वर यांच्या विचारांचे वारसदार डॉ. दाभोलकर यांच्याबाबत मला अभिमान वाटू लागला. याचे कारण मी शिक्षकाची नोकरी करत समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचे काम करीत होतो. मला डॉ. दाभोलकर यांना भेटून अंधश्रद्धा निर्मूलन समितीला काय मदत करता येईल, त्यांचे नियम व कोणत्या अघोरी प्रथेविरुद्ध कशी कृती करायची, याचे मार्गदर्शन घ्यावयाचे होते; पण ते पूर्ण महाराष्ट्रभर संघटनाबांधणीच्या कामासाठी दौरे करत असल्याने हा योग येणे कठीण होते. मी 2005 च्या मे मध्ये सेवामुक्त झालो. दरम्यान, मी डॉ. दाभोलकर यांना एक पत्र लिहून ‘अंनिस’च्या चळवळीत काम करणार असल्याची इच्छा व्यक्त करून त्यांची भेट व मार्गदर्शन मागितले. तेव्हा त्यांनी मला एक पत्र पाठवून ‘व्यक्तिगत पातळीवर तुमचे काम चालू ठेवा, मी गडहिंग्लजला जेव्हा येईन तेव्हा भेटू,’ असं कळविलं होतं.

पांडुरंग ल. करंबळकर (गुरुजी)

नोकरीतून मुक्त झाल्यानंतर मला समजले की, गडहिंग्लजमध्ये ‘अंनिस’ची शाखा असून शिवराज कॉलेजमध्ये प्रा. भोईटे सर शाखा चालवतात. त्यांना भेटण्यासाठी मी जून 2005 रोजी शिवराज कॉलेजमध्ये गेलो. शिवराज कॉलेजचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे सर यांचा परिचय असल्यामुळे मी त्यांच्या केबीनमध्ये गेलो. त्यांना, मी प्रा. भोईटे सर यांना भेटण्यासाठी आल्याचे सांगितले. त्यांनी शिपायाबरोबर मला त्यांच्याकडे पाठविले. सरांची व माझी चर्चा झाली. त्यांनी, ‘तुम्ही आजपासून ‘अंनिस’ संघटनेचे सभासद झाला. आपण काम करूया. जेव्हा आमची शाखा मीटिंग असते, तेव्हा तुम्हाला निरोप देतो. तुम्ही येत चला, संघटनेचा मेळावा, सभा असे कार्यक्रम असतील, तेव्हा तुमची डॉ. दाभोलकरांची भेट होईल. ते गडहिंग्लजला आले, तर तुम्हाला निरोप देतो,’ असे सांगितले होते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची भेट होईल तेव्हा होईल; मी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम सुरू केले, ते ‘अंनिस’ला मदत करावयाची, असा निर्धार करून. मी ‘अंनिस’च्या उपक्रमांना सुरुवात केली. वार्तापत्राचे सभासद करणे, फटाकेमुक्त दिवाळी साजरी करणे, पर्यावरणपूरक गणपती विसर्जन करणे, होळी लहान-पोळी दान, बुवा-बाबा, मांत्रिक यांचा पर्दाफाश करणे, ‘अंनिस’चा कायदा व जातपंचायतींचा कायदा, यासाठी डॉ. दाभोलकर सांगतील ते काम करणे इत्यादी कामामध्ये माझे वार्तापत्रचे वर्गणीदार, सभासद करणे यामुळे मी संघटनेच्या प्रकाशात आलो. प्रत्येक वर्षी 150 ते 250 पर्यंत सभासद करून संघटनेला आर्थिक मदत करत आलो आहे. संपादक प्रा. आर्डेसर, व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात हे महाराष्ट्रभर फिरून, भारतात व विदेशात घडणार्‍या अंधश्रद्धा, अघोरी कर्मकांडे याबाबतचे लेख व कर्मकांडांच्या घटना यांची माहिती प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन अंधश्रध्दा निर्मूलन वार्तापत्रातून प्रसिद्ध करतात. ती वाचकांपर्यंत पोचावी; शिवाय डॉ. दाभोलकर करीत असलेल्या प्रबोधनाच्या कार्यक्रमास कडवे हिंदुत्ववादी, सनातनी प्रवृत्तीचे लोक विरोध का करतात, हे सुद्धा वाचकांपर्यंत जाऊन त्यांचे मतपरिवर्तन व्हावे, यासाठी हे वार्तापत्र अनेक वाचकांपर्यंत जावे, अशी माझी तळमळ आहे. कोल्हापूर या ठिकाणी प्रेरणा मेळावा डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या उपस्थितीत झाला. या मेळाव्याला येण्याचे निमंत्रण भोईटे सरांनी मला दिले. मेळाव्यात त्यांनी माझा परिचय करून दिला. डॉ. दाभोलकरांनी कॉ. पानसरेंच्या हस्ते माझा सत्कार करून मला एक पुस्तक भेट दिले. ‘विचार संघटना मार्गदर्शिका’ असे त्याचे नाव आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकरांबाबत माझ्या मनात एक सल राहिली आहे की, मी आमच्या गावामध्ये सत्यशोधकी परिषद भरविली होती. त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना निमंत्रित करण्याचा संयोजन समितीने निर्णय केला; पण डॉक्टरांना अनेक व्यापामुळे त्यांना वेळ देता आला नाही. मात्र ‘मी काही कामानिमित्त आपल्या गावी येईन, आपले शिबीर उरकून घ्या. माझा नाईलाज आहे. शिबिराला माझ्या शुभेच्छा,‘ असा फोन आला. 31 मे 2013 रोजी आमची परिषद संपन्न झाली. पुढे दोन महिने 20 दिवसांनी म्हणजे 20 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी सनातनी धर्मांधांनी सुपारी देऊन डॉक्टरांचा खून घडवून आणला. एक विचारवंत, बुद्धिमान मार्गदर्शक हरवल्याचे मनस्वी दु:ख झाले. डॉ. दाभोलकर यांच्या खुनामुळे विवेकाचा आवाज बुलंद करणार्‍या ‘अंनिस’च्या सर्व कार्यकर्त्यांवर संकट कोसळले. माझे ‘त्या’ महापुरुषाला घरी आणण्याचे स्वप्न भंगले; पण ‘अंनिस’ चळवळीत काम करण्याचा जोश वाढला. डॉ. दाभोलकरांच्या खुनामुळे चळवळ थांबली नाही, तर ती अधिकच फोफावली. धर्मांधांचे मनसुबे धुळीला मिळाले. चळवळीत काम करणारे कार्यकर्ते ‘आम्ही सारे दाभोलकर’ म्हणून हिरिरीने काम करू लागले. अशा प्रकारचे कार्य करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करूया!