डॉ. प्रदीप पाटील - 9890844468
किशोर फडके (कि. मो. फडके) हे नाव महाराष्ट्रातील कमी लोकांनाच माहिती असेल! त्याचे कारण सरळ आहे. मनाचे विज्ञान हा अवघड विषय. तो सर्वसामान्यांत लोकप्रिय असायचे काहीच कारण नाही; आणि या विषयात तज्ज्ञ असणारे समाजात ओळखीचे होणे खूपच कठीण.
पण 1959 मध्ये पुणे विद्यापीठातून मनोविज्ञान आणि तत्त्वज्ञान विषयातून मास्टर्स डिग्री घेऊन बाहेर पडल्यावर किशोर फडके यांनी ‘मनाशी खेळायला’ सुरुवात केली. काका स्वातंत्र्य चळवळीत एक कम्युनिस्ट नेते होते. अशा घरातील वातावरणात ‘चिकित्सा’ हा शब्द मोलाचा न ठरल्यास नवलच; आणि पुस्तकप्रेम तर किशोर फडकेंचे खरे प्रेम! डॉक्टर वडील असलेल्या किशोर फडके यांचा जन्मदिन आहे 20 फेबु्रवारी 1936. मुंबईतल्या रुपारेल कॉलेजात 5 वर्षे नोकरी केल्यावर अहमदाबाद टेक्स्टाईल इंडस्ट्री रिसर्च असोसिएशनमध्ये (‘अटिव’) वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून काम केले. तेथेही ते ग्रंथालयात चकरा मारायचे. Experiments in behaviour Therapy म्हणजे ‘वर्तनोपचारातील प्रयोग’ नावाचे पुस्तक ते चाळत असताना त्यात त्यांना ‘रॅशनल सायकोथेरपी’ नावाचा विभाग दिसला. ते स्तीमित झाले. आगरकरांच्या बुद्धिप्रामाण्यवादी विचारसरणीतून ते थेट इंग्लंडमधील बर्ट्रांड रसेल यांच्या विवेकवादी जीवनदृष्टीपर्यंतचा विचार किशोर फडकेंनी आत्मसात केल्याने जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन निरिश्वरवादी बनला होता. त्यात ‘प्रायोगिक मानसशास्त्रा’चा अभ्यास व प्रयोगामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन हाडी-मांसी खिळला होता.
‘रॅशनल सायकोथेरपी’विषयी त्या पुस्तकातून त्यांना कळले की, ही विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धत डॉ. अल्बर्ट एलिस विकसित करीत आहेत. इथे किशोर फडके यांना आपले ध्येय सापडले. विवेकनिष्ठ मानसोपचार हेच आपले आता कार्यउद्दिष्ट असेल, असे ठरविले. मग ते शोध घेऊ लागले एलिस यांच्या पुस्तकाचा. अहमदाबादेतील एका ग्रंथालयात ‘बुद्धी आणि भावना यांचे मानसोपचारातले स्थान’ या नावाचे पुस्तक मिळाले आणि किशोर फडके एलिस यांच्या विचाराने झपाटले गेले. ही गोष्ट आहे 1962 ची. त्यावेळी अमेरिकेहून त्यांनी ‘अ गाईड टू रॅशनल लिव्हिंग’ नावाचे पुस्तक मागविले, जे डॉ. रॉबर्ट हार्पर व डॉ. अल्बर्ट एलिस यांनी लिहिले होते. ते मिळायला त्यांना तब्बल 1 वर्ष लागले! तरीही किशोर फडके यांनी कुठून ना कुठून तरी विवेकनिष्ठ मानसोपचाराचे साहित्य मिळवत राहण्याचा सपाटा लावला आणि ही पद्धत पूर्णपणे आत्मसात केली.
पण तरीही त्यांना वाटले की, अल्बर्ट एलिस यांना पत्र लिहावे, म्हणून 29 एप्रिल 1968 रोजी त्यांनी अल्बर्ट एलिसना पत्र धाडले. विशेष म्हणजे एलिस यांनी तात्काळ या पत्रास उत्तर दिले! त्यानंतर उत्साहित झालेल्या किशोर फडके यांनी एलिस यांना शंका विचारणारी पत्रे लिहायला सुरुवात केली आणि पुढे 36 वर्षे हा पत्रव्यवहार अखंड चालू राहिला. एलिस यांनी अनेक ग्रंथ-पुस्तके फडकेंना पाठविली. या पत्रव्यवहाराची सुमारे 1351 पाने 4 खंडांत बनली असून ‘रॅशन इमोटिव्ह बिहेव्हिएर थेरपी’ (आरईबीटी) या मानसोपचार पद्धतीचा अभ्यास करणार्यांसाठी ही एक बौद्धिक मेजवानी आहे. हे खंड आजही कोलंबिया विद्यापीठात जपून विंडी ड्रायडेन यांनी ते वाचले, तेव्हा ते म्हणाले, “ज्ञानाचे भुकेले आणि सूक्ष्मात सूक्ष्म तपशिलासह अध्ययन करणारे मानसतज्ज्ञ म्हणजे किशोर फडके होत.”
1969 मध्ये ते अहमदाबाद सोडून मुंबई विद्यापीठातील मानसशास्त्र विभागात आले. चार वर्षांनंतर त्यांनी सर फेराबजी पूछखनवाला बँकर्स ट्रेनिंग कॉलेजात 7 वर्षे नोकरी केली; पण तेथेही मन रमेना. कारण विवेकनिष्ठ उपचार पद्धतीचा प्रसार व संशोधन हे एकच ध्येय त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते, म्हणून तेथीलही नोकरी सोडून त्यांनी स्वत:चे ‘फडके सेंटर’ सुरू केले आणि त्यातून त्यांनी ‘आरईबीटी’चे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. या संस्थेतून त्यांनी सुमारे 200 च्या वर संस्थांना आणि दहा हजारांहून जास्त प्रमुख अधिकार्यांना विवेकनिष्ठ मानसोपचाराची पद्धती शिकविली.
1977 मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील ‘अल्बर्ट एलिस इन्स्टिट्यूट फॉर नॅशनल इमोटिव्ह बिहेव्हिएर थेरपी’ या संस्थेचा ‘फेलो’ होण्याचा व 1989 मध्ये सुपरव्हाइजर म्हणून सन्मान मिळालेले कि. मो. फडके ही एकमेव व्यक्ती आहे, जिने कोणताही त्यांना अधिकृत कोर्स न करता हा मान मिळवला.
त्यांचे ‘आरईबीटी’वरील लेखअनेक मासिके-वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाले. त्यांचे एकत्रित स्वरुपात पुस्तक छापून ते ‘आधुनिक संजीवनी’ या नावाने प्रकाशित झाले आहे. यातील लेखांची नावे वाचल्यास किशोर फडके यांनी विवेकनिष्ठ उपचार पद्धती ही कितीतरी विविध क्षेत्रांत वापरलेली दिसून येते, ती नावे अशी – ‘एका मानसोपचारतज्ज्ञाची धर्माविरुद्ध कैफियत’, ‘निरिश्वरवाद – मानसिक स्वास्थ्याची गुरुकिल्ली’, ‘निरोगी धार्मिकता’ ‘अमेरिकेतील धर्मश्रद्धेची मानसशास्त्रीय मीमांसा’, ‘राजकीय खुनाचे मानसशास्त्र’, ‘माणूस खुनी केव्हा बनतो?’, ‘लुटूपुटूच्या लढाईतील शस्त्रास्त्रांवर बंदी घालावी काय?’, ‘मानसतज्ज्ञ अणुयुद्धे रोखू शकतील?’, ‘रोगट प्रेम ः लक्षणे व उपाय’, ‘कामप्रेरणा ः मानसोपचार व मानसिक आरोग्य’, ‘मुलाखतीला घाबरण्याचे कारणच काय?’, ‘धूम्रपानावर भाषाशास्त्रीय उपाय’, ‘फलज्योतिषाचे मानसशास्त्र’, ‘संध्याछाया भिवविती हृदया’ इत्यादी.
डॉ. अल्बर्ट एलिस यांच्याशी शंका-समाधानाची चर्चा करताना किशोर फडके यांनी या पद्धतीच्या सूत्रात अमूल्य अशा सूचना केल्याने ते निर्दोष होत गेले. हे सूत्र असे आहे-
एखादी घटना/व्यक्ती – समजुती व विचार – परिणाम – हटविणे
A=Activating (Event/Thing) – B=Beliefs – C= Consequences – D = Dispats
याला ‘एबीसीडीई’ मॉडेल म्हणतात.
म्हणजे एखादी गोष्ट आपल्या मनास शिवते, तेव्हा त्या गोष्टीबद्दल जे विचार मनात उमटतात ते विचार तशा भावना निर्माण करतात. जर विचार विवेकी असतील, तर भावना सकारात्मक उमटतात. पण जर विचार व समजुती अविवेकी असतील, तर भावना त्रासदायक ठरतात. हे साधे सूत्र बनत असताना किशोर फडके यांनी प्रत्येक अ, ब, क, ड, ई टप्प्यावर अल्बर्ट एलिस यांना सतत प्रश्न विचारून शंका-समाधान करून घेत त्यांच्याशी प्रदीर्घ चर्चा घडविली. यामुळेच डॉ. अल्बर्ट एलिस म्हणतात –
“किशोर फडके तुम्ही आशियातील एकमेव अशी व्यक्ती आहात, जी ‘आरईबीटी’ची प्रॅक्टिस आणि शिकवण देण्यास परिपूर्णतेने सक्षम आहात. माझ्यावर व माझ्या कार्यावर फडके यांचा प्रभाव खूप मोठा आहे. त्यांच्या तीक्ष्ण प्रश्नांमुळे मी ‘आरईबीटी’मध्ये आमूलाग्र बदल करू शकलो. मी त्यांचे आभार मानतो आणि फडके माझे 1968 पासून मित्र व समर्थक राहिलेले आहेत.”
डॉ. कि. मो. फडके यांना आयुष्याच्या उत्तरार्धात पार्किनसन्स रोगाने घेरले. 31 जानेवारी 2022 रोजी ते कालवश झाले. विशेष म्हणजे त्यांनी स्वत:च्या देहाचे देहदान सोमय्या हॉस्पिटलला मरणोत्तर करून उत्तम सामाजिक ‘दायित्व’ दाखवून दिले आहे.
अशी माणसं आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणार्या चळवळींचे आधारस्तंभ आहेत. त्यांनी पेरलेले विचार कृतीत आणणे, हीच खरी आदरांजली ठरेल!
लेखक संपर्क : 98908 44468