होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई

डॉ. अनिकेत सुळे -

महाराष्ट्र प्रांताला विज्ञान प्रसार-प्रचाराची फार मोठी परंपरा आहे. आजच्या घडीलाही जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये विज्ञान प्रसार – प्रचाराचे कार्य करणार्‍या अनेक संस्था कार्यरत आहेत. मात्र आज आपण एका अशा संस्थेबद्दल जाणून घेणार आहोत, जिचा जन्मच मुळी विज्ञान प्रसाराचे उद्दिष्ट समोर ठेवून झाला होता आणि गेल्या चाळीस-पंचेचाळीस वर्षांत विज्ञान प्रसाराचे नवनवीन पैलू या संस्थेच्या कार्यामुळे लोकांना अवगत झाले.

होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र (HBCSE) मुंबई येथील मानखुर्द भागात स्थित आहे. तसे म्हटले तर ही संस्था TIFR म्हणजेच टाटा मूलभूत संशोधन संस्थेचा एक भाग आहे. मात्र विज्ञान शिक्षक, विज्ञान प्रसारक यांच्यासमोर या संस्थेची स्वतःची एक स्वतंत्र म्हणून ओळख आहे. 1970 च्या आसपास TIFR मधील अनेक वैज्ञानिकांना असे जाणवले की, मुंबई व आसपासच्या भागातही विज्ञान शिक्षणाची स्थिती खूपच चिंताजनक आहे. कारणे बरीच होती, त्यातली अनेक कारणे आजही वैध आहेत. शाळांमध्ये पुरेसे साहित्य उपलब्ध नसते, शिक्षकांचे प्रशिक्षण योग्य रीतीने होत नाही. एकेका वर्गात क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक मुले कोंबली जातात. या सर्वांचा प्रत्यक्ष परिणाम नव्या पिढीचे वैज्ञानिक घडविण्यावरही होत असतो. त्यामुळे किमान मुंबई शहर व आजूबाजूच्या अर्धनागरी / ग्रामीण परिसरामध्ये तरी विज्ञान शिक्षण चांगल्या पद्धतीने दिले जावे, या हेतूने या केंद्राची स्थापना केली गेली. सुरुवातीला टाटा ट्रस्टतर्फे देणगी स्वरुपात निधी उपलब्ध करून चालविला जाणारा एक प्रकल्प असे या केंद्राचे स्वरूप होते. ग्रँट रोड येथे नाना चौक महापालिका शाळेतील काही खोल्यांमध्ये केंद्राचे कार्य 1974 साली सुरू झाले. पहिले केंद्र निर्देशक श्री. वि. गो. कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या सभासदांनी निरनिराळ्या शाळांमध्ये जाऊन गणित, विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावरील सत्रे घेण्यास सुरुवात केली. यामध्ये मुंबई क्षेत्रातील महापालिका शाळा जशा होत्या, तशा कोकण व पश्चिम महाराष्ट्रामधील जिल्हा परिषद शाळा होत्या आणि ठाणे/नाशिक/जळगाव जिल्ह्यातल्या आश्रमशाळाही होत्या. काही वर्षांनंतर या केंद्रास एक कायमस्वरुपी केंद्र म्हणून केंद्र सरकारची मान्यता मिळाली आणि पुढची वाटचाल सुकर झाली.

या सुरुवातीच्या काळात संस्थेचे लक्ष मुख्यत्वेकरून मराठी भाषेमध्ये विज्ञान व गणित शिक्षण; तसेच सामाजिकरित्या मागासलेल्या वर्गापर्यंत चांगले विज्ञान शिक्षण पोेचवणे, या गोष्टींवर केंद्रित झाले होते. उदाहरणार्थ संस्थेतील काही अभ्यासकांनी असे सप्रमाण दाखवून दिले, की पाठ्यपुस्तक मंडळाची विज्ञान व गणिताची पुस्तके ही अनेक विद्यार्थ्यांना समजण्यास क्लिष्ट आहेत. जर तेच पुस्तक सोप्या भाषेत आणि मुलांना माहिती असलेल्या शब्दांचा वापर करून लिहिले गेले, तर अभ्यासात पिछाडीवर असलेल्या मुलांचे गुणही मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. यासंदर्भात एक गोष्ट आठवते. त्या पुस्तकातल्या एका प्रश्नाची सुरुवात अशी होती, ‘जर दख्खनची राणी मुंबई – पुणे हे 180 किलोमीटरचे अंतर तीन तासांत कापत असेल…’ आदिवासी पाड्यांत काम करताना आमच्या अभ्यासकांना असे लक्षात आले की, तेथील मुले गुणाकार, भागाकार व्यवस्थित करू शकतात; पण हा प्रश्न सोडवू शकत नाहीत. असे का? कारण मुलांना पहिला प्रश्न पडायचा की ही कुठली राणी? ती दिसते कशी? एखादी बाई इतक्या वेगाने कशी जाऊ शकते? याचा विचार करण्यात मुले इतकी मग्न व्हायची की मूळ प्रश्न बाजूलाच राहायचा. थोडक्यात काय, तर शैक्षणिक साहित्य (जसे की पाठ्यपुस्तके) वापरणार्‍या मुलांचा जीवनानुभव जर ते साहित्य बनवणार्‍यांच्या जीवनानुभवापेक्षा पूर्णत: वेगळा असेल तर एकाला सोपी वाटणारी मांडणीही दुसर्‍याला क्लिष्ट वाटू शकते.

या सर्व उपक्रमांतून मिळालेल्या अनुभवांवर आधारित विविध पुस्तकांचे लेखन संस्थेतर्फे केले गेले. शाळा-शाळांमध्ये जाऊन सोप्या प्रयोगांतून विज्ञान कसे शिकवता येते, याची प्रात्यक्षिके सादर केली. पुढे-पुढे तर हाच देशभर विज्ञान जत्रांमधला हमखास यशस्वी होणारा उपक्रम बनला. प्रा. कुलकर्णींची गुणग्राहकता वादातीत होती. आपल्या आजूबाजूच्या माणसांच्या पदव्यांपेक्षा त्यांच्या अंगभूत गुणांना प्रोत्साहन देऊन त्यांनी नवीन विज्ञानप्रसारक घडविले. आज कुणाला खरे वाटणार नाही की, आमचे एक माजी प्रतिथयश सहकारी एका छोट्या महापालिका शाळेत शिक्षक म्हणून काम करत असताना प्रा. कुलकर्णींच्या संपर्कात आले व त्यांनी नंतर आमच्या संस्थेच्या अनेक प्रकल्पांचे यशस्वी नेतृत्व केले. आमचे दुसरे एक माजी सहकारी संस्थेमध्ये केवळ फोटोग्राफी, सुलेखन आणि आरेखन करण्यासाठी रूजू झाले होते; पण त्यांच्या गुणांच्या जोरावर ते आज एक यशस्वी विज्ञानप्रसारक व विज्ञानलेखक म्हणून ओळखले जातात. संस्थेने महाराष्ट्रभर पोचतील, असेही अनेक उपक्रम हाती घेतले. जसे ‘किशोर’ या मासिकामध्ये प्रश्नोत्तरांचे सदर; त्याचबरोबर मुंबई विज्ञान शिक्षक संघाच्या मदतीने होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा आणि शिक्षण खात्याच्या सहकार्याने आंतरशालेय प्रकल्प सादरीकरण स्पर्धा हे सर्व या काळातच सुरू झाले

1990 च्या दशकामध्ये संस्था मानखुर्दला तिच्या सध्याच्या कॅम्पसमध्ये आली. याच काळात संस्थेचे स्वरूप हे राष्ट्रीय स्वरूपाचे झाले. विज्ञान/गणित कसे शिकवावे, यावर संशोधनासाठी पीएच. डी. प्रोग्रॅम; तसेच विविध आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाडमध्ये भारताचा सहभाग असे नवीन उपक्रम संस्थेने सुरू केले. प्रा. अरविंद कुमार यांच्या नेतृत्वाखालील या कालखंडात संस्थेची जोमाने वाढ झाली. त्यानंतरच्या काळात संस्थेने मोठ्या प्रमाणात शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संशोधनाची तोंडओळख व्हावी, म्हणून छखणड प्रकल्प हाती घेतला गेला. अलिकडच्या काळात माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक साहित्याची निर्मिती करण्याचा खूप मोठा प्रकल्प संस्थेने आखला आहे.

विज्ञान शिक्षणाविषयीचे संशोधन म्हणजे काय, असा प्रश्नही अनेकांना पडू शकतो. या प्रकारच्या संशोधनात दोन मूलभूत प्रश्न असतात. पहिला प्रश्न म्हणजे काही विद्यार्थ्यांना विज्ञान/गणिताची गोडी नसते, ते नक्की कशामुळे? कोणते शैक्षणिक/सामाजिक/आर्थिक घटक याला कारणीभूत असतात? एकाच वर्गात असूनही वेगवगळ्या विद्यार्थ्यांची प्रगती वेगवेगळ्या गतीने का होते? दुसरा प्रश्न म्हणजे विज्ञानातले/गणितातले काही धडे सर्वच विद्यार्थ्यांना कठीण का वाटतात? त्या घटकांबाबत त्यांच्या काय गैरसमजुती असतात? त्याचा इतर शिक्षणावर काय परिणाम होतो? या प्रश्नांच्या अनुषंगाने विचार करून त्यावर उपाय शोधणे, असे या संशोधनाचे स्वरूप असते.

होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इतर सहकारी संस्थांप्रमाणे आपल्याच कोषात न राहता संस्थेची दारे ही अभ्यासकांसाठी नेहमीच उघडी असतात. संस्थेचे वाचनालय अनेक विद्यार्थी वापरत असतात. विज्ञान प्रसाराच्या नवीन कल्पना घेऊन विज्ञान चळवळीतले अनेक कार्यकर्ते संस्थेचे मार्गदर्शन घेत असतात. संस्थेच्या बहुतांश प्रकल्पांचे स्वरूप देखील लोकाभिमुख असल्याने कुठल्या ना कुठल्या शिक्षक वा विद्यार्थ्यांचा केंद्रात सतत राबता असतो.

पण फक्त विज्ञान शिक्षण/विज्ञान शिक्षणाविषयी संशोधन एवढीच या केंद्राची ओळख नाही. विज्ञान प्रसार आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रचाराच्या कार्यातही केंद्राचा मोठा सहभाग राहिला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मराठी विज्ञान परिषद, अखिल भारतीय लोकविज्ञान संघटना, प्रथम अशा अनेक संस्थांच्या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण केंद्रात होत असते. त्याचबरोबर या केंद्रातील विद्यार्थी, प्राध्यापक व इतर सहकारी हे विज्ञान प्रसाराच्या कार्यात हिरिरीने सहभागी होत असतात. गेल्या काही वर्षांत वैज्ञानिक दृष्टिकोनावर सर्व बाजूंनी हल्ले होत असताना त्याला विरोध करण्याचे धारिष्ट्य या केंद्रातील वैज्ञानिकांनी दाखवले आहे. अवैज्ञानिक विधाने कितीही मोठ्या पदांवरील व्यक्तीने केली, तरी त्याचा निषेध करणे व त्याविरुद्ध जनजागृती करणे, हे एक वैज्ञानिक, एक विज्ञान प्रसारक आणि एक सुजाण भारतीय म्हणून आपले कर्तव्य आहे. यावर या संस्थेच्या वैज्ञानिकांचा ठाम विश्वास आहे. गेली तीन वर्षे विज्ञानासाठीचा मोर्चा (March for Science) हे आंदोलन भारतभर दरवर्षी करण्यात येते. त्याचबरोबर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिदिन हा राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यात या केंद्रातील वैज्ञानिकांचा सतत सहभाग असतो.

गेल्या 45 वर्षांत HBCSE ने विज्ञानप्रसाराचे भरीव कार्य केले आहे. त्यात अर्थातच संस्थेच्या कर्मचार्‍यांबरोबर इतर असंख्य कार्यकर्त्यांचाही सहभाग लाभला आहे. ही साथ अशीच लाभत राहिली तर संस्थेचे कार्य असेच उत्तरोत्तर चालत राहील.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]