राजीव देशपांडे -
महाराष्ट्र सरकारचा प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘महाराष्ट्र भूषण’ हा नागरी पुरस्कार निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना त्यांच्या आध्यात्मिक आणि सामाजिक कार्याबद्दल १६ एप्रिल रोजी नवी मुंबईतील खारघर येथे त्यांच्या लाखो भक्तांच्या आणि देशातील व राज्यातील प्रमुख राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत जवळजवळ १४ कोटी रुपये खर्च करत भव्य शासकीय सोहळ्यात देण्यात आला. महाराष्ट्रभूषण सारखे सोहळे राजभवनात आयोजित केले जातात व हे सोहळे राजकारणापलिकडचे असतात, असे म्हटले जाते; पण हा सोहळा आपले राजकीय शक्तीप्रदर्शन करण्यासाठी आयोजित करण्यात आल्याचा आरोप सत्ताधार्यांवर करण्यात आला. हा सोहळा भरदुपारी १२ वाजता ४२ अंश सेल्सिअस तापमानात आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे उष्माघाताने १४ जणांचा मृत्यू झाल्याचे व १५० जण जखमी झाल्याचे अधिकृतपणे सरकारतर्फे जाहीर करण्यात आले. पण त्यानंतर प्रसारित झालेल्या व्हिडिओवरून व मिडियातून आलेल्या बातम्यांनुसार, या घटनेला उष्माघाताबरोबरच प्रचंड गर्दीत झालेली चेंगराचेंगरीही कारणीभूत आहे, असे आरोप करण्यात आले. पण अशा कोणत्याही घटना घडल्याचे सरकारने नाकारले आहे व या घटनेला वाढलेले तापमान जबाबदार धरले आहे. यावरून आता राजकीय धूळफेक जोरजोरात चालू आहे. या राजकीय धूळफेकीत आजच्या परिस्थितीच्या रेट्याने गांजलेल्या, आपल्या समस्यांनी हतबल झालेल्या सर्वसामान्य माणसाच्या बुवाशरण मानसिकतेच्या गर्दीबद्दलची आणि अशा प्रकारच्या प्रचंड गर्दीचे योग्य, वैज्ञानिक मार्गाने जे नियोजन व्हावयास पाहिजे, त्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करावयास हव्यात याबाबतची चर्चा मात्र हवेत विरून जाण्याचीच शक्यता आहे.
सोहळ्याला अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे लाखो भक्त उपस्थित होते. या भक्तांना ‘श्रीसेवक’ असे म्हटले जाते. या श्री संप्रदायाची स्थापना अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांनी केली. त्यांनाही काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दिला होता. हा श्री संप्रदाय गावोगावी चालणार्या बैठकांच्या स्वरूपात महाराष्ट्रभर विशेषत: महाराष्ट्राच्या किनारी पट्टीत पसरला आहे. या बैठका गावातील प्रभावशील व्यक्तीच्या घरात घेतल्या जातात. या बैठकीला हजर राहणे प्रत्येक श्री सेवकाला सक्तीचे असते. ओळीने तीन वेळा गैरहजर राहिलेल्याचे श्री सदस्यत्व रद्द केले जाते. या बैठकांतून रामदास स्वामींच्या दासबोधातील ओव्यांचे निरूपण केले जाते. तसेच खोटे बोलू नये, व्यसन करू नये वगैरे सांगितले जाते. बैठकीत लोक आपले व्यवहार, सोयरीक, अनेक समस्या याचे प्रश्न घेऊन जातात. त्याबाबत ‘वरून’ आदेश येतो. कोणताही प्रश्न न विचारता तो पाळावाच लागतो. स्वत:च्या बुद्धीला पटला म्हणून नाही तर आदेश पाळायचा म्हणून. अशा प्रकारे भक्तांची स्वतंत्र निर्णय क्षमताच क्षीण केली जाते व एक प्रकारची मानसिक गुलामगिरीच लादली जाते. या सर्वांवर नियंत्रण असणार्या नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत स्वच्छता, वृक्षारोपण अशा मोहिमा राबविल्या जातात. अर्थात, अशा एका दिवसाच्या या मोहिमांमुळे ना स्वच्छता मूल्य म्हणून स्वीकारली जाते ना वृक्षारोपणामुळे पर्यावरण रक्षणाची जाणीव होते.. केवळ झाडू मारा, झाडे लावा… आदेशाचे पालन!
याबाबत अंनिसच्या कार्यकर्तीचा अनुभव बोलका आहे. त्यांच्या घरातील काम करणार्या बाई पुरस्कार सोहळ्याला खारघरला जाण्यासाठी पहाटे तीनपासून आपल्या गावातून इतरांबरोबर गेल्या होत्या. पुढून दर्शन मिळावे म्हणून त्या रणरणत्या उन्हात पूर्ण दिवस बसल्या. त्यांना झालेला उन्हाचा त्रास घरी कामाला आल्या तेव्हा जाणवत होता. त्याबाबत छेडल्यावर त्या म्हणाल्या, “इथून पुढे ‘उन्हात’ जाणार नाही.” ही सर्वसामान्यांची बुवाशरण मानसिकता छेदणे किती आव्हानात्मक आहे हेच यातून लक्षात येते. आजच्या काळात तर खूपच आव्हानात्मक. देव, देश, धर्म, रूढी, परंपरा याबाबत कोणी प्रश्नच उपस्थित करायचा नाही अशा दहशतीच्या काळात.
एकीकडे भक्तांची ही मानसिक अवस्था तर दुसरीकडे प्रशासन, राजकीय नेतृत्वातही तशाच मानसिकतेचे प्रतिबिंब पडलेले. केवळ आदेश पालन. बुद्धीचा स्वतंत्र वापरच नाही. राजकीय नेत्यांना योग्य सल्ला देण्याची धमकच आज प्रशासनात राहिलेली नाही. अनेक जत्रा, यात्रा, धार्मिक कार्यक्रम, मिरवणुका, मेळे… हल्ली यात भर पडली आहे बुवा लोकांचे सत्संग वगैरे, राजकीय सभा, मोर्चे यात मोठ्या प्रमाणावर मोठा जनसमुह एकत्र येत असतो. येणार्या जनसमूहाचे योग्य नियंत्रण करण्यासाठी अतिशय सूक्ष्म वैज्ञानिक नियोजनाची गरज असते पण वरून आलेल्या आदेशांच्या पालनासाठी सगळे नियम, कायदे, वैज्ञानिक पद्धती धाब्यावर बसवल्या जात आहेत. खारघरची घटना हे त्याचेच एक उदाहरण आहे. आजचे राज्यकर्ते तर पाठ्यपुस्तकातून विज्ञानच गायब करायला टपलेले. खारघर येथे रस्ते बांधले गेले, वाहतुकीची व्यवस्था केली गेली, पाण्याचे नळ, पाईपलाईन टाकली गेली, पण तापमानाचा, त्याच्या परिणामांचा विचारच केला गेला नाही. तसाच विचार भक्तांनीही केला नाही. तेही आपल्या सद्गुरूच्या आदेशाने जमलेले. परिणामी १४ श्रीसेवकांना उष्माघातामुळे आपले प्राण गमवावे लागले, तर शेकडो जणांना इस्पितळात भरती व्हावे लागले.
अशी काही घटना घडली की, कुंभमेळे, केरळमधील शबरीमला, आंध्र प्रदेशातील राजमहेंद्रि, महाराष्ट्रातील मांढरदेवी, अगदी अलीकडील मध्यप्रदेशांतील रुद्राक्ष मिळविण्यासाठी झालेली चेंगराचेंगरी या घटना आठवतात. इंटरनॅशनल जर्नल ऑफ डिझास्टर रिस्क रिडक्शनच्या २०१३ मधील एका अभ्यासानुसार अशा चेंगराचेंगरीच्या ज्या घटना घडतात त्यात ७९ % घटना या धार्मिक ठिकाणच्या असतात. तसेच या प्रत्येक ठिकाणची परिस्थिती, वातावरण, हवामान वेगवेगळे असते. तसेच यात सहभागी होणार्या भक्तांची मानसिकताही सर्वच ठिकाणी एकसारखी नसते. भक्तांना विशिष्ट मुहूर्त गाठायचा असतो, विशिष्ट वेळेत विशिष्ट स्थानावरच नदीत डुबकी घ्यायची असते, मूक प्राण्यांचा बळी द्यायचा असतो, दर्शन घ्यायचे असते. प्रसाद घ्यायचा असतो. त्यामुळे अशावेळी गर्दीवर नियंत्रण राहणे अशक्य बनते. अशी ठिकाणे एकतर दुर्गम भागात असतात जेथे अशा घटनांना हाताळण्यासाठी असणार्या पायाभूत सुविधांचा अभाव असतो. एखादा छोटासा अपघात होतो किंवा जाणीवपूर्वक एखादे कृत्य केले जाते आणि अफवेबरोबर घबराट पसरते व गर्दीत प्रचंड पळापळ सुरू होते.
अशा घटना टाळायच्या असतील, तर जसे प्रशासनाने सजगपणे सर्व बाबींचा विचार करत वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब करून अशा सोहळ्यांचे नियोजन केले पाहिजे तसेच सर्वसामान्यांनी विशिष्ट व्यक्ती, दिवस, वेळ, स्थान यांचा आग्रह सोडला पाहिजे आणि हा आग्रह तेव्हाच त्यांच्याकडून सोडला जाईल जेव्हा वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजला जाईल. तो रुजवण्याचे अत्यंत कठीण आव्हान आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांपुढे आहे आणि ‘तीर्थे धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी’ असे सांगणार्या आपल्या पूर्वसुरींच्या पावलांवर पाऊल टाकत आम्ही हे आव्हान नकीच स्वीकारले आहे.