वाघेश साळुंखे -
डिजिटल अंधश्रद्धा
आजच्या काळात डिजिटल मीडियाने आपल्या जीवनाच्या प्रत्येक अंगाला वेढून टाकले आहे. कोणत्याही तंत्रज्ञानाचे जसे फायदे असतात तसे तोटे असतातच. त्याचे चांगले-वाईट परिणाम समाजावर होत असतात. याही तंत्रज्ञानाचे चांगले-वाईट परिणाम आहेतच. पण या तंत्रज्ञानाचा उपयोग आजकाल समाजात बुवाबाजीचा धंदा वाढविण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर होत आहे. एका साध्या कमेंट किंवा लाईक पासून सुरू झालेला प्रवास व्यतीला अंधश्रद्धांच्या जाळ्यात कसा खेचतो याचा वेध घेणारे सदर या नव्या वर्षात आम्ही सुरू करत आहोत.
फेसबुक स्क्रोल करत असताना मध्येच अचानक एक पोस्ट दिसते. त्यामध्ये लिहिलेले असते, एक मिनिट वेळ आहे का अमुक एक नाव लिहायला? किंवा एखाद्या पोस्टमध्ये लिहिलेले असते, संध्याकाळपर्यंत एक चांगली बातमी समजेल. फक्त तमुक बाबाचे नाव लिहा.
बर्याच वेळा या पोस्ट्स ज्या अकाउंटवरून किंवा पेजवरून आपणाला दिसतात त्या अकाउंट/पेजला आपण फॉलो केलेलेच नसते. कधी आपण त्यावर कमेंट किंवा लाईक केलेच नसते. तरीही या पोस्ट आपल्या फीडमध्ये दिसत राहतात. वरवर पाहता या पोस्ट्स निरुपद्रवी वाटतात. पण अशा पोस्ट्स म्हणजे लीड्स (leads) गोळा करणे असते. व्यावसायिक जगतात लीड्स हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. लीड्स म्हणजे संभाव्य ग्राहकांचा डाटा (data). आध्यात्मिक संप्रदायांनी आपले संभाव्य ग्राहक शोधण्यासाठी शोधलेली एक युती म्हणजे या पोस्ट्स आहेत. अनेक व्यावसायिक आपल्या ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी विविध मार्केटिंग पद्धतींचा वापर करतात. आपल्या उत्पादनांचा संभाव्य ग्राहक कोण आहे, हे शोधण्यासाठी ते विविध तंत्रांचा वापर करतात. फेसबुक अॅड्स, गुगल अॅड्स, यांबरोबरच पोस्ट boost करणे हा प्रकारही वापरला जातो. अर्थात, यासाठी पैसे खर्च करावे लागतात. पण या पद्धतीच्या जाहिराती इतक्या परिणामकारक असतात की, यांवर पैसे खर्च करण्यास व्यावसायिक लोक मागेपुढे पहात नाहीत. यामध्ये सोशल मीडिया वापरकर्त्याचे वय, लिंग, भौगोलिक ठिकाण, व्यवसाय, आवड इत्यादी गोष्टींचा विचार करून टार्गेट ऑडियन्स ठरवला जातो. त्यामुळे या जाहिराती फक्त टार्गेटेड (लक्ष्यित) लोकांनाच दिसतात. जे लोक आपले ग्राहक होण्याची शक्यता अजिबात नाहीत, त्या लोकांना अॅड्स दिसतच नाहीत. या जाहिरातींवर जितका जास्त पैसा खर्च होईल, तितका मोठ्या प्रमाणात त्याचा परतावा मिळतो. त्यामुळे धार्मिक गट/पंथ/संप्रदाय गुगल अॅड्स किंवा फेसबुक अॅड्सचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात करत आहेत.
याशिवाय Organic reach मिळवण्याचाही खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला जातोय. एखादा व्यावसायिक किंवा उद्योजक ऑरगॅनिक रीच मिळवण्यासाठी काय करतो? तर व्यवसायाच्या नावाने एखादे फेसबुक पेज चालू करतो, एखादे यू ट्यूब चॅनेल चालू करतो. त्यापुढे जाऊन इंस्टाग्राम किंवा ट्विटरवरही (सध्या याचे नाव X आहे) आपल्या उद्योगाचे अकाउंट बनवतो. पण आध्यात्मिक गट/संप्रदाय या व्यावसायिकांच्याही कित्येक पावले पुढे आहेत. त्यांनी आपल्या गटाच्या/संप्रदायाच्या नावे एक नव्हे; तर शेकडो अकाउंट्स/पेजेस/ग्रुप्स/चॅनेल्स बनवलेले आहेत. आपल्या भत संप्रदायातील तंत्रस्नेही भतांना व्यवस्थित प्रशिक्षण देऊन प्रभावीपणे सोशल मीडियाचा वापर कसा करायचा हे शिकवले आहे. त्यांच्या पेजवरील पोस्ट पाहिल्या असता सहजपणे लक्षात येते की, हे लोक चांगल्या प्रकारे प्रशिक्षित आहेत. एखादी पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोचेल आणि तिला जास्तीत जास्त चांगला प्रतिसाद कसा मिळेल याचा विचार करूनच त्या पोस्ट्स तयार केलेल्या असतात. योग्य प्रकारे हॅशटॅग आणि कीवर्डस् यांचा वापर केलेला असतो. तसेच या लोकांना रोजच्या रोज पोस्ट करण्यासाठी साहित्य (content) ‘वरून’ पुरवले जाते. एकाच दिवशी सगळ्या अकाउंट/पेजेसवरून प्रसिद्ध होणारे एकाच प्रकारचे मेसेज म्हणजे हे ‘वरून’ पुरवलेले साहित्य असते. असे साहित्य बनवण्यासाठी अर्थातच काही लोक पैसे देऊन बसवलेले असतात. या लोकांनी आपल्या संप्रदायाच्या नावाने पेजेस/अकाऊंटस् बनवण्याबरोबरच दुसराही एक मार्ग वापरलेला असतो. तो म्हणजे, कुठल्याही विषयावरचा ग्रुप असला, तरी त्यामध्ये घुसखोरी करणे. उदाहरणार्थ, शेती विषयावर असलेल्या एखाद्या फेसबुक ग्रुपमध्ये आपला माणूस घुसवायचा आणि त्यामध्ये आपल्याच पोस्ट्स टाकत राहायचे. संबंधित ग्रुप एका विशिष्ट विषयाला वाहिलेला असला; तरी देवाधर्माला विरोध नको म्हणून अशा पोस्टला तिथे कोणीही विरोध करत नाही. त्यामुळे या लोकांना सगळीकडे अगदी मुक्तपणे संचार करता येतो.
यांच्या पोस्टचाही एक फॉरमॅट ठरलेला आहे. त्यांच्या श्रद्धेय व्यक्तीचा/देवाचा फोटो असणारच. कमेंट मध्ये एखादे वाक्य लिहिण्याचे आवाहन करणे, दुर्लक्ष केल्यास वाईट घडण्याची भीती घालणे, काहीतरी लाभ मिळण्याचे आमिष दाखवणे, जीवनात चमत्कार घडण्याची लालूच दाखवणे, असे प्रकार तर आहेतच; पण त्याचबरोबर दुसर्यांची चोरलेली वाक्ये, सुविचार यांचाही समावेश हे लोक आपल्या साहित्यात करतात. या सगळ्या गोष्टींमुळे लोकांची गुंतवणूक (engagement) वाढते. आणि त्यामुळे त्यांच्या पोस्टचा रीच वाढतो.
या सगळ्या गोष्टी केल्यामुळे सतत नवनवीन लोकांपर्यंत पोहोचता येते. जास्त लाईक आणि कमेंट्स मिळाल्या तर फेसबुक किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पोस्टचा रीच वाढवतात आणि नवीन लोकांपर्यंत यांचे साहित्य पोचवतात. (तुम्ही फॉलो केलेले नसतानाही तुम्हाला अशा पोस्ट्स का दिसतात? या प्रश्नाचे उत्तर इथे मिळते.) व्यतीने त्यांच्या पोस्टवर कमेंट किंवा लाईक केले तर फेसबुक त्या व्यतीला पुन्हा पुन्हा याच प्रकारचा कंटेंट दाखवते. म्हणजे त्या व्यतीला वारंवार त्या संप्रदायाच्या इतर पोस्ट्स सुद्धा दिसू लागतात. मग हळूहळू त्यांचे कार्यक्रम, त्यांचे समारंभ त्यांचे मठ, सेवा केंद्रे यांची माहिती त्या व्यतीपर्यंत पोहोचवली जाते. हळूहळू त्या व्यक्तीला जवळच्या केंद्राला भेट द्यायला भाग पाडले जाते. तिथेही काही आमिषे, भीती यांचा व्यवस्थित वापर केला जातो. संगीत, भारलेले वातावरण, समूह मानसशास्त्र (मॉब सायकॉलॉजी) या गोष्टींचा पुरेपूर वापर केला जातो. आणि एक दिवस ती व्यती त्यांचे कायमचे ग्राहक बनून जाते. पुढे जाऊन ती व्यती फुकटची प्रचारक सुद्धा बनते. एका साध्या कमेंट किंवा लाईकपासून सुरू झालेला प्रवास व्यतीला एका धार्मिक गटाशी जोडून घेतल्यानंतर थांबतो. आणि तिथून पुढे नव्याच प्रवासाला सुरुवात होते.
या सापळ्यात सगळेच अडकतात असे नाही. सातत्य किती आहे यावर ते अवलंबून आहे. वारंवार एकाच प्रकारच्या पोस्टला प्रतिसाद देत गेल्यावर व्यक्ती त्यात गुंतून जाण्याची शक्यता खूप असते. पण प्रतिसाद द्यायला कंटाळा केला तर या सापळ्यातून सुटू शकते किंवा त्यात अडकतच नाही. लोकांना या सापळ्याची आधीच माहिती दिली तर लोक सावध राहू शकतात. त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायला हवी. तेव्हा मी तुम्हालाच प्रश्न विचारतो, एक मिनिट वेळ आहे का हा लेख शेअर करायला?
– वाघेश साळुंखे
