जन्मकुंडली भासमान विचारधारा

डॉ. दीपक माने -

मुलाच्या जन्माच्या वेळी जन्मस्थळावरून दिसणार्‍या आकाशातील (दृश्य, अदृश्य व काही काल्पनिक) ग्रह, तारे, राशी यांच्या स्थितीचा ढोबळ आराखडा/चार्ट म्हणजे जन्मकुंडली/जन्मपत्रिका!

आकाशातील ग्रहगोलांचा दैनंदिन मानवी जीवनव्यवहारांवर सतत आणि अखंड परिणाम होत असतो, या गृहितकावर सारे ज्योतिष आधारित आहे आणि हे परिणाम व्यक्तीच्या जन्मवेळेला जन्मस्थळावरून आकाशात जी ग्रहस्थिती दिसत असते त्यावर अवलंबून असतात असे मानले जाते. त्यामुळे जन्मस्थळ आणि जन्मवेळ यांच्यावर आधारित असलेल्या जन्मकुंडलीला ज्योतिषात भलतेच महत्त्व आहे.

मध्यभागी पृथ्वी आणि तिरप्या रेषा मारून १२ घरे/रकान्यांनी बनलेली चौकोनी आकृती म्हणजे कुंडली. उभ्या, आडव्या, सरळ रेषांचे चौकोन असते तर गोपनीयता राहिली नसती काय? असा प्रश्न पडतो. प्रत्येक भागाला/ घराला स्थान क्रमांक प्रथम, द्वितीय, तृतीय असे उजवीकडून डावीकडे (उलट दिशेने का? विचारायचे नाही.) दिलेले असतात. प्रत्येक घरात एक अंक व काही अक्षरे असतात. उदा.(१, र. च.), (४ गु. मं.) त्यातील अंक हा राशीचा अनुक्रमांक असतो तर र., च., गु, मं, ही ग्रहांच्या नावाची अद्याक्षरे असतात. यातील गंमत अशी की ज्या ग्रहावर आपण राहतो त्या पृथ्वीचा उल्लेखही नाही. त्या नऊ ग्रहांपैकी चंद्र- उपग्रह, सूर्य- तारा, राहू व केतू हे पृथ्वी आणि चंद्राचे परिभ्रमण कक्षांचे काल्पनिक छेदनबिंदू आहेत. प्लूटो- हा आता खुजा ग्रह आहे. युरेनसचा शोध हा दि.१३/३/ १७८१ मध्ये ‘विल्यम हर्षल’ यांनी लावला. त्याला कुंडलीमध्ये ‘ह’ हर्षल लिहितात (हजारो वर्षांपूर्वी त्याजागी काय लिहीत?) अशाप्रकारे ५० टक्के माहिती विसंगत आहे त्याचा पायाच भासमान आहे.

जगभरात हे आराखडे/ चार्ट एकाच पद्धतीने बनवले आहेत असेही नाही. कुंडल या संस्कृत शब्दाचा अर्थ वर्तुळ असा आहे. पाश्चिमात्यांनी तसे वर्तुळाकृती चार्ट बनवले, चीनमध्ये ते अधिक (+) चिन्हाकृती असतात. इतकेच काय तर आपल्या देशातही दक्षिणेला वेगळे तर उत्तरेला वेगळे असे त्याचे विविध प्रकारचे नकाशे आहेत.

आकाशस्थ ग्रह हायड्रोजन, हीलियम, आयर्न ऑक्साईड, कार्बन डाय-ऑक्साइड,मिथेन इ. वायूंनी व्यापलेले आहेत. कुंडलीकर्ते ग्रहांना भावना असतात, ते स्त्रीलिंगी, नपुंसक असतात असे मानतात. त्यातील काल्पनिक छेदनबिंदू राहू-केतू हे तर महाभयंकर राक्षस. ते व्यक्तीची हानी करतात. त्यांना मंत्राने, विधी करून कोटी कोटी कि.मी. अंतरावरून थंड/शांत करता येते अशी धारणा जनमानसामध्ये जागवलेली आहे.

जन्मकुंडलीच्या भाष्यकारांच्या भविष्याचा लोकांचा विश्वास बसतो कारण बार्नम इफेक्ट! म्हणजे पी.टी. बार्नम हा सर्कस मालक सर्कशीच्या यशाबद्दल सांगे की, प्रत्येकाला आवडेल असा कोणता तरी खेळ सर्कशीत असतो. तसेच जन्म कुंडली भाष्यात असते. माणसाला आवडेल ते, हवे ते, बोलणे-सांगणे हे तंत्र असते.

जन्मपत्रिका वाचन हे सांकेतिक भाषेत असल्यामुळे पारंपरिक ज्ञानधारकच ते समजू शकत होते. कुंडलीतील नक्षीवरून जीवनातील योग, गुणमिलन, घातवार, शुभकाळ, अशुभ घटना ठरविल्या जातात. ज्या आधारे ही माहिती दिली जाते, त्या पाच अंगांपैकी योग, करण, वार, नक्षत्र, तिथी यापैकी वार या व्यतिरिक्त इतर सर्व गोष्टी वर्तमान दैनंदिन जीवनात वापरात नाहीत तरीही कोष्टके वापरकर्ते अचूकतेचा दावा करतात. तुमच्या जन्माच्या वेळीच जीवनातील घडणार्‍या घटनांचे वेळापत्रक निश्चित केलेले आहे. त्यामध्ये बदल होत नाही ही धारणा मान्य करणे म्हणजे फोन हँग होतो तसे विवेकी बुद्धीला हँग करूनच जन्मपत्रिकेकडे जाता येईल.

जगभरातील मानवाचा जन्म भिन्न वेळेवर अथवा एकाच वेळी अनेकांचा जन्मही होतो. अथांग जनसमूहातील एकाच वेळी जन्मलेली माणसे एकसारखीच आयुष्य जगताना दिसत नाहीत. अनेक वर्षांपूर्वीपासून जगभरात भिन्न समूहातील लोकांनी जन्म वेळेवर आराखडे/ नकाशे निर्माण केले. जसे सिंधू संस्कृतीत कुंडली, बुद्धीझममध्ये व्हील ऑफ लाइफ, ख्रिश्चनिटीमध्ये नेथल, ज्यूमध्ये जेव्हीस, आयरिस, असे भविष्यावर भाष्य करण्याचे नानाविध प्रकार आहेत त्यांचा भडिमार करून सर्वत्र बाजार भरला आहे.

जन्मकुंडलीचा मुख्य गाभा जन्मवेळ आहे तर तिचे नेमके आकलन हवे. कोणती वेळ ही जन्मवेळ मानावी? एकूण सात वेळा आहेत. १) स्त्रीबीज-शुक्राणू मिलनातून गर्भपेशी निर्माण होते ती २) कायद्यानुसार गर्भपात प्रतिबंध अर्थात गर्भाची जननक्षमता येते ती ३) प्रत्यक्ष गर्भाचा जन्म (यात डोके/पाय की संपूर्ण बाळ बाहेर येते) ती ४) पायाळू /ब्रिज डिलिव्हरी मध्ये ती ५) मातेशी नाळेने जोडलेले बाळ नाळ कापून स्वतंत्र होते ती ६) बाळ प्रथम रडते ती ७) बाळाची फुफ्फुसे कार्यरत होऊन पहिला श्वास घेते ती. याबाबत जन्मपत्रिकाकर्ते ठोसपणे सांगू शकत नाहीत. ते संभ्रमित असल्याचे दिसते. कोणती वेळ इष्ट?

डॉ. दाभोलकर त्यांच्या भाषणातून नेहमी जन्मवेळेवर भविष्य ठरते का, हे तपासण्याकरिता एक उदाहरण देत- एकाच वेळी तीन टेबलावर तीन महिलांची सिझेरियन शस्त्रक्रिया करून बाळे जन्मली. त्यातील एक गर्भ श्रीमंताची, एक मध्यमवर्गीयाची, एक शेतमजुराची मुलगी असेल तर गर्भश्रीमंत हेलिकॉप्टरने, मध्यमवर्गीय कारने, शेतमजूर वडाप/एस.टी.ने मुलीला घरी नेईल. म्हणजे तिघांचे भविष्य जन्मवेळेवर नसून आर्थिक, सामाजिक कर्तृत्वावर, परिस्थितीवर अवलंबून असते.

व्यक्तीच्या जन्मावेळी चंद्र ज्या राशीमध्ये ती जन्मरास, ज्या नक्षत्रात ते जन्मनक्षत्र याकरिता त्यांच्या पुस्तिकेत तयारच ‘अ व क ह डा’ चक्र दिलेले असते.

सूर्यापासून पृथ्वीचे अंतर १५ कोटी कि.मी. आहे म्हणून सेकंदाला तीन लाख कि.मी. वेग असणारा प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास आठ मिनिटे लागतात. जन्मकुंडलीतील ग्रहांची अंतरे गुरु ७८ कोटी, मंगळ २२.८ कोटी, शनि १४३ कोटी, बुध ६ कोटी, शुक्र १०.५ कोटी, चंद्र (उपग्रह)३ लाख ८४ हजार कि.मी., युरेनस (हर्षल)२८८ कोटी, नेपच्यून ४५२ कोटी कि.मी. असल्याने जन्मावेळी दिसणारे ग्रह हे प्रत्यक्ष पाहतो त्यापेक्षा पूर्वीचे असतात.

गुरु एका राशीत एक वर्ष, शनी अडीच वर्षे म्हणजे त्या कालखंडात जन्मलेल्या सर्वांचे राशीत हेच ग्रह दिसणार मग त्यांच्या जीवनातील भविष्यातील घटनांमध्ये साम्य असायला हवे; पण तसे वास्तवात दिसत नाही.

योग- ग्रह आपल्या कक्षेत फिरताना त्यातील दोन ग्रहांचा पृथ्वी बरोबर ९० अंशाचा कोन होतो त्याला केंद्रयोग नंतर १२० अंशाचा कोन होतो त्याला त्रिकोण योग म्हणतात. यावर भाकिते मांडली जातात. याचा १९७८ मध्ये टेक्सास विद्यापीठात अभ्यास केला गेला. त्यात भाकिते व कोन या बाबत काहीही तथ्य आढळले नाही.

जन्म राशीवरून व्यक्तीचा बांधा, उंची, शरीर ठेवण इत्यादी बाबतीत भविष्यातील भाष्य करतात. रॉजर कल्चर यांनी ३०० व्यक्तींचा अभ्यास केला. त्यात राशी आणि बांधा, उंची ठेवण, यांचा सुतरामही संबंध नसल्याचे आढळले.

जन्मतारीख व व्यवसाय याचा १०,३१३ लोकांचा अभ्यास जी. ए. टायसन यांनी केला त्यातही तथ्य आढळले नाही.

जन्मवेळेवरून अर्थतज्ज्ञ दिवंगत वि. म. दांडेकर यांनी ३०० घटस्फोटित महिलांचा अभ्यास केला त्यातही तथ्य दिसले नाही.

जन्मवेळ अनिश्चित, त्यात वापरलेले निम्मे ग्रह चुकीचे, ५०% पायाच चुकीचा, अद्ययावत ग्रहांची माहिती त्यात नाही, सर्व चिकित्सा तपासणीमध्ये शून्य टक्के निष्कर्ष बरोबर. या बाबी विचारात घेता जन्मकुंडली भासमान विचारधारा असल्याचे दिसते. पुढील भागात जन्मानंतरची भाकिते वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासू.

डॉ. दीपक माने

संपर्क : ९८६०७६८८७१


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]