एकच निर्धार, जातपंचायतीला देऊ मूठमाती

विश्वजित चौधरी -

जळगाव येथे राज्यस्तरीय जातपंचायत मूठमाती परिषद संपन्न

जळगाव शहरात 1 मार्च रोजी जातपंचायतीला मूठमाती राज्यस्तरीय संकल्प परिषद घेण्यात आली. मानसी बागडे या महाविद्यालयीन युवतीने जातपंचांच्या छळाला कंटाळून केलेल्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर या परिषदेचे आयोजन केले होते. परिषद महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व जळगाव जिल्हा महिला असोसिएशन यांच्या पुढाकाराने आणि समविचारी संघटना-संस्था यांच्या सहभागाने घेण्यात आली. परिषदेसाठी ‘अंनिस’च्या आणि महिला असोसिएशनच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. अनेक देणगीदारांनी परिषदेसाठी आर्थिक सहकार्य केले. यात जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी त्यांचे कांताई सभागृह मोफत उपलब्ध करून दिले; तर भाजप आमदार तथा ‘अंनिस’चे हितचिंतक राजूमामा भोळे यांनी नाश्ता, चहा, भोजन परिषदेसाठी उपलब्ध करून दिले.

परिषदेत रविवारी, 1 मार्चला वातावरण उत्साही होते. सकाळी कार्यकर्त्यांनी विविध बॅनर लावले. या बॅनरमध्ये मानसी बागडे हिला न्याय मिळवून देण्यासाठी जो काही संघर्ष ‘अंनिस’ने केला, त्याबाबत वृत्तपत्रांत आलेल्या बातम्यांच्या कात्रणांचे बॅनर, ‘अंनिस’ने 15 जातपंचायती बरखास्त केल्या, त्याविषयी आणि सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याची माहिती देणारे बॅनर लक्ष वेधून घेत होते. परिषदेला कंजरभाट, भटक्या-विमुक्त जमाती आणि इतर समाजातील प्रतिनिधी उपस्थित होते. पीडित व्यक्ती व तिचे कुटुंबीय; तसेच समाजातील समविचारी यांची सभागृहातील उपस्थिती ‘अंनिस’ला बळ देत होती.

उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अविनाश पाटील होते. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजूमामा भोळे यांच्यासह जातपंचायतीला मूठमाती अभियान विभागाचे राज्य प्रमुख कृष्णा चांदगुडे, राज्य सरचिटणीस डॉ. ठकसेन गोराणे, बानोताई बागडे, राज्य पदाधिकारी डॉ. प्रदीप जोशी, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डी. एस. कट्यारे, जिल्हा महिला असोसिएशनच्या अध्यक्षा राजकुमारी बालदी उपस्थित होत्या. सुरुवातीला डॉ. नरेंद्र दाभोलकरांना अभिवादन करणारे गीत डी. आर. कोतकर, सुनील वाघमोडे, शिरीष चौधरी, रणजित शिंदे व इतर कार्यकर्त्यांनी सादर केले. शहरात 23 जानेवारी रोजी कंजरभाट समाजातील मानसी बागडे या तरुणीने जातपंचायतीच्या मनमानीला कंटाळून आत्महत्या केली होती. या परिषदेचे उद्घाटन मानसीची आई बानोताई यांच्या हस्ते जातपंचायतीच्या बेड्या तोडून अनोख्या पद्धतीने करण्यात आले. कौमार्य चाचणी, बालविवाह, शोषक जातपंचायत अशांच्या बंधनातून तरुणीला मुक्त करून हे उद्घाटन झाले. सायली चौधरी या कार्यकर्तीने उद्घाटनाची तयारी व सादरीकरण अभिनव पद्धतीने केले होते. प्रास्ताविकात कृष्णा चांदगुडे यांनी, राज्यात जातपंचायतींचे अस्तित्व दिसून आल्यानंतर त्यांच्या शोषक बाबींविरुद्ध ‘अंनिस’ने आवाज उठविला, असे सांगत परिषद घेण्यामागील भूमिका विषद केली. जातपंचायती बरखास्त करण्यासाठी ‘अंनिस’ सातत्याने लढत आहे. नाशिक येथील 2013 साली प्रमिला कुंभारकर हिच्या हत्येच्या घटनेनंतर ‘अंनिस’कडे जातपंचायतीच्या तक्रारी वाढत गेल्या, असेही त्यांनी सांगितले.

आमदार राजूमामा भोळे म्हणाले की, भारतीय संविधानानुसार आम्ही काम करतो. धर्म आपण वेगळे मानतो; मात्र राज्यघटनेनुसार आपण काम करतो. संविधानाचे पालन सर्वांनी केले पाहिजे. जीवनात श्रद्धा असावी; अंधश्रद्धा नसावी. संत, समाजसुधारकांनी केलेले विचारपरिवर्तनाचे काम पुढे गेले पाहिजे. आरोग्य आणि शिक्षणाची व्यवस्था चांगली निर्माण झाली पाहिजे. “मी अंधश्रद्धा मानत नाही, माझा ‘अंनिस’च्या कामाला पाठींबा आहे. प्रत्येक समाजात चुकीच्या रूढी, प्रथा असतील तर दूर झाल्या पाहिजेत,” असेही आ. राजूमामा भोळे यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषण अविनाश पाटील यांनी केले. “ज्या तरुणांच्या पिढीवर अवलंबून राहून आपण महासत्ता होण्याची स्वप्नं बघत आहोत, त्या तरुणांची प्रतिनिधी मानसी बागडे हिला जर आत्महत्या करावी लागत असेल, तर आपल्याला यासंबंधीचा अधिकार आहे काय? तरुणांच्या आशा, अपेक्षांच्या पूर्ततेसाठी जातपंचायत आडवी येणार नाही, हा आशावाद तरुणांच्या मनात निर्माण करण्याची आवश्यकता आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात अविनाश पाटील म्हणाले, “जातपंचायतींच्या जाचांना तोंड देण्यासाठी सामाजिक पातळीवर सामूहिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. याविषयी शासन प्रचंड उदासीन आहे. जातपंचायतींनी पीडित व्यक्तींना आधार देण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येणे महत्त्वाचे आहे. प्रशासनातील अधिकार्‍यांना योग्य प्रशिक्षण नसल्यानेच जातपंचायती फोफावल्या आहेत, असे सांगितले. महाराष्ट्राचे समाजमन हे जातपंचायतीच्या विरोधात आहे. जातपंचायतीच्या जाचाला कंटाळलेला कुठलाही तरुण त्रस्त असेल, कुठलेही कुटुंब बाधित असेल, तर अशा लोकांच्या पाठीशी ‘अंनिस’ कायम उभी आहे.” सूत्रसंचालन राज्य सरचिटणीस विनायक सावळे यांनी मानले. आभार भारती पाथरकर यांनी मानले.

प्रथम सत्र ः परिषदेच्या पहिल्या सत्रात जातपंचायत पीडित व्यक्तींनी अनुभवकथन केले. सत्राच्या अध्यक्षस्थानी मुंबई येथील शासकीय वित्तीय सल्लागार कृष्णा इंद्रेकर होते. या सत्रात नाशिक येथील कोमल वर्दे, अरुणा कुंभारकर, अण्णा हिंगमिरे, तनुजा मोती, मुंबई येथील लीला इंद्रेकर, औरंगाबाद येथील दर्शनसिंग मलके हे सहभागी झाले होते. जातपंचायतींनी कसा त्रास दिला, वाळीत टाकल्यावर अनुभव आले, अशा प्रकारे पीडितांनी ‘आप बिती’ कथन केली. यात कोमल वर्दे यांनी पती वारल्यावर पत्नीला अंधार्‍या खोलीत कोंडण्याच्या प्रथेला विरोध केला, असे सांगितले. तनुजा मोती यांनी कंजरभाट समाजातील जाचक रूढी, प्रथा यांना विरोध केला पाहिजे, असे सांगितले.

अरुणा कुंभारकर यांच्या मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून पित्याने गळा घोटला होता. त्यामुळे हळव्या झाल्या होत्या. परिषदेत त्यांना रडू कोसळले. त्यांच्या वतीने कृष्णा चांदगुडे यांनी माहिती दिली. अण्णा हिंगमिरे यांनी भटक्या जोशी समाजाने बहिष्कृत केल्याची ‘आप बिती’ सांगितली. लीला इंद्रीकर यांनी कंजरभाट समाजातील तरुणांच्या पाठीशी पालकांनी खंबीरपणे उभे राहावे, असे सांगितले. पीडितांचे अनुभवकथन ऐकून सभागृह हळवे होत होते. दर्शनसिंग भालके म्हणाले, कंजरभाट समाजाने मला सहा वर्षे समाजाबाहेर काढल्याचे म्हटले. कंजरभाट जातपंचायतीचे प्रतिनिधी हसन मलके यांनीही त्यांचे अनुभव सांगितले. या जातपंचायतीच्या प्रतिनिधींनी परिषदेत येऊन त्यांची भूमिका मांडली. त्यांच्या अंतर्विसंगत मांडणीतूनच त्यांच्या भूमिकांचे श्रोत्यांनीच मूल्यमापन केले आणि त्यांना जाहीर विरोध दर्शवला. स्त्रियांचीच कौमार्य चाचणी का; पुरुषांची का नाही, असा सवाल सभागृहातून विचारण्यात आला.

सत्राचे अध्यक्ष कृष्णा इंद्रेकर म्हणाले की, आणखी किती ‘मानसीं’च्या आत्महत्या होणे आपल्याला अपेक्षित आहे? आपण 21 व्या शतकात आज जातपंचायतींना मूठमाती दिलीच पाहिजे. विशीतील तरुणांचा वेश्या व्यवसाय सुरू झाला आहे. कंजरभाट समाजात अमानुषपणे जातपंचायतींचा कारभार सुरू आहे. संविधान प्रचलित कायदेव्यवस्था झुगारून कंजरभाट समाजात बेभानपणे अत्याचार सुरू आहेत. प्रशासनाने यात लक्ष घालून प्रबोधन केले पाहिजे. कंजरभाट समाजातील जातपंचांनी आता समाजाचे शोषण करणे थांबवले पाहिजे. कंजरभाट समाजात डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक आहेत. मात्र तरीही कौमार्य चाचणी सुरू आहे, हे कधी थांबेल? असाही सवाल इंद्रेकर यांनी विचारला. सूत्रसंचालन सुनील वाघमोडे यांनी केले. आभार प्रा. डी. एस. कट्यारे यांनी मानले.

द्वितीय सत्र ः द्वितीय सत्रात जातपंचायतीच्या अन्यायग्रस्त परिस्थितीला जबाबदार कोण, याविषयी मंथन करण्यात आले. सत्राच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या वासंती दिघे होत्या. या सत्रात अ‍ॅड. तृप्ती पाटील (ठाणे), अ‍ॅड. विनोद बोरसे (धुळे), जिजा राठोड (पाचोरा) यांनी सहभाग घेतला. अ‍ॅड. तृप्ती पाटील यांनी जातपंचायतीच्या जाचामागे अज्ञान व पुरुषप्रधान व्यवस्था आहे, असे सांगत कायदा राबविणार्‍या यंत्रणेलाही प्रशिक्षणाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. जातपंचायतीचे शोषण थांबविण्यासाठी समाजाने तरुणांना पाठबळ दिले पाहिजे. सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याचे नियम आपण तयार करून शासनाला दिले आहेत, त्याला मान्यता मिळायला हवी, असेही त्या म्हणाल्या. अ‍ॅड. विनोद बोरसे म्हणाले की, व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार असून जातपंचायत त्या हिरावून घेत आहेत. जातपंचायतींनी समाजाच्या हिताचे काम केले पाहिजे. जातपंचायतीच्या जाचाविरुद्ध विधी सेवा प्राधिकरणाची मदत देखील घेतली गेली पाहिजे.

जिजा राठोड म्हणाले की, कौमार्य चाचणी केवळ स्त्रियांचीच का घेतली जाते? शिक्षणाचा अभाव हा भटक्या समाजाचा खरा प्रश्न आहे. सामाजिक विषमता दूर होण्यासाठी समाजातील लोकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. अध्यक्षीय भाषणात वासंती दिघे यांनी, कोणतीही प्रथा जिवंत ठेवायची असेल तर समाजातील स्त्रियांवर बंधने लादली जातात. ती दूर झाली पाहिजेत, असे सांगितले. सूत्रसंचालन डॉ. ठकसेन गोराणे यांनी केले. आभार शहर कार्याध्यक्ष जितेंद्र धनगर यांनी मानले.

समारोप ः समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. मनीषा महाजन (पुणे) होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून ‘अंनिस’चे राज्य पदाधिकारी डॉ. प्रदीप जोशी, ‘अंनिस’चे जिल्हा उपाध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील उपस्थित होते. यावेळी परिषदेचा आढावा राज्य सरचिटणीस विनायक सावळे यांनी घेतला. परिषद यशस्वी झाली, असे सांगत परिषदेतून सामाजिक बदलासाठी योग्य दिशेने विचारमंथन झाले, असे म्हटले. याप्रसंगी परिषदेत मंजूर पिंजारी, रणजित शिंदे, काजल बागडे, कोमल गायकवाड, सागर बहिरुणे या पाच तरुणांच्या हस्ते ठराव वाचन करण्यात आले. डॉ. प्रदीप जोशी म्हणाले की, मानसिक दुर्बलता जाणवत असल्याने पीडित लोक तक्रारी करीत नाहीत. पीडितांना यातून बाहेर येण्यासाठी ‘अंनिस’ मदत करायला तयार आहे. तरुणांनी मानसिक ताण न घेता आयुष्यात सकारात्मक जीवनशैली स्वीकारली पाहिजे. अध्यक्षीय भाषणात अ‍ॅड. मनीषा महाजन म्हणाल्या की, जातपंचायतीकडे तर्क, तथ्य, कायदा नाही. त्या द्विधा मन:स्थितीत असतात. पीडितांना मानसिक आधार न मिळाल्याने ते टोकाचे पाऊल उचलतात. सूत्रसंचालन विश्वजीत चौधरी यांनी केले. आभार जिल्हा प्रधान सचिव आर. वाय. चौधरी यांनी मानले.

परिषदेत मानसी बागडे यांचा संपूर्ण परिवार उपस्थित होता. मंचाला ‘मानसी बागडे स्मृती विचारमंच’ असे नाव देण्यात आले होते. परिषदेसाठी धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद, बुलढाणा, ठाणे; तसेच जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. पीडित कुटुंब व त्यांचा परिवार उपस्थित होता. परिषदेकरिता निधी संकलन स्थानिक पातळीवर उभारण्यात आला. त्याचे कार्यकर्त्यांनी कौतुक केले. याचा आपल्याला आनंद आहे. परिषदेसाठी ‘अंनिस’चे जिल्हा प्रधान सचिव अशोक तायडे, डी. आर. कोतकर, डॉ. अय्युब पिंजारी, अरुण दामोदर, शहराध्यक्ष विकास निकम, मंजूर पिंजारी, सुधाकर पाटील, विजय लुल्हे, सुरेश थोरात, आर. एस. चौधरी, शिरीष चौधरी, कल्पना चौधरी, गुरुप्रसाद पाटील, अशफाक पिंजारी, दिलीप भारंबे, सायली चौधरी, गणेश पवार, प्रदीप पांडे, महिला असोसिएशनच्या मंगला नगरकर, ज्योत्स्ना बर्‍हाटे, डॉ. हेमलता रोकडे, बिंदिया नांदेडकर, छाया गडे, चंद्रकला परदेशी, स्मिता पाटील, मीनाक्षी वाणी, निर्मला जोशी, यास्मिन मेहंदी, आझमी मेहंदी, वैशाली पाटील, रत्ना झंवर आदींनी परिश्रम घेतले.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]