प्रसन्न दाभोलकर -
सर वर्गात येऊन बसल्यावर गार्गीने विचारले, “सर, आज सगळ्या वर्गाचा तुम्हाला एक प्रश्न आहे. बुद्धी कशी वाढवावी?”
“मला सांगा, तुम्हा सगळ्यांना आत्ताच हा प्रश्न का पडला?” सरांनी विचारले.
सुबुद्धी सांगू लागला, “सर, गेल्या आठवड्यात मुख्याध्यापक आमच्या वर्गावर येऊन गेले. त्यांनी आम्हाला सांगितले. तुमच्याकडून शाळेच्या खूप अपेक्षा आहेत. शालान्त परीक्षेत सगळ्यांनी उत्तम गुण मिळवले पाहिजेत. आम्ही विचार केला, जास्त गुण पाहिजे तर जास्त बुद्धी पाहिजे. सर, खरंच बुद्धी कशी वाढवावी?”
देशमुख सरांनी वर्गावर नजर टाकत विचारले, “तुमचा बुद्धिमान मुलांचा वर्ग आहे. बुद्धी वाढवण्याचे वेगवेगळे मार्ग तुम्ही नकीच ऐकले असणार. सांगा बरं कोणकोणते?”
नेहमीप्रमाणे एक एक उत्तर पुढे येऊ लागले. “माझी आई पुढच्या वर्षी मला दररोज भिजवलेले बदाम खायला देणार आहे. त्याने बुद्धी वाढते.” “बाजारात बुद्धी वाढायचं औषध मिळतं म्हणे.” “त्राटक का काय केल्यामुळं एकाग्रता वाढते.” “पहाटे उठून अभ्यास केला की बुद्धी चांगली होते.” “वय वाढतं तशी बुद्धी वाढते.” “नियमित अभ्यास केला की बुद्धी वाढते.”
“पण बुद्धी नेमके काय?” सरांनी गंभीरपणे विचारले.
“बुद्धी म्हणजे हुशारी.” चंचल बोलून मोकळा झाला.
“हा तर समानार्थी शब्द झाला. मला बुद्धी या शब्दाचा अर्थ स्पष्ट करून पाहिजे, कोण सांगेल?” सरांनी आम्हालाच प्रश्न विचारणे सोडले नाही.
“परीक्षेत जिच्यामुळे जास्त मार्क पडतात ती बुद्धी.” विचक्षणने विचार करून सांगितले.
“दुर्दैवाने असे समजले जाते खरे. परीक्षेत जास्त मार्क कोणाला पडतात?” सरांचे प्रश्न सुरू होते.
“विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे जो लिहितो त्याला.” अमेय म्हणाला.
“बरोबर. आता मला सांगा, प्रश्नाची उत्तरे तुम्ही कशी तयार करता?” सरांनी विचारले.
तेजस्विनी म्हणाली, “वर्गात सर आम्हाला प्रश्नांची उत्तरे नीट समजावून सांगतात. गाईडमध्ये ती उत्तरे व्यवस्थित लिहिलेली असतात. ती आम्ही पाठ करतो.”
“म्हणजे दुसर्याची उत्तरं तुम्ही पाठ करून लिहिता. मग हुशार कोण, मुळात उत्तरे तयार करणारा का पाठ करून लिहीणारा? दुसर्यांनी सांगितलेलं तुम्ही तसंच लिहिलं तर त्यात तुमची हुशारी काय?”
आमच्या वर्गाला हुशारीबद्दल गर्व होता. अचानक आम्हाला जाणवले, अरे आपली हुशारी तर उसनी आहे.
सर आम्हाला समजावून देऊ लागले, “अरे, प्रश्नांची उत्तरे शोधायला हुशारी किंवा बुद्धी लागते हे खरे आहे. पण ती उत्तरं आपण शोधून काढायची असतात. दिलेल्या माहितीवरून आपल्यालाच प्रश्नांची उत्तरं शोधता आली पाहिजेत. ती नीट मांडता आली पाहिजेत.
“तसेच धड्यावरील प्रश्न फक्त परीक्षेत विचारले जातात. आपल्याला जगताना पडणारे प्रश्न वेगळेच असतात. त्यामुळे वर्गातील पाठांतरावर आधारित असलेली हुशारी पुढे आयुष्यात उपयोगी पडेलच असे नाही. शास्त्रज्ञ, लेखक, कलावंत, सामाजिक कार्यकर्ते, नेते यांच्यापुढे असलेल्या प्रश्नांची उत्तरे कोणत्या धड्यात किंवा गाईडमध्ये मिळत नाहीत. मुळात प्रश्न पडायलाच खूप बुद्धी लागते. समजेल तुम्हाला हळूहळू. पण एक लक्षात ठेवा, आपल्याला प्रश्न पडणे आणि पडलेल्या प्रश्नांची उत्तरे स्वप्रयत्नाने शोधणे हा बुद्धीचा महत्त्वाचा पैलू आहे.”
खरं तर आम्हाला फारसं समजलं नव्हतं. तेजस्विनीने उभे राहून विचारले, “सर आम्हाला सगळे सांगतात. या प्रश्नाचं उत्तर असं लिहायचं. दुसर्या पद्धतीनं लिहिलं तर मार्क मिळणार नाहीत. मग आम्ही काय करायचं?
“सरांच्या चेहर्यावर खंत उमटली. ते म्हणाले, “तेजस्विनी, तुझं म्हणणं दुर्दैवानं खरं आहे. पण निदान तुम्ही हेच उत्तर का बरोबर असा विचार करू शकता. दुसर्या प्रकारानं उत्तर लिहायचा विचार करू शकता. पाठांतर करून उत्तरं लिहिण्यात खरी हुशारी नाही. पाठांतरावर भर न देता स्वतः विचार केल्यास शालेय परीक्षेत कदाचित काही मार्क कमी पडतील परंतु आयुष्यातील परीक्षेत तुम्ही यामुळे अधिक यशस्वी व्हाल.”
“सर, मूळ प्रश्न राहिलाच.” शकील म्हणाला. “आमची बुद्धी वाढवायची कशी?”
सर सांगू लागले, “आपली बुद्धिमत्ता ही आपली आनुवंशिकता आणि लहानपणच्या आपल्या मेंदूच्या वाढीवर अवलंबून असते. असलेली बुद्धी नीट कशी राखायची कशी ते प्रथम बघू. मग ती वाढवायची कशी याचा विचार करू. मला सांगा, जास्त मार्क मिळवण्यासाठी तुम्ही जास्त अभ्यास करता आणि जास्त अभ्यास करण्यासाठी काय करता?”
“सर, घरचे मला पहाटे उठवतात.” कल्पेश म्हणाला.
“अगदी बरोबर.” सर म्हणाले. “जास्त अभ्यास करण्यासाठी आपण आपली झोप कमी करतो. पण अभ्यास आपला मेंदू करीत असतो. आणि मेंदूला पुरेशी विश्रांती मिळाली नाही तर तो अभ्यास नीट करू शकत नाही. त्यामुळे दररोज सात ते आठ तास व्यवस्थित झोप घेणे हे आपला मेंदू कार्यक्षम राहण्यासाठी आवश्यक आहे. बरं मला सांगा, मेंदूसाठी उत्तम औषध कोणते असेल? ती तोंडाने घ्यायची गोष्ट नाही, एवढे मी तुम्हाला सांगतो.
“आम्ही सर्व जण विचारात पडलो. कोणालाच काही सुचेना. “मेंदूचे सर्वांत उत्तम औषध आहे, नियमित व्यायाम.” सर म्हणाले. “पण आपण दहावीला गेलो की झोप कमी करतो, व्यायाम आणि खेळ बंद करतो. आपण नुसतं पाठांतराच्या मागं लागतो. त्यामुळे कदाचित काही मुलांना परीक्षेत थोडे मार्ग जास्त मिळतीलही परंतु यामुळे आपल्या बुद्धीचा विकास होत नाही.”
“सर, शरीराच्या शक्तीचा आणि बुद्धीचा काही संबंध आहे का?” राजेशने विचारले.
“पैलवानाचं डोकं गुडघ्यात असतं असं म्हणतात.” एक मुलगी पुटपुटली.
जरा आवाज चढवून सर म्हणाले, “हाही एक गैरसमज आहे. चांगला पैलवान व्हायलाही चांगली बुद्धिमत्ता लागते. बुद्धी चांगली ठेवण्यासाठी जिममध्ये जाऊन स्नायू बळकट करण्याची गरज नाही हे खरे. परंतु सुदृढ आणि आरोग्यसंपन्न शरीर असल्याखेरीज बुद्धी नीट काम देणार नाही. असं का?”
“कारण मेंदू हा शरीराचाच भाग आहे.” पुढे डॉक्टर होऊ इच्छिणारी अपर्णा म्हणाली.
“छान उत्तर. आपण नियमित व्यायाम केला तर मेंदूकडे भरपूर रक्त जाते आणि मेंदूची तरतरी आणि उत्साह वाढतो. नेहमीचाच पण योग्य आहार हादेखील मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. तुमच्यापैकी ज्यांना थकल्यासारखं वाटत असेल त्यांनी जरूर हिमोग्लोबिन तपासून घ्या. रक्ताची लाली योग्य असल्याशिवाय आपण नीट अभ्यास करू शकत नाही.” आम्हाला माहिती नसलेल्या अनेक गोष्टी सर सांगत होते.
“या सर्व गोष्टींमुळे आपली बुद्धी नीट राखली जाईल. ती वाढवण्यासाठी काय करायचे?” ऋत्विकने विचारले.
“प्रथम एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्या बुद्धीची किती वाढ होऊ शकेल याला काही नैसर्गिक मर्यादा असतात. वयानुसार आपले ज्ञान वाढत जाते, पण बुद्धी फारशी वाढत नाही. म्हणजे असं, एखाद्या मुलाला परीक्षेत ६० टके गुण मिळतील एवढी बुद्धी असेल तर त्याची बुद्धी वाढवण्याचा प्रयत्न करून ते फार तर ७०% पर्यंत जाऊ शकतील.”
“एवढी तरी कशी वाढवायची सर?” मैत्रेयीने विचारले.
“त्यासाठी आपली बुद्धी वापरत राहायची. म्हणजे अवांतर वाचन करून भरपूर ज्ञान गोळा करायचे, त्यावर विचार करायचा, मित्रांबरोबर चर्चा करायची आणि त्या माहितीवर आधारित असे आपले स्वतःचे प्रश्न तयार करायचे आणि स्वतःची उत्तरं शोधून काढायची. माणसाच्या सर्व क्षमता नीट वापरल्या तरच काही प्रमाणात वाढू शकतात, नाहीतर त्यांची वाढ खुंटते.”
थोडे थांबून सर सांगू लागले, “मुख्य म्हणजे परीक्षेतले गुण म्हणजेच हुशारी हा समज सोडून द्यायचा. बुद्धीला अनेक पैलू असतात. गुण कमी पडले म्हणजे मी हुशार नाही असं कधीही समजायचं नाही. तसेच केवळ हुशारीमुळं कोणीही आयुष्यात फार पुढं जाऊ शकत नाही. चिकाटी, आत्मविश्वास, कुतूहल, नेतृत्वक्षमता, मनमिळाऊ वृत्ती हे पैलूही महत्त्वाचे असतात.
जाता जाता सर म्हणाले, “वाचणे, विचार करणे, चौकस बुद्धी ठेवणे, वेगवेगळी उत्तरे शोधणे, ती तपासून घेणे आणि आपले ज्ञान वाढवण्यासाठी मन कायम उघडे ठेवणे हा बुद्धी वाढवण्याचा सर्वांत उत्तम मार्ग आहे.”
– डॉ. प्रसन्न दाभोलकर
