सुबोध जावडेकर -
सचिन तेंडुलकर आपल्या डाव्या पायाला पॅड आधी बांधतो, मग उजव्या पायाला; राहुल द्रविड़ मैदानात शिरताना नेहमी उजवं पाऊल आधी टाकतो; सुनील गावसकर फलंदाजीसाठी मैदानात उतरताना न चुकता जोडीदाराच्या उजवीकडून चालत असे; सौरभ गांगुली नेहमी आपल्या गुरूचा फोटो खिशात ठेवून खेळायला येत असे आणि स्टीव्ह वॉ आपल्या डाव्या खिशात त्याच्या आजोबांनी दिलेला काळा हातरुमाल ठेवत असे. या सगळ्या अंधश्रद्धा आहेत हे उघडच आहे. पण त्या-त्या खेळाडूंच्या दृष्टीने त्यांना फार महत्त्व आहे. अशा गोष्टींमुळे त्यांना एक प्रकारचा दिलासा मिळत असणार. त्यांचा आत्मविश्वास दुणावत असणार, हे उघड आहे. त्याच्या विक्रमांमध्ये अशा गोष्टींमुळे मिळणार्या मनोबलाचं स्थान किती आणि त्याच्या मेहनतीचा वाटा किती ते सांगणं कठीण आहे. पण त्यांच्या यशात या समजुतींचा काही थोडा वाटा तरी नकीच असणार. अनेकांच्या अशा काही लकी गोष्टी असतात, काही रंग असतात, लकी तारखा, लकी वार असतात. केवळ क्रिकेटपटूंचेच नव्हे, तर जवळपास सगळ्यांचेच!
अशा गोष्टींवर यांचा विश्वास आहे. त्यांच्या कामगिरी त्यामुळे खरोखरच सुधारते. का? याचा शोध घ्यायचं जर्मनीतल्या कोलोन युनिव्हर्सिटीच्या लिसान डार्मिश यांनी ठरवलं. त्यांनी काही जणांना आपापल्या “शुभशकुनी” चीजा घेऊन प्रयोगशाळेत यायला सांगितले. शंभरेक जण या प्रयोगात सामील झाले. आपल्याबरोबर त्यांनी अनेक चित्रविचित्र गोष्टी आणल्या होत्या. त्यात लहानपणीच्या खेळण्यांपासून ते भाग्यरत्नांच्या अंगठ्यापर्यंत अनेक वस्तू होत्या. पहिल्या प्रयोगात चेंडू दहा वेळा थोड्या अंतरावरून जाळ्यात टाकायचा होता. काही जणांच्या हातात चेंडू देताना डॅमिशने त्यांना ‘हा चेंडू आत्तापर्यंत तरी खूप लोकांना लकी ठरलाय, बरं का! हा ज्यांना मिळाला होता त्यानी शंभर टक्के अचूक कामगिरी केली’, असं खोटंच सांगितलं. असं ज्यांना सांगण्यात आलं होतं त्यांनी खरोखरच बाकीच्यांपेक्षा जास्त वेळा चेंडू जाळ्यात टाकला! आपल्याला लकी चेंडू मिळाला आहे, आपली कामगिरी सरस होणारच या विश्वासाचा तो परिणाम होता. दुसर्या एका प्रयोगात हस्तकौशल्याचा एक खेळ खेळायचा होता. त्यात खेळाला सुरुवात करायच्या आधी काही लोकांना डॅमिशने शुभेच्छा दिल्या. त्यांची कामगिरी शुभेच्छा न मिळालेल्यांच्या तुलनेत चांगली झाल्याचे आढळून आलं. मग स्मरणशक्तीची कसोटी पाहणारा एक खेळ खेळायला दिला. त्यापूर्वी त्यातल्या निम्म्या लोकांजवळून त्यांनी बरोबर आणलेल्या ‘लकी’ गोष्टी काढून घेण्यात आल्या. त्यांनी कुरकुरतच त्या डॅमिश यांच्या हवाली केल्या. मग त्यांना प्रश्न विचारून त्यांच्या आत्मविश्वासाची चाचपणी केली गेली. शुभशकुनी गोष्टी गमावलेल्या लोकांचा आत्मविश्वास अर्थातच डळमळला होता. तुमचा स्कोर किती होईल त्याचा अंदाज त्यांना सांगायचा होता. ज्यांच्याकडून या चीजा काढून घेण्यात आल्या होत्या त्याचा अंदाज लकी वस्तू जवळ राहू दिलेल्यांपेक्षा कितीतरी कमी होता. आणि गंमत म्हणजे प्रत्यक्षात तसंच घडलं! त्या वस्तू जवळ ठेवणार्यांनी बाजी मारली. याचे कारण मात्र या वस्तूच्या अंगी असलेल्या जादूमध्ये नव्हतं. त्या जवळ असल्यामुळे आपली कामगिरी छान होणारच, या त्याच्या समजुतीत होतं.
जगण्याच्या लढाईत अंधश्रद्धा आदिमानवाला उपयोगी पडल्या असणार. कठीण परिस्थितीत मनाला उभारी देण्याचे काम त्यांनी केलं. कल्पना करा, लाखो, करोडो वर्षांपूर्वी माणसाचा पूर्वज जंगलात एकटाच आहे. त्याच्या टोळीपासून त्याची ताटातूट झालीय. चहू दिशांना घनदाट काळोख. दुरून वन्य प्राण्यांच्या डरकाळ्या कानावर येताहेत आणि… शेजारच्या झुडपातून कसली तरी खसखस ऐकू येते. या भीतिदायक परिस्थितीत कशाच्या आधारावर त्यानं उभं रहावं? अशी एखादी गोष्ट (लकी हाडूक?) त्याच्यापाशी असेल आणि त्यामुळे आपण संकटातून तरून जाऊ असं त्याला वाटत असेल, तर त्याला बोल कसा लावणार? त्याच्या अंधविश्वासाच्या जोरावरच तो तगून राहिला आणि तो विश्वास नसणार्यानं केवळ भीतीनंच ‘राम’ म्हटला. अशा अंधश्रद्ध आदिमानवाचे आपण वारस आहोत! अंधश्रद्धा समाजात का टिकून आहेत त्याचं हे स्पष्टीकरण आहे. अंधश्रद्धेचं समर्थन नव्हे!
२००२ मध्ये कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतले डेव्हिड फिलिप्स यांनी एक अभ्यास केला. १९७३ पासून १९८८ पर्यंत अमेरिकेत हृदयरोगानं किती माणसं मरण पावली त्याची आकडेवारी जमवली. त्यात मूळचे चीन आणि जपानहून येऊन अमेरिकेत स्थायिक झालेले सुमारे दोन लाख लोक होते. फिलिप्सना आढळले की, चीन व जपानहून आलेले लोक जास्त करून महिन्याच्या चार तारखेला मरण पावतात. या तारखेला हृदयविकाराने मरणार्यांची संख्या महिन्याच्या इतर कुठल्या दिवशी मरणापेक्षा सात टक्क्यांनी जास्त असते! बाकी कुठल्याही देशातून अमेरिकेत आलेल्या लोकांमध्ये मात्र चार तारखेला मरणार्यांची संख्या इतर तारखेइतकीच होती. मग चीन आणि जपानमधून आलेल्या लोकांमध्ये असा फरक का दिसावा? याचं कारण चिनी आणि जपानी लोक चार हा आकडा अशुभ मानतात. त्यामुळे हृदयविकार असलेल्या चिनी आणि जपान्यांच्या मनावर चार तारखेला खूप जास्त ताण असतो. याला ‘बास्करव्हिले इफेक्ट’ म्हणतात. हाउंड ऑफ बास्करव्हिले या शेरलॉक होम्सच्या प्रसिद्ध कादंबरीतला ड्यूक शापाच्या भीतीने, केवळ घाबरूनच मरण पावतो. त्यावरून त्याला हे नाव मिळालं आहे. अंधश्रद्धांच्या दुष्परिणामांचे एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणावं लागेल. आपल्या देशातही असा शास्त्रशुद्ध अभ्यास कुणी केला तर अंधश्रद्धेच्या घातक परिणामांची रग्गड उदाहरणं सापडतील. ‘आपल्याभोवतीचे जग अनेकदा स्वैर (random) असतं. कुठलाही नियम न पाळणारे असतं. त्यात काही म्हणजे काहीही होऊ शकतं, अतर्क्य घटना घडतात. त्यावर आपलाच नव्हे, तर कुणाचाच ताबा असत नाही. घडणार्या घटना ‘अनियमित’ असल्यानं त्यात कसलीच संगती नसते. पण तरीही आपण त्यामागे काहीतरी कारण असणारच असं गृहीत धरून त्यांचा कार्यकारणभाव शोधायचा प्रयत्न करतो. नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीतल्या अॅडॅम गॅलिन्स्की (Adam Galinsky) यांनी एक प्रयोग केला. काही स्वयंसेवकांना वीसपंचवीस धूसर, अस्पष्ट चित्रं दाखवली. त्यातल्या निम्म्या चित्रांमध्ये खुर्ची, होडी यांसारख्या काही वस्तूंच्या आकृती, ठिपक्याठिपक्यांच्या मध्ये लपलेल्या होत्या, बहुतेक लोकांनी त्या बरोबर हुडकून काढल्या. पण ज्यांच्यामध्ये कसल्याही आकृती दडलेल्या नव्हत्या, फक्त ठिपक्यांची स्वैर रांगोळी होती त्यांच्यातही बर्याच लोकांना आकृत्या दिसल्या.’ विशेषतः जे लोक मनाने कमकुवत होते, ज्यांना भोवतालची परिस्थिती आपल्या हाताबाहेर जात आहे असं वाटत होतं, त्यांच्याबाबतीत हे प्रकर्षानं घडताना दिसलं. अशा लोकांना नसलेल्या गोष्टी दिसतात, नसलेले संबंध दिसू लागतात. माहिती अपुरी असली, तरी स्वत:च्या कल्पनाशक्तीनं रिकाम्या जागा भरून पूर्ण चित्र तयार करण्यात आपला मेंदू वाकबगार असतो. त्याला गोंधळ, अनिश्चितता मानवत नाही. प्रत्येक गोष्टीमागचे कारण समजलेच पाहिजे हा जणू त्याचा हट्ट असतो. दोन घटना एकामागोमाग घडताना दिसल्या तर दुसरीमागचे कारण पहिली घटना हेच असणार, अशी समजूत तो करून घेतो. मारून-मुटकून असा संबंध जोडणं कितीही मूर्खपणाचे असले, तरी कारण अजिबात माहीत नसण्यापेक्षा हास्यास्पद कारणसुद्धा मेंदू स्वीकारतो, हे अनेकदा दिसून आले आहे. त्यातूनच अंधश्रद्धेचा जन्म होतो. ‘केवळ माणूसच नाही तर पक्षी आणि प्राणीही असा बादरायण संबंध लावायचा प्रयत्न करतात’, असं बी. एफ. स्किनर नावाच्या मानसशास्त्रज्ञाला आढळलं. १९४८ मध्ये त्यानं कबुतरांवर केलेले प्रयोग प्रसिद्ध आहेत. आपण नेहमी पाहतो, कबुतरं सतत काही ना काही करत असतात. म्हणजे गिरकी घेणं, पंखात चोच खुपसणं, मान वेळावणं, असं काहीतरी. स्किनरनं सहा कबुतरांना सहा स्वतंत्र पिंजर्यात ठेवले. त्यांना थोड्या-थोड्या वेळाने यंत्राद्वारे दाणे खायला द्यायची व्यवस्था केली होती. दाणे नियमित अंतराने मिळत नसत. ते केव्हा मिळतील याला काही नियम नव्हता. कधी पाच मिनिटे थांबायला लागायचं तर कधी पाच सेकंदातसुद्धा मिळे. मात्र दाणा मिळायच्या आधी कबुतर जे काही करत असे ते, म्हणजे गिरकी घेणं, मान वेळावणं वगैरे. त्यामुळेच आपल्याला दाणा मिळाला अशी समजूत ते करून घेई! लवकर दाणा मिळावा म्हणून तीच गोष्ट पुन्हापुन्हा करत राही. तसं करताना दाणा मिळाला तर ते केल्यानेच दाणा मिळतो ही समजूत पकी होई. मग अधिकच उत्साहाने ती गोष्ट करू लागे. दुसर्या दिवशी येऊन स्किनरनं पाहिलं; तर काय? एक कबुतर सारखं स्वत:भोवती गिरक्या घेत होते. दुसरं पंखात चोच खुपसत एका पायावर नाचत होते, तर तिसरं सतत एका विशिष्ट दिशेने मान खालीवर करत होते. सहाही कबुतरं असं काही ना काहीतरी निष्ठापूर्वक करत होती, जणू दाणे मिळवण्यासाठी एखादा पवित्र विधीच श्रद्धापूर्वक चालू होता!
माणसं कर्मकांड करतात तेव्हा तरी दुसरं काय करत असतात? त्यातून मनाला दिलासा मिळतो हे खरं असलं, तरी भोंदूबाबा मेंदूच्या ह्या कमकुवतपणाचा फायदा उठवतात. एक-दोन लोकांना नव्हे, तर सार्या समाजालाच टोपी घालू पाहतात. त्यांच्याभोवती लक्षावधी लोक गोळा होतात. तेव्हा प्रश्न पडतो, माणसाचा मेंदू आणि कबुतराचा मेंदू यात काही फरक आहे की नाही?
(साभार – ‘मेंदूच्या मनात’ या सुबोध जावडेकरांच्या पुस्तकातील प्रकरण)
-सुबोध जावडेकर