राजीव देशपांडे -

कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेची जी आशंका तज्ज्ञांकडून सातत्याने सांगितली जात होती, त्या लाटेने सार्या देशाला अभूतपूर्व तडाखा दिला आहे. मागील वर्षापेक्षा दुप्पट, तिप्पट वेगाने ही लाट सार्या देशात पसरली आहे. देशभरातून येणारे वृत्तांत अक्षरश: हादरवून टाकणारे आहेत. रुग्णालयांमधील खाटांबरोबरच ऑक्सिजन, जीवरक्षक औषधे यांची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे, त्यासाठी नातेवाईकांना अक्षरक्ष: पायपीट करावी लागत आहे. दररोज कोणी ना कोणी कुटुंबीय, सहकारी, कार्यकर्ता, परिचित, कलावंत यांच्या मरणाची बातमी ऐकावी लागत आहे. एकीकडे डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कामगार, महापालिका, नगरपालिकांचे कामगार, प्रयोगशाळांतले तंत्रज्ञ, लस तयार करणारे शास्त्रज्ञ असे अनेकजण जीव तोडून काम करीत आहेत; तर दुसरीकडे देशभरात निर्माण झालेली दारुण परिस्थिती ज्या नेतृत्वाने कार्यक्षमतेने, संवेदनशीलतेने हाताळावयाची, ते सत्ताधारी पक्षाचे नेतृत्व लाखोंच्या निवडणूक प्रचार सभा घेत, कुंभमेळे भरवत लोकांच्या जीवाशी खेळणारे घाणेरडे राजकारण करण्यात मग्न आहे.
आज कोरोनाला अटकाव करण्यासाठी त्वरित योग्य उपचार मिळतील, अशा आरोग्य सुविधा कोणतेही सामाजिक, राजकीय भेदभाव न करता वाढविणे, कोरोनाच्या नियमांची कार्यक्षमतेने कठोरपणे अंमलबजावणी करणे, टाळेबंदी वगैरेंमुळे गरिबांवर कोसळणार्या आर्थिक परिणामांची झळ कमीत कमी करणे हे ताबडतोबीने करण्याचे उपाय आहेत; तर सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करीत सरकारी सुसज्ज रुग्णालये उभारत दीर्घकालीन आरोग्य धोरण आखणे गरजेचे आहे, नाही तर कोरोनाच्या अशाच दुसर्या-तिसर्या लाटा येत असे किती जीव घेत राहतील, यांची कल्पनाही करवत नाही.
कोरोनाची साथ सुरू झाली, तेव्हा या साथीचे गांभीर्य देशातील आणि जगभरातील आरोग्यतज्ज्ञांनी सामोरे आणले होते; पण सुरुवातीला ही राष्ट्रीय आपत्ती आहे, हे मानायलाच आरोग्यमंत्री तयार नव्हते. त्यामुळे तातडीने योग्य उपाय योजण्याऐवजी थाळ्या, टाळ्या वाजवणे, दिवे पेटविणे, मंत्र-तंत्र, यज्ञयाग, गाय-गोमूत्र अशा अंधश्रद्धा वाढविणार्या मोहिमा आणि वाफारे घ्या, गरम पाणी, काढे प्या अशा उपायांचा प्रसार केला गेला. त्यामुळे वैद्यकीय उपाययोजना आणि साथीचे गांभीर्य जनतेपर्यंत पोहोचविण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. कुंभमेळा तर दर बारा वर्षांनी भरतो. मागचा हरिद्वारचा कुंभमेळा 2010 साली झाला होता; म्हणजे या कुंभमेळ्याचे 2022 साली नियोजन व्हावयास हवे होते; पण केवळ ज्योतिषांमुळे तो या कोरोना काळात भरवला गेला, त्याचे परिणाम आपण आता अनुभवतच आहोत. त्यामुळे या साथीकडे, त्या साथीवरील उपाययोजनांकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच पाहणे गरजेचे आहे.
आज कोरोनाला थोपवताना आधुनिक औषधशास्त्राच्या वैज्ञानिक उपाययोजनाच कामाला येत आहेत. ऑक्सिजन काय किंवा पल्स ऑक्सिमीटर, रुग्णालयांमधील अद्ययावत अतिदक्षता केंद्रे, जीवरक्षक औषधे असोत अथवा महामारीतून सुटका करण्याची आशा दाखविणारी लस असो, ही सर्व विज्ञानाचीच देन आहे; पण या सर्व वैज्ञानिक उपाययोजना जनतेपर्यंत कार्यक्षमतेने पोचविण्यात हितसंबंधांच्या राजकारणी जाळ्यात अडकलेले, विवेकी वैज्ञानिक दृष्टीला खुंटीवर टांगलेले सत्ताधारी अपयशी ठरलेले आहेत आणि त्याचे परिणाम सर्वसामान्य जनतेला आपल्या रोजी-रोटीचेच नव्हे, तर जिवाचेही मोल देत भोगावे लागत आहेत.
विज्ञानाने प्रतिष्ठित केलेले सिद्धांत, साधने आमच्याच रुढी-परंपरेची कशी भाग आहेत, असे दावे करीत आपले धर्मांध, आर्थिक, राजकीय हितसंबंध प्रस्थापित, बळकट करण्याचे व सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यात येणारे प्रस्थापितांचे अपयश झाकण्याचे काम छद्म विज्ञान नेहमीच करत असते. त्यामुळे छद्म विज्ञानाच्या विरोधातील हा संघर्ष कोणत्याही काळात महत्त्वाचाच असतो; पण आजच्या कोरोनासारख्या महामारीविरोधात लढताना छद्म विज्ञानाच्या विरोधातील हा संघर्ष कळीचा ठरतो. कारण अशा काळात विज्ञानाने सुपीक केलेल्या जमिनीतून छद्म विज्ञानाचे (ज्याला स्युडो, नकली, फसवे, आभासी विज्ञान असेही म्हटले जाते) विषारी पीक तरारून येते. म्हणूनच ‘अंनिवा’ने छद्म विज्ञानाच्या विरोधातील संघर्षाचा विविध अंगांनी वेध घेणारा हा विशेषांक कोरोना महामारीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर साजरा होत असलेल्या महाराष्ट्राच्या एकसष्टाव्या वर्धापनदिनी व जागतिक कामगार दिनी आम्ही प्रकाशित केला आहे. वाचकांना तो निश्चितच उपयुक्त ठरेल, असा आम्हाला विश्वास वाटतो.