संजय बारी - 9420257075

चिंचवड परिसरात सप्टेंबर व ऑक्टोबर 2020 दरम्यान एक भानामातीचे प्रकरण घडले. त्याचे झाले असे की, एका दक्षिण भारतीय शिक्षिकेकडे वेगवेगळ्या वस्तू जळण्याचे प्रकार घडत होते. हा प्रकार एका शिक्षिकेकडे घडत होता. त्या घटस्फोटित आहेत व त्यांचे वडील, मुलगी व भावासह चिंचवडला वास्तव्यास आहेत. त्यांनी मुलगी दत्तक घेतली आहे. अजाणतेपणाने त्या सर्वांना मुलीसमोर हे सांगतात. त्यामुळे किंवा इतर कारणांनी ही सातवीत शिकणारी मुलगी हे प्रकार करत होती, हे समोर आले. मुलगी खूपच चंचल आहे. आई व आजोबाची नजर चुकवून ती हे सर्व करत होती. यामध्ये सुरुवातीला मुलीच्या आईचा गाऊन जळाला. नंतर मुलीचे डोक्याचे केस झोपेत कापले गेले. शिक्षिकेचा मोबाईल हरवला, त्याचा संशय मुलीच्या मामावर घेण्यात आला. वाद होऊन त्यांना दुसरीकडे राहायला जावे लागले. मुलीने काही वेळात मोबाईल गच्चीत सापडला, असे सांगून आणून दिला. मुलीच्या आजोबांचा बुवाबाजीवर विश्वास असल्याने ते एका बाबाकडे गेले, बाबाने रक्षा दिली व दिवा लावा व इतर गोष्टी सांगून 10 हजार रुपये उकळले. घरात वेगवेगळ्या ठिकाणी दिवे लावायचे व ते लगेचच विझत असत. दिवा विझणे हा अपशकुन समजला जातो. त्यामुळे ते घाबरून गेले. दरम्यानच्या काळात 10 हजारांचा प्रिंटर जाळला गेला, हँगरला लावलेले कपडे जळू लागले. वार्तापत्राच्या वाचक सरोज इंगळे या त्यांच्या मैत्रीण असल्याने त्यांनी ही घटना त्यांना सांगितली व मदत मागितली. संजय बारी यांनी त्यांना समितीची कार्यपद्धत सांगून त्यांचा विनंती अर्ज घेऊन राज्य सरचिटणीस मिलिंद देशमुख यांना देऊन येण्याची विनंती केली.
ही सर्व माहिती 18 ऑक्टोबर, 2020 रोजी त्यांनी दिली. सर्व घटनाक्रम सांगितला. मुलीने माहिती देताना घटना रंगवून सांगितल्या व तिचा या सर्वांशी कसा संबंध नाही, हे सांगण्याचा प्रयत्न केला. हे सर्व झाल्यावर मुलगी व आई घरी गेली. आई बाथरूममध्ये गेली असता दाराला लावलेला पडदा जळाला. या प्रकाराने ते फारच घाबरून गेले व मॅडमनी फोन करून त्वरित येण्याची विनंती केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मिलिंद देशमुख, श्रीराम नलावडे, स्वाती बारी व संजय बारी लगेचच तेथे पोचले. त्यांना धीर दिला व सर्वांच्या स्वतंत्र मुलाखती घेतल्या. त्यावेळी मुलीकडून सर्व माहिती काढून घेतली व तिला सांगतले, ‘आम्हाला समजले आहे हे सर्व कोण करत आहे. त्यामुळे हे सर्व बंद व्हायला पाहिजे, नाहीतर पोलीस येतील तुला घेऊन जातील व तू इथे नसताना हे प्रकार घडले नाही, तर तुझे नाव येणार.’ तसेच अशा प्रकाराने कोणाचा जीव जाऊ शकतो. हे सर्व मुलीच्या लक्षात आणून दिले असता, यापुढे असे होणार नाही, असे तिने सांगितले. मुलीच्या आईलापण मुलीसमोर कुणाला दत्तक घेतल्याचे बोलू नका व काळजी करू नका, असा दिलासा देऊन इतर गोष्टी मिलिंद देशमुख यांनी सांगितल्या.
यानंतर 21 व 22 ऑक्टोबरला वस्तू हरवण्याच्या घटना सुरू झाल्या. संबंधित शिक्षिकेचे शाळेचे ओळखपत्र हरवले, सर्वदूर शोधाशोध करून झाल्यावर मुलीने कॉटखालून काढून दिले. दुसर्या दिवशी लायसन्स मिळत नव्हते, शोधाशोध करून मॅडम शाळेत गेल्या, तासाभराने मुलीला घरातच सापडले. मग आजोबा व नातीने रिक्षाने पोचवले. अशा रीतीने भानामतीचे स्वरूप बदलून मानसिक व आर्थिक त्रास सुरूच होता. हा सर्व प्रकार सांगितल्यावर 23 ऑक्टोबरला मिलिंद देशमुख, श्रीराम नलावडे, संजय बारी, अंजली देशमुख व सायली देशमुख सकाळीच त्यांच्याकडे पोचले. सायली देशमुख या शिक्षिका असल्याने त्यांनी मुलीचे व आईचे समुपदेशन केले. त्याचा चांगला परिणाम होऊन भानामती पळून गेली. अशा प्रकारे शहरी भागातही हे प्रकार घडत आहेत व सुशिक्षित नागरिक बळी पडत आहेत.
लेखक संपर्क – 94202 57075