राहुल थोरात -
“पशुबळी देऊ नका, सण–समारंभावर वायफळ खर्च करू नका!” – सम्राट अशोक यांचा शिलालेख (धौली, भुवनेश्वर)
दोन हजार वर्षांपूर्वी सम्राट अशोकांनी ओरिसातील एका शिलालेखावर आपल्या जनतेला हा संदेश दिला होता; परंतु अजूनही जनता या कर्मकांडात अडकली आहे.
कलिंगा युद्धानंतर सम्राट अशोकाने दिलेल्या या लोकोपयोगी संदेशाचा प्रसार/प्रचार करण्याचे काम ओरिसातील काही विवेकवादी मंडळी आजही करीत आहेत.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वाचकांना ओडिशा (ओरिसा) राज्यातील विवेकवादी संघटना, अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करणारे कार्यकर्ते आणि या कामाला साथ देणारे काही शासकीय अधिकार्यांचा परिचय करून देण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात आणि ‘अंनिस’चे राज्य कार्यकारिणी सदस्य अण्णा कडलास्कर यांनी दि. १२ ते १९ ऑक्टोबर २०२२ दरम्यान आठवडाभराचा ओरिसा दौरा केला. या दौर्यातील अनुभवावर आधारित हा स्पेशल रिपोर्ताज…
ओरिसातील विवेकवादी चळवळ
ह्युमॅनिस्ट रॅशनॅलिस्ट ऑर्गनायझेशन (H.R.O.) चे संस्थापक-अध्यक्ष प्रोफेसर धनेश्वर साहू हे गेली ४० वर्षे ओरिसामध्ये विवेकवादी विचार रुजवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या संघटनेच्या २० शाखा राज्यभरात सध्या कार्यरत आहेत. त्यांनी आमच्या ओरिसा दौर्याचे नियोजन केले होते. १२ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजता आम्ही भुवनेश्वरला पोचलो. तेव्हा आमचे स्वागत करण्यासाठी विधानभवन परिसरातील रबींद्र मंडप या नाट्यगृहाजवळ सत्तरी पार झालेले एच.आर.ओ.चे भुवनेश्वर जिल्हाध्यक्ष मोहम्मद सुकूर भरपावसात आले होते. त्यांनीच आमची राहण्याची सोय ओरिसा विधानभवन परिसरातील माजी आमदार निवासस्थानी केली होती.
१३ ऑक्टोबरला दुपारी ४ वाजता प्रोफेसर धनेश्वर साहू, मोहम्मद सुकूर आणि राकेश कांगो हे आम्हाला भेटायला आमदार निवासस्थानी आले. सोबत येताना ओरिसातील प्रसिद्ध मिठाई ‘छेना पोडा’ देऊन त्यांनी आमचे गोड स्वागत केले. त्यांच्याकडून ओरिसातील विवेकवादी चळवळीचे काम, संघर्ष जाणून घेण्याची उत्सुकता आम्हाला लागली होती, म्हणून अण्णा कडलास्कर यांनी प्रोफेसर धनेश्वर साहूंना बोलते केले…
“तुमच्या एच.आर.ओ. संघटनेचा मुख्य उद्देश काय आहे”, असे विचारल्यावर प्रो. साहू म्हणाले की, “र्कीारपळीीं ठरींळेपरश्रळीीं जीसरपळूरींळेप, जवळीहर’ (मानवतावादी विवेकवादी संघटना) या संस्थेच्या नावातच आमच्या कामाचा उद्देश स्पष्ट समजतो. आम्ही आमच्या संघटनेची पाच प्रमुख ध्येये ठरवली आहेत – १) वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी मानवता, चिकित्सक वृत्तीसाठी लोकसंवाद. २) समाजातील अंधश्रद्धा, सामाजिक भेदाभेद नष्ट करणे. ३) इतरांचा जगण्याचा हक्क मान्य करून त्यांचा आदर करणे. ४) पुस्तके, मासिके यांच्या माध्यमातून आपल्या विवेकवादी विचारांचा प्रसार करणे. ५) संवाद शिबिरे, जाहीर कार्यक्रम आयोजित करून मानवतावाद आणि विवेकवादाच्या अंगाने जनतेचे प्रबोधन करणे. ”
विवेकवादी कार्यकर्त्यांशी संवाद
“या विवेकवादी विचारांकडे कसे वळलात”, असे राहुल थोरात यांनी विचारल्यानंतर ७३ वर्षीय प्रो. साहू म्हणाले की, “तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक म्हणून काम करत असताना मला या विवेकवादी विचारांनी मोहीत केले. माझ्यामध्ये विवेकवादी विचार बालपणी रुजवण्यामध्ये महाराष्ट्रातील ज्येष्ठ सर्वोदयी विनोबा भावे यांचा मोठा वाटा आहे. त्याचे असे झाले की, भूदान चळवळीसाठी आचार्य विनोबा भावे हे देशभर फिरत असताना १९६४ मध्ये ओरिसामध्ये आले. धेंकनाल जिल्ह्यातील आमच्या भूबन गावी विनोबांची ‘भूदान यात्रा’ आली. तेव्हा मी नववीमध्ये होतो. या यात्रेतील कार्यकर्त्यांसाठी आम्ही लहान मुलांनी गावभर फिरून भोजन गोळा केले. सर्वांना एकत्र बसवून गाववाल्यांनी जेवण वाढले. विनोबाही हेच जेवण जेवत होते. त्यावेळी आमच्या गावातील दलितांची नेहमीप्रमाणे वेगळी पंगत एका बाजूला दूरवर बसवली होती. हे दृश्य विनोबांनी पाहिले आणि दलितांना आपल्या जवळ जेवणासाठी बसवले. विनोबांच्या या कृत्याने गाव आश्चर्यचकित झाले. त्यावेळी विनोबांनी आमच्या गाववाल्यांना ‘आपण सर्व ईश्वराची लेकरे आहोत, असा भेदभाव माणसामाणसांमध्ये करू नका,’ असा प्रेमाचा उपदेश केला. त्यावेळी आमच्या गावातील दलितांनी विनोबांकडे एक तक्रार केली की, ‘गावातील सवर्ण भातगिरणी मालक आमचा भात त्यांच्या गिरणीतून भरडून देत नाहीत.’ तेव्हा विनोबांनी गिरणी मालकांना असे न करण्याविषयी बजावले; मात्र विनोबांची ‘भूदान यात्रा’ पुढे गेल्यावर दलितांचा तांदूळ भरडून देण्यास गावातील गिरणी मालकांनी नकार दिला. तेव्हा मी गावातील काही ज्येष्ठ ‘सर्वोदयी’ कार्यकर्त्यांना एकत्र करून गिरणी मालकांना समजावून सांगितले; मात्र ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. तेव्हा मी दलितांना पोलिस स्टेशनला घेऊन जाऊन त्यांच्या विरोधात तक्रार करण्याची धमकी दिली, तेव्हा कुठे गावातील पाच गिरणी मालकांनी दलितांना तांदूळ भरडण्यासाठी आठवड्यातील एक दिवस ठरवला.”
या प्रसंगानंतर धनेश्वर साहू हळूहळू मानवतावादी विचारांकडे वळले. शिक्षण घेत असताना त्यांना तत्त्वज्ञान या विषयामध्ये गोडी वाटली. त्यातूनच ते पुढे याच विषयाचे प्राध्यापक झाले.
१९८० मध्ये गोरा यांनी विजयवाडा (आंध्र प्रदेश) येथे स्थापलेल्या नास्तिक केंद्रात एच. नरसिंहा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या दुसर्या जागतिक मानवतावादी परिषदेस उपस्थिती लावली. या परिषदेमध्ये त्यांची अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रणेते बी. प्रेमानंद यांच्याशी ओळख झाली. प्रो. साहू यांनी ओरिसा राज्यामध्ये बी. प्रेमानंदांचे दौरे आयोजित करण्यास सुरुवात केली. त्यावेळी बी. प्रेमानंद हे चमत्काराचे अनेक प्रयोग सादर करायचे. या दौर्यानंतर साहू यांनी आपल्या गावामध्ये समविचारी मित्रांना एकत्र करून ‘रॅशनॅलिस्ट असोसिएशन’ची स्थापना केली. आपल्या गावामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार रुजावा म्हणून ‘मानवतावाद संवाद परिषद’ घेतली. मग त्यांनी या विचारांचा राज्यव्यापी प्रचार-प्रसार करायचे ठरविले. ओरिसा राज्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्र ‘समाज’मधून या विषयावर अनेक लेख लिहून त्यांनी विवेकी विचारांची प्रबोधन मोहीम सुरू केली. त्यांच्या या लेखांचे विषय चमत्कार आणि विज्ञान, अंधश्रद्धा, जुन्या रुढी-परंपरेवर प्रहार, जातीवरून भेदाभेद, मानवतावादी विचारांची तोंडओळख, पाश्चात्य विचारवंतांचा परिचय असे असायचे. ओरिया भाषेमध्ये ‘हेतूवादी चिंतन’ हे त्रैमासिक सुरू केले. त्याचे ते संपादक आहेत. त्याचबरोबर त्यांनी काही महत्त्वपूर्ण पुस्तके लिहिली, त्यामधील ‘कुसंस्कारविरोधी संग्रामी व्यक्तिमत्त्व : अब्राहम कोवूर’ हे ओरिया भाषेतील पुस्तक. या पुस्तकाचा पुढे इंग्रजी अनुवाद केरळच्या ‘मैत्री प्रकाशन’ने प्रसिद्ध केला. कोवूरांची सविस्तर माहिती असलेले हे पुस्तक देशभर प्रचंड गाजले. आजही ते देशभरातील विवेकवादी कार्यकर्त्यांच्या संग्रही असते.
प्रो. धनेश्वर साहू यांनी एच.आर.ओ.च्या माध्यमातून एक रुपयात ‘सर्वधर्मीय सहभोजन’ हा अभिनव उपक्रम राबविला. जातिअंताचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होण्यासाठी त्यांनी अनेक आंतरजातीय/आंतरधर्मीय लग्ने पुरोहिताविना, हुंडा न घेता पार पाडली. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर एच.आर.ओ. च्या वतीने भुवनेश्वर येथे मोठे निदर्शन आंदोलन केले होते. यामध्ये ओरिसामधील विवेकवादी, प्रागतिक विचारांचे साहित्यिक, कवी सहभागी झाले होते. याचीही आठवण प्रो. साहूंनी आम्हाला करून दिली.
प्रो. साहूंचे अनेक वर्षांपासूनचे सहकारी आणि एच.आर.ओ.चे भुवनेश्वर जिल्हाध्यक्ष मोहम्मद सुकूर यांच्याशी आम्ही संवाद साधला, तेव्हा ते म्हणाले की, “मी एका कर्मठ मुस्लिम कुटुंबात वाढलो. एका शाळेमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून काम करताना मला विज्ञानाची गोडी लागली. प्रो. साहूंचे वर्तमानपत्रातील लेख वाचून मला मानवतावादी विचार आवडायला लागला. कंधमाल जिल्ह्यातील आमच्या गावात सार्वजनिक भोजनाचा कार्यक्रम असला की, आदिवासी कुटुंबांना शेवटी भोजन देण्याचा प्रघात मी प्रखर विरोध करून मोडून काढला. स्वत: आणि कुटुंबात कोणतेही धार्मिक कर्मकांड आजपर्यंत केले नाही. मला लांबूनच लोक ‘अधर्मी’ म्हणून बोलवतात; मात्र मी त्याकडे दुर्लक्ष करून हसत-हसत त्यांच्याशी तर्कवादी संवाद करतो. मी स्वत:ला नास्तिक वा क्रांतिकारी मानत नाही, तर ‘परिवर्तनवादी’ म्हणवून घेतो. ‘लोक टीका करतात म्हणून आपण आपला विचार सोडून दिला, तर हे काम कसे पुढे चालणार,’ असे म्हणत ‘मी हे व्रत आयुष्यभरासाठी स्वीकारले आहे, ते माझ्या मरणानंतर संपेल,” असा दुर्दम्य आशावाद मोहम्मद सुकूर यांनी आमच्याकडे व्यक्त केला.
डाव्या विचारांनी प्रभावित असलेला एक गोरा-गोमटा तरुण कार्यकर्ता राकेश कांगो हाही आम्हाला भेटायला आला होता. राकेशला उत्तम हिंदी बोलता येत असल्यामुळे त्याने आमच्यासाठी दुभाषीची भूमिका उत्तम प्रकारे निभावली. कॉ. गोविंद पानसरे यांची त्याने आठवण काढली.
“ओडिया समाजामध्ये कोणत्या कुप्रथा आजही सुरू आहेत,” असे आम्ही विचारल्यानंतर कॉ. राकेश सांगू लागला, “कबूतर, कोंबडा, बकरा आणि म्हैस यांचा बळी आजही अनेक गावांत जाहीरपणे दिला जातो. याशिवाय मृत्युभोजवर प्रचंड खर्च आजही केला जातो. एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर गावाभोवतालच्या तीन गावांतील ब्राह्मणांना बोलावून त्यांना सुग्रास ‘ब्रह्मभोजन’ दिले जाते. या भोजनाला कोणाचाही स्पर्श होऊ नये, म्हणून स्वत: ब्राह्मणच शिजवतात. त्यांना आपल्याला कोरडा शिधा द्यावा लागतो. ब्रह्मभोजनानंतर बाकी सर्वांच्या पंगती बसतात. त्यावेळी उपस्थित सर्व ब्राह्मणांना ५१ ते ५०१ रुपये अशी दक्षिणा आणि लाल गमछा द्यावा लागतो. या सर्वांमुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना किमान ५० ते ६० हजारांचा आर्थिक भुर्दंड बसतो. या ब्रह्मभोजनाविरोधात आमचे विवेकवादी कार्यकर्ते लोकांचे प्रबोधन करतात; मात्र त्यांचे प्रयत्न तोकडे पडतात.”
‘कार्यकर्ता’ अधिकारी गंगाधर साहू
आमची चर्चा सुरू असतानाच ओरिसा सरकारमधील ज्येष्ठ सनदी अधिकारी गंगाधरन साहू हे आम्हाला भेटायला आले. २०१० च्या बॅचचे आय. ए. एस. अधिकारी असलेले गंगाधरन साहू हे सध्या ओरिसा सरकारच्या राज्य सार्वजनिक तक्रार निवारण आयोगाचे कमिशनर आहेत. यापूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी, विविध विभागांचे सेक्रेटरी म्हणून काम पाहिले आहे.
“या विवेकवादी विचाराकडे कसे वळलात,” असे आम्ही विचारल्यावर गंगाधरन सर म्हणाले की, “धेंकनाल जिल्ह्यातील एका ग्रामीण कुटुंबात माझा जन्म झाला. लहानपणी आई सांगते म्हणून पूजापाठ करायचो. आमच्याकडे लहान मुलांना विद्येची देवता सरस्वतीपूजेचा उपवास पकडायला सांगतात. हा उपवास अत्यंत कडक पकडायचा असतो. उपवासादरम्यान लाळही गिळायची नसते, असा दंडक असतो. मला हा उपवास आईने एकदा पकडायला सांगितला होता, तेव्हा मला लाळ न गिळणे शक्य व्हायचे नाही. त्यानंतर परीक्षेत मला कमी मार्क मिळाले. त्यावेळी माझ्या बालबुद्धीमध्ये असा विचार आला की, मी उपवास नीट न पकडल्यामुळे सरस्वतीदेवी माझ्यावर नाराज होऊन मला कमी मार्क मिळाले. काही काळानंतर माझ्या मनात चिकित्सक विचार यायला लागले. दगडाचा देव कोंबड्या – बकर्यांचे मांस खाऊन कसा प्रसन्न होतो? तसेच हा देव अगरबत्तीचा धूर खाऊनही कसा प्रसन्न होतो? एकदा आमच्या गावात म्हैस बळी दिल्याचे पाहिल्यानंतर मला त्याचे खूप वाईट वाटून मी बेचैन झालो. शाळेमध्ये मी १५ दिवस वेड्यासारखा वागत होतो. माझ्या चेहर्यासमोर त्या म्हशीचे किंचाळणे, रक्तमांसाचा चिखल नेहमी दिसायचा.”
गंगाधरन सर पुढे सांगू लागले की, “त्या काळात आमच्या घरात छुआछूत प्रथा कडक पाळली जात असे. माझे जवळचे प्रेमळ मित्र हे दलितच जास्त असत. त्यांच्या घरी एकदा मी जेवण करून आलो, हे आईला समजल्यावर ती माझ्यावर प्रचंड रागावली. मला आंघोळ घालून माझे सर्व कपडे घरावर फेकून द्यायला लावले, याचे मला खूप वाईट वाटले. या प्रसंगानंतर मी विचार करू लागलो की, माझ्यावर प्रेम करणार्या माझ्या प्रिय मित्रांचा स्पर्श कसा काय वाईट असेल? मला एका दलित शिक्षकाने मुलगा मानून खूप मार्गदर्शन केले. त्यांच्यामुळेच मला स्पर्धा परीक्षा देण्याची प्रेरणा मिळाली आणि त्यात मी यशस्वीही झालो. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मी खूप वाचन केले. भारतातील समाजसुधारक, त्यांच्या चळवळी, परदेशातील विचारवंत, त्यांचे विचार यांच्या वाचनाने मी पूर्णपणे बदलून गेलो. त्यानंतर विवेकवादी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते प्रो. धनेश्वर साहू यांची भेट झाल्यानंतर मला या कार्यामध्ये सहभागी व्हावेसे वाटले. मी त्यांच्या संघटनेच्या अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावतो. त्यांना जमेल ती मदत करतो.”
“तुम्ही एवढे उच्चपदस्थ सनदी अधिकारी असूनही अशा परिवर्तनवादी संघटनेमध्ये काम करता, याचा कधी तुम्हाला त्रास होतो का,” असे आम्ही विचारल्यावर गंगाधरन सरांनी हसत-हसत उत्तर दिले, ‘होतो की! पण मी त्याकडे साफ दुर्लक्ष करतो. एकदा मी राज्याच्या शिक्षण विभागाचा संचालक असताना मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणारे विविध चांगले उपक्रम सुरू केले. पण काही प्रतिगामी शक्तींनी माझी तक्रार शासनाकडे केली, तेव्हा शासनाने माझी बदली दुसर्या विभागात केली. विवेकवादी विचार हा माणसाला प्रगत करणारा आहे, या विचारांचा प्रसार करणे हा काही गुन्हा नाही. तेव्हा शासकीय नोकरी सांभाळत मी या विचारांचा प्रसार करण्यासाठी ‘हेतू ग्यान’ या नावाने यू-ट्यूब चॅनेल सुरू केले आहे. चमत्कार आणि विज्ञान, फसवे वास्तुशास्त्र, ज्योतिषांची पोलखोल, खगोल विज्ञानाची माहिती यावर माझे व्हिडिओ ‘अपलोड’ करीत असतो. तसेच ओरिसामधील दोन वर्तमानपत्रांमध्ये या विचारांचे कॉलम चालवतो. माझ्या या ‘हेतू ग्यान’ यू-ट्यूब चॅनेलची लिंक — https://youtube/UlEtcZALBUM अशी आहे.’ एवढा मोठा उच्चपदस्थ अधिकारी विवेकवादी चळवळीमध्ये साधा कार्यकर्ता म्हणून निर्भीडपणे काम करतो, याचे आम्हाला आश्चर्य आणि कौतुक वाटले. ‘महाराष्ट्र अंनिस’ आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याविषयी त्यांना सविस्तर माहिती आहे, हे ऐकून आम्हाला आनंद झाला.
दहा हजार आंतरजातीय विवाह लावणारे रामचंद्रन
या चर्चेनंतर प्रो. साहू यांनी आम्हाला भुवनेश्वर शहरातील धर्मविहार परिसरात राहणार्या आणि ज्यांना ओरिसाचे व्हॉल्टेअर म्हणून ओळखले जाते, अशा बी. रामचंद्रन यांच्या घरी नेले. त्यांच्या तीन मजली घरावर ‘AMOFOI’ (Anticaste Marriage And One Child Family Organization Of India) अशी भलीमोठी पाटी लावली होती. घरामध्ये प्रवेश करताच एका पूर्णवेळ चळवळ्या कार्यकर्त्याचे हे घर आहे, हे ओळखायला वेळ लागला नाही. घराच्या तळमजल्यावर ‘AMOFOI’ (अमोफॉई) चे कार्यालय थाटले होते. या कार्यालयाच्या भिंतीवर जगभरातले विचारवंत जसे की, थॉमस पेन, व्हॉल्टेअर, रसेल, नेल्सन मंडेला, जॉन लेनन यांच्यासह देशभरातील सुधारक पेरियार, राजाराम मोहन राय, महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ. आंबेडकर यांचे सोबत डॉ. नरेंद्र दाभोलकर, प्रा. एम. एम. कलबुर्गी आणि बॅ. नाथ पै यांच्याही तस्बिरी लावल्या आहेत. बॅ. नाथ पै यांचे ते पूर्वीपासून चाहते आहेत. तसेच आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाहासंबंधी समाजोपयोगी ऐतिहासिक निकाल देणार्या सर्वोच्च न्यायालयांच्या न्यायमूर्तींचे फोटो आणि केसचे संदर्भही लावले आहेत. विवाहांची तारीख आणि संख्या दाखविणारा बोर्डही तेथे लावला आहे.
बी. रामचंद्रन आणि त्यांच्या पत्नी स्वप्ना यांनी त्यांचे आयुष्य आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाहासाठी वाहून घेतले आहे. त्यांनी त्यांचा विवाहही ‘पैठा’ (जानवे) तोडून आंतरजातीय केला आहे. राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केलेल्या ७५ वर्षीय रामचंद्रन यांनी १० डिसेंबर १९८० ला पहिले आंतरजातीय लग्न आपल्या संस्थेच्या वतीने लावले. तेव्हापासून आजपर्यंत आंतरजातीय लग्नांचा धूमधडाका सुरूच आहे.
दाभोलकरांच्या प्रतिमेस साक्ष ठेवून विवाह
तुम्हाला आश्चर्य वाटेल की, कालपर्यंत (१३ ऑक्टोबर २०२२) रामचंद्रन यांनी तब्बल ९८९४ आंतरजातीय/आंतरधर्मीय लग्ने लावली आहेत. सध्या ही आंतरजातीय लग्ने ते डॉ. नरेंद्र दाभोलकर, एम. एम. कलबुर्गी यांच्या फोटोला साक्ष ठेवून लावतात. डॉ. दाभोलकरांचा केवढा हा गौरव! या सर्व विवाहांच्या रेकॉर्डनी, फोटो अल्बमनी त्यांचे तीन मजली घर भरले आहे. त्यांच्याकडे येणार्या जोडप्यांची ते योग्य ती कायदेशीर माहिती तपासून घेतात. त्यानंतर विवाहाची तारीख ठरते. मुला-मुलींचे जवळचे दोन नातेवाईक किंवा मित्र साक्षीदार म्हणून घेतले जातात. सर्वांची वयाची व इतर माहिती साक्षांकित केली जाते. रामचंद्र पती-पत्नी हे जोडप्यांना शपथ देऊन विवाह लावतात. जोडपी एकमेकांच्या गळ्यात पुष्पहार घालून विवाहबद्ध होतात. त्यानंतर त्यांचा एकत्रित फोटो काढला जातो. विवाहानंतर संस्थेच्या रजिस्टरवर वधूवरांच्या व साक्षीदारांच्या सह्या घेतल्या जातात. त्यानंतर त्यांना संस्थेचे विवाह प्रमाणपत्र दिले जाते. त्यांच्याकडून एकच अपत्य जन्माला घालणार, असे प्रतिज्ञापत्र घेतले जाते.
प्रो. रामचंद्र यांनी अनेक विषयांवर पुस्तके, ग्रंथ लिहिले आहेत. ते ग्रंथ विवाहित जोडप्यांना भेट दिले जातात. त्यांनी लिहिलेले १९ व्या शतकातील प्रसिध्द विचारवंत ‘चार्ल्स ब्रॅडलाफ’ यांचे इंग्रजी चरित्रपरिचय पुस्तक डॉ. नरेंद्र दाभोलकरांना अर्पण केले आहे. त्यांनी त्यांचे तीनमजली घर संस्थेच्या या कार्यासाठी दिले आहे. घरातील प्रत्येक रूममध्ये पुस्तकांचे ढीग, विवाहांची रजिस्टर, कागदपत्रे, फोटो अल्बम यांचा प्रचंड पसारा दिसतो.
“अशी आंतरजातीय लग्ने लावून तुम्ही डॉ. आंबेडकरांचे कार्य पुढे नेता; पण त्याला विरोध होतो का?” असे आम्ही विचारल्यानंतर रामचंद्रन म्हणाले की, “होतो की. काही नाराज पालक घरी येऊन मला शिवीगाळ करतात. मात्र मी पोलिसांना फोन करतो म्हटले की, पळून जातात. पण ओरिसामध्ये आंतरजातीय विवाहाला म्हणावा तेवढा विरोध होत नाही, ही एक जमेची बाजू आहे; परंतु एका नाराज पालकाने मुलीची जन्मतारीख खोटी दाखवून माझ्यावर हायकोर्टात केस टाकली. हायकोर्टाने आमच्या संस्थेला दोन लाख रुपयांचा दंड केला, तेव्हा या विरोधात आम्ही दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयात अपील केले. तेथे ९ वर्षे केस चालली आणि सर्वोच्च न्यायालयाने आम्हास निर्दोष सोडले. असे वाईट अनुभवही कधी-कधी येत असतात; पण माझी आता पक्की अशी खात्री झाली आहे की, समाजातील जातव्यवस्था मोडून काढण्यासाठी फक्त आंतरजातीय विवाह हेच हत्यार सध्या आपल्याकडे उपलब्ध आहे. आजतरी यापेक्षा प्रभावी मार्ग आपल्यापुढे नाही. तेव्हा या कार्यास मी माझे आयुष्य वाहून घेतले आहे.” मुलाखतीनंतर रामचंद्र यांनी या विवाहांची सर्व माहिती असणारा ८२० पानी जाडजूड इंग्रजी ग्रंथ आम्हाला भेट दिला. सध्या रामचंद्रन यांनी ‘लीव्ह इन रिलेशनशिप’ (सहमतीने सहजीवन) या पद्धतीनेही विवाह लावण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये विवाहेच्छुक दोघांकडून एक सामंजस्य करार करून घेतला जातो आणि त्यांचा ‘लीव्ह इन’ विवाह लावला जातो. आजपर्यंत त्यांनी १०९ जोडप्यांचे असे विवाह लावले आहेत. त्यांच्या या सविस्तर कार्यावर लिहिण्यासाठी एक स्वतंत्र लेख लिहावा लागेल. त्यांचे हे अफाट कार्य पाहून आम्ही थक्क झालो. या कार्यासाठी ओरिसामधील विवेकवादी कार्यकर्त्यांनी त्यांची पद्म पुरस्कारासाठी केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे. प्रो. रामचंद्रन यांच्या या अफाट कार्याला ‘ग्रेट सॅल्यूट’ करत आम्ही त्यांचा निरोप घेतला.
बेहरमपूर शाखा भेट
प्रो. साहूंनी आम्हाला सांगितले की, “आमच्या एच.आर.ओ. संघटनेची गंजाम जिल्ह्यातील बेहरमपूर शाखा ही खूप क्रियाशील आहे. या शाखेला तुम्ही आवर्जून भेट द्या. तेथे ई. टी. राव हे काम करतात. ते सध्या ‘फिरा’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत.”
दुसर्या दिवशी भुवनेश्वरहून आमचा प्रवास आंध्र प्रदेशच्या बॉर्डरजवळ असणार्या बेहरमपूर गावाकडे सुरू झाला. साडेचार तासांच्या रेल्वे प्रवासानंतर बेहरमपूर रेल्वे स्टेशनला उतरलो. तेथे आम्हाला न्यायला राव सरांनी स्कूल व्हॅन पाठवली होती. या गाडीने आम्ही थेट ‘रलाब’ गावी पोचलो. तेथे राव सरांनी पाच एकरांमध्ये अतिशय सुंदर असे ‘संकल्प’ नावाचे सी.बी.एस.ई. स्कूल सुरू केले आहे. या शाळेत सध्या ६०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेचा परिसर अतिशय देखणा होता. तेथील गर्द झाडी पाहून मन प्रसन्न झाले. या शाळेच्या गेस्ट हाऊसमध्ये आमची निवास व्यवस्था केली होती. या शाळेमध्ये कोणतेही धार्मिक कार्यक्रम, सकाळची प्रार्थना होत नाही, अशी माहिती आम्हाला मुख्याध्यापकांकडून मिळाली.
आम्ही खास भेटायला आलोय म्हणून राव सरांनी बेहरमपूरमधील त्यांच्या सर्व सहकार्यांना शाळेमध्ये बोलावून घेतले. शाळेच्या मीटिंग हॉलमध्ये आमची चर्चा सुरू झाली. या मीटिंगमध्ये गंजाम जिल्ह्यातील ज्येष्ठ विवेकवादी कार्यकर्ते के. एन. सेनापती, डी. मोहन राव, ई. टी. राव, एन. सुरेश असे कार्यकर्ते सहभागी झाले होते. ई. टी. राव हे ‘महाराष्ट्र अंनिस’च्या अनेक कार्यक्रमांना आले असल्याने त्यांना ‘अंनिस’च्या कामाचा जवळून परिचय होता.
क्रियाशील कार्यकर्ते दिवंगत राजा सुरेश
बेहरमपूर येथील एक क्रियाशील कार्यकर्ते राजा सुरेश हे देखील ‘महाराष्ट्र अंनिस’च्या अनेक कार्यक्रमांना येत. परदेशी शिक्षण घेतलेले “राजा सुरेश हे धडाडीने काम करणारे ओरिसातील एक महत्त्वाचे कार्यकर्ते होते. त्यांचे नुकतेच कोरोनाने निधन झाले, हे समजले. राजा सुरेश यांना ‘महाराष्ट्र अंनिस’प्रमाणे ओरिसामध्ये त्यांच्या विवेकवादी संघटनेची रचना करायची होती. त्यासाठी त्यांनी प्रयत्नही सुरू केले होते. त्यांचा जनसंपर्कही दांडगा होता. ते अत्यंत प्रभावीपणे व्याख्याने देत. ‘महाराष्ट्र अंनिस’मध्ये जसे वेगवेगळे राज्य विभाग आहेत, तसे विभाग त्यांना त्यांच्या संघटनेमध्ये उभे करायचे होते”, अशी आठवण त्यांचे जवळचे सहकारी के. एन. सेनापती हे आम्हाला भावूक होऊन सांगत होते. सेनापती हे बेहरमपूर शाखेचे स्थापनेपासूनचे अध्यक्ष आहेत. त्यांनी आणि राजा सुरेश यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतर त्याच दिवशी रात्री बेहरमपूर शहरामध्ये प्रचंड मोठा ‘कँडल मार्च’ काढून या खुनाचा तीव्र निषेध व्यक्त केला होता. ‘महाराष्ट्र अंनिस’प्रमाणे राजा सुरेश यांनी स्वत:कडील एक लाख रुपये डिपॉझिट करून चमत्कार सिद्ध करणार्यांना जाहीर आव्हान ठेवले होते.
हेतूवादी प्रकाशन
एच.आर.ओ. या संघटनेच्या हेतूवादी प्रकाशनाचे काम बेहरमपूर शाखाच सांभाळते. वर्षाला साधारण दोन लाखांची पुस्तक विक्री होते. हेतूवादी प्रकाशनाच्या वतीने आतापर्यंत त्यांनी चमत्कार रहस्य, हेतूवादी विचार, तर्कशील चिंतन, मासिक पाळीच्या अंधश्रद्धा, स्त्रिया आणि व्रतवैकल्ये, वाल्मिकी नायक, हमारो वैज्ञानिक (लहान मुलांसाठी), मूर्तिपूजेची तार्किक समीक्षा, अशी पुस्तके प्रकाशित केली आहेत.
ई. टी. राव सर त्यांच्या कार्याविषयी माहिती देताना म्हणाले, “आमची बेहरमपूर शाखा दरमहा मीटिंग घेऊन कामकाज चालवते, याच शाखेच्या वतीने विजयवाडा येथील नास्तिक केंद्राचे विजय लवणम्, बी. प्रेमानंद यांचा दौरा आयोजित केला होता. २०१४ मध्ये आमच्या संकल्प स्कूलमध्ये ‘फिरा’ची ९ वी देशव्यापी कॉन्फरन्स आमच्या शाखेने आयोजित केली होती. आम्ही मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरे आयोजित करतो. बेहरमपूर शाखेने मागील वर्षी शक्तीनगरमध्ये १३०० चौरस फुटांची भगतसिंग लायब्ररी बांधली आहे.” त्यांच्या लायब्ररीला भेट देऊन आम्ही राजा सुरेश यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
संकल्प स्कूलमध्ये ई. टी. राव सरांनी विद्यार्थ्यांसाठी अण्णा कडलास्कर यांचा चमत्कार सादरीकरणाचा कार्यक्रम ठेवला. अण्णा चमत्कार सादरीकरणाचे काही थोडे साहित्य सोबत घेऊन आला होता. अण्णाने इंग्रजी आणि हिंदीमधून अत्यंत दमदार कार्यक्रम सादर केला. मुलांना प्रचंड हसवले. अण्णाच्या या चमत्कार सादरीकरणाच्या कार्यक्रमाने तेथे उपस्थित असलेले एच.आर.ओ.चे कार्यकर्ते भारावून गेले. राव सरांनी अण्णाला त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी चमत्कार प्रशिक्षण कार्यशाळा घेण्याविषयी विनंती केली. ‘महाराष्ट्रातून दोन कार्यकर्ते तुम्हाला चमत्कार शिकविण्यासाठी पाठवू,’ असे आश्वासन देऊन आम्ही त्यांचा निरोप घेतला. निरोप घेताना ई. टी. राव सरांनी आम्हाला ओरिसातील अंधश्रद्धा निर्मूलनासाठी लागणारे एक प्रसिद्ध कार्यकर्ते देबेंद्र सुतार यांची भेट घेण्याची विनंती केली. कटक येथे राहणारे सुतार यांच्याशी राव यांनी संपर्क साधून आमच्या भेटीचे नियोजन केले. मोहन राव हे आम्हाला निरोप देण्यासाठी रेल्वे स्टेशनला आले. रेल्वेमध्ये आम्हाला बसवूनच ते माघारी फिरले.
कटकमधील लढवय्ये देबेंद्र सुतार
बेहरमपूरहून पाच तासांचा रेल्वे प्रवास जनरल डब्यातून करून आम्ही संध्याकाळी दहा वाजता कटक रेल्वे स्टेशनला पोचलो. तेथून रिक्षाने सरळ देबेंद्र सुतार यांच्या घरी पोचलो. पन्नासवर्षीय देबेंद्र सुतार हे ओरिसा रॅशनॅलिस्ट सोसायटी (ज.ठ.ड.) या संघटनेचे राज्य सेक्रेटरी आहेत. ते गेली २५ वर्षे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करतात. त्यांनी आमचे हसतमुखाने स्वागत केले. माध्यमिक शिक्षिका असलेल्या त्यांच्या पत्नी सौ. सुतार यांनी चविष्ट मांसाहारी जेवण दिले. “दुसर्या दिवशी सकाळी आपण सविस्तर चर्चा करू,” असे म्हणून झोपी गेलो. सकाळी लवकर उठल्यानंतर देबेंद्र सुतार यांच्याशी संवाद साधला. ते सांगत होते…
“ओरिसा रॅशनॅलिस्ट सोसायटी ही ओरिसातील आणखी एक विवेकवादी संघटना आहे. ती गेली २५ वर्षे कार्यरत आहे. सोसायटीच्या १५ सदस्यांच्या राज्य कमिटीची बैठक दरमहा होते. त्यांच्या संघटनेच्या वतीने ‘वैज्ञानिक चर्चा’ या नावाने एक त्रैमासिक निघते.” त्याचे संपादक देबेंद्र सुतार हेच आहेत. त्याच्या दोन हजार प्रती काढल्या जातात. राज्यातील त्यांच्या तीस केंद्रांना त्या पाठवल्या जातात. ५० रुपयांप्रमाणे त्याची विक्री केली जाते. त्यांच्या संघटनेच्या वतीने आतापर्यंत ४५ विषयांची पुस्तके प्रकाशित केली आहेत. १० रुपये किमतीच्या पुस्तकांना मोठी मागणी असते. ‘शिवाजी कोण होता?’ हे कॉ. गोविंद पानसरे यांचे पुस्तकही त्यांनी ओडिया भाषेत प्रकाशित केले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे चरित्र ओडिया भाषेत प्रकाशित करायची त्यांची तीव्र इच्छा आहे.‘त्यासाठी तुम्ही आम्हाला इंग्रजीमधून साहित्य पुरवा,’ असा आग्रह त्यांनी आमच्याकडे केला. त्यांना याबाबत ‘महाराष्ट्र अंनिस’ नक्की सहकार्य करेल, असे आश्वासन आम्ही दिले. आतापर्यंत ओरिसामध्ये भेटलेले सर्व विवेकवादी कार्यकर्ते हे लेखन, प्रबोधन या अंगाने काम करत आहेत, असे दिसले; पण कटक येथील देबेंद्र सुतार हे रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे पहिलेच कार्यकर्ते आम्हाला ओरिसामध्ये भेटले.
ओरिसामध्ये प्रचलित असलेल्या चेटकीण प्रथेविरोधात देबेंद्र सुतार यांचा संघर्ष नेहमी सुरू असतो. राज्यात कोठेही चेटकीण बळीची घटना घडली की, ते लगेच तेथे भेट देतात. पोलीस आणि प्रशासन यांच्या मागे लागून गुन्हा नोंद करतात. आतापर्यंत त्यांनी राज्यातील दहा वर्षांचा चेटकीण प्रथेचा संपूर्ण डाटा संग्रही करून त्यावर साडेतीनशे पानी पुस्तक लिहिले आहे.
राज्यात कोठेही चमत्कारांचे प्रकार घडले की, देबेंद्र सुतार तेथे प्रत्यक्ष जाऊन त्याचा भांडाफोड करतात. अंधश्रद्धा, धर्मांधता या विषयावरील टी. व्ही. डिबेटमध्ये त्यांना बोलावले जाते. त्यांनी अनेक सामाजिक विषयांवर हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केल्या आहेत. चेटकीण प्रथेविरोधातील त्यांच्या एका याचिकेमुळेच सरकारला चेटकीण प्रतिबंधक कायदा करणे भाग पडले. राज्यातील बर्याच सरकारी जमिनीवर काही मंदिरांनी, बुवा-बाबांनी अतिक्रमण केले आहे. मोठ्या प्रमाणात सरकारी जमिनी लुटल्या आहेत. या सर्वांची सविस्तर माहिती काढून सुतार यांनी कटक हायकोर्टात एक याचिका दाखल केली. सरकारी जमिनीवरील हे धार्मिक अतिक्रमण काढून टाकावे, अशी मागणी त्या याचिकेत केली. या याचिकेमुळे त्यांना प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले. एका मोठ्या बुवाने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तेव्हा काही काळ ओरिसा पोलिसांनी त्यांना पोलीस संरक्षण दिले. ‘महाराष्ट्र अंनिस’चे काम पाहण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र दौरा करा,’ असे निमंत्रण आम्ही देबेंद्र सुतार यांना देऊन त्यांचा निरोप घेतला.
दुसर्या दिवशी सकाळी कटकहून एक तासाचा बसचा प्रवास करून आम्ही भुवनेश्वरला पोचलो. बस स्टॉपवर आम्हाला रिसिव्ह करायला ओरिसा रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे राज्याध्यक्ष प्रो. डॉ. प्रताप रथ हे स्वत: कार घेऊन आले होते. डॉ. रथ गेली ३० वर्षे विवेकवादी चळवळीत काम करतात. ते भुवनेश्वरच्या उत्कल युनिव्हर्सिटीमध्ये मानसशास्त्र विभागाचे प्रमुख होते. त्यांनी तेथे ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती अभ्यासवर्ग’ सुरू केला होता.
मानसशास्त्र आणि अंधश्रद्धा यांचा परस्परसंबंध असल्याने त्यांनी मानसशास्त्र विभागाच्या वतीने या विषयावर अनेक परिसंवाद, चर्चा आयोजित केल्या होत्या. सध्या ते मानसिक आजार, नैराश्य, लैंगिक समस्या यावर मोफत समुपदेशन करतात. त्यांची भुवनेश्वर येथे मतिमंद मुलांची एक शाळाही आहे. मतिमंद मुलांच्या कौशल्य विकासासाठी ते प्रशिक्षण वर्ग चालवितात. ही शाळा त्यांनी आम्हाला फिरून दाखविली. “मतिमंद मुलांसाठी काम करणे हे देवाच्या कामापेक्षा मोठे आहे,” अशी भावना त्यावेळी प्रो. रथ यांनी व्यक्त केली. नास्तिकवादाचा पुरस्कार करणार्या प्रो. प्रताप रथ यांनी विवेकवाद्यांनी संघटितपणे काम करायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कोणाच्या भावना दुखावतील, कोणीतरी नाराज होईल, म्हणून आपण नेहमी समन्वयाची भूमिका घेतो, त्यामुळे मूलतत्त्ववाद्यांचे फावते, अशी खंत प्रो. रथ यांनी व्यक्त केली.
त्यानंतर दुपारी एच.आर.ओ.च्या राज्य सेक्रेटरी बसंती आचार्य मॅडम यांनी घडेश्वर हायस्कूल येथे अण्णा कडलास्कर यांचा चमत्कार सादरीकरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. येथेही अण्णांनी अत्यंत सुंदर कार्यक्रम सादर केला.
लेखक संपर्क:
राहुल थोरात मो. ९४२२४ ११८६२
अण्णा कडलास्कर मो.९२७०० २०६२१