पारध्यांची जातपंचायत

संतोष पवार -

लेखकाचे मनोगत आणि पुस्तक प्रकाशित करण्यामागील भूमिका :

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे लिहायला व बोलायला शिकलो. त्यांच्यामुळेच माझ्यातला माणूस बंड करून उठला. गुलामी माणसाला नपुंसक बनवते. गुलामीला थारा न देता, एक स्वाभिमानी भीमसैनिक, सच्चा आंबेडकरवादी म्हणून जीवन जगण्यात मला स्वारस्य आहे. खूप दिवसांपासून मनात घोळत असलेला नवा विषय घेऊन माझ्या प्रिय वाचक वर्गापुढे पुन्हा आलो आहे. ‘पारध्यांची जातपंचायत’ हा विषय पारध्यांतील अनिष्ठ रूढी, परंपरा, चालीरितीरिवाज, असंविधानिक जातपंचायतीसारखा अनिष्ट स्वयंघोषित माणसांनी निर्माण केलेला कायदा, यावर प्रखरपणे लिहावे असे वाटले, म्हणून अवघ्या तीन महिन्यांतच पारध्यांची जातपंचायत जन्माला आली. पारध्यांची जातपंचायत मी स्वतः पाहिली, माणसावर लादलेला हा अनिष्ट व असंविधानिक, स्वयंघोषित कायदा होय. हा स्वयंघोषित कायदा मूठभर, ऐतखाऊ, दारुड्या व स्वयंघोषित पंचांनी आपल्याच माणसांचे शोषण करण्यासाठी निर्माण केला. असे स्वयंघोषित पंच जसे पारध्यात दिसतात तसेच भटक्या विमुक्त समाजातील लोकांमध्येही आहेत. हे स्वयंघोषित अंगठेबहाद्दूर, पंच एखाद्या ढेकणासारखे आपल्याच समाजातील माणसांचे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण करीत आहेत. माझ्या बापाच्या बोटाला धरून मीही अनेक जातपंचायती डोळ्याने पाहिल्या आहेत. काही मूठभर माणसं आपल्याच माणसाचे प्रचंड शोषण करताना पाहून त्यावेळी मला खूप संताप वाटायचा. त्याच्या अज्ञानपणाची व अडाणीपणाची कीव वाटायची. तो अघोरी प्रकार बघून या पृथ्वीवर जन्माला यायच्या अगोदर आईच्या उदरात हा समाज मेला का नाही? असे वाटायचे. या जातपंचायतीतून पुरुषांचे शोषण तर व्हायचेच; पण स्त्रिया, आठ-दहा वर्षांच्या कोवळ्या पोरी यांचेही शारीरिक, मानसिक, आर्थिक शोषण केले जायचे. ते आजही काही जिल्ह्यात केले जाते.

अशा जातपंचायतीला कायद्याचा आधार नसतो, म्हणूनच काही अडाणी माणसं एकत्र जमून अशा स्वयंघोषित कायद्याला खतपाणी घालतात. आदिवासी पारधी समाजात शिक्षणाचा अभाव असला तरीही शिकले-सवरलेले पांढरपेशे वर्गातले पारधीसुद्धा अशा जातपंचायतीला, अंधश्रद्धेला, रूढीपरंपरेला, रितीरिवाजाला पुढे होऊन खतपाणी घालत आहेत. कोणताही समाज फक्त शिकला म्हणून पुढे जात नाही. शिक्षणाने माणसात बदल जरूर होतो; परंतु त्याचे विचार जर कमरेखालचे असतील तर तो शिकून तहसीलदार झाला काय किंवा कलेक्टर झाला काय त्याचा त्यालाही फायदा होत नाही. जोपर्यंत उच्चशिक्षित माणसाचे विचार विकसित होणार नाहीत, तोपर्यंत अशा जातपंचायतीसारख्या अनिष्ठ रूढीला महत्त्व राहणार आहे.

मी लहान असताना फेटेवाले आणि टोपीवाल्याची जातपंचायत बघितली. आता तर सुटाबुटातले, उच्चशिक्षित स्वयंघोषित विचारवंत आपल्या पुढाकारात जातपंचायतीला, अनिष्ट रूढी-परंपरेला खतपाणी घालून वाढवत आहेत. एका बाजूला आदिवासी पारधी समाजाचा, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकास झाला पाहिजे म्हणून ओरडायचे आणि दुसर्‍या बाजूला त्याच समाजाचे, त्याच माणसाकडून आर्थिक, मानसिक, सामाजिक, शारीरिक शोषण होताना मी पाहिले आहे. त्याचा मी स्वतः साक्षीदार आहे. एखाद्या समाजातील पुढारलेली माणसंच अशा घाणेरड्या विचाराला खतपाणी घालत असतील तर त्या समाजाची अवस्था काय होईल? याचा विचारही करवत नाही. ज्या नेल्सन मंडेला यांनी काळ्या माणसाच्या शोषणाविरुद्ध जगात बंड केले, त्या महापुरुषाचे तोंडभरून कौतुक करणार्‍या माझ्या देशातील पुढारलेल्या माणसाकडून आपल्याच माणसाचे शोषण करताना पाहून, अशा माणसांची मलाच लाज वाटते. ज्या विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हजारो वर्षांपासून दलित, आदिवासी माणसांच्या शोषणाविरुद्ध इथल्या धर्माच्या ठेकेदारांविरुद्ध प्रचंड बंड करून दलित, आदिवासी समाजाला एक शोषणमुक्त समाज निर्माण केला. तेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिवंत असते तर आपल्याच समाजातील आपल्याच माणसाकडून होणारे शोषण पाहून त्यांनाही अशा समाजाची व माणसांची लाज नक्कीच वाटली असती.

पारध्यांच्या अनिष्ट रूढी, अंधश्रद्धा यावर बरंच लिहिल्यानंतर या समाजातील अघोरी जातपंचायतीविरुद्ध लिखाण करावे म्हणून माझे आजवरचे जातपंचायतीचे पाहिलेले अनुभव मी जशास तसे लिहून काढले आहेत. काही चुका झाल्या असतील तर वाचकवर्गाने मला माफ करावे. मला माहीत आहे की, ‘पारध्यांची जातपंचायत’ या पुस्तकात पारध्यांच्या स्वयंघोषित नेत्यांची, जातपंचायतीच्या प्रमुखांची बिनापाण्याची केली आहे. त्यामुळे या लोकांकडून मला शारीरिक, मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. त्या शक्यतेला न जुमानता हे सातवे पुस्तकरूपी पुष्प आपल्या हाती सोपवत आहे. यातील सर्व प्रसंग माझ्या अनुभवातील बोल आहेत, यात तिळमात्रही शंका नाही. अशा जातपंचायती म्हणजे भारतीय संविधानाला एक आव्हान आहे. जातपंचायतीवाल्यांचे हे बेकायदेशीर कृत्य वेळीच ठेचून काढले नाही तर, भारतीय संविधानाला महत्त्व उरणार नाही. भारतीय संविधान हाच संपूर्ण देशातला कायदा आहे, धर्मग्रंथ आहे. अशा जातपंचायतीसारख्या पावसातल्या उकिरड्यावर उगवून येणार्‍या छत्र्या संविधानाला घातक आहेत. शासनाने केवळ तोंडावर बोट ठेवून वागू नये. शासन जर या स्वयंघोषित जातपंचायतीचा बिमोड करीत नसेल तर, देशात अशा बेकायदेशीर जातपंचायतींना भरती येईल आणि एक दिवस सारा समाज वाहून जाईल, याचा शासनाने आणि समाजाने गांभीर्याने विचार करावा, नाहीतर आपल्याच डोळ्यांनी आपलेच घर जळताना आपल्याला बघावे लागेल. सूज्ञवाचक, बुद्धिजीवी, मीमांसक माझ्या मोडक्या तोडक्या विचाराला मोठ्या मनाने स्वीकारतील अशी आशा करतो.

या दुसर्‍या आवृत्तीसाठी अनेक दानदात्यांनी मनापासून सहकार्य केले. त्यात मा. प्राचार्य विजय पाटील भंडारा, मा. डॉ. संजय वाणे भंडारा, मा. पुरण लोणारे भंडारा, मा. सुशांत बन्सोडे, तहसीलदार भंडारा. मा. सतीशकुमार मेश्राम, इंजि. महावितरण विभाग, भंडारा. मा. डॉ. अनिल ढवळे, मुंबई. मा. हेमंत चांदेवार, पोलीस निरीक्षक, भंडारा. मा. डी. एफ. कोचे, राष्ट्रीय अध्यक्ष, समता सैनिक दल, भंडारा. मा. वंदना लोणे भंडारा, मा. नरेंद्र बन्सोडे भंडारा, इंजि. प्रभाकर भोयर भंडारा, प्रा. संजय खडसे, उपविभागीय अधिकारी, अकोला यांच्यामुळे ही सुधारित आवृत्ती काढू शकलो, यांचा मी मनापासून आभारी आहे.

‘पारध्यांची जातपंचायत’ याची ही सुधारित आवृत्ती आहे. वाचकांच्या प्रचंड मागणीमुळे दुसरी आवृत्ती आपल्या हाती देताना खूप आनंद वाटत आहे. माझ्या लेखनाला असाच प्रतिसाद मिळावा ही आपल्या सर्वांकडून अपेक्षा करतो.

जयभीम.

संतोष पवार (चोरटाकार)

संपादक, साप्ताहिक धम्मक्रांती, भंडारा.

मो. ७०३०९९६१५९


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]