मठाच्या तथाकथित औषधाची तपासणी करावी! – कोल्हापूर अंनिसची मागणी

अनिल चव्हाण - 9764147483

कोल्हापूर जिल्ह्यातील एक मठाधिपती आपण देखील ‘इम्युनिटी’ वाढविणारे औषध शोधले असल्याचा दावा करतात. पाण्याच्या बाटलीत त्यांच्या औषधाचे थेंब घालतात आणि पिण्यासाठी देतात. या औषधाने खरोखरच ‘इम्युनिटी’ वाढते काय? या औषधाला ‘ड्रग्स अँड रेमिडिटी अ‍ॅक्ट’प्रमाणे मान्यता आहे काय? हे पाणी आणि थेंब शरीराला हानिकारक नाही, याची तपासणी झाली आहे काय? असे औषध वाटण्यास शासनाने परवानगी दिली आहे काय?

या औषधाला ‘आयसीएमआर’ (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) किंवा ‘डब्ल्यूएचओ’ने मान्यता दिलेली आहे का? काही ठिकाणी शासकीय कर्मचारी शासकीय वेळेमध्ये नोकरीचा भाग म्हणून असे थेंब वाटत आहेत.

कोरोनाच्या काळामध्ये कोणीही बुवा अशा तर्‍हेने औषधे वाटू लागला आणि शासकीय यंत्रणा त्याला मदत करू लागली, तर जनतेला हा शासकीय कार्यक्रम आहे, असे वाटते. हे लोक विश्वास ठेवून आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढली, अशा भ्रमात राहतील आणि कोरोनाविरोधात योग्य काळजी घेणार नाहीत. कोरोनाचा प्रसार वाढेल, याला जबाबदार कोण?

लोक कोरोनाशिवाय इतर रोगांनीही आजारी पडतात. हे औषध सर्व रोगांवर रामबाण उपाय आहे का? असे एखादे औषध सर्व रोगांवर लागू पडत नाही. अतिश्रमाने भोवळ आली तर साखर-पाणी घेतल्याने तरतरी येते; पण डायबेटिस असेल तर तेच विष ठरते. न तपासलेले औषध देणे म्हणजे आरोग्याशी खेळणे होय.

भारतीय संविधानाने 51 (क) (ज) या कलमानुसार वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणे, त्याचा प्रचार करणे हे प्रत्येक नागरिकाला कर्तव्य सांगितले आहे. शासकीय अधिकार्‍यांनाही ते लागू आहे. शासकीय अधिकार्‍यांनी औषधाची वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासणी केली आहे काय?

खरा प्रकार काय आहे? याचा जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व आरोग्य अधिकारी यांनी खुलासा करावा, अन्यथा त्यांच्यावर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जाईल. असे पत्रक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे अनिल चव्हाण, सीमाताई पाटील, विनायक चव्हाण, सतीशचंद्र कांबळे, गजानन विभूते, सुनीता अमृतसागर, रमेश वडणगेकर, गीता हसूरकर आदींनी काढले आहे.