सिमरन फारुक गवंडी -
शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंदराव पानसरे अण्णा, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन याची चर्चा आम्ही अगदी लहानपणापासून आमच्या घरात ऐकत आम्ही दोघी बहिणी मोठ्या झालो. या चर्चेत तुम्हीच जगापेक्षा वेगळे आणि भारी आहात का? हा प्रश्न आम्ही नेहमी पप्पांना विचारायचो. पण काही काळ गेल्यानंतर पप्पा करायचे तोच विचार योग्य होता. याची जाणीव व्हायची. पप्पा नेहमीच ‘लाइन ऑफ थिंकिंग’ हा शब्द वापरतात. बर्याच वर्षाने त्याचा अर्थ आम्हाला कळला. पण तो पूर्णपणे कळाला असा आमचा दावा नाही.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि अनेक पुरोगामी चळवळींचे कार्यकर्ते नेहमी आमच्या घरी येत असतात. विशेषतः डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अनेक वेळा आमच्या घरी मुक्काम केला आहे. चमत्कार, भूतबाधा, करणी, भानामती अशा अवैज्ञानिक कल्पनेच्या आहारी जाऊन अनेक बुवाबाजींच्या प्रकरणात फसलेल्या लोकांना मदत करणे, त्यांचे प्रबोधन करणे, साधी केसांची निगा न राखल्याने स्त्रियांना येणारी जट ही त्यांच्या दुःखाचे कारण बनते. ही जट सोडवून स्त्रियांना दुःखातून मुक्त करणे. ही कामे पप्पा करीत असल्याचे कळल्यापासून आम्हाला र्िीेीव फील होते. ‘मी जे काही आहे अंनिस चळवळीमुळेच आहे!’ हे पप्पांचे वाक्य आम्हाला थोडी चळवळ समजण्यासाठी उपयोगी पडते. पण तुम्हीपण चळवळीत या. वाचन करा. हे सांगणे आम्हाला आचरणात आणता येत नाही.
आमच्या घरी मोठी पुस्तकांची लायब्ररी आहे. मिरजेत नवीन घर बांधताना बाकी घराची व्यवस्था मम्मीकडे होती. पण पुस्तके ठेवण्यासाठीच्या पप्पांच्या व्यवस्थेबाबत आमचा काहीही हस्तक्षेप चालला नाही. माझा इंजिनियरिंगचा डिप्लोमा पूर्ण झाल्यावर माझे काही मित्र-मैत्रिणी नोकरीसाठी पुण्यात जाणार होते. मी पण ही कल्पना पप्पांना सांगितल्यावर त्यांनी साप धुडकावून लावली आणि मला व माझी लहान बहीण सानियाला दोघींना समोर बसवून स्पष्ट सांगितले की, आपल्या घराचे नाव ‘सत्यशोधक’ आहे. हे नाव महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या बहुजन समाजाला शिक्षित, स्वाभिमानी आणि विवेकी करणार्या चळवळीचे नाव आहे. या आपल्या ‘सत्यशोधक’ मध्ये कमीत कमी पदवीपर्यंत शिक्षण हे कंपलसरी आहे. त्यामुळे तुम्हाला कमीत कमी पदवी पूर्ण करावीच लागेल. मग तुम्ही जास्तीत जास्त कितीही शिकू शकता. त्यामुळे मी इंजिनियरिंगमध्ये बी.टेक. पूर्ण केले. माझी लहान बहीण सानिया सध्या डेंटलचे वैद्यकीय शिक्षण घेत आहे.
पप्पांच्या विचारानेच आम्हाला खूप स्वातंत्र्य दिले आहे. कधीही मम्मी पप्पांनी आम्हाला मुली म्हणून कमीपणा दिला नाही. मुस्लिम समाजातील हिजाब, बुरखा अशा बंधनात अडकवले नाही. कोणत्याही धार्मिक कर्मकांडात गुंतवले नाही किंवा आमच्या घरात यासाठी खर्च केला जात नाही. आम्ही कधीही फटाके वाजवले नाहीत. कारण पप्पांचे फटाकेमुक्त दिवाळीचे व्याख्यान अनेकदा आमच्या शाळेतच होत असे. पप्पांनी आम्हाला जाती धर्माच्या पलिकडे विचार करायला लावला. मित्र मैत्रीणी करताना हा विचार आम्हाला शिवत नाही. बकरी ईदसारख्या सणाबाबतीत आमची घरात चर्चा होते. पण कुर्बानी का करायची नाही. याची सविस्तर चर्चा होऊन, ती कधीच आमच्यात गेली गेली नाही. उलट ईद दिवशी मित्र मैत्रिणींना शिरखुर्मा आणि बिर्याणी खाण्यासाठी बोलवा, हा आग्रह पप्पांचा असतो आणि आई सर्व करून वाढते.
स्त्री-पुरुष समानताबाबत चर्चेमध्ये पप्पांचे उत्तर मजेशीर असते आणि ती त्यांची पळवाट पण असते. म्हणजे घरातील कामे पुरुषांनी केली पाहिजे, हे मला तत्त्वत: मान्य आहे. पण ते कधीच घरातील कामे करीत नाहीत. अर्थात बाहेरच्या सर्व जबाबदार्या ते अतिशय सक्षमपणे पार पाडतात. आमची वेगवेगळी शैक्षणिक कागदपत्रे आणि कामकाजापासून ते सर्वच व्यवहारापर्यंत ते करत असतात. आईला किंवा आम्हाला कधीही पप्पांनी मारहाण केलेली आम्ही बघितली नाही. रागवण्यापुरता त्यांचा राग मर्यादित असतो.
पप्पा महावितरणमध्ये अभियंता असल्याने त्यांच्या कामाचा व्याप खूप असतो तसेच ते सातत्त्याने अंनिसच्या कामानिमित्त बाहेर असल्याने आमचा अभ्यास मम्मीनेच घेतला आहे. माझ्या लग्नाचा विचार चालू झाल्यानंतर मला स्पष्टपणे जोडीदार निवडला आहेस का? याची माहिती दोघांनी घेतली. त्यांनी जाती धर्मापलीकडे योग्य जोडीदाराची निवड करायचे स्वातंत्र्य हे खरोखरच आजच्या काळात विशेष आहे. घराचे नाव ‘सत्यशोधक’ असणे, आम्ही बुरखा, हिसाब न वापरणे, घरात एकच फोटो, तो पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा असणे, ही अडचण माझ्या लग्नाची स्थळं बघताना सध्या अनुभवास येत आहेत. पण यावर मार्ग पप्पाच काढणार यावर आमचा पूर्ण विश्वास आहे.
पंधरा वर्षांपूर्वी पप्पांचे हृदय रोगावर अँजिओप्लास्टी ऑपरेशन करावे लागले. पण त्यांनी यावर ज्याप्रकारे मात केली, त्यावरून गंभीर समस्येवर ती समस्या समजून घेऊन वैज्ञानिक दृष्टिकोनातून कशी मात करावी याची आम्हाला शिकवण मिळाली आहे. आम्हाला जे काही स्वातंत्र्य मिळाले आहे, जे काही समृद्ध जीवन मिळाले आहे, ते पप्पा आणि मम्मीमुळे मिळाले आहे. याबाबत पप्पांना विचारले असता “ते जे काही घडले आहेत. ते डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीमुळे घडले आहे,” असे ते नेहमी म्हणतात. आम्हीही आमच्या जीवनात याच सत्यशोधकी वाटेने चालण्याचा प्रयत्न करू.!
– सिमरन फारूक गवंडी, मिरज
DEE, B.Tech (Electrical)