प्रथमेश -
प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही गोरेगाव शाखेने महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे उभारलेल्या अंनिस पुस्तक विक्री स्टॉलला अत्यंत उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला. स्टॉलवर अंनिसची पुस्तके, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारसरणीवर आधारित साहित्य आणि वार्तापत्र विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. ५ आणि ६ डिसेंबर रोजी लावण्यात आलेल्या स्टॉलवरून एकूण ३६,००० रुपयांची विक्री झाली. यात अंनिसच्या प्रकाशन विभागाने नुकत्याच प्रकाशित केलेल्या डॉ. दाभोलकरांच्या पुस्तिका, डॉ. तारा भवाळकरांच्या संत साहित्यावरील पुस्तिका तसेच २०२५ चा वार्षिक अंक याला चांगली मागणी होती. वार्तापत्राचे १४ सदस्य झाले. तर ८ जणांनी अंनिसच्या कामात सामील होण्याची इच्छा व्यत केली. नव्याने अंनिसच्या कामात भाग घेऊ लागलेल्या जयश्री येडगे यांनी स्टॉलची संपूर्ण उभारणी केली. शैलेश सोनारे, किरण, सुखलाल पाटील, प्रतीक्षा मॅडम, सुनीता मॅडम, आशा मॅडम, ज्योती मॅडम, अमित फोंडेकर, संगीता, उमा या सर्वांनी दोन्ही दिवस स्टॉलवर उपस्थित राहून पुस्तक विक्री करणे, डिजिटल कामे, बॅनर बनविणे, अंनिस आणि अंनिसची पुस्तके याबद्दल माहिती देणे, भेट देणार्या मान्यवरांबरोबर चर्चा करणे, सर्व कार्यकर्त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करणे या सर्व कामात हिरिरीने सहभाग घेतला. शुभदा मॅडम आणि प्रभाताई यांनी नियोजन, समन्वय, संपर्क आणि संपूर्ण व्यवस्थापनात मोठा आधार दिला. प्रीती आणि सई यांनी कल्पना आणि शुभेच्छांद्वारे मनोबल वाढवण्याचे काम केले.
गणेश चिंचोले, राजीव देशपांडे, सुबोध मोरे यांचेसह अनेक मान्यवरांनी, कार्यकर्त्यांनी स्टॉलला भेट दिली. व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव यांनी सदिच्छा भेट देत स्टॉलचा एक सर्जनशील व्हिडिओ तयार केला.
एकत्र काम, शांत संयम, पुस्तकांविषयी संवाद साधण्यातील कौशल्य आणि टीमवर्क यामुळे स्टॉलचा प्रभाव व पोहोच मोठ्या प्रमाणात वाढून ५ आणि ६ डिसेंबरचा स्टॉल अत्यंत यशस्वी ठरला.
–प्रथमेश, मुंबई, गोरेगाव शाखा.
