मंत्रालय-विधानभवनाला ‘ज्योतिष मार्गदर्शन केंद्र’ बनवू नका!

-

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागानं ४ सप्टेंबर २०२६ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार मंत्रालय परिसर आणि महाराष्ट्र विधानभवन येथे प्रत्येकी एक ‘कालायन’ उपकरण बसवण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आलीय. या दोन उपकरणांसाठी १० लाख ९७ हजार ४०० रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आलाय. मंत्रालयाचं ज्योतिष मार्गदर्शन केंद्र करणारा हा शासन निर्णय तातडीने रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने करत आहे.

भारतीय ज्ञानाच्या नावाखाली खगोल विज्ञान आणि ज्योतिष यांची सरमिसळ करणारा हा निर्णय आहे. शासन निर्णयात सांगितल्याप्रमाणे केवळ वेळ दाखवणारे घड्याळ नसून यामध्ये राशी, नक्षत्रे, पंचांग अशा सर्व गोष्टींची प्रमाणवेळेशी सरमिसळ केली आहे. यामधून कुठलाही वैज्ञानिक आधार नसलेले ज्योतिष आणि खगोल विज्ञान हे एकच असल्याचा भास निर्माण केला जात आहे. ग्रहांची स्थिती, त्यांची गती, सूर्योदय-सूर्यास्त यांची अचूक गणना करणे हा खगोलशास्त्राचा विषय आहे. मात्र, ग्रह व नक्षत्रांच्या स्थितीचा आधार घेऊन एखाद्या व्यक्तीचे भविष्य, व्यक्तिमत्त्व, भाग्य किंवा जीवनातील घटना सांगता येतात, हा ज्योतिषांचा दावा वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेला नाही. त्यामुळे खगोलशास्त्रीय माहिती आणि ज्योतिषीय विश्वास यांना एकाच ‘विज्ञानाधारित’ चौकटीत मांडणे दिशाभूल करणारे आहे.

मंत्रालय हे महाराष्ट्राच्या प्रशासनाचे केंद्र आहे. विधानभवन हे लोकशाहीचे सर्वोच्च संस्थात्मक व्यासपीठ आहे. या ठिकाणी शासनाने अशा उपकरणाला अधिकृत स्थान देणे म्हणजे अप्रत्यक्षपणे ज्योतिषीय विचारांना शासकीय प्रतिष्ठा देण्यासारखे आहे. मंत्रालय हे धोरणनिर्मितीचे आणि लोकसेवेचे केंद्र असावे; ते ज्योतिष मार्गदर्शन केंद्र बनता कामा नये.

भारतीय संविधानाच्या कलम ५१(अ)(ह) नुसार नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक वृत्ती विकसित करणे हे मूलभूत कर्तव्य आहे. शासनाकडून तर या मूल्यांचे संरक्षण आणि संवर्धन अधिक गांभीर्याने अपेक्षित आहे. त्यामुळे शासकीय वास्तूंमध्ये विज्ञानाच्या नावाखाली वैज्ञानिकदृष्ट्या असिद्ध ज्योतिषीय दाव्यांना प्रतिष्ठा देणे, हे संविधानाच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या भावनेशी विसंगत आहे.

अंनिसचा भारतीय संस्कृती, पंचांग किंवा पारंपरिक कालगणनेच्या अभ्यासाला विरोध नाही. भारतीय कालगणनेचा इतिहास, प्राचीन भारतीय खगोलशास्त्रातील योगदान आणि विविध कालमापन पद्धती यांचा अभ्यास तसंच प्रदर्शन निश्चितच केलं जाऊ शकतं. परंतु त्यासाठी खगोलशास्त्र आणि ज्योतिष यांच्यातील स्पष्ट सीमारेषा कायम ठेवणं आवश्यक आहे.

शासन निर्णयातील आणखी एक बाब लक्षवेधी आहे. या उपकरणासाठी एका खासगी संस्थेने Expression of Interest (EOI) दिल्याचे आणि असे उपकरण बनविणारी ती एकमेव संस्था असल्याचे शासन निर्णयात नमूद आहे. त्यामुळे सार्वजनिक निधीतून हा खर्च करण्यापूर्वी या उपकरणाची वैज्ञानिक उपयुक्तता, शैक्षणिक मूल्य आणि शासनाच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाशी असलेली सुसंगती यांचे स्वतंत्र आणि तज्ज्ञ परीक्षण झाले आहे का, हा प्रश्न उपस्थित होतो.

अंनिसच्या प्रमुख मागण्या

१. मंत्रालय परिसर आणि महाराष्ट्र विधानभवन येथे ‘कालायन’ उपकरणे बसविण्यासाठी ४ सप्टेंबर २०२६ रोजी देण्यात आलेली प्रशासकीय मान्यता तातडीने रद्द करावी.

२. सार्वजनिक निधीतून अशा उपकरणांवर खर्च करण्यापूर्वी त्यांची स्वतंत्र वैज्ञानिक व तज्ज्ञांकडून तपासणी करावी.

३. शासनाच्या कार्यालयांमध्ये ज्योतिषीय दावे आणि वैज्ञानिक ज्ञान यांची सरमिसळ करणार्‍या उपक्रमांना अधिकृत मान्यता देऊ नये.

महाराष्ट्राने अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसारासाठी देशात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अशा महाराष्ट्राच्या मंत्रालयात विज्ञानाच्या नावाखाली ज्योतिषीय विचारांना शासकीय प्रतिष्ठा मिळणे, ही गंभीर आणि चिंताजनक बाब आहे. 

– महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

महाराष्ट्र शासनाने ‘कालायन’ यंत्र मंत्रालयात बसवण्याच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने वरील निवेदनाद्वारे केलेल्या निषेधाला संपूर्ण राज्यातून चांगला प्रतिसाद मिळाला. प्रसिद्धी माध्यमांतूनही त्यावर बरीच चर्चा झाली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकारी समितीचे सदस्य डॉ. हमीद दाभोलकर यांची या संदर्भात प्रशांत कदम यांनी त्यांच्या यू ट्यूब चॅनेलसाठी घेतलेली मुलाखत आम्ही संपादित स्वरूपात देत आहोत.

प्रशांत कदम : आपल्या मंत्रालयात ‘कालायन’ नावाचे एक डिजिटल घड्याळ बसविले जाणार आहे. आता हे कालायन यंत्र काय आहे? संगितले असे जात आहे की, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र याचा एकत्रित संगम असलेले हे एक साधं घड्याळ आहे. पण अशाच छोट्या, साध्या गोष्टींपासूनच सावध राहायला हवे. कारण त्यातूनच आपला महाराष्ट्र आज कोणत्या दिशेला जात आहे याची कल्पना येते. प्रश्न केवळ दहा लाखांचा आणि १४ घड्याळांचा नाही. ती कुठे बसविली जात आहेत, त्यातून आपण कोणता संदेश देत आहोत, कोणाला  पालकत्व देत आहोत, वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल सरकारचा अ‍ॅटिट्यूड कसा आहे, संविधानात वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं हे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य सांगितले जाते त्या संविधानाची पायमल्ली तर होत नाही ना? असे अनेक गंभीर प्रश्न निर्माण होतात. या प्रश्नांची चर्चा आपण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर यांच्याशी या कालायन यंत्राच्या निमित्ताने करणार आहोत. चर्चेची सुरुवात आपण विधानभवनाच्या प्रांगणात, मंत्रालयात बसविल्या जाणार्‍या कालायन या डिजिटल घड्याळाला तुमचा इतका कडाडून का विरोध आहे, या प्रश्नाने करू या.   

डॉ. हमीद दाभोलकर : तुम्ही जर तो जीआर वाचाल तर तुमच्या सहज लक्षात येईल की त्याच्यामध्ये ज्याला ‘अ‍ॅस्ट्रॉनॉमी’ म्हणतात ते खगोलशास्त्र आणि ज्योतिष या दोन गोष्टींची सरमिसळ केलेली आहे आणि त्याला एक गोंडस नाव दिलेले आहे ते म्हणजे भारतीय ज्ञान परंपरेचा अभ्यास म्हणून आम्ही हे तिथे लावतोय आणि पुरातत्त्व खात्याकडून ते लावले जात आहे. आता यात आक्षेपार्ह काय आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. खगोलशास्त्र हे एक अतिशय उन्नत आणि व्यवस्थित अभ्यास झालेली ज्ञान शाखा आहे, पण ज्योतिषशास्त्रामध्ये मात्र जी गृहितके धरली जातात त्यातली प्रमुख दोन-तीन गृहितके आहेत, त्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नाही. म्हणजे, कोणी जर ग्रह-तार्‍यांचा अभ्यास करत असेल तर त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. पण त्या ग्रहगोलांचा तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम पडतो आणि ते तुमचे आयुष्य घडवते, हे तुम्ही एकदा मान्य केले की मग माणसाच्या इच्छाशक्तीला त्याच्या आयुष्यात काहीच अर्थ उरत नाही. ते पूर्णपणे पराधीन आहे, कुणाच्यातरी इच्छेने चालणारी ती गोष्ट आहे असा संदेश मग त्यातून दिला जातो आणि त्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. भारतातही नाही आणि जगभरातच कुठेच नाही. पण हा विषय इथेच थांबत नाही. त्याच्या पुढे जाऊन त्यावर सोल्यूशन देणारा जो विषय आहे ज्याला ज्योतिष म्हटले जाते तिथे तो पोहोचतो. म्हणजे, ग्रहगोल, तारे तुमच्यावरती प्रभाव टाकतात इतपत मर्यादित न राहाता तुमच्या लग्नापासून ते थेट आजारापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी हे ज्योतिषी सोल्यूशन देऊ लागतात तसा दावाही करतात.

आज अनेक ठिकाणी तुम्ही बघितले तर सुरुवात ज्योतिषापासून होते… जसं खरात प्रकरणामध्ये आपण बघितले, सुरुवात ज्योतिषापासून झाली आणि पुढे ते करणी, भानामती, दैवी शक्ती वगैरे वगैरे त्याच्या मनात येईल तसे. म्हणजे माझ्याकडे दैवी शक्ती आहे असा दावा केल्याशिवाय कुणीच ज्योतिषी होऊच शकत नाही आणि ज्योतिषातला जो मूलभूत सिद्धान्त आहे की तुमची जन्मवेळ…. आता मुळात मानवी जन्मवेळे बाबतच इतकी मतभिन्नता आहे की जन्मवेळ कशाला म्हणायचे? ज्या वेळेला स्त्रीबीज आणि पुरुषबीज एक झाले त्या वेळेचा क्षण ती जन्मवेळ की त्याचे ह्रदय धडधडायाला लागले ती जन्मवेळ की डोकं बाहेर आली ती, की पाय बाहेर आले ती, की ते रडले ती जन्मवेळ? यातली कोणती जन्मवेळ धरायची याबाबतच त्यांच्यामध्ये एकवाक्यता नाही. त्यामुळे अशी गोष्ट तुम्ही मंत्रालयात बसवताय, विधिमंडळात बसवताय. याचा एक डेमॉन्स्ट्रेशन करणारा व्हिडिओ आहे. इंदूरमधला आहे. एका मोठ्या प्रदर्शनात ते यंत्र ठेवले आहे आणि तेथील भाजपचे मुख्यमंत्री तेथे गेलेले आहेत आणि त्यांच्या ताफ्यातला एक माणूस त्या डेमॉन्स्ट्रेशन देणार्‍या त्या माणसाला विचारत आहे की, माझी रास सिंह आहे आणि आता चार वाजले आहेत. सांगा पाहू माझी परिस्थिती. तर तो म्हणतो आता तुमच्या राशीत शनी आहे, मग तो माणूस म्हणतो म्हणजे आता माझे काम होणार नाही. म्हणजे, आपण हे यंत्र मंत्रालयात आणि विधिमंडळाच्या प्रांगणात लावून काय संदेश देत आहोत तर तुझे काम होत नाही याला इथले कोणीच जबाबदार नाहीत. आम्ही जे बाहेर लावलेले ग्रहमान आहे तेच याला जबाबदार आहे. आमची काहीच जबाबदारी नाही. हा सगळा जबाबदारी झटकण्याचाच प्रकार आहे. त्यासाठी प्रत्येक यंत्रामागे दहा लाख रुपये आणि यातला विरोधाभास बघा, त्यांचा प्रस्ताव दहा यंत्रांचा आहे आणि त्यातील दोन यंत्रे पायलट तत्वावरती बसवणार म्हणजे त्या यंत्रांचे भविष्यात काय होणार हे माहीत नाही, ज्या यंत्रांचेच भविष्यात काय होणार हे माहिती नाही, ते यंत्र तुम्ही लावत आहात. आणि यातील सर्वांत गंभीर भाग हा आहे, ज्या संविधानाची शपथ घेत तुम्ही कारभार करत आहात त्यात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार, प्रसार, अंगीकार करण्याचे कर्तव्य सांगितले आहे, त्यासाठी आवश्यक धोरण ठरविणारे हे सर्वोच्च केंद्र आहे. त्या ठिकाणी तुम्ही हे यंत्र लावून काय संदेश देत आहात? इथे विज्ञानाधारित पद्धतीने सामान्य माणसाचे प्रश्न सुटले पाहिजेत अशी ही जागा आहे. म्हणूनच तुम्हाला हे मंत्रालय ठेवायचे आहे की ज्योतिष मार्गदर्शन केंद्र करायचे आहे असा सवाल करत थोडी कठोर भूमिका घेत आम्ही याला विरोध करत आहोत.

प्रशांत कदम : पण हल्ली सरकारची शपथच या ज्योतिषी आणि बाबा-बुवांना व्यासपीठावर घेऊन होते. ते सरकार याला प्रतिसाद देईल?

हमीद : सध्याच्या काळात आपल्या आजूबाजूला जे घडत आहे ते बघता सरकार कितपत प्रतिसाद देईल याची मला काहीच खात्री नाही. पण डॉ. दाभोलकर नेहमी म्हणायचे,‘ ही काही दशकांची नाही तर शतकांची लढाई आहे.’ सरकारविरोधात जी काही आंदोलने, चर्चा वगैरे करायची ती आम्ही करत आलेलोच आहोत ती आम्ही करत राहूच. सरकार पण त्यासाठी उत्सुक नाहीच आहे. उलट ते अशा गोष्टींना प्रोत्साहनच देत आहे. पण लोकांचे प्रबोधन करणे हा या लढाईतला महत्त्वाचा भाग आहे. आणि जे आता पुण्यात डीजेबाबत झाले… सरकारला जरी काहीही हवे असले, तरी उद्या तुम्ही मंत्रालयात नागरिक म्हणून मंत्र्याला जाब विचारायला गेला आणि तो म्हणू लागला, तुझे ग्रह चांगले नाहीत तर मी काय करू? तर ही नागरिक म्हणून आपल्या मुळावर येणारी गोष्ट आहे, हे नागरिकांनी समजून घेतले पाहिजे. जसे पर्यावरणपूर्वक सण-उत्सव साजरे करण्यासंबंधी अंनिस २५ वर्षांपासून काम करत आहे. पूर्वी त्याला खूप विरोध व्हायचा, पण आज खूप मोठ्या प्रमाणात त्याचे वास्तव समाजातल्या लोकांना पटायला लागले आहे आणि पर्यावरणपूर्वक गणपती व्हायला लागले आहेत. डीजे विरोधात सामान्य नागरिक रस्त्यावर उतरू लागले आहेत. योग्य विचार जर तुम्ही निर्धारानं मांडत राहिला तर आज ना उद्या लोक विचार करायला लागतात आणि बदलतातही अशी धारणा घेऊन अंनिस काम करते.

प्रशांत कदम : समाजाचे सायंटिफिक टेंपर जागे असणे यासाठी खरं तर समाजातील सर्वच घटकांनी काम केले पाहिजे. सरकारी व्यवस्था तर आज अंधश्रद्धांना प्रोत्साहन देत असेल अशा वेळी माध्यमांची भूमिका…

हमीद : आज भारतातील एकही वर्तमानपत्र नाही जे ज्योतिषाच्या जाहिराती छापत नाही. का? त्यांना ज्योतिषांचा पैसा हवाहवासा वाटतो. म्हणजे, अगदी नाव घेऊन बोलायचे झाले तर एक्सप्रेस समूहापासून एकही माध्यमसमूह असा नाही की, जो ज्योतिषांच्या जाहिराती छापत नाही. इलेक्ट्रॉनिक मीडियाने तर कमरेचे सोडून डोक्यालाच बांधले आहे. काही वेळा गमतीने असे वाटते, फूड अडल्ट्रेशनसाठी एफडीएची जशी यंत्रणा आहे आणि त्यावर तुकाराम मुंडेंसारखा आय.ए.एस. अधिकारी आहे तसा या विचारातील अडल्ट्रेशनसाठीसुद्धा असाच एखादा अधिकारी नेमला पाहिजे. खरं तर यासाठी आपल्याकडे न्यायालयाचे निर्णय आहेत. औरंगाबाद हायकोर्टाने पाच वर्षांपूर्वी जादूटोणा विरोधी कायद्याचा आधार घेत माध्यमांवरती ज्या या स्वरूपाच्या जाहिराती येतात, त्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक ट्रायब्युनल नेमा, त्या संदर्भात कठोर नियम करा असा आदेश दिलेला आहे. औरंगाबाद हायकोर्टाने सुमोटो एक अमिकेस क्युरि नेमले होते. हे अलीकडील सर्व बुवा-बाबा अगदी खरातपासून ते नुकत्याच अटक झालेल्या पुण्यातील मोनिका आईपर्यंत अंधश्रद्धांचा प्रसार करण्यासाठी सोशल मीडियाचा आणि माध्यमांचाच वापर करताना आपल्याला दिसून येईल. यावर कारवाई करण्याची यंत्रणाच आपल्याकडे नाही. डिजिटल बुवाबाजी हे सध्याच्या कालखंडातील फार मोठे आव्हान आहे. या माध्यमांची अधिकृत पेजेस, त्यांच्या बातम्या, स्पेशल रिपोर्ट अंधश्रद्धा पसरविणारे असतात. लोकांनी स्वत:च्या डोक्यांनी विचार करू नये यासाठी त्यांना सतत भुलवत ठेवणारे वातावरण ही माध्यमे निर्माण करतात. कारण अशा स्वरूपाच्या वातावरणातच आजची राजसत्ता काम करू शकते. पण याचा अर्थ असा आहे की, तुम्ही विकले गेलेला आहात आणि तुम्ही लोकांची फसवणूक करत आहात. याविषयी बोलणे आवश्यक आहे आणि चांगली बाब ही आहे की, जेन झी आंदोलनानंतर लोक बोलायला लागले आहेत. जी लोकं, चॅनल ब्रॅन्डेड नाहीत त्यांची ताकद मेन स्ट्रीम मीडियाइतकी नाही अशी लोकं, चॅनल्स बोलायला लागली आहेत, ज्या प्रश्नांविषयी त्यांनी बोलायला पाहिजे त्या प्रश्नांविषयी न घाबरता ते बोलत आहेत, प्रश्न विचारत आहेत, व्हिडिओ बनवत आहेत.

प्रशांत कदम : ही चांगलीच गोष्ट आहे. पण आपण आपल्या मुद्याकडे येऊ या, महाराष्ट्र हे जादूटोणाविरोधी कायदा बनविणारे देशातील पहिले राज्य आहे आणि तेच राज्य स्वत:च्या इमारतीमध्ये जर अशा पद्धतीच्या गोष्टी करत असेल तर मुळात या कायद्याच्या अंतर्गत हा गुन्हा ठरत नाही का?

हमीद : खरं तर ठरायला पाहिजे. पण खेदाची गोष्ट अशी आहे, त्या कायद्याच्या सुरुवातीच्या ड्राफ्टमध्ये ज्योतिषाचा समावेश होता. पण अशा स्वरूपाचे समाजसुधारणेचे कायदे सहमतीच्या पद्धतीने करावेत अशी अंनिसची भूमिका कायम राहिलेली आहे. त्यामुळे ज्योतिष त्यातून काढले गेले. पण आता खरात प्रकरणानंतर आपण परत ही मागणी सातत्याने करत आहोत. ज्योतिषाचा छंद म्हणून वापर करणे, ग्रहगोल, तार्‍यांचा अभ्यास करणे ठीक आहे, पण त्याच्यावर एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यासंदर्भातील निर्णय तुम्ही कसे घेऊ शकता? एखाद्या व्यक्तीच्या भविष्यातील निर्णय घेण्यासाठी कसे सांगू शकता? हे त्या व्यक्तीला डॉक्टरच्या किंवा इतर तज्ज्ञांच्या पंक्तीत बसविण्यासारखे आहे. अशा ठिकाणी किंवा जिथे ज्योतिषापासून सुरुवात करून करणी, भानामती पर्यंत नेत थेट शोषण होते, तेथे ज्योतिष या कायद्यांतर्गत यायला पाहिजे. पण सध्याचे शासन हे करेल का नाही याची मला अजिबात खात्री नाही. मग ज्योतिष्याला कमीत कमी ग्राहक संरक्षण कायद्याखाली तरी आणा अशी आमची मागणी आहे. ज्योतिषाने फसवलं तर तक्रार कुठे करायची? बाकी सगळ्या ग्राहकांना ती सुविधा आहे, पण ज्यांचे काही शास्त्र नाही, कोणीही ज्योतिषी म्हणून काहीही जे त्याच्या मनाला येईल ते सांगू शकतात.

प्रशांत कदम : हे एक प्रकारे राजाश्रय दिल्यासारखेच आहे.

हमीद : हो, पण हे काही अचानक घडत नाही. गेली  १० -१२ वर्षे केंद्रात आणि महाराष्ट्रात जे सरकार आहे त्याच्या सर्वोच्च पदावरील व्यतीकडून प्लॅस्टिक सर्जरी, बायोलॉजिकल – नॉन बायोलॉजिकल, रडारवरचे ढग वैगेरे  अवैज्ञानिक दावे केले जातात. उत्क्रांतीवाद नाकारणे,  अभ्यासक्रमातून तो काढून टाकणे. हे पूर्वी घडत नव्हते अशातला भाग नाही. पण यांनी त्याची एक सिस्टिमच उभी केली आहे. हे त्यांचं एक प्रमुख काम झालेले आहे. धर्माच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करायची, त्याच्यामध्येच त्यांना गुंतवून ठेवायचे, दुसर्‍या धर्माचे भय दाखवायचे आणि मग आपली सत्ता राबवायची.

प्रशांत कदम : दाभोलकरांच्या खुनाला १३ वर्षे पूर्ण झाली. त्याच वेळी सचिन अंदुरेला जामीन मिळाल्याचा निकाल आला. एकीकडे दाभोलकरांचे मारेकरी सापडत नाहीत. म्हणजे, आपण त्यांना तो न्याय देऊ शकत नाही आणि दुसरीकडे त्यांच्या विचारांवरही हल्ला करण्याचे काम केले जात आहे.  

हमीद : मारेकरी सापडत नाहीत याविषयी आता इतकी वर्षे झाल्यामुळे अनेकदा काही वेळेला त्या बाबतीत गोंधळ राहतो. पण डॉ. दाभोलकरांच्या केसमध्ये कळसकर आणि अंदुरे हे दोन्ही मारेकरी सापडले आहेत. त्यांच्यावरचा गुन्हा देखील खालच्या कोर्टात सिद्ध झालेला आहे. आता त्यांना जामिनावर सोडलेले आहे. त्यांच्या मागचे सूत्रधार सापडलेले नाहीत. न्याययंत्रणेमध्ये सातत्याने जर प्रयत्न केला तर काही पावले पुढे जाता येते, हे या निमित्ताने म्हणता येईल. या दोघांच्या जामिनाच्या विरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत, पण महाराष्ट्र शासन, सीबीआय यांना त्याचे काही पडलेले नाही. ज्या तीन जणांना पुरेशा पुराव्याअभावी सोडलेले आहे, त्यांच्या विरोधात देखील सीबीआय हायकोर्टात गेलेली नाही. खुनाचा तपास करणे ही तर बेसिक गोष्ट आहे, पण तीही त्यांनी नीटशी केलेली नाही. हा तपाससुद्धा इतका इथंवर आला त्याचे कारणसुद्धा आम्ही हायकोर्टात गेलो आणि हायकोर्ट मॉनिटर करत होते म्हणून! दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश या चारही खुनांच्या चारही चार्जशीट चार वेगवेगळ्या एजन्सीजनी केलेल्या आहेत आणि या वेगवेगळ्या एजन्सीजनी परत परत हेच सांगितले आहे, हे एक दहशतवादी स्वरूपाचे कृत्य आहे आणि यामध्ये गुंतलेल्या माणसांचे एक मॉड्यूल तयार केले गेले आहे. ही संघटित गुन्हेगारी आहे, असे मी म्हणत नाही तर त्या चार्जशीटमध्ये सीबीआय, महाराष्ट्र एटीएस, कर्नाटक एसआयटीने म्हटलेले आहे. पण ना त्यांच्या केसेस चालतात, ना त्यांना शिक्षा होते आणि शिक्षा झालीच तर ते जामिनावर बाहेर येतात. त्यामध्ये चार्जशीट झालेले १८ च्या १८ लोक आज बेलवर बाहेर आहेत. अशा प्रकारची सामान्य माणसाच्या दृष्टीने अस्वस्थ करणारी परिस्थिती आज आपल्या देशामध्ये आहे.

प्रशांत कदम : दुसरीकडे आपण बघतोय याच काळात बाबा-बुवांचे प्रस्थ वाढत चालले आहे. खरात प्रकरणाने आपल्या नेत्यांबद्दल जे किळसवाणे सत्य पुढे आणलेले आहे. त्यावरून वाटते, या नेत्यांना हे करण्याची गरज काय असते? त्यांना सामान्य लॉजिकचे प्रश्नसुद्धा पडत नाहीत? त्यांना इतकी कशाची भीती वाटत असते ज्याच्यामुळे ते याच्या आहारी जातात? खरात प्रकरण तर सामान्य जनता आता विसरूनच गेलेली आहे.

हमीद : आजवर आपण समजत होतो, अंधश्रद्धा या फक्त अज्ञानातूनच निर्माण होतात आणि अज्ञान जसे कमी होईल तशा अंधश्रद्धा कमी होतील. पण सुशिक्षितांची अंधश्रद्धा ही नवीन प्रचंड मोठी बाब तयार झालेली आहे. यामध्ये डिजिटल मीडियातल्या आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींना मोठ्या प्रमाणात बळी पडणारे हे सुशिक्षित लोक आहेत आणि याचा संबंध परत वैज्ञानिक दृष्टिकोन न रुजण्याशी आहे. आपल्या शिक्षण पद्धतीत प्रश्न विचारायला शिकवलेच जात नाही. प्रश्न विचारणार्‍यालाच उद्धट समजले जाते. तीच गोष्ट आपल्या सामाजिक जीवनात. आपले सामजिक वातावरण असे की, जिथे तुम्ही प्रश्न विचाराल तर मग माझ्याच धर्माला का, तुम्ही धर्मविरोधी, देशविरोधी! या सगळ्या पद्धतीने त्या व्यक्तीलाच टार्गेट केले जाते. अशा वातावरणात प्रश्न विचारायला लोक घाबरायला लागतात. आणि त्यातूनच या सुशिक्षितांतून एक मोठी पिढी निर्माण झाली आहे, जी या बुवा-बाबांकडे जाण्यात धन्यता मानायला लागलेली आहे. आणि सोशल मीडियाच्या बूममुळे त्याचा एक विस्तृत परिणाम साधला गेला आहे.                  

प्रशांत कदम : हे थांबवता येण्यासारखे नाही?

हमीद : निश्चितच थांबवता येईल. साधा जादूटोणा विरोधी कायद्याचा प्रभावी वापर जरी केला तरी हे करता येईल. यासाठी हायकोर्टाने गाईड लाईन्स दिलेल्या आहेत, डिजिटल बुवाबाजीविरोधात हा कायदा वापरू शकता असा हायकोर्टाचा निकाल आहे. ट्रायब्युनल बनवून जादूटोणाविरोधी कायद्याचे नियम करू शकता. एवढे जरी केले तरी हे थांबू शकते. पण आज समाजालाच हे हवे आहे अशी एक धारणा आज निर्माण झाली आहे. पण असेही आहे की केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनही अनेक वेळा उपयोगी पडत नाही. त्याबरोबर अंनिसची विज्ञान, निर्भयता, नीती ही जी त्रिसूत्री आहे त्यातील निर्भयता हे सूत्र मला महत्त्वाचे वाटते. विज्ञानातून नीतीकडे जायचे तर त्याला निर्भयतेशिवाय पर्याय नाही. आणि जी आपण आता बघतोय की कॉक्रोच जनता पार्टीमधील तरुण मुला-मुलांनी, पुण्याच्या विद्यानंद बापट सारख्या काही नागरिकांनी निर्भयता दाखवली तर ज्यांनी एवढा भयाचा बुडबुडा तयार केलेला होता ते सरकार गुडघ्यावरती आलं.

प्रशांत कदम : एरव्ही या चर्चा घरामध्ये बसून दिवाणखान्यात करणारे बरेच लोक आहेत. पण तिथं महापालिकेच्या सभेत जाऊन त्या राजकीय गुंडांच्या समोर जाऊन बोलणं…

हमीद : ही निर्भयता आहे. म्हणजे ही चिकित्सक दृष्टी कदाचित अनेक जणांकडे आहे जे नंतर त्याच्याविषयी बोलायला पुढे आले, पण निर्भयता ही मला वाटतं त्याच्यातली खूप महत्त्वाची बाब आहे आणि दमन करणार्‍या लोकांच्या विरोधामध्ये नुसती चिकित्सक बुद्धी एका मर्यादेपलीकडे पुरेशी नाही. जगाच्या इतिहासात हे पुन्हा पुन्हा पुढे आलेले आहे ज्या वेळेला दमन करणार्‍या प्रवृत्ती येतात त्या वेळेला सामान्य नागरिकाला निर्भयताही दाखवायला लागते आणि ती नाही दाखवली आपण तर मग आहे ते चक्र चालू राहणार आहे. मतदारांनी समजून घ्यायला पाहिजे की आपण कुठल्याही धर्माची बाजू घेऊन आपल्याला वापरलं तर जात नाही ना? शेवटी डीजे वाजल्यावर सगळ्यांचे कान खराब होणार आहेत. जर ते ज्योतिषाचे कालयंत्र तुम्ही तिथे लावलं तर तुमची उद्याची  पिढी स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास न ठेवणारी आणि ज्योतिषाच्या आहारी जाणारी होणार आहे. तुम्ही धर्माच्या राजकारणासाठी या सगळ्या गोष्टी करू इच्छित आहे का?

प्रशांत कदम : खरं आहे. हे मला वाटतं महत्त्वाचं आहे विचार करा या निमित्ताने आता जी चर्चा होते त्याच्यामध्ये सणांच उन्मादी स्वरूप किंवा त्याच्यातून होणारे सामान्य नागरिकांना त्रास याच्याबद्दल आता किमान एक थोडासा अवेअरनेस लोकांमध्ये येतोय? आणि अंनिसने ज्या गोष्टी सांगितलेल्या होत्या त्या दिशेने हे जाताना दिसतंय?

हमीद : मला वाटतं, ही एक नक्कीच चांगली बाब आहे जसं मी पर्यावरणपूरक गणपतीच म्हणेन की, २५ वर्षांपूर्वी ज्या वेळेला कोल्हापूरच्या अंनिस शाखेने पर्यावरणपूरक गणपती चालू केला रंकाळ्यावर आणि तिथे त्यांना मारहाण झाली होती. त्याच्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी पर्यावरणपूरक गणपती केला. बहुतांश ठिकाणी त्यांना विरोध झाला होता. आज २५ वर्षांनंतर पर्यावरणपूरक गणपतीचं मूल्य म्हणजे पूर्ण प्रमाणात नसेल तरी महाराष्ट्रामध्ये एका अर्थाने स्वीकारलं गेले आहे. जी पर्यावरणपूरक गणपतीच्या विषयाची डॉ. दाभोलकरांनी केलेली जी जनहित याचिका होती, ज्याच्यावरून प्रदूषण मंडळाने हे निर्देश दिलेले आहेत. २०-२५ वर्षे लागली. परंतु हळूहळू मूल्य बदललं. जसं डीजेच्या बाबतीत लोकांना ते समजायला लागलं. आपला विरोध सण-उत्सव साजरे करण्याला नाही, फक्त ते पर्यावरणपूरक साजरे व्हावे, असा आपला आग्रह आहे. खरंतर ही धारणा नागरिकांच्या फायद्याची आहे, हे ज्या वेळेला ते विचार करायला लागतात तेव्हा त्यांना समजू लागते आणि हीच सगळ्यात महत्त्वाची शक्ती आहे आणि नागरिकांनी एकत्र येऊन ती शक्ती धुडगूस घालणार्‍या लोकांच्या विरोधात वापरली पाहिजे. कारण, धुडगूस घालणारे लोक रस्त्यावर फार पटकन एकत्र दिसतात, पण नागरिक रस्त्यावर एकत्र येत नाहीत, ते आपल्या दिवाणखान्यात राहतात. इथे निर्भयता कामी येते. या संदर्भात डॉ. दाभोलकर जयप्रकाश नारायण यांचे एक वाक्य नेहमी सांगायचे, स्वातंत्र्याची सगळ्यात मोठी किंमत सततची सजगता आहे. तुम्ही जर सततची सजगता दाखवत नसाल आणि त्या बाबतीत निर्भयपणे हस्तक्षेप करायची तुमची तयारी नसेल तर कोणीतरी तुमचं स्वातंत्र्य पळवून नेणार आहे हे नक्की.

प्रशांत कदम : करेक्ट, करेक्ट, बरोबर… ही सततची सजगता जी आहे तीच खरंतर या संपूर्ण प्रकरणामध्ये महत्त्वाची म्हणजे जिथून आपला प्रश्न सुरू झाला होता की मंत्रालयाच्या प्रांगणामध्ये अशा पद्धतीचं एक घड्याळ आणणं ही गोष्ट छोटी वाटू शकते, पण ज्या घटनाकारांनी आपल्या संविधानामध्ये ज्ञाननिष्ठा ठेवलेली आहे तर या सगळ्यात एक प्रकारे तुम्ही त्यांचाही अपमान करत आहात. या निमित्ताने प्रेक्षकांना काय सांगाल?

हमीद :  मला वाटतं की, आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रश्न विचारायला सुरुवात करायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं आहे, प्रश्न विचारणारी व्यक्ती ही आपली मित्र आहे, ती शत्रू नाहीये, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि आपल्या स्वधर्माच्या चिकित्सेपासूनच सर्व गोष्टींची सुरुवात होते. त्याच्यामुळे स्वधर्माची चिकित्सा करणारे

लोक हे आपले मित्र आहेत, ते धर्माचे मित्र आहेत हे आपण समजून घ्यायला पाहिजे. जर धर्माच्या नावावरती कोणी राजकारण करत असेल, फसवत असेल मग तो कुठलाही पक्ष असो, कुठलाही व्यक्ती असो, त्याच्या विरोधामध्ये आपण नागरिक म्हणून खंबीरपणाने उभं राहिलं पाहिजे. आपल्या दैनंदिन जीवनातला काही वेळ मला वाटतं की, आपण नागरी प्रश्नांसाठी काढून ठेवायला पाहिजे नाहीतर आज ना उद्या ते आपल्या घरामध्ये येणार आहे.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ] [ 143 ] [ 144 ]