…आणि आश्रम शाळेतील भूत पळाले…!

नंदिनी जाधव -

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) मध्यस्थीने आणि प्रबोधनाने चिखलदरा तालुक्यातील डोमा आश्रमशाळेतील कथित ‘भूतबाधे’च्या भीतीचे सावट आता दूर झाले आहे. अंनिसच्या पथकाने प्रत्यक्ष गावात जाऊन केलेल्या समुपदेशनानंतर घाबरलेल्या विद्यार्थिनी पुन्हा एकदा आत्मविश्वासाने शाळेत जाण्यास तयार झाल्या आहेत.

डोमा आश्रमशाळेतील कथित भूतबाधेचे सावट दूर; अंनिसच्या प्रबोधनानंतर मुली पुन्हा शाळेच्या वाटेवर

काही दिवसांपूर्वी अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील डोमा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत काही विद्यार्थिनींना कथित ‘भूतबाधा’ झाल्याची बातमी पसरली होती. यामुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण होऊन अनेक मुली भीतीपोटी शाळा सोडून घरी निघून गेल्या होत्या. मात्र, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) तत्पर हस्तक्षेपाने आणि तीन दिवसांच्या सातत्यपूर्ण प्रबोधन मोहिमेमुळे ही भीती दूर झाली असून विद्यार्थिनी पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात येण्यास सज्ज झाल्या आहेत.

घटनेचे गांभीर्य ओळखून १० ऑगस्ट रोजी ‘अंनिस’च्या राज्य कार्यकारिणी पदाधिकारी नंदिनी जाधव (पुणे), प्रा. प्रवीण देशमुख (मुंबई) आणि रामभाऊ डोंगरे (नागपूर) यांनी डोमा आश्रमशाळेला भेट दिली. मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचार्‍यांशी चर्चा करून संपूर्ण घटनाक्रम समजून घेतला. भुताची भीती दूर करण्यासाठी केवळ औपचारिक भेट न देता पथकाने रात्री आश्रमशाळेतच मुक्काम केला.

मास हिस्टेरिया’ आणि भयपटांचा प्रभाव –

११ ते १३ ऑगस्ट दरम्यान अंनिसच्या पथकाने एकताई, चुनखडी, पाचडोंगरी, खडीमल आणि बुटीदा या आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन मुलींच्या घरी प्रत्यक्ष संवाद साधला. या पाहणीतून पुढील महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले:

सामूहिक मानसिक प्रतिक्रिया (Mass Hysteria) :

सुरुवातीला एका मुलीला मानसिक किंवा शारीरिक त्रास झाला. तिला ‘भुताने झपाटले’ या भीतीतून इतर मुलींमध्येही भीतीची साखळी पसरली. या सामूहिक भीतीमुळे मुलींमध्ये असंबद्ध बोलणे व हातवारे करणे अशा प्रतिक्रिया दिसून आल्या.

भयपटांचा (Horror Movies) प्रभाव :

सुट्टीच्या काळात मुलींनी ‘कांचना २’ सारखे भयपट पाहिले होते. हॉस्टेलमध्येही या चित्रपटाची चर्चा झाली होती. आधीपासून असलेल्या अंधश्रद्धाळू समजुतींमुळे भयपटांमधील प्रतिमांचा मनावर खोल परिणाम झाला होता.

भूमका’(भगत) चा प्रभाव :

आदिवासी भागात आजारपण किंवा मानसिक त्रासावर डॉक्टरांकडे जाण्याऐवजी प्रथम ‘भूमका’कडे (स्थानिक भगत) जाण्याची प्रवृत्ती असल्याने अंधश्रद्धेला खतपाणी मिळते.

“मुलींच्या घरी भेट दिल्यानंतर त्या पूर्णपणे स्वस्थ आणि सामान्य स्थितीत असल्याचे दिसून आले. भुताच्या भीतीने घाबरलेल्या मुली आता मनमोकळेपणाने बोलू लागल्या असून, ‘आम्हाला पुन्हा शाळेत जायचे आहे’ अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. अंनिसने त्यांच्या मनातील भुताची भीती प्रबोधन करून दूर केली.”

पालकांचा सकारात्मक प्रतिसाद

समितीच्या संवेदनशील संवादामुळे पालकांचाही विश्वास पुन्हा संपादन करण्यात यश आले आहे. मुलींनी स्वतः आश्रमशाळेतील सुविधा, जेवण आणि शिक्षकांचे प्रेमळ वातावरण याबद्दल समाधान व्यक्त केले. पालकांनीही आपल्या मुलींना लवकरात लवकर शाळेत परत पाठवण्याचे आश्वासन दिले आहे.

सातत्यपूर्ण प्रबोधनाची गरज

“अंधश्रद्धा केवळ अज्ञानातून नव्हे, तर भीती, अफवा आणि परंपरेतून जन्म घेते. त्यामुळे केवळ ‘भूत नसते’ एवढे सांगून चालणार नाही, तर विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे सातत्याने आणि संवेदनशीलतेने प्रबोधन करणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन नंदिनी जाधव, प्रा. प्रवीण देशमुख, रामभाऊ डोंगरे (राज्य कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र अंनिस) यांनी केले.

या सगळ्या सोबत इथल्या अनेक आश्रम शाळांच्या मधल्या जेवण आणि रहाण्याच्या असंख्य असुविधा आहेत त्यामध्ये देखील तातडीने दुरुस्ती होणे आवश्यक आहे असे मत नंदिनी जाधव यांनी व्यक्त केले  भीतीच्या सावलीतून बाहेर पडून भविष्याची स्वप्ने पाहणार्‍या या मुलींच्या चेहर्‍यावर आता पुन्हा एकदा आशेचे किरण दिसू लागले असून, ओस पडलेली डोमा आश्रमशाळा पुन्हा विद्यार्थ्यांच्या गजबजाटाने फुलण्यासाठी सज्ज झाली आहे.

अधिक माहिती साठी संपर्क-

नंदिनी जाधव
+९१ ७०८३७ ३४२४४

प्रवीण देशमुख, रामभाऊ डोंगरे


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ] [ 143 ] [ 144 ]