-
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त पुण्यामध्ये १६ ऑगस्ट ते २० ऑगस्ट विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून जट प्रथा निर्मूलन छायाचित्र व बातम्यांचे प्रदर्शन दि. १६ व १७ ऑगस्ट रोजी बालगंधर्व कलादालन येथे आयोजित करण्यात आले होते.
समितीच्या कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांनी गेल्या दहा वर्षात २७६ महिलांचे जट निर्मूलन केले. निवडक साडेसातशे फोटो आणि बातम्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.
या प्रदर्शनाचे उद्घाटन अभिनेत्री गिरिजा ओक-गोडबोले यांच्याहस्ते झाले. अंधश्रद्धा निर्मूलन समिती ट्रस्ट सदस्य डॉक्टर शैला दाभोलकर या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी समिती विश्वस्त दीपक गिरमे, अरविंद पाखले, मिलिंद देशमुख, गणेश चिंचोले आदी उपस्थित होते. या प्रदर्शनामुळे समाजातील जुनाट रूढी, परंपरा आजही अस्तित्वात आहेत. याचे भान येईल असे अभिनेत्री गिरिजा ओक यांनी आपल्या भाषणात नमूद केले. प्रदर्शन अगदी बारकाईने पाहून गिरिजा ओक यांनी हे काम खूपच अवघड आहे, त्यासाठी नंदिनी जाधव यांना मनापासून सलाम अशी प्रतिक्रिया दिली.”माहितीकडून ज्ञानाकडे जाणारा मार्ग खडतर असला तरी हा विवेकाचा प्रवास आपल्या समाजाला यश देणारा असून यामध्ये प्रत्येकाने हातभार लावावा”, असे आवाहन डॉ. शैला दाभोलकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.
डॉक्टर दाभोलकर यांच्या मृत्यूनंतर पूर्ण झोकून देऊन महिलांचे जट निर्मूलन करण्याचे व्रत हाती घेण्यात आल्याचे नमूद करत गेल्या दहा वर्षांचा प्रवास नंदिनी जाधव यांनी आपल्या मनोगतातून उलगडून दाखवला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीपाल ललवाणी यांनी केले. प्रास्ताविक नंदिनी जाधव यांनी तर वसंत कदम यांनी आभार मानले. प्रदर्शनाला पुणेकरांचा भरघोस प्रतिसाद लाभला. प्रसार माध्यमांनी त्यास योग्य प्रसिद्धी दिली.