पावसाळी नक्षत्रांच्या अंधश्रद्धा

ज्ञानेश महाराव -

पावसासाठी बेडकाचं लग्न लावण्याऐवजी लोकांनी झाडं लावली पाहिजेत! पण मीडिया पावसासाठी आतुर झालेल्यांच्या माथ्यावर अंधश्रद्धेचा धोंडा ठेवताना दिसतो!

विज्ञानाने अनेक शोध लावले तरी पाऊस कधी, कुठे आणि किती पडणार, याबाबत निश्चितता नाही. परिणामी, हवामान खात्याचा ‘अंदाज’ हा बर्‍याचदा विनोदाचा विषय होतो. तथापि, हवामान खात्याची अनिश्चितता हा विज्ञानाचा दोष नाही. निसर्ग हा लहरी आहे. वातावरणात प्रत्येक क्षणाक्षणाला बदल होत असतो. या बदलांची नोंद घेत अंदाज व्यक्त करणं, हे हवामान खात्याचं काम आहे. ह्या नोंदीत थोडा जरी घोटाळा झाला, तरी हवामानाचा अंदाज चुकू शकतो. आपल्या देशात हवामान तज्ज्ञ वसंत गोवारीकर यांचा फॉर्म्युला हवामानाचा-विशेषतः पावसाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी वापरला जातो; तो शेतीसाठी उपयुक्तही ठरतो. तथापि, “या अंदाजावर पूर्णपणे अवलंबून राहू नका”, असं आवाहन करण्याची वेळ शेतकी खात्यावर वारंवार येत असते. सध्या ‘ज्येष्ठ’ अधिक मास सुरू आहे. याला गावाकडच्या भाषेत ‘धोंड्याचा महिना’ म्हणतात. जावयाला सुवर्णदान करायच्या या महिन्यात सासुरवाडीच्या माथी खर्चाचा धोंडा आढळतो. त्याचप्रमाणे हा अधिक मास पावसाअभावी शेतकर्‍यांच्या माथी ‘दुबार पेरणी’चा धोंडा हाणणार का, अशी परिस्थिती निर्माण झालीय.

             “भावाआधी बहिणीकडे पाळणा हाले” तसे यंदा ‘रोहिणी’ नक्षत्र राज्यभर बरसले. पण ‘मृगशीर्ष’ कोरडे जाईल, अशी सध्याची स्थिती आहे. ‘एल् निनो’ (El Nino) ने या वेळच्या उन्हाळ्यात अक्षरशः भाजून काढले. ‘एल् निनो’ हा (पॅसिफिक ओशन) प्रशांत महासागरातील पाण्याच्या तापमानात होणारा एक नैसर्गिक बदल आहे. यामुळे जागतिक तापमान वाढते. अनेक ठिकाणी तीव्र दुष्काळ पडतो; तर काही भागांत अतिवृष्टी व महापूर येतात. विशेष म्हणजे, वार्‍याची दिशा बदलते. प्रशांत महासागरावर नेहमी पूर्वेकडून पश्चिमेकडे वारे वाहतात. ते कमकुवत होतात. यामुळे गरम पाणी पूर्वेकडे (दक्षिण अमेरिका किनार्‍याजवळ) जमा होते. परिणामी, भारतात मान्सूनचे बाष्पयुक्त वारे मंदावतात आणि पावसाचे प्रमाण कमी होऊन अनेक भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. अमेरिकेच्या ‘क्लायमेट प्रेडिक्शन सेंटर’ च्या अंदाजानुसार, यंदाचा ‘एल् निनो’चा प्रभाव आतापर्यंतच्या नोंदणीत सर्वाधिक तीव्र होता. यामुळे २०२७ चे वर्षदेखील विक्रमी उष्णतेचे असू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. हा अथवा हवामानाचा अंदाज सांगणारं विज्ञान चुकीचं अथवा खोटं ठरत नाही. अंदाज चुकण्याचं कारणही विज्ञानच स्पष्ट करतं. यावरून विज्ञानाची उपयुक्तता आणि अपरिहार्यता समजून घ्यावी. यासाठी कृषी खात्याची भूमिका आग्रही हवी. ते त्यांचं कर्तव्य आहे. तथापि, याबाबतीत सरकारी भमिका आजवर बोटचेपीच राहिली आहे. पूर्वी “आत्याबाईच्या पाठीला घामोळं फुटलं” की, पाऊस पडतो, असे आडाखे मांडले जात. तसे ‘बेडूक-बेडकीचं लग्न’ लावून, नववधूला कडुनिंबाच्या पानांनी सजवून “धोंडी धोंडी…. पाणी दे”चा गजर केल्यानंतर पाऊस पडतो, असा समज आजही आहे. “पर्जन्य पडे अपुल्या स्वभावे| वेदावीर्य शक्ती नाही”, असे संत तुकोबांनी ठणकावून सांगितले तरी शेंड्या ताठ करून यज्ञ- यागाचा झोल- झमेला करणारे वेदमूर्ती आहेत. अशा प्रकारांना मीडियातून प्रसिद्धी दिली जाते.

या वेळी ‘मृग’ तथा ‘मृगशीर्ष’ (आकाशात हरिणाच्या शिंगासारखी ग्रह रचना असणारं) ७ ऐवजी ८ जूनला लागलं. पण महिना उलटायला आला तरी हव्या तशा सरीवर सरी आल्या नाहीत. त्या ‘धोंडी’ला आळवून, गावदेवाला बोकड बळी देऊन, शंकराच्या पिंडीला बुडवून अथवा पुराणातला ‘वरुणपुत्र मारुतीराया’ला साकडं घालून येणार नाहीत. तसंच, पाऊस कुठल्या वाहनावर बसूनही येत नाही. तथापि, धंद्यासाठी कॅलेंडरमध्ये पंचांग घुसवणार्‍यांनी वर्षभरातल्या २७ नक्षत्रांसाठी पशु-पक्ष्यांचं वाहन दिलंय. ‘नक्षत्र’ हे ‘पंचाग’च्या पाच अंगांपैकी महत्त्वाचं अंग आहे. यासाठी आकाशाचे चार विभाग कल्पून नक्षत्रपट तयार केलाय. या नक्षत्रपटात दिसणारे लहान-मोठे तारे म्हणजे नक्षत्र! चंद्राला हे विभागात्मक एक नक्षत्र ओलांडण्यासाठी एक दिवस लागतो. त्यामुळे दररोज एक वेगवेगळं नक्षत्र असतं. (चंद्र ज्या नक्षत्रात असताना व्यक्तीचा जन्म झालेला असतो, ते ज्योतिषशास्त्रानुसार त्याचं जन्म नक्षत्र ठरतं.) सूर्याला मात्र एक विभागात्मक नक्षत्र ओलांडण्यास तेरा अथवा चौदा दिवस लागतात. पंचांगानुसार, हा ‘नक्षत्र’ प्रवास पशु-पक्ष्यांच्या वाहनावरून होतो. एकूण २७ पैकी पुढील ९ नक्षत्रं पावसाची मानली जातात.

१) मृग (वाहन = बेडूक) : या नक्षत्रात चांगला आणि मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज असतो.

२) आर्द्रा (वाहन = गाढव) : या काळात पाऊस कमी पडण्याची शक्यता असते.

३) पुनर्वसू (वाहन = घोडा) : ह्याचा अर्थ, सर्वत्र चांगला पाऊस पडणे, असा होतो.

४) पुष्य (वाहन = उंदीर) : ह्या काळात मुसळधार पावसाचा अंदाज असतो.

५) आश्लेषा (वाहन = हत्ती) : उत्तम आणि समाधानकारक पावसाचा संकेत देणारे नक्षत्र.

६) मघा (वाहन = मोर) : या काळात पाऊस खंडित होऊन काही ठिकाणी जोरदार सरी बरसतात.

७) पूर्वा (वाहन : गाढव) : या नक्षत्रात बर्‍यापैकी पाऊस होतो.

८) उत्तरा (वाहन = बेडूक) : पाऊस चांगला आणि तापमानवाढीची शक्यता असते.

९) हस्त (वाहन = उंदीर ) : पावसाची उघडझाप आणि काही ठिकाणी मोठ्या सरी पडतात.

हत्ती, बेडूक, म्हैस, मोर यांना पाणी किंवा पाऊस आवडतो. त्या वाहनांच्या नक्षत्र काळात चांगला पाऊस पडतो. तर गाढव, उंदीर, कोल्हा या प्राण्यांना पाणी आवडत नाही. त्या वाहनांच्या नक्षत्र काळात पाऊस कमी पडतो किंवा हुलकावणी देणारा होतो. ‘मृग’ ते ‘हस्त’ दरम्यानच्या ९ नक्षत्रात पावसाळा असल्याने ही नक्षत्रं महत्त्वाची ठरतात. या काळात पाऊस झाला नाही किंवा अति झाला, तरी कोणतं नक्षत्र सुरू आहे; त्याचं वाहन कोणतं याची तपासणी केली जाते. ती शेती व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी  महत्त्वाची माहिती असते. हे लक्षात घेऊन ‘सहदेव भाडळी’ म्हणजे ‘रोग अनेक, इलाज एक’ सारख्या पोथ्यांची निर्मिती झाली. त्याचा पगडा भारतात बहुसंख्याक असलेल्या ग्रामीण व शेतीशी संबंधित जनतेवर आजही आहे. ‘सहदेव-भाडळी’ ही ७०० वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या ज्योतिषी भावंडांची नावं आहेत अथवा एकच जोडनाव असल्याचा समज आहे. त्यांच्या नावाच्या पोथीत, खरं तर तिथी, वार, महिना, नक्षत्रं यावरून भविष्य नाही, तर वस्तुस्थिती सांगितली आहे. परंतु त्याचं ज्योतिष्यांनी लोकांना भटीपाशात फसवण्यासाठी भविष्यकथनात रूपांतर केलंय. पावसाळ्यातील नक्षत्रांसंबंधाने ‘सहदेव भाडळी’ लिहिलंय.

मृग करी झाडाझाड, आर्द्रा न पडे कोय|
भाडळी म्हणे सहदेवजी, पृथ्वी प्रलय होय॥

अर्थात, मृग नक्षत्रात नुसताच वारा सुटला, आर्द्रा नक्षत्रात अजिबात पाऊस पडला नाही, तर मोठा दुष्काळ पडेल. तसंच –

पुनर्वसु न पडे काही, पुष्प जाय कोरडा|
भाडळी म्हणे सहदेवजी, वाळूच्या कण्या भरडा॥

म्हणजे, जर पुनर्वसू व पुष्प नक्षत्रात पाऊस पडला नाही, तर धान्याऐवजी माती दळावी लागेल. तसेच –

उत्तरा पडे चार दिन, हस्त न पडे कोय|
भाडळी म्हणे सहदेवजी, पृथ्वी प्रलय होय॥

अर्थात, उत्तरा नक्षत्रात चार दिवस पाऊस पडून हस्त नक्षत्रात मुळीच पाऊस पडला नाही, तर दुष्काळ पडेल.

ही ‘सहदेव-भाडळी’ मराठीत आहे. मराठी महाराष्ट्राचा विस्तार खूप मोठा आहे. त्यामुळे पावसाळी नक्षत्र एकीकडे खूप बरसतं, तर दुसरीकडे कोरडं जातं. परिणामी, ‘सहदेव भाडळी’चं म्हणणं सर्वत्र खरंच ठरतं. तथापि, खर्‍याच्या भासातलं खोटं उघडं पडतं. स्वाती नक्षत्राबद्दल ‘सहदेव-भाडळी’त लिहिलंय-

पडल्या साई स्वाती, तर पिकतील माणिक मोती।
न पडे स्वाती, तर राजहंस माती खाती॥

याचा अर्थ, स्वाती नक्षत्राचा पाऊस समुद्रात पडतो, त्यामुळे मोती पिकतात. मोती हे राजहंसाचं अन्न असल्यामुळे स्वाती नक्षत्र कोरडं गेल्यास राजहंसाची उपासमार होईल. तथापि, ही सारीच कविकल्पना आहे. “ते स्वास्तीस्तव अब्धिशुक्ति पुटकी मोती घडे नेटके” या वामन पंडिताच्या कविकल्पनेला खरं मानल्यामुळे ‘सहदेव- भाडळी’ची फसगत झाली असावी. तथापि, पाऊस पडो, न पडो ‘सहदेव भाडळी’ सारख्या पोथ्या भविष्यवाद्यांना फसवण्यासाठी उपयुक्त ठरतात. या वेळी मृग जवळपास कोरडं गेलं. या वेळी या नक्षत्रांचं वाहन बेडूक होतं. पण पावसाअभावी बेडकांनी आपली समाधी अवस्था सोडली नाही. २२ जूनपासून ‘आर्द्रा’ नक्षत्र सुरू होतंय. त्याचे वाहन ‘गाढव’ आहे. उंदीर व कोल्ह्याप्रमाणे गाढवाला पाऊस-पाणी पसंत नाही. त्यातून हवामान खात्याप्रमाणे पंचांगालाही खोटं ठरवण्याचं पावसानं ठरवलं तर, तो गाढवासारखा कोसळेल! असे हे दुहेरी संकट आहे.

त्यानंतरचे ‘पुनर्वसू’ नक्षत्र घोड्यावर येईल. त्या वेळी दिमाखात टापा टाकीत येईल की धापा टाकीत येईल? पुनर्वसूच्या पुढचे ‘पुष्य’ नक्षत्र उंदीर वाहनावरून येणार आहे. पुढचे ‘आश्लेषा’ हत्तीवरून डुलत-डुलत येणार! त्यापुढचे मोरावरून येणारे ‘मघा’ नक्षत्र मोरावरून नाचत- नाचत येणार की पब्लिकला ओला-सुका दुष्काळ करीत नाचवणार? आणखी एक प्रश्न. नीटपणे बरसली तर दुष्काळ टाळणार्‍या या नक्षत्रांची वाहनं पशु-पक्ष्यांची का? पाऊस पाडणार्‍या नक्षत्रांची वाहनंही काळानुरूप वेगवान हवीत. त्यासाठी बुद्धी वर्तमानाला समजून घेणारी; भिडणारी हवी. पुरेसा पाऊस पाहिजे, तर भरपूर झाडं हवीत! बेडूक- बेडकीचं लग्न लावून ‘धोंडी’च्या नावानं टाहो फोडण्याऐवजी झाडं लावली पाहिजेत. ते सांगण्याची जबाबदारी सरकारची आहे, तशीच प्रसारमाध्यमांचीही आहे. पण प्रसारमाध्यमं पावसासाठी आतुर झालेल्यांच्या माथ्यावर अंधश्रद्धेचा धोंडा ठेवण्याचा उद्योग करताना दिसतात. त्यांचा हा उद्योग यंदा ‘पुष्य’ नक्षत्राचं वाहन असलेल्या हत्तीच्या पायाखाली नष्ट होवो! त्याने समाजाचं नेतृत्व करणार्‍यांच्या बिनडोकपणाचा दुष्काळ तरी संपेल !

-ज्ञानेश महाराव (ज्येष्ठ पत्रकार-संपादक)

(पूर्व प्रसिद्धी : दैनिक देशोन्नती)

नक्षत्र-महिन्यांचे ‘संशयकल्लोळ’
            प्राचीन हिंदू ऋषींनी राशीचक्राची २७ नक्षत्रांमध्ये, म्हणजेच चंद्राच्या तारकासमूहांमध्ये विभागणी केली आहे. प्रत्येक तारकासमूह १३ अंश आणि २० मिनिटांचा असतो. मेष राशीच्या ० अंशांवर असलेल्या ‘अश्विनी’ नक्षत्रापासून नक्षत्रांची गणना सुरू होते. मीन राशीचे ३० अंश ‘रेवती’ नक्षत्राने व्यापलेले आहेत. या नक्षत्रांची नावे अशी आहेत. 
१) अश्विनी २)भरणी ३)कृत्तिका ४)रोहिणी ५)मृगशीर्ष ६)आर्द्रा  ७)पुनर्वसू  ८)पुष्य ९)आश्लेषा १०)मघा ११)पूर्वा फाल्गुनी १२)उत्तरा फाल्गुनी १३)हस्त १४)चित्रा १५)स्वाती १६)विशाखा १७)अनुराधा १८)ज्येष्ठा १९)मूळ २०)पूर्वाषाढा २१)उत्तराषाढा २२)श्रवण २३)धनिष्ठा २४)शततारका २५)पूर्वा भाद्रपदा २६)उत्तरा भाद्रपदा २७)रेवती.
            यातील बर्‍याच नावांनी मुलींचे नामकरण झालेले दिसते. पण त्यापुढची गंमत गोविंद बल्लाळ देवल यांच्या ‘संगीत संशयकल्लोळ’ (पहिला प्रयोग : ऑक्टोबर १९१६) या नाटकात आहे. त्यातील पुरुष पात्रांची नावे अश्विनशेठ, फाल्गुनराव, वैशाखशेठ, कार्तिकशेठ, भादव्या (भाद्रपद), आषाढ्या अशी मराठी महिन्यांची आहेत. तर, स्त्री पात्रांची नावे रेवती, कृत्तिका, स्वाती, मघा, रोहिणी अशी नक्षत्रांची आहेत.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ] [ 143 ]