प्रा. डी. एन. पंगु -

सांगली येथील मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयातून इतिहासाचे अध्यापन करून निवृत्त झालेले प्रा. सी. बा. माणगावकर यांनी राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) मध्ये प्रकल्प प्रमुख म्हणून केलेल्या कामाचा शिवाजी विद्यापीठाने गौरव केला आहे. वैयक्तिक जीवनात सतत सामाजिक जाणीव ठेवणार्या प्रा. माणगावकर यांनी सामाजिक समता चळवळ व दलित चळवळ यात सक्रिय सहभाग घेतला. डॉ. नरेंद्र दाभोलकरांपासून प्रेरणा घेऊन प्रारंभ केलेल्या ‘लोकरंजनापासून लोकशिक्षण’ या उपक्रमातून सांगली जिल्हा पिंजून काढला. त्यांनी ‘अंधश्रद्धा निर्मूलन प्रयोगात्मक कार्यक्रम’ हा उपक्रम यशस्वीपणे राबविला. त्यांच्या अनुभवाचा परिपाक म्हरजे ऑक्टोबर २०२२ मध्ये प्रसिद्ध झालेले ‘विज्ञानयुगातील अविज्ञान’ असे आकर्षक शीर्षक असलेले त्यांचे पुस्तक होय. पुणे येथील मैत्री प्रकाशनाच्या धडाडीच्या प्रकाशिका मोहिनी कारंडे यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकास यशवंत देशमुख यांचे सूचक व बोलके मुखपृष्ठ लाभले आहे.
पुस्तकात एकूण पाच भाग आहेत. पहिल्या भागात लेखकाने विज्ञानयुगाचा ऐतिहासिक आढावा घेतला आहे. वस्तूंच्या वागण्याचे नियम समजले की, त्यांच्या वागण्यावर सत्ता चालविण्याचा प्रयत्न करता येतो, हा कार्यकारणभाव समजून घेणे म्हणजे विज्ञान, अशी विज्ञानाची सुटसुटीत व्याख्या केली आहे. प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ व आधुनिक काळ असे विज्ञानयुगाचे तीन टप्पे आहेत. मध्ययुगातील देकार्तकडेसुद्धा शंका घेण्याची प्रवृत्ती होती, असे लेखक आवर्जून सांगतो.
विज्ञानाच्या कसोटीत जे उतरत नाही, ते ‘अविज्ञान’ होय. पुस्तकाच्या दुसर्या भागात लेखकाने विज्ञानयुगातसुद्धा अविज्ञान अस्तित्वात असते, असा विचार मांडला आहे. याचे कारण म्हणजे विविध अंधश्रद्धा, त्यांचा उगम पूर्वग्रह व भ्रामक समजुतींमध्ये असतो. उदा. इंद्रियजन्य भ्रम, चवभ्रम, मनोभ्रम. कोणत्या प्रकारचा भ्रम झोला आहे, हे समजल्यास त्या अंधश्रद्धेचे निराकरण करणे सोपे जाते. उदा. देवी अंगात येणे हा गरीब व दुबळ्या स्त्रीने तिच्या दु:खावर शोधलेला उतारा असतो. (पृ.२५) लेखकाने भोंदू वास्तुशास्त्रज्ञ व कुंभमेळ्यात शाही स्नानाचे अवडंबर माजविणार्या साधूंचा समाचार घेतला आहे. लेखक म्हणतो, “कुंभमेळ्यात भाग घेणार्या साधूंचा प्रत्येक आखाडा म्हणजे एक संस्थान बनले आहे.” (पृ. ४७) तथापि, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांनी असली प्रदर्शने केली नव्हती, हे सांगावयास लेखक विसरत नाही. सर्वसामान्य लोकांना धर्माच्या तात्त्विक चर्चेत अजिबात रस नसतो. त्यांना धर्म हा कर्मकांडासाठीच आहे, असे वाटते, हे लेखक परखडपणे सांगतो. (पृ. ५३) धर्मशास्त्रातील झालेले बदल वस्तुनिष्ठ ज्ञानावर आधारलेले नसतात; परंतु वस्तुनिष्ठता हा वैज्ञानिक विचार पद्धतीचा गाभा असल्याने खरी शास्त्रीय दृष्टी असलेला शास्त्रज्ञ आपल्याला त्रिकालाबाधित सत्य सापडल्याचा आव कधीच आणत नाही. धर्मशास्त्रात होणारे बदल बर्याच वेळा अंधश्रद्धांनाच उत्तेजन देतात, हे लेखकाने समर्पक उदाहरणे देऊन सांगितले आहे.
पुस्तकातील तिसरे प्रकरण मोठे असून लेखकाने त्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनासाठी इतिहासपूर्व काळापासून आजवर झटलेले वैज्ञानिक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्तेव संत यांच्या कार्याचे सविस्तर विवेचन केले आहे. मध्ययुगात देकार्तने ज्ञानाच्या सत्यतेबद्दल शंका घेण्यास प्रारंभ केला. निरिश्वरवादी चार्वाकने विचारणा केली, “परलोकी जाणारा, परलोकी राहणारा जीव कधी कोणी पाहिला आहे का?” (पृ. ६३) १६ व्या शतकापासून क्रांतिकारक बदल होऊ लागले. मृत व्यक्तीला पिंडदान ही फसवाफसवी असते, असे सांगणार्या तुकारामांनी सोवळेपणाचा कोष दूर करून मनाची शुद्धता ठेवण्याचा उपदेश केला. मध्ययुगीन संत महात्मा बसवेश्वर यांनी कर्मकांडांचा फोलपणा दाखविला, तर महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक चक्रधर यांनी जातीच्या श्रेष्ठ-कनिष्ठतेला तिलांजली देण्यासाठी आपल्या शिष्यांनी चारी वर्णांच्या लोकांच्या घरी भिक्षा मागावी, असा दंडक घातला. संत ज्ञानेश्वरांनी व्रतवैकल्यात बुडालेल्या जनतेची दिशाभूल होत आहे, हे अचूक ओळखले होते. पंधराव्या शतकात संत कबीरांनी हिंदू व मुसलमान या दोन्ही समाजातील अंधश्रद्धांवर हल्ला केला. त्यांनी विचारले, “शूद्राचा जन्म होतो तसाच ब्राह्मणांचाही; मग ब्राह्मण उच्च व शूद्र कनिष्ठ कसे?” संत जनाबाई यांनीसुद्धा त्यांच्या कुवतीप्रमाणे अंधश्रद्धांना विरोध केला. विसाव्या शतकातील, स्वच्छतेलाच देवासमान मानणारे संत गाडगेबाबा हे तर अंधश्रद्धा निर्मूलनाचे ‘फिरते विद्यापीठ’च होते.
अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्रयत्न अनेक विचारवंतांनी केला. प्रबोधनकार के. सी. ठाकरे सत्यशोधकी चिकित्सा वापरली व ‘शनिमहात्म्य अथवा ग्रहदशेच्या फेर्याचा उलगडा’ या पुस्तकात ज्योतिषांची खिल्ली उडविली, असे लेखक सांगतो.
लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी अंधश्रद्धा घालविण्यासाठी धर्मसुधारणांचा आग्रह धरला, तर गोपाळ गणेश आगरकरांनी इहवाद, विज्ञानवाद, बुद्धिप्रामाण्यवाद या आधुनिक मूल्यांचा अंगीकार करून प्रतिपादन केले, “आकाशातून देव येथे आले नाहीत व येथून परत कधी गेले नाहीत.” (पृ.८४) स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांनी, व्रतांचे थोतांड माजविणारे धर्मग्रंथ कपाटात ठेवून हिंदू समाजाच्या पायात पडलेल्या सात बेड्या (वेदोक्त, व्यवसाय, स्पर्श, सिंधू-समुद्र गमन निर्बंध, शुद्धी बंदी, रोटी बंदी, बेटी बंदी) तोडून टाकण्याचा आदेश दिला. धर्मग्रंथांवर समाजव्यवस्था उभारण्याचे दिवस गेले, असे त्यांनी ठणकावून सांगितले. महात्मा जोतिराव फुले यांनी अंधश्रद्धांना बळी पडलेल्यांवर तोंडसुख घेतले नाही; उलट कणव व सहानुभूती दाखविली, असे लेखक सांगतो. अंधश्रद्धांचा नायनाट करण्यासाठी लोकांची सामाजिक व आर्थिक परिस्थिती बदलणे, हा मार्ग त्यांनी सांगितला. अविद्या हे प्रमुख कारण असून बुद्धिप्रामाण्यवाद, धर्माचे समाजशास्त्रीय विश्लेषण व इहवादी दृष्टिकोन या त्रिसूत्रीच्या सहाय्याने त्यांनी अंधश्रद्धेविरुद्ध लढा दिला. राजर्षी शाहू महाराज यांनी पुराणांना व स्मृतिंना विरोध केला आणि विद्यादानाचा पुरस्कार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘धम्म’ आणि ‘धर्म’ या दोन संकल्पनांतील भेद स्पष्ट केला. त्यांनी निरिश्वरवादी, मानवकेंद्रित धर्म असू शकतो, हा महत्त्वाचा विचार मांडला. महर्षी वि. रा. शिंदे यांनी १९०६ साली ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया’ची स्थापना करून अंधश्रद्धा निर्मूलन व अस्पृश्यता निवारण यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अस्पृश्यता निवारण व प्रश्न त्यांनी राजकीय पातळीवर नेण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
विशेष म्हणजे या सर्वच विचारवंतांनी सामाजिक कार्य, राजकीय कार्य व धर्म यांच्यामध्ये फारकत केली नाही, असे निरीक्षण लेखकाने नोंदविले आहे.
धर्मसंस्थेवरचा विश्वास पूर्णपणे उडालेले अंधश्रद्धा निर्मूलन कार्यातील महत्त्वाचे योद्धे म्हणून विसाव्या शतकातील डॉ. अब्राहम कोवूर यांना लेखक ‘बुवाबाजीचा कर्दनकाळ’ असे संबोधतो. करणी, भानामती, भूत आदी कल्पनांचा त्यांनी धुव्वा उडविला. १९६३ साली जागतिक पातळीवर त्यांनी एक आव्हान दिले. जगातील कोणीही दैवी किंवा अतींद्रिय शक्तीने कोणताही चमत्कार करून दाखविल्यास त्याला एक लाख रुपये रोख बक्षीस दिले जाईल, असे त्यांनी जाहीर केले. आजअखेर ते बक्षीस कोणीही मिळविलेले नाही, असे लेखक सांगतो.
पुस्तकाच्या पाचव्या भागात लेखकाने १९८५ मध्ये सातारा येथे स्थापन झालेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची रचना, कार्याचे स्वरूप व आजवर हाती घेतलेले उपक्रम यांची थोडक्यात माहिती दिली आहे. संस्थापक डॉ. दाभोलकर हे स्वत: विद्रोही विचारांचे असले, तरी विध्वंसक विचारांचे नव्हते. त्यांच्या माघारी ती परंपरा चालू राहिली आहे. म.अं.नि.स.च्या कृतिसूत्रात केरळमधील बुद्धिप्रामाण्यवादी बी. प्रेमानंद यांनी बहुमोल सहकार्य केले आहे. म. अंनिसचा स्वतंत्र प्रसिद्धी व प्रकाशन विभाग आहे. मुख्य म्हणजे युवाशक्तीचा विधायक कामासाठी वापर करून महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांमध्ये १८० स्थानिक शाखा उभारल्या आहेत. नजीकच्या काळात प्रत्येक तालुक्यामध्ये म.अंनिसची शाखा सुरू करण्याचा इरादा आहे. म.अंनिसच्या सभेत मोकळेपणा असतो. ही चळवळ म्हणजे एकखांबी तंबू नाही. बहुतेक सदस्य नास्तिक व अज्ञेयवादी आहे. म.अंनिसचे कार्य जाती-धर्म-पंथ-लिंग यांच्या पलिकडे आहे. अनेकतेतून एकता निर्माण करण्याचाच हा प्रयत्न आहे.
म.अंनिसच्या काही उपक्रमांची लेखक नोंद करतो. उदा. डाकीण व भानामतीसंबंधी प्रबोधन, सर्पयात्रा, जातपंचायतीच्या जाचाविरुद्ध मोहीम, पर्यावरण जागृती, प्रसिद्ध नाटककार अतुल पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेला सांस्कृतिक विभाग, खगोलशास्त्र प्रकल्प, फिरते कृत्रिम तारांगण इ. विविध उपक्रम यशस्वी करण्यासाठी निधीची आवश्यकता असते; पण भारताबाहेरील देशांकडून मिळणारा पैसा कटाक्षाने टाळला जातो, असे लेखकाचे निरीक्षण आहे. भारतीय राज्यघटनेतील मानवतावाद आणि बुद्धिप्रामाण्यवाद यांचे अनुकरण केले जाते.
पुस्तकाच्या पाचव्या व शेवटच्या भागाचे शीर्षक ‘मूल्यमापन व अपेक्षा’ असे आहे. लेखकाच्या मते, देशातील प्रत्येक व्यक्ती ही थोड्याफार प्रमाणात अंधश्रद्ध असते. परंतु आपण अंधश्रद्धाळू आहोत, याची आपणास कल्पनाही नसते. कित्येकदा अंधश्रद्धा चळवळीला अपयशाला सामोरे जावे लागते. म्हणून लेखकास वाटते की, लोकांच्या मनात अंधश्रद्धेबाबत प्रथम घृणा निर्माण करावी लागेल. एकदा का ही प्रक्रिया मानवी मेंदूत रुजली की, अंधश्रद्धेला थारा नसतो. अज्ञान राहील; पण अंधश्रद्धेचे निर्मूलन होईल. जी व्यक्ती भानामतीस जबाबदार आहे, तिचा छळ होणार नाही, याची काळजी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे लेखकास वाटते. हिंदू धर्माप्रमाणेच मुस्लिम, ख्रिश्चन वगैरे अन्य धर्मांतील अंधश्रद्धांचे निर्मूलन क्रमप्राप्त ठरते. डॉ. बाबसाहेब आंबेडकरांनी गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल, असे सांगितले आहे, या गोष्टीकडे लेखक लक्ष वेधवितो.
याबाबत लेखक आशावादी आहे. भारतीय संविधानाने अंधश्रद्धाविरोधी भूमिका घेतली आहे. भारताला जगात ताठ मानेने उभे राहायचे असेल, तर प्रथम देशातील अज्ञान व अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार करावा लागेल. हे काम कठीण असले, तरी अशक्य नाही, असे लेखकास नम्रपणे वाटते. म्हणून आपल्या विचारांना विरोध करणारे विचार असू शकतील, हे लेखकाने मनोगतामध्ये मान्य केले आहे. कारण हे निरोगी लोकशाहीचे लक्षण आहे.
लेखकाची भाषाशैली सुबोध व सोपी वाटते. तर्कसंगती सुरेख आहे. पुस्तकाच्या शेवटी २८ संदर्भ ग्रंथांची यादी दिली आहे. त्यावरून लेखकाच्या व्यासंगाची कल्पना येते. एक छोटा दोष आढळतो. समाजसुधारक व वैज्ञानिक यांच्या कार्याची माहिती देताना काही वेळा कालक्रम पाळलेला नाही, असे वाटते. काही वाक्यांना सौम्य विनोदाची छटा असल्याने ती आकर्षक झाली आहेत.
उदा. १) स्वर्गात चार दिवस मौजेत राहून आपला अनुभव सांगण्यासाठी कोणी खाली आला नाही. (पृ.१३)
२) बुवा-महाराज आणि चतुर व्यापारी सारखेच. दोघेही गिर्हाईक गटवितात. (पृ.२९)
३) पिंडाला कावळा शिवणे हा प्रकार मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध इ. धर्मियांत नाही, म्हणून या धर्मातील सर्व व्यक्ती मरताना समाधानी असतात, असे म्हणता येणार नाही. (पृ.३१)
मराठी वाचक या पुस्तकाचे स्वागत करतील, असे वाटते.
पुस्तकाचे नाव : विज्ञानयुगातील अंधश्रद्धा
लेखक : प्रा. एस. बी. माणगावकर
प्रकाशक : मैत्री पब्लिकेशन (मोहिनी कारंडे), २६७/३, आनंदनगर, माळवाडी रोड, हडपसर, पुणे. ४११०२८
मोबा. ९२८४६१७०८१
पृष्ठे : १५०
मूल्य : रु. २५०/-