सम्राट हटकर -
‘अंनिस’ व बिलोली पोलिसांनी केला तौफिक बाबाचा भांडाफोड : जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल
बिलोली तालुक्यातील कासराळी येथील दस्तगीर दर्ग्यावरील तौफिक बाबाकडे दैनंदिन स्वरूपाच्या समस्या किंवा आजारावरील उपचारांसाठी स्थानिक व आजूबाजूचे लोक जातात. त्यासाठी तो 251, 501, 1001 रुपये घेतो. समस्या घेऊन गेलेल्या लोकांना ‘तुमची समस्या किंवा आजार जादूटोणा किंवा करणीमुळे निर्माण झाली आहे,’ असे सांगत असल्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. पाच-पन्नास लोक गोळा करून अंगात दैवी शक्ती असल्याचा भास तो निर्माण करतो.
दिनांक 28 जानेवारी 2022 रोजी ईरण्णा बोरोड याचा पाय दुखत असल्यामुळे उपचारासाठी तो तौफिक बाबाकडे गेला. त्याला आपल्या पायाच्या त्रासाबद्दल सांगितले. तौफिक बाबाने अंगात आल्याचे भासवून तुमचा त्रास दवाखान्यातल्या नसून रूक्मिणबाई बोरोड यांनी तुमच्यावर मंत्राने करणी, जादूटोणा केल्यामुळे तुम्हाला हा त्रास होत असल्याचे सांगितले. नाव सांगितल्यामुळे रूक्मिणबाईकडे लोक संशयाने बघायला लागले. त्यांच्याशी वादावादी-भांडण करू लागले. याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नांदेडकडे तक्रार दिली.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारणी सदस्य सम्राट हटकर, जिल्हा प्रधान सचिव कमलाकर जमदाडे यांनी पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांची भेट घेऊन तपशीलवार चर्चा केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्टिंग ऑपरेशन’ची योजना बनवली. त्या योजनेनुसार दि. 4 फेब्रुवारी 2022 रोजी सापळा रचून तोफिक बाबाचा भांडाफोड केला आणि जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
या भांडाफोड प्रकरणांमध्ये पोलीस उपनिरीक्षक एम. झेड सय्यद, पोलीस उपनिरीक्षक रूपाली कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल शिंदे जी. बी., भारत फंताडे, कोरनोळे बी. एस. आधी पोलीस कर्मचार्यांचा सहभाग होता. तसेच या मोहिमेत ‘अंनिस’ बिलोलीचे कार्याध्यक्ष फारुक शेख, बालाजी एलगंद्रे, मोहन जाधव, सायलू कारमोड यांची मदत झाली.
– सम्राट हटकर, नांदेड