वीरा – द विनर आणि नागेश्वर बाबा

अनिल चव्हाण -

शाळेला सलग दोन दिवस सुट्ट्या! आदी, स्वरा आणि वीरा दप्तराशी खेळत, दोन दिवस काय करावे याचे नियोजन करत होते. “सुट्टीच्या दिवशी सुद्धा अभ्यास करावा”, अशी भुणभुण आजीने लावली होती. एवढ्यात वीराला आठवले.

“अरे आज आपले मामा आणि मावश्या सातारहून येणार आहेत! काल आई बोलत होती!”

” होय आई?” आदीने खात्री करून घेण्यासाठी विचारले.

“होय! येतच असतील आत्ता.” अस्मिता म्हणाली.

“कोण आहेत ते काकी?” स्वराचा प्रश्न!

“तिथे ना माझ्या बाबांची मावशी राहते! त्यांची नातवंडं म्हणजे, माझे मावस चुलतभाऊ आणि बहीण. त्यांची मुलं म्हणजे तुमचे मामा आणि मावशी लागणार!”

“हैय्या! मग खूप मज्जाच करायची!” स्वरा म्हणाली.

एवढी चर्चा होते तोपर्यंत दारात पाहुणे हजर झाले. आजीने त्यांचे “या! या!” म्हणत स्वागत केले.

“आणि मामा कुठे आहे?” मोठे कोणी दिसत नाही म्हटल्यावर आदीने विचारले!

“हा काय हा तुझा कबीर मामा!” छोट्या मुलाकडे बोट दाखवून सानू मावशी म्हणाली.

आपला मामा आपल्याच वयाचा असल्याचे पाहून आदीला गंमत वाटली. मावश्याही तशाच शाळा कॉलेजात जाणार्‍या! ईरा, सानू, सई!

तोपर्यंत गुंड्याभाऊ एका स्टायलिश माणसाला घेऊन दारात आला! बर्‍यापैकी वाढवलेले, चापून चोपून बसवलेले केस! भरपूर तेल लावून, भांग व्यवस्थित पाडलेला; अंगात मोरपंखी रंगाचा झब्बा आणि निळसर रंगाची तुमान! एकदम आकर्षक व्यक्तिमत्त्व!

“आई हे नागेश्वर बाबा आहेत!” गुंड्याभाऊंनी ओळख करून दिली.

“गुंड्याकाका, नागेश्वर नव्हे बागेश्वर म्हणा! वृत्तपत्रात बातमी आहे ना!” वीराने माहिती पुरवली.

“हो बरं! बागेश्वर धाम सरकार बाबा नागपूरला आले आहेत बरं!” सानूने भर घातली!

“अहो हे वेगळे बुवा… ते वेगळे बुवा! ते बागेश्वर, हे नागेश्वर! त्यांच्या इथे बागेश्वराचे देऊळ आहे! यांच्या येथे नागेश्वरांचे देऊळ आहे!” गुंड्याभाऊ.

“अहो नामसाधर्म्याचा परिणाम आहे हा.” नागेश्वर बुवांनी खुलासा केला!

“नुसतेच नाम साधर्म्य नव्हे, बरे शरीर आणि कपड्याचे साधर्म्यही आहे बरे!” सानूने साम्य नोंदवले. “समजले बरे” आदीने बरे शब्दावर जोर दिला.

“आई, आम्हाला एक तासभर रूम वापरायला मिळेल का? महाराजांना थोडे नियोजन करायचे आहे आणि विश्रांती घ्यायची आहे!” गुंड्याभाऊ.

पहिले पाहुणे स्थिर व्हायच्या आतच गुंड्याभाऊंनी प्रपोजल ठेवले आणि परवानगीची वाट न पाहता महाराजांची बॅग घेऊन रूमकडे प्रस्थान ठेवले! इकडे मुले साहित्य ठेवून स्थिरस्थावर होऊ लागली; गप्पा मारू लागली!

थोड्याच वेळात दोन व्यक्ती आत आल्या. गुंड्याभाऊंनी त्यांना रूममध्ये घेतले आणि आतून दार लावायला सांगून स्वतःबाहेर आला. जाता जाता वीराने आपली ओळख करून दिली, “काका नमस्ते!”

काकांनी हसून हात हलवला.

“चला रे पोरांनो हॉलकडे जाऊन येऊ या!” गुंड्याभाऊंनी आदी आणि कबीरला बरोबर घेतले.

इकडे दार बंद करून हळू आवाजात चर्चा सुरू झाली. बाहेर बसलेल्या सानू आणि सईच्या कानावर त्यातील काही शब्द पडत होते.

“आम्ही काही भाविकांची माहिती घेतो आणि फोनवरून कळवतो.”

“हो, पण लक्षात आले ना माहिती काय घ्यायचे ते?”

“नाव, गाव, अडचणी, नातेवाईक एवढेच!”

“ठीक आहे! निघा आता! पण या कानाची खबर त्या कानाला लावू देऊ नका, म्हणजे झाले.”

“तुम्ही निश्चिंत असा कुणालाही कळणार नाही!”

“आपले मानधनाचे पाकीट तयार आहे! पण ते काम झाल्यावरच मिळणार. समजलं ना?”

“ठीक आहे! येतो आम्ही!”

हळुवार हाताने दाराची कडी काढून दोघे बाहेर पडले!

सई आणि सानूनी एकमेकींकडे अर्थपूर्ण दृष्टी टाकली.

गुंड्याभाऊ हॉल पाहून आले! त्यांनी महाराजांना हाक मारून बाहेर बोलावले!

“हॉल मोठा आहे! दहा हजार माणसे तरी मावतील! आता लोक यायला सुरुवात झाली! आपली तयारी झाली का? ही दोन्ही पोरे हुशार आहेत बरं. त्यांनी लांबी, रुंदी बरोबर मोजली.” गुंड्याभाऊने एका दमात माहिती तर सांगितली; शिवाय दोघांचे कौतुक केले.

“हो का? कसे मोजले बरे तुम्ही?” सानूने विचारले.

“सोपं आहे अगदीच. लांबीला शंभर फरशी आहेत आणि रुंदी ७० फरशांची आहे.” कबीर म्हणाला.

“फरशा आपल्यासारख्याच आहेत. म्हणजे दोन फुटाच्या!” आदीने माहिती दिली.

महाराजांनी ड्रेपरी आटोपली. चहाचा कप रिकामा केला. आणि गुंड्याभाऊबरोबर हॉलकडे प्रस्थान ठेवले.

“तुम्ही सर्व जण या बरं” गुंड्याभाऊने जाता जाता सर्वांना आमंत्रण दिले! शिवाय जादा माहिती दिली.

“महाराज, भाविकांचे नाव, गाव न सांगता ओळखतात! केवळ चेहर्‍यावरून!”

“म्हणजे बाबा चमत्कारी दिसतायेत!” वीराने शेरा मारला.

“हो तर. त्यांना भुते वश आहेत. ते मंत्र-तंत्र जाणतात, बारा वर्षेत्यांनी साधना केली आहे!” गुंड्याभाऊंनी आपल्या माहितीत भर घातली!

“मग तर गेलंच पाहिजे! आवरा भरभर!” सर्वांनीच एकमेकींना सूचना दिल्या!

“कसा करत असतील हा चमत्कार?” स्वराने विचारले!

“चमत्कार खरे असत नाही! बुवा, बाबा नेहमी हात चलाखी करतात! काहीतरी गडबड असली पाहिजे!” आदीने आपले मत दिले.

“हो पण कशी हातचलाखी करतात, ते ठाऊक हवे ना!” कबीर म्हणाला.

“आपण शोधून काढू!” वीरा.

“घाई नको जेवून मग जा! तो बाबा कुठे पळत नाही!” आजीने सूचना केली. “आणि वीरा तिथे काही आगाऊपणा करू नको!”

एव्हाना अस्मिताने, राणी मावशीच्या मदतीने जेवण तयार केले होते. “पोरांनो हात धुवून घ्या!” राणीने सूचना केली. कधी एकदा कथा ऐकायला जातोय असे झाले होते. सर्वांनी जेवण झटपट आटोपले. आणि कार्यक्रमाचे ठिकाणी हजर झाले. हॉल खचाखच भरला होता. आत जाताना प्रत्येकाच्या कपाळाला ओला भंडारा म्हणजे हळद लावली जाई! तीन बोटे फिरवून चार समांतर रेषा काढल्या जात. त्यावर दुसरा कार्यकर्ता कपाळावर तांबड्या रंगाचा नागाचा शिक्का उठवी! प्रत्येकाचे कपाळ नागेश्वर बाबासारखे दिसू लागले. स्वरा, ईरा, आदी आणि कबीर नागेश्वर बाबा बनले. सई आणि सानू मात्र बाजूला होत्या. त्यांचे वीराबरोबर खलबत चालू होते! काहीतरी निर्णय झाल्यावर त्यांनीही आपली कपाळे रंगवून घेतली. एका बाजूला पावत्या फाडण्याचे काम सुरू होते. पण गुंड्याभाऊंनी त्यातून या बाल चमूला वगळले.

वीराने इकडे तिकडे फिरून पाहिले. मघाशी घरी आलेले दोघेजण एका भाविकाला बाजूला घेऊन गप्पा मारत होते.

“काका, इथून दिसत नाही हा” वीराने त्यांच्याशी संपर्क साधला!

“तुम्हाला पुढे बसवू का?” एक काका म्हणाला.

वीराने इतरांनाही बोलावले. पुढे जाता जाता त्यांनी सानू आणि सईची माहिती विचारून घेतली. नावे लिहून घेतली. त्या दोघी मागून येत होत्या! मोक्याची जागा बसायला तरी मिळाली.

कार्यक्रम सुरू झाला. एका कार्यकर्त्यांने सर्वांचे स्वागत केले. गावातल्या पुढार्‍यांचे कौतुक केले. मग नागेश्वर बाबांच्या कथनाचा कार्यक्रम सुरू झाला. पण प्रत्येकाला पाहायचा होता चमत्कार! महाराज अनोळखी माणसाचे नाव, गाव, अडचणी, कशा ओळखतात? याबद्दल प्रत्येकाला कुतूहल होते. त्यांना फार वेळ थांबावे लागले नाही. महाराजांनी नाव पुकारले

“आशा पाटील”

आशा पाटील पुढे आल्या. त्यांनी महाराजांना नमस्कार केला. खाली बसल्या.

“ताई, तुमचे पूर्ण नाव आहे- आशा आनंदराव पाटील. आपले पती वीज कर्मचारी आहेत. त्यांचे आजारपण, मुलाची नोकरी आणि शेतीची कोर्टबाजी यासंबंधी तुमचे प्रश्न आहेत. काळजी करू नका. पाच सोमवार दरबारात हजेरी लावा. शनीला तेल घाला. तुमचे प्रश्न सुटतील.”

“मी सांगितलेले बरोबर आहे ना?” महाराजांनी सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात पुन्हा पुन्हा प्रश्न विचारला.

“होय बरोबर आहे, महाराज!” आशाताईंनी पायावर डोके ठेवले. अनोळखी व्यक्तीची माहिती बरोबर सांगितल्याचे पाहून लोकांनी टाळ्यांचा गजर केला.

अजून दोन भाविकांची माहिती सांगितल्यावर सानू आणि सईचे नाव पुकारले गेले. नाव-गाव सांगून महाराज म्हणाले, “दोघींना परीक्षेत गुण कमी मिळत आहेत. अनेक ठिकाणी अर्ज केले पण उत्तर नाही. नोकरी मिळत नाही, एकीचा हात दुखतोय, तर दुसरीची दाढ किडलेली आहे.” सभा शांत होती. महाराजांनी एवढे सगळे ओळखल्यावर सर्व जण टाळ्या वाजवायच्या तयारीत होते. तेवढ्यात वीरा स्टेजवर पोहोचली. तिने अचानक माईकचा ताबा घेतला.

“महाराज, तुमच्याकडे कसलीही दैवी शक्ती नाही! तशी ती कुणाकडेच नसते, तुम्ही आता सांगितलेली माहिती पूर्ण चुकीची आहे. या दोघी फर्स्ट क्लासमध्ये पास झालेल्या आहेत आणि आता चांगल्या कंपनीत वरच्या पदावर नोकरी करताहेत. त्यांचे हात-पाय, दात काही दुखत नाही. मीच सर्व खोटे तुमच्या एजंटाला सांगितले होते. हे खोटे आहे असे तुम्हाला ओळखता आले नाही.”

सानू आणि सई उभ्या राहिल्या. त्यांनी वीराला दुजोरा दिला आणि म्हणाल्या, “चमत्कार करणारा भोंदू असतो आणि त्यावर विश्वास ठेवणारा बावळट असतो!” सभा स्तब्ध झाली आणि अचानक उसळली.

“अरे पकडा त्या भोंदूला”

“पकडा त्या भोंदूला”

तोपर्यंत बाबा आणि त्यांच्या एजंटांनी आपले चंबूगबाळे आवरले होते. गुंड्याभाऊ अवाक् होऊन पहात होता!

गर्दीतून एकच आवाज आला. “वीरा द विनर! वीरा द विनर!!”

लेखक संपर्क : ९७६४१ ४७४८३


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ]