धर्मसंस्थेची चिकित्सा करताना धर्मभावनेचा आदर ठेवणे आवश्यक : प्रा. शरद बाविस्कर

श्रीपाल ललवाणी -

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे 9 एप्रिल रोजी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ व ‘भुरा’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक-प्राध्यापक तत्त्वज्ञानाचे अभ्यासक शरद बाविस्कर यांचे व्याख्यान पुणे येथे आयोजित करण्यात आले होते.

‘धर्मभावना, धर्मसंस्था आणि धर्मचिकित्सा’ या विषयावर डॉ. बाविस्कर यांनी तत्त्वज्ञानाचा इतिहास, राजकीय तत्त्वज्ञान, आणि राजकीय समाजशास्त्र या अंगाने सखोल विवेचन केले. ते म्हणाले, “धर्मभावना ही तत्त्वज्ञानातील संकल्पना तार्किकतेच्या अंगाने समजून घेता येत नाही. त्यासाठी जीवन जगण्याच्या काय-काय प्रेरणा आहेत ते समजून घ्यावे लागेल. ग्रामीण भागात किंवा आपल्या संस्कृतीतील बरेचसे सण-समारोह हे तार्किकतेला पटणारे नाहीत; पण ते जगण्याला एक निश्चित आयाम देतात. ते आयाम कदाचित तार्किक नसतील; पण भावनिक असतात. आधुनिक काळातील विज्ञान हे धर्मसंस्थांचे तर्कनिष्ठ पद्धतीने आकलन, विश्लेषण करू शकतात. कारण धर्मसंस्था ही एक संस्थागत संरचना आहे, जी विज्ञानाच्या तर्कनिष्ठ कसोट्यांनी तपासून पाहता येते. पण धर्मभावनेला कोणतेही संस्थात्मक स्वरूप नसल्याने त्याची चिकित्सा करणे म्हणजे समाज म्हणून त्यांच्या भावनेकडे असंवेदनशीलतेने पाहणे होय.” त्यापुढे ते म्हणाले की, धर्मभावनेचा आपण जेव्हा-जेव्हा आपल्या स्वार्थासाठी वापर करू लागतो, तेव्हा त्याचे संस्थाकरण केले जाते. एका बाजूला धर्मभावनेचा आदर ठेवणे हे आवश्यक असले, तरी धर्मसंस्थेची कठोर चिकित्सा आवश्यक आहे, असे देखील त्यांनी नमूद केले. सर्व धर्मांसाठी हे पथ्य आवश्यक आहे आणि विज्ञानाचा देखील शोषणासाठी वापर केला जात असेल तर त्याची चिकित्सा होणे आवश्यक आहे, असे देखील त्यांनी नमूद केले.

अध्यक्षस्थानी ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ होते. त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चतुःसूत्री सांगितली. त्यामध्ये धर्माची कालसुसंगत चिकित्सा करणे हे एक प्रमुख होते. या सूत्राचा विचार करताना त्यांनी एक वर्ष महाराष्ट्रात फिरून ‘धर्माचा नैतिक दृष्टिकोन’ आणि ‘अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका’ या विषयांवर मांडणी करण्याचे ठरवले होते. धर्माबद्दल ‘अंनिस’ची भूमिका चिकित्सेची; परंतु सहानुभूतीची सुद्धा आहे. नैतिकदृष्ट्या उन्नत धर्म अंगीकृत केलेले नागरिक आपले विरोधक नसून मानवतावादासाठी आपण करत असलेल्या प्रवासातील साथीदार आहेत.

कार्यक्रमास उपस्थित युवकांनी ‘विज्ञान व धर्म’, ‘आजच्या काळातील धर्माची उपयुक्तता’, ‘तर्कनिष्ठ पद्धतीने व तत्त्वज्ञानाच्या अंगाने धर्माची चिकित्सा’ या विषयांवर विविध प्रश्न विचारून चर्चेमध्ये सहभाग घेतला.

डॉ. हमीद दाभोलकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अरुण बुरांडे यांनी परिचय करून दिला. राहुल माने याने सूत्रसंचालन केले. नंदिनी जाधव यांनी आभार मानले. यावेळी ‘अंनिस’चे दीपक गिरमे, श्रीपाल ललवाणी आणि वसंत कदम हे उपस्थित होते.

श्रीपाल ललवाणी, पुणे


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]