डॉ. सारिका शिंदे जावळीकर -

मी ज्या कुटुंबात जन्मले, वाढले, लहानाची मोठी झाले ते अगदी सुशिक्षित जरी असले, तरी घरची जुनी मूळ म्हणजे माझे आजी-आजोबा हे ग्रामीण भागातूनच आलेले. त्यात अशिक्षित व कमी अधिक प्रमाणात अंधश्रद्धेने ग्रासलेले. तसे माझे आजोबा मात्र आंबेडकरांच्या विचारांचे पक्के होते. त्यांनी त्यांच्या हयातीत त्यांच्या सर्व मुलांना उत्तम शिक्षण दिले आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे पक्के ज्ञान दिले. माझे वडीलही पेशाने डॉक्टर. त्यांनी त्यांची काही सर्विस ही ग्रामीण भागात केल्यामुळे मला लहानपणापासूनच डॉक्टरी पेशा व त्यातले अनुभव याचे अप्रूप होते.
माझ्या घरचे वातावरण अगदी रॅशनल, वैज्ञानिक व सेक्युलर. फुले शाहू, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांनी युक्त असे होते. घरी कसलेच कर्मकांड विधी मूर्ती पूजा नसल्याने माझ्या विचारांची जडणघडणही अगदी अंधश्रद्धाविरहित होत होती. तरीही माणूस हा समाजशील प्राणी आहे. ज्या गोष्टी घरच्यांनी नाकारल्या त्या बाहेरच्या मित्र-मैत्रिणींकडून कळत नकळत तीन तिघाडा काम बिघाडा, मांजर आडवे गेल्यामुळे काम बिघडणे, घराच्या उंबर्यावर बसू नये, शनिवारी नखे काढू नये अशा असंख्य अंधश्रद्धांची ओळख होत गेली. त्यात लहानपणी सर्वात भयावह वाटणारी म्हणजे भूतांची गोष्ट..
कुणी भूत पाहिले तर, कुणी भूताचा आवाज ऐकला, तर कुणी अमुकतमुक ठिकाणी भूतांचा वावर किंवा वास्तव्य असल्याच्या ठाम बतावण्या ऐकल्या. त्यामुळे एकंदरच कितीही इतर अंधश्रद्धा जरी माझ्या आयुष्यात फोल ठरल्या तरी भूत माझ्या मनात तसेच तळपत राहिले.
माझा भूतावर अगदीच विश्वास नव्हता, पण अंधार पडला की चित्रपटातली काही भूतांची रेखाटलेली कॅरेक्टर्स डोळ्यासमोर यायची म्हणून भूतांची भीती मनात होतीच. जसजशी मोठी झाले, वैद्यकीय कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. उच्च शिक्षणाबरोबरच मित्र-मैत्रिणींकडून प्लान्चेटचेही शिक्षण मिळाले. त्याचा प्रत्यक्ष अनुभवही घेतला, आणि बाकी अंधश्रद्धा जरी मिटल्या तरी काहीतरी न दिसणारी शक्ती किंवा आत्मा असतो असा ठाम विश्वास झाला. त्यातही चांगला आत्मा आणि अतृप्त किंवा वाईट आत्मा असतो हे खरे वाटायला लागले. असाच प्लान्चेटचा खेळ काही वर्ष वैद्यकीय शिक्षण संपेपर्यंत चालूच राहिला.
वर्तमानपत्रात डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचे आणि प्राध्यापक शाम मानवांचे लेख वाचण्यात यायचे, त्यांचे अंधश्रद्धा विरोधी कार्य आणि त्याचा प्रचार प्रसार याबद्दलही माहिती होत गेली; परंतु ते काम आपल्याही जिल्ह्यात होते याची मला कल्पना नव्हती. माझी नव्यानेच बदली नांदेड जिल्ह्यातच भोकर तालुक्यात झाली. माझी एसटी बसने ये-जा सुरू झाली. रस्ता खराब असल्यामुळे रोजचा एक ते दीड तासाचा प्रवास सुरू झाला. या दीड तासांमध्ये डॉक्टर दाभोलकरांचे आणि प्राध्यापक श्याम मानवांचे यूट्यूबवर असलेल्या सर्व चॅनल्सवरची व्याख्यानांची पारायण केली. जसजशी व्याख्याने ऐकत गेले तशी माझ्या व्यक्तिमत्त्वामधील रॅशनल आणि सेक्युलर विचारांना आणखीनच उजाळा मिळाला. एका अर्थाने माझे खरे व्यक्तिमत्त्व स्वच्छ होत गेले.
आठ नऊ वर्ष नांदेडच्या रुग्णालयात काम केल्यानंतर माझी प्रथमच जिल्ह्याच्या बाहेर ग्रामीण रुग्णालयात बदली झाली. तिथला कार्यकारभार माझ्यासाठी नवीनच होता. पेशंट सर्वत्र सारखेच असतात; परंतु पेशंट जेव्हा ग्रामीण रुग्णालयात पाहिला जातो, त्यांच्या आजाराचे खरे स्वरूप आणि त्यांचे निदान हे शारीरिक कमी आणि मानसिक जास्त असते, हे लक्षात आले. म्हणजे तसे माझ्या तरी ड्युटीमधील आलेल्या पेशंटमध्ये निदर्शनास आले.
गुरुवारचा दिवस माझी तशी नेहमीची ड्युटी पण गुरुवार म्हणजे बाजाराचा दिवस. जसजशी बाजाराची रेलचेल वाढत होती तशी ओपडीमध्ये पेशंटची गर्दीही वाढत होती. अचानक एक वयस्कर बाई चक्कर आली म्हणून सांगत आली. लगेच मी बीपी कफ लावला, मावशींना तपासले. बीपी तसं नॉर्मलच होतं; पण मावशी मात्र स्टुलावर बसूनच थरथरायला लागल्या. माझा हात त्यांच्या मनगटावरच होता, पल्स पाहण्यासाठी बोटं ठेवली होती. त्यांच्या अचानक गिरक्या सुरू झाल्या. तसं लगेच मी माझा हात त्यांच्या मनगटावरून बाजूला केला. त्यांच्या तपासणी आधीच त्यांच्या कुटुंबीयांनी मलाच बाजूला सारून देवीचा संचार झालेला आहे असे सांगून बीपीचा पट्टा काढून टाकायला सांगितला आणि त्या मावशींना ते सोबत दवाखान्यातून घेऊन गेले. मी त्यांना खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांना मानसिक उपचारांची गरज आहे, परंतु माझ्या सल्ल्यापेक्षा त्यांच्या अंधश्रद्धेचा विळखा अधिक घट्ट होता आणि इथून माझ्या ग्रामीण भागातील अंधश्रद्धांची जवळून ओळख व्हायला सुरुवात झाली.
वर्षभरातच कोरोनाच्या विळख्याने सर्व भारतालाच नव्हे तर जगभराला ग्रासले होते. कोविडचा लॉकडाऊन पिरेड चालू झाला होता. शासनाकडून आलेल्या आदेशानुसार आणखी काही दिवस लॉकडाऊन असणार होते आणि कोणीही घराबाहेर न पडता शक्यतो घरूनच कामे करावी असा फतवा जाहीर झाला; पण डॉक्टरची ड्युटी घरून कशी जमणार? आम्ही डॉक्टर मंडळी आणि खाकी वर्दीतली मंडळी घराबाहेर पडून लॉकडाऊनचा पहारा आणि पॉझिटिव्ह आलेल्या पेशंटचा पहारा यात कर्तव्यावर मात्र राहणे भाग होते, तसे आम्ही पारसुद्धा पाडलेच. कोरोनाने मृत्यूचे थैमान घातले होते. जगभरात कोरोनामुळे मरणार्यांच्या संख्येत वाढ होतच होती तसतसे कोरोनाच्या शास्त्रीय उपचारासोबतच इतर संशोधकांच्या संख्येतही वाढ होत होती. रोज निरनिराळे उपाय, काढे, वाफा, धुरी काही तात्पुरती तर काही कायमस्वरूपी उपाययोजनांना व्हाट्सअॅप जगात उधाण आले होते. याच whatsapp scrolling मध्ये अंनिसने आयोजित केलेल्या कोरोनाच्या उपायासंदर्भातील छदम विज्ञानावरील झूम मीटिंगमधील चर्चेत मी सहभागी झाले. त्यातच नवीन कार्यकर्त्यांना जोडून घेण्यात आले आणि माझा अंनिस कार्यकर्ती म्हणून सहभाग झाला. कोरोनाच्या निर्बंधामुळे बरेच दिवस अंनिसच्या कार्यात सक्रियपणे काम करता आले नाही; परंतु येत्या काही दिवसांतच हटकर सरांसोबत नांदेडमध्ये व काही ग्रामीण भागातही जादूटोण्याचे विद्यार्थ्यांसमोरचे प्रयोग पाहिले. त्यावेळेस मुलांकडून येणारा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पाहिला. यामुळे मी अंनिसशी जोडले गेल्याचा आनंद द्विगुणित झाला.
मी वैद्यकीय व्यवसायात गेली १६ ते १७ वर्ष कार्यरत आहे. तसेच मी बालरोगतज्ञ असल्याने माझ्या वाट्याला असंख्य अंधश्रद्धेने ग्रासलेली लहान मुलं व कुटुंबं आली. मूल अगदी बाईच्या पोटात असल्यापासून ते अर्भक बनूून बाहेर येईपर्यंत निरनिराळ्या अंधश्रद्धा प्रचलित आहेत. बाईने काय खावे काय खाऊ नये, ज्यामुळे बाळ बाळाच्या वाढीवर होणारा परिणाम होईल इथपर्यंत एक वेळ मान्य आहे; पण गर्भसंस्कारासारख्या गोष्टीमुळे बाळाच्या जडणघडणीवर व व्यक्तिमत्त्वावर जन्माआधीच तरतूद करू घालणार्या संस्था सर्वत्र स्थापित होत आहेत. ज्यामुळे अंधश्रद्धा बाळाच्या जन्माच्या आधीपासूनच घट्ट होते. सूर्यग्रहणांसारख्या नैसर्गिक घटनांचा गर्भावर होणारा विपरीत परिणाम व भीती तर सुशिक्षित स्त्रियांमध्ये अजूनही कमालीची दिसते. ‘जाऊ द्या ना! कशाला उगाच रिस्क घ्यायची…’ अशी मनोवृत्ती बळावत आहे. या सुशिक्षितांच्या अंधश्रद्धाळू मनोवृत्तीमुळे अशिक्षितांमध्ये त्यांना मान्यता मिळत आहे; परंतु त्यामुळे बाळाला अपाय होत जरी नसला, तरी खरा अंधश्रद्धेचा प्रवास बाळाच्या जन्मानंतर सुरू होतो. सुरळीत प्रसुतीसाठी उशीखाली एखादे हत्यार किंवा सुरी किंवा कोयता ठेवणे ज्यामुळे सुकर प्रसुती होते ही अंधश्रद्धा डिलिव्हरी रूममध्येच पाहायला मिळाली. तसेच गरोदर स्त्रियांच्या पायाला मंत्रून बांधलेला दोरा आमच्या आवश्यकतेनुसार सांगितलेल्या सिजेरियन शस्त्रक्रियेच्या कितीतरी वेळेला आडवा आला. बाळाला तीट लावणे, नजर काढणे, यामुळे बाळाची काळजी लक्षात येणे सहाजिक आहे; परंतु बाळांना आजारांपासून संरक्षित करण्यासाठी लसीकरणासारख्या उपाययोजना करण्याऐवजी बाळाला गरम लोखंडी सळ्यांनी पोटावर चटके देऊन डागून आणलेल्या लालबुंद झालेली बाळाची नाजूक पोटाची कातडी बघून मात्र माझे मन खिन्न होते. ज्या बाळावर कोणाची वाईट नजर पडू नये यासाठी धडपडणारे पालक व कुटुंबीय मात्र या अंधश्रद्धेपायी अघोरी कृत्य करायला मात्र सहजपणे तयार होतात. ज्या युगात पावलोपावली दवाखाने डॉक्टर उपलब्ध असूनही वैद्यकीय सल्ला घेण्याऐवजी पालक बाळाला चटके देण्यास कसे काय तयार होऊ शकतात त्याचे उत्तर अजूनही मला मिळालेले नाही.
आता मी आंनिसच्या इतर कामांतही भाग घेऊ लागले आहे. नुकत्याच एका बाबाचा आम्ही भांडाफोड केला. भोकर शहराच्या हद्दीत भोकर-उमरी रस्त्यावरील जकापुर फाट्याजवळ एका शेतात प्लॉट खरेदी करून एका भोंदूबाबाने बस्तान मांडलं. टीन-शेडमध्ये देवीची स्थापना करून लोकांचे संकटनिवारण करू लागला. नडलेले लोक दररोज त्याच्याकडे येत असतात, परंतु गुरुवार, शुक्रवार व रविवारी त्याचा दरबार भरत असे. आलेल्या व्यक्तीकडून नारळासाठी ५० रुपये, दानपेटीत टाकण्यासाठी ५० रुपये व तोडग्यासाठी ४०० रुपये असे एकूण ५०० रुपये तो आकारीत असे. तसेच त्या व्यक्तीला आठ वार्या करायला लावी. असे एकूण ४, हजार रुपये त्या व्यक्तीला बाबाच्या दरबारी द्यावे लागत. यासंदर्भात सम्राट हटकर सर सहकार्यांसोबत भोकरला आले होते. त्यांनी त्या भोंदूबाबाचा भांडाफोड केला आणि त्याच्यावर जादूटोणाविरुद्ध कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. त्या टीममध्ये माझा सक्रिय सहभाग होता.
पण अंनिसची कार्यकर्ती म्हणून या वैद्यकीय सेवेतूनच मला या अंधश्रद्धेविषयी आणखी खूप काम करण्याची इच्छा आहे आणि मी त्यासाठी सतत प्रयत्नशील राहीन.
–डॉ. सारिका शिंदे जावळीकर (नांदेड)
संपर्क : ९९७०२ २३३१६