लज्जा सांडोनियां। मांडितां दुकान….

सौरभ बागडे - 7350773427

भोळ्या-भाबड्या लोकांच्या देशात रोज नव्या ‘दिशाभूलतज्ज्ञा’चा जन्म होतो. ही ‘दिशाभूलतज्ज्ञ’ मंडळी सर्वच क्षेत्रांत आढळतात. लोकांचा भित्रेपणा आणि अडाणीपणा यांच्या भांडवलावर चालणार्‍या त्यांच्या धंद्याला मंदी माहीतच नसते. धर्माच्या नावाखालील वेडगळ समजुतींवर घाऊकपणे विश्वास ठेवण्याची ‘भरभक्कम’ परंपरा असलेल्या भारतात बाबा, बुवा, अम्मा मंडळी नंबर एकचे ‘दिशाभूलतज्ज्ञ’ आहेत. अशाच एका बाबाचे आयुष्य आणि कारनामे यावर आधारित ‘आश्रम’ ही वेब मालिका (Web Series) अलिकडेच म्हणजे 28 ऑगस्टला ‘एमएक्स प्लेअर’वर (Mx player) प्रदर्शित झाली.(या प्लेअरचे अ‍ॅप मोफत ‘डाउनलोड’ करता येते.) नॅशनल फिल्म अवॉर्ड विजेते हबीब फैसल यांनी या मालिकेची मूळ कथा लिहिली आहे. सामाजिक-राजकीय विषयांवरील चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक, पटकथा लेखक अशी ओळख असलेले प्रकाश झा आणि इतर चार लेखकांनी याची पटकथा लिहिली आहे. बर्‍याच दिवसांपासून मोठ्या पडद्यावरून गायब असलेला बॉबी देओल या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर आला आहे. त्याने या मालिकेतील मुख्य पात्र बाबा निरालाची भूमिका साकारली आहे; तर आदिती पोहनकर, दर्शन कुमार, राजीव सिध्दार्थ, चंदन रॉय संन्याल, अनुप्रिया गोएंका, तुषार पांडे हे सहकलाकार आहेत. ‘आश्रम’चे शूटिंग अयोध्या आणि आजूबाजूच्या परिसरात झाले आहे. या वेब मालिकेचा पहिला सिझन एकूण नऊ भागांचा आहे. एका भागाची लांबी 40-45 मिनिटांची आहे; म्हणजेच साधारणपणे पूर्ण लांबीचे तीन चित्रपट इतका आकार पहिल्या सिझनचा आहे. वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्यांतून क्वचित बाबा-बुवांची दांभिकता वाचायला, ऐकायला मिळाते. मात्र या मालिकेत बुवाबाजीचे अंतर्बाह्य चित्रण असल्याने ती प्रभावी ठरते. परंतु जी कथा एका पूर्ण लांबीच्या चित्रपटात मांडता येईल, ती लांबवणे, तिला बारीक-बारीक अनावश्यक उपकथानके जोडणे, काही ठिकाणी केलेले ‘स्पून फीडिंग’ यांमुळे मालिका थोडी कंटाळवाणी होते. अर्थात, असे असले तरी समाजसेवेचा बुरखा परिधान केलेल्या बाबाचा खरा चेहरा, त्याचे पंचतारांकित आश्रम व या सगळ्याला साजेसे संगीत आणि ‘निराला बाबा आणि मंडळी’ची कृष्णकृत्ये पाहताना प्रेक्षक अगदीच भयभीत होऊ नये, याचे भान राखून दिलेली प्रेमकथा, या सगळ्यांमुळे मालिका प्रेक्षणीय व श्रवणीय झाली आहे. पुढे काय घडते…? ही उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात शेवटपर्यंत टिकवून ठेवण्याचे आव्हान प्रकाश झा यांनी लीलया पार पाडले आहे. ‘एबीपी न्यूज’ हिंदीवर घेतलेल्या मुलाखतीत प्रकाश झा यांना, ‘तुम्ही रामरहीमवर मालिका बनवली आहे का?’ असा प्रश्न विचारला गेला. त्याचे उत्तर त्यांनी ‘नाही’ असे दिले. अर्थात, ही मालिका कमी-अधिक फरकाने सर्वच बाबा-बुवांशी संबंधित आहे. त्यामुळे ती बघताना अनेक बाबा-बुवांची नावे नजरेसमोर येतात.

कथेची सुुरुवात होते उत्तर प्रदेशातील काशीपूर शहरात. तिथल्या बाबाची ‘बाबा निराला – काशीपूरवाला, गरिबोंवाला’ अशी ओळख आहे. विंदा करंदीकरांनी म्हटल्याप्रमाणे ‘आता दुधाचा प्रश्न न उरला, काल नवी मधमाशी व्याली’ या मनोवृत्तीचे आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास वर्गातील त्याचे भक्त आहेत. ‘कोटेशन’ म्हणून वापरता येतील, असे अनेक संवाद मालिकेत आहेत. त्यातील एक संवाद असा – ‘भक्ती की जरूरत कमजोर और गरीब लोगो को ज्यादा होती हैं।’ अशा कमजोर, गरीब भक्तांची संख्या 44 लाख इतकी आहे. ते निराला बाबाच्या भक्तीत आकंठ कसे बुडाले, हे मांडणारी पम्मीची कथा (आदिती पोहनकर) प्रातिनिधिक आहे. पम्मी दलित कुटुंबातील कुस्तीगीर आहे. तिला व तिच्या कुटुंबाला दलित असल्याने उच्च जातीतील लोकांकडून हरतर्‍हेचा जाच सहन करावा लागतो आहे. अशाच एका जाचातून पम्मीचा भाऊ सत्तीला (तुषार पांडे) बाबा निरालाने मरता-मरता वाचवले आहे. त्यामुळे पम्मीला बाबा तारणहार वाटू लागलेत. ती आश्रमात नित्य हजेरी लावू लागलीय आणि घरातून पळून आश्रमात कायमची राहायला गेलीय. तिच्या हाताबाहेर गेलेल्या बाबाभक्तीच्या या व्यसनातून तिला बाहेर काढणारा सत्तीही भक्तीच्या दलदलीत फसला आहे.

‘बाबा निराला – काशीपूरवाला, गरिबोंवाला’ची ‘माणसे’ सर्वत्र आहेत. त्यांचा एकूण वीस मतदार संघात प्रभाव आहे. बाबा म्हणेल तो उमेदवार तेथून निवडून येऊ शकतो. त्यामुळे बाबाचा वरदहस्त आपल्यावर असावा, याकरिता राजकारण्यांचे प्रयत्न सुरू आहेत. बाबाने आपल्याला मदत नाकारली तर बाबाचा खरा चेहरा समोर आणावा, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. तो प्रयत्न करणार्‍या पोलीस अधिकारी शर्माची बाबाने केलेली कोंडी, असे अनेक प्रसंग बाबा तंत्रज्ञानाचा चलाखीने वापर करून कसा सर्वज्ञ झाला आहे, हे दाखवून देतात. ‘वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया’ हे प्र. के. अत्रे यांचे बुवा आणि बायांच्या संबंधावर प्रकाशझोत टाकणारे नाटक आहे. मात्र हल्ली बुवांचे वाढते प्रस्थ बघता ‘बुबा तेथे मते आणि त्यामुळे राजकारणीही’ असे चित्र दिसते, जे या मालिकेत अधोरेखित करण्यात आले आहे; मात्र केवळ इतकेच अधोरेखित केलेले नाही, तर पोलीस, प्रशासन व्यवस्था बाबाच्या हातातील कळसूत्री बाहुले बनले आहे, हे सुद्धा अधोरेखित करण्यात आले आहे.

नऊ भागांतील प्रदीर्घ सिझन एकाच बैठकीत पूर्ण करावा, इतका तो खिळवून ठेवणारा आहे. बाबा निरालाच्या भक्तीत आकंठ बुडालेली पम्मी बाबाच्या विरोधात का गेली? असा डोळे उघडणारा कोणता प्रसंग घडला? भोपस्वामीने केलेल्या खुनाचा तपास पूर्ण होऊन, मुलीला न्याय मिळाला का? यांसारखे अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवून पहिला सिझन संपतो व दुसर्‍या सिझनची उत्कंठा निर्माण करतो.

समाजातील एखाद्या समस्येपासून मुक्ती कशी मिळेल, याचे उपदेश न देता, ती निर्माण का झाली व कशी झाली याचे वास्तववादी चित्रण, हे प्रकाश झा यांच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य आहे. हेच वैशिष्ट्य ‘आश्रम’मध्ये देखील दिसून येते, म्हणजेच दिग्दर्शक प्रकाश झा यांनी समस्येविषयी ‘दिग्दर्शन’न करता प्रेक्षकांसमोर दर्पण धरला आहे आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रेक्षकाच्या विवेक बुद्धीवर सोपावली आहे.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]