सीमा पाटील -
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पोलिसांनी केले प्रबोधन
हळदी (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथे आषाढी अमावस्येनिमित्त ग्रामस्थांच्या गर्दीसमोर देवाला बकरा बळी देण्याची अघोरी प्रथा पूर्वापार चालत आली होती. याबाबत गावातील काही सुजाण नागरिकांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा कोल्हापूर येथील राज्य कार्यकारिणी सदस्या सुजाता म्हेत्रे यांच्याकडे ही प्रथा बंद व्हावी, अशी मागणी केली. त्यानंतर राज्य महिला सदस्या सीमा पाटील, ‘ वैज्ञानिक जाणिवा’च्या जिल्हाप्रमुख किरण गवळी यांनी कोल्हापुरातील सोन्या मारुती चौकातील पोलिस स्टेशनमध्ये जाऊन करवीर तालुका उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत गोसावी यांना भेटून ही अघोरी प्रथा बंद करण्यासाठी सहकार्य मिळावे, विनंती केली. गोसावी यांंनी हळदी ग्रामपंचायत सदस्यांना पोलिस स्टेशनला बोलवून घेतले, गावकरी आणि अंनिस यांची बैठक पोलिस स्टेशनमध्ये झाली. ‘अंनिस’ कार्यकर्त्यांसोबतच्या सुमारे दीडतास तासांच्या चर्चेनंतर ही प्रथा कायमची बंद करण्याचे आश्वासन ग्रामपंचायत सदस्यांनी दिले.
देवाला सार्वजनिक ठिकाणी उपस्थित जनसमुदायासमोर बकर्याचा बळी देण्याऐवजी त्याच पैशांचा विधायक विनियोग, म्हणून गरीब विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्यासाठी वापर करावा, असे ‘अंनिस’ कार्यकर्त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना सुचविले आणि त्यांनी ते राजीखुशीने मान्य केले.
त्याप्रमाणे गुरुवारी (ता. 28) सायंकाळी हळदी गावात आषाढी अमावस्येनिमित्त कोणत्याही प्रकारचा बोकड बळीचा धार्मिक विधी ग्रामस्थांतर्फे आयोजित करण्यात आला नाही. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आवाहनास; तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीच्या मागणीतून झालेल्या महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध उच्चाटन अध्यादेश 2013 आणि या कायद्याचे महत्त्व समजून घेऊन इथून पुढे असे कोणतेही कृत्य केले जाणार नाही, याची शंभर टक्के ग्वाही अत्यंत विवेकी मार्गाने देऊन, तसे पोलिस अधिकार्यांच्या समोर व्यक्त होऊन विधायक प्रतिसाद देत हळदी ग्रामस्थांतर्फे अनेक वर्षांपासून सुरू असलेली प्रथा कायमची बंद करण्यात आली आणि विज्ञानवादाकडे वाटचाल सुरू झाली.
या चर्चेत सरपंच विमल बाळासाहेब सुतार, उपसरपंच बाजीराव निवृत्ती पाटील, राजेंद्र महादेव बन्ने, प्रताप राजाराम पाटील, प्रशांत सुदाम कांबळे, संदीप परसू कांबळे, अमृत बाळासो सुतार, प्रदीप पांडुरंग पाटील हे सर्व सदस्य आणि तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष तानाजी दिनकर मगदूम आदी उपस्थित होते.
उपसरपंच बाजीराव पाटील आणि इतर सदस्यांनी याविषयी अत्यंत विवेकी मार्गाने सल्लामसलत करून इथून पुढे अशा कोणत्याही अंधश्रद्धेला आम्ही बळी पडणार नाही, असे आश्वासन दिले.
विशेष म्हणजे अशा अंधश्रद्धांना आता युवा वर्गातूनही खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच गावातील काही युवकांना असं वाटत होतं की, अशा अंधश्रद्धा बंद व्हाव्यात आणि म्हणून त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे अशा पद्धतीने मागणी केली होती
(ग्रामीण भागातील युवा पिढी जुन्या चाली-रीतीला विधायक पर्याय शोधून विज्ञानाच्या वाटेवर जात असल्याचे चित्र या उपक्रमातून सर्वांना जाणवत आहे.)
– सीमा पाटील, कोल्हापूर