अनुवाद : उत्तम जोगदंड -
चार्ली चॅपलिन जयंती विशेष
चार्ली चॅपलिन यांचे ‘ग्रेट डिक्टेटर’ चित्रपटातील शेवटचे भाषण
चार्ली चॅपलिन यांची भूमिका असलेला ‘ग्रेट डिक्टेटर’ हा चित्रपट खूप गाजला होता; विशेषतः यातील शेवटचे भाषण अत्यंत प्रभावी होते. आज विविध देशांमध्ये हुकुमशाही प्रवृत्ती डोके वर काढीत आहे व लोकशाहीची पद्धतशीरपणे गळचेपी करीत आहे. या पार्श्वभूमीवर त्या भाषणाची आठवण येणे अपरिहार्य ठरते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान प्रस्तुत करताना संसदेत केलेले भाषण आणि ‘ग्रेट डिक्टेटर’ या चित्रपटातील हे शेवटचे भाषण, ही दोन्हीही स्थल-कालाच्या सीमा ओलांडणारी भाषणे आहेत. लोकशाहीवर विश्वास असणार्या प्रत्येक व्यक्तीने हे भाषण मन लावून जरूर ऐकावे. एप्रिल महिन्याच्या 16 तारखेला चार्ली चॅपलिन यांची जयंती आहे. त्यानिमित्त हे भाषण सादर करीत आहोत.
“क्षमा करा; परंतु मला सम्राट व्हायचे नाही. मला त्याच्याशी काही कर्तव्यही नाही. मला कोणावरही राज्य करायचे नाही किंवा कोणावर विजय मिळवायचा नाही. मला प्रत्येकाला मदत करायला आवडेल- शक्य असल्यास- ज्यू, परकीय-काळे लोक-गोरे लोक. मानव असेच आहेत. आपण एकमेकांच्या सुखासाठी सोबत राहायचे आहे-एकमेकांच्या दुर्दशेसाठी नाही. आपल्याला एकमेकांचा तिरस्कार करायचा नाही आणि एकमेकांची घृणा करायची नाही. या पृथ्वीवर सर्वांसाठी जागा आहे आणि आपली सुंदर पृथ्वी समृद्ध आहे आणि सर्वांना पुरवणारी आहे. जीवनमार्ग मुक्त आणि सुंदर असू शकतो; परंतु आपण मार्गावरून भरकटलो आहोत.”
“लालसेने माणसांचे आत्मे विषारी करून टाकले आहेत, तिरस्काराने जगाला तटबंदीत टाकले आहे, परेड करत दुर्दशा आणि रक्तपाताकडे आपल्याला नेले आहे. आपण वेगाचा विकास केला आहे; पण आपण आपल्यालाच बंद करून टाकले आहे. रेलचेल करणार्या यंत्रांनी आपल्याला गरजवंत बनवून टाकले आहे. आपल्या ज्ञानाने आपल्याला निंदक बनवले आहे; तर आपल्या हुशारीने आपल्याला कठोर आणि निर्दय बनवले आहे. आपण विचार खूपच जास्त करतो; पण जाणीव मात्र फारच कमी असते. आपल्याला यंत्रांपेक्षा माणुसकीची अधिक गरज आहे. हुशारीपेक्षा आपल्याला दयाळूपणाची आणि कोमलतेची गरज आहे. हे गुण नसल्यास आपले आयुष्य हिंसक होईल आणि आपले सारे काही हरवून जाईल…”
“विमाने आणि रेडिओ यांनी आम्हा सर्वांना एकत्र आणि निकट आणले आहे. या शोधांचे एकूण स्वरूप माणसातल्या चांगलेपणासाठी आकांत करीत आहे – जागतिक बंधुत्वासाठी आकांत करीत आहे – सर्वांच्या एकीसाठी आकांत करीत आहे. आतासुद्धा माझा आवाज जगभरातील कित्येक दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचतो आहे – कित्येक दशलक्ष निराश पुरुष, स्त्रिया व मुलांपर्यंत पोहोचत आहे – निष्पाप लोकांचा छळ करणार्यांत आणि त्यांना तुरुंगात टाकणार्या व्यवस्थेचे बळी ठरलेल्या लोकांपर्यंत पोहोचत आहे.‘’
“जे मला ऐकू शकत आहेत, त्यांना मी सांगतो आहे, निराश होऊ नका. आता आपल्यावर जी दुर्दशा ओढवलेली आहे, ती अशा लोकांच्या लालसेमुळे ओढवलेली आहे, ज्यांना माणसाची प्रगती ज्या प्रकारे होत आहे, त्याला घाबरून ज्यांच्यात कटुता आलेली आहे. माणसांतील तिरस्कार निघून जाणार आहे आणि हुकूमशहा मरणार आहेत आणि लोकांकडून त्यांनी जी सत्ता घेतली आहे, ती त्यांना परत मिळणार आहे आणि जोपर्यंत माणसे मरतील, तोपर्यंत स्वातंत्र्य कधीही नष्ट होणार नाही.” “सैनिकहो! तुम्ही स्वतःला अमानुष लोकांच्या स्वाधीन होऊ देऊ नका – जे तुमचा तिरस्कार करतात – तुम्हाला गुलाम करतात – जे तुमच्या आयुष्याला पलटण बनवतात – तुम्ही काय करायचे ते सांगतात – तुम्ही काय विचार करायचा आणि तुम्हाला काय वाटले पाहिजे ते ठरवतात! जे तुमची कवायत करतात – तुमचा आहार देतात – तुम्हाला गुरा-ढोरासारखे वागवतात. कारण तुम्ही स्वतःचा चारा मिळवू शकत नाही. या अनैसर्गिक, यांत्रिक मन आणि यांत्रिक हृदय असणार्या यंत्रमानवांच्या स्वाधीन तुम्ही स्वतःला करून देऊ नका! तुम्ही यंत्रे नाही आहात! तुम्ही गुरेढोरे नाही आहात! तुम्ही मनुष्य आहात! तुमच्या हृदयात माणुसकीसाठी प्रेम आहे! तुम्ही तिरस्कार करीत नाही! प्रेम-रहित लोकच तिरस्कार करतात – प्रेम-रहित आणि अनैसर्गिक लोकच! सैनिकहो! गुलामगिरीसाठी लढू नका! स्वातंत्र्यारसाठी लढा!‘’
“संत ल्युक‘च्या 17 व्या प्रकरणात लिहले आहे – देवाचे राज्य माणसाच्या आतच आहे – एक मनुष्य किंवा माणसांचा गट नव्हे, सर्वच माणसांत! तुमच्यात! तुमच्यात, जनतेत शक्ती आहे – यंत्रे बनविण्याची शक्ती. आनंद निर्माण करण्याची शक्ती! तुमच्यात, जनतेत हे आयुष्य मुक्त आणि सुंदर बनविण्याची शक्ती आहे, आयुष्य अद्भुत, साहस बनविण्याची शक्ती आहे!“
“तर – लोकशाहीच्या नावाने – ती शक्ती आपण वापरूया – आपण सारे एक होऊया. नवीन जगासाठी आपण लढूया – एक अशा शालीन जगासाठी जे माणसांना काम करण्याची संधी देईल – जे युवकांना भविष्य आणि वयोवृद्ध लोकांना सुरक्षा देईल. या बाबींचे वचन देऊनच निर्दयी लोक सत्तेत आले आहेत. परंतु ते खोटे बोलतात! ते त्यांच्या वचनांची पूर्ती करत नाहीत आणि ते करणारही नाहीत!“
“हुकूमशहा स्वतःला मुक्त ठेवतात; परंतु लोकांना ते गुलाम बनवतात! आता आपण त्या वचनांची पूर्ती करण्यासाठी लढूया! विश्वाला मुक्त करण्यासाठी आपण लढूया – देशांच्या सीमा हटविण्यासाठी – लालसा दूर करण्यासाठी, तिरस्कार आणि असहिष्णुता दूर करण्यासाठी. आपण तर्कशक्ती असलेल्या विश्वासाठी लढूया, असे विश्व जिथे विज्ञान आणि प्रगती लोकांना आनंदाच्या मार्गाकडे घेऊन जाईल. सैनिकहो! लोकशाहीच्या नावाने, आपण सारे एक होऊया…!‘’