‘तरूणाईसाठी दाभोलकर’ चरित्र ग्रंथांचे शानदार प्रकाशन

प्रा. शशिकांत सुतार -

मंगळवार, दि. 12 जानेवारी स्वामी विवेकानंद आणि माता जिजाऊ यांचा जयंती दिन हा दिवस युवक दिन म्हणून भारतात साजरा होतो. या युवकदिनी युवकांना प्रेरित करणार्‍या ‘तरुणाईसाठी दाभोलकर’ या पुस्तकाचे शानदार प्रकाशन मराठा समाज कार्यालय, सांगली येथे पार पडले. साधना प्रकाशन पुणे, अंधश्रद्धा निर्मूलन समिती सांगली आणि मराठा समाज सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने हा समारंभ यशस्वी करण्यात आला.

अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या साहित्यात ‘तरुणाईसाठी दाभोलकर’ या पुस्तकाने मोलाची भर घातली आहे. या पुस्तकाचे लेखक प्रा. प. रा. आर्डे हे जवळपास 25 वर्षे दाभोलकरांचे सहकारी होते. त्यांचा ‘अंनिस’मध्ये सातत्याने सहभाग होता. दाभोलकरांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आणि चळवळीसाठी त्यांनी दिलेले योगदान याचे योग्य दर्शन या पुस्तकात आर्डे सरांनी प्रभावीपणे केले आहे. दाभोलकरांच्या हयातीत अनेक तरुण उशिरा का होईना चळवळीत सहभागी झाले. त्यांच्या मृत्यूनंतर तरुणाई मोठ्या संख्येने चळवळीत आली. या तरुणाईला दाभोलकरांनी चालवलेली विवेकी समाजाच्या निर्मितीसाठीची वैचारिक लढाई माहीत व्हावी व या रोमहर्षक लढाईतून त्यांनी प्रेरणा घ्यावी, हा हे पुस्तक लिहिण्यामागे सरांचा हेतू होता.

या प्रकाशन समारंभास, ‘साधना’चे विनोद शिरसाठ, हमीद दाभोलकर आणि लेखक आर्डे सर; तसेच ‘मराठा समाजा’चे अध्यक्ष उत्तमराव निकम प्रत्यक्षात हजर होते. प्रमुख वक्ते प्रख्यात सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी व हार्वर्ड विद्यापीठातील विचारवंत तरुण सूरज येंगडे हे ऑनलाईन हजर रहिले. ‘झूम’ ऑनलाईनद्वारे व ‘नरेंद्र दाभोलकर थॉट्स’ या फेसबुक पेजवर ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी व इतर सुजाण नागरिकांनी या प्रकाशन समारंभास मोठा प्रतिसाद दिला.

विवेकानंद, माता जिजाऊ व राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. वार्तापत्राचे व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.

लेखक प्रा. प. रा. आर्डे आपल्या मनोगतात म्हणाले,

हे पुस्तक तरुणांना प्रेरणादायी आहेच; या शिवाय ते सर्व थरांतील वाचकांना उपयुक्त आहे. दाभोलकरांच्या चरित्राबरोबर या पुस्तकात ‘अंनिस’चा 25 वर्षांचा समग्र रोमहर्षक इतिहास शब्दबद्ध करण्यात आला आहे. विचार, संघटन आणि कृती या या तीनही पातळ्यांवर चळवळ चालविणार्‍या समाजसुधारकांत दाभोलकरांचे स्थान महत्त्वाचे आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कार्यातून लाखो दलित बांधव आज परिवर्तनाच्या लढाईत कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे भविष्यकाळात धर्म, जात, लिंग आणि वर्ण या भेदांना मूठमाती देऊन मानवतेचा उद्घोष करणारे विवेकशील तरुण भविष्यकाळात दाभोलकरांना मृत्युंजय करतील.

भावी काळात समाजसुधारणेचा इतिहास लिहिणार्‍या इतिहासकारांना हे पुस्तक संदर्भग्रंथ म्हणून बहुमोल ठरेल.

या पुस्तकाच्या लिखाणासाठी व प्रकाशनासाठी शैला दाभोलकर, हमीद, मुक्ता, अरविंद पाखले, गिरमे सर आणि विनोद शिरसाठ यांचे बहुमोल सहाय्य झाले, याबद्दल सरांनी कृतज्ञता व्यक्त केली.

पुस्तकाचे प्रकाशक, साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ आपल्या भाषणात म्हणाले की, दाभोलकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाची चतु:सूत्री तयार केली होती. अघोरी अंधश्रद्धांना लगाम, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि अंगीकार, कालसुसंगत धर्मचिकित्सा आणि व्यापक परिवर्तन चळवळीशी जोडून घेणे, अशी ही चतु:सूत्री होती. या चतु:सूत्रीच्या आधारे त्यांनी केवळ 25 वर्षांत ग्रास रूटपासून ते उच्च वर्गापर्यंत जे कार्य केले, तसे कार्य भारतात अन्यत्र कुठेही घडलेले नाही. जगाच्या पाठीवर सुद्धा अन्यत्र असे सुनियोजित कार्य घडले असेल की नाही, याबद्दल मला शंका आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचे हे कार्य लोकांपर्यंत पोचविण्यासाठी त्यांनी जे साहित्य प्रसारित केले, तसे साहित्य भारतात अन्यत्र कोणत्याही भाषेत प्रसारित झालेले नाही. दाभोलकर म्हणत, अंधश्रद्धा विरोधातील ही लढाई ही दहा-पंधरा वर्षांची नाही, तर शतकांची लढाई आहे; पण ही लढाई भविष्यकाळात लढली जाणार आहेच आणि ती जगातील सर्व देशांत पसरणार आहे. जेथे-जेथे ही लढाई लढली जाईल, तेथे-तेथे दाभोलकरांच्या साहित्याचा उपयोग भविष्यकाळात होणार आहे.

यानंतर स्टेजवरील मान्यवरांच्या व सोनालीताई आणि सूरज यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने ‘तरुणाईसाठी दाभोलकर’ पुस्तकाचे शानदार प्रकाशन झाले. लोकांनी टाळ्यांच्या गजरात आपला आनंद व्यक्त केला.

डॉ. हमीद दाभोलकरांनी नुकत्याच घडलेल्या दोन महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख सुरुवातीला केला. त्यातील पहिली घटना म्हणजे औरंगाबाद खंडपीठाने यंत्र-तंत्राच्या वापराबाबत दिलेला निर्णय. जनहितार्थ अंभोरे नावाच्या एका नागरिकाने हनुमान चालीसा नावाच्या यंत्र-तंत्राने आपली फसवणूक झाली, अशी तक्रार औरंगाबाद न्यायालयात दाखल केली होती. 5500 रुपयाला विकत घेतलेल्या ‘हनुमान चालिसा’ या यंत्र-तंत्राने आपला काहीच फायदा झाला नाही, अशी त्यांनी तक्रार अर्जात लिहिले होते. कोर्टाच्या पद्धतीला कंटाळून अंबोरेंनी आपली तक्रार तीन वर्षांनी मागे घेतली; पण हा विषय सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. असे मत व्यक्त करून कोर्टाने स्वत: ती तक्रार पुढे चालू ठेवली आणि हनुमान चालीसा सारखे मंत्र-तंत्र जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हेगारीचे कृत्य ठरले, असा ऐतिहासिक निकाल दिला. हा निकाल म्हणजे समाजमनात डॉ. दाभोलकरांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित झाल्याची खूण आहे.

दुसरी घटना म्हणजे सांगली जिल्ह्यातील जांभुळणी या गावात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर घडलेला प्रसंग. पंधरा वर्षांपूर्वी या गावात बोकडबळी प्रथेविरोधात दाभोलकरांच्या सूचनेनुसार राहुल थोरात यांनी गावातील तरुणांना सहकार्य केले होते. तेच तरुण निवडणुकीत विजयी झाल्यानंतर सत्तारूढ होताना त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात जे फोटो लावले, त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज आणि महात्मा फुले यांच्याबरोबर डॉ. नरेंद्र दाभोलकरांचाही फोटो लावला. वरील दोन घटनांवरून अंधश्रद्धा निर्मूलनाचा डॉक्टरांचा विचार लोकांच्या अंतर्मनात कसा रुजला आहे, याची प्रचीती येते. तथाकथित धार्मिक शक्तीच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ लोक स्वीकारीत आहेत, याची ही साक्ष आहे. हा चळवळीचा विचार पुढे नेण्यासाठी ‘तरुणाईसाठी दाभोलकर’ हे आर्डे सरांनी लिहिलेले पुस्तक प्रेरणादायी ठरेल, त्यांचे मी अभिनंदन करतो.

सोनालीताईंनी आपण इतक्या लांब आणि दूर-दूर असूनही एखाद्या विषयावरचा संवाद करू शकतो, हे विज्ञानाच्या तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे, असे विचार आवर्जून व्यक्त केले. नरेंद्र दाभोलकर यांचा परिचय मी पुण्यात शिकत असताना झाला. विचार करण्याची ताकद त्यांच्याशी अनेक वेळा पुढे चर्चा करताना मिळाली. विज्ञाननिष्ठ माणसं अरसिक आणि कोरडी असतात, ही गैरसमजूत आहे. मी विज्ञाननिष्ठ राहूनही कविता करते आणि कविते ऐकते, म्हणून विज्ञानवादी माणसांबद्दल इतरांनी भीती किंवा गैरसमज बाळगण्याचे कारण नाही, असे त्या म्हणाल्या.

सोनालीताईंच्या भाषणातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ‘अंनिस’च्या परिघाबाहेरील माणसांबरोबर आपला संवाद वाढला पाहिजे, हा होता. या माणसांना विचार कसा करावा, हे नीट समजत नाही; मग जीवन कसे जगावे हे तर दूरच. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीने माझ्याबाबत नरेंद्रकाकांनी जे केले, त्याप्रमाणे आपल्या परिघाबाहेरच्या समाजातील लोकांशी संपर्क वाढवून संवाद करून, त्यांना आत्मपरीक्षणाची व चिकित्सक पद्धतीने विचार करण्याची प्रेरणा द्यावी. या प्रेरणेसाठी हे पुस्तक उपयोगी ठरेल, असे विचार व्यक्त करून आर्डे सरांचे हे पुस्तक लवकरात लवकर सर्वांपर्यंत पोचावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

सूरज येंगडे यांनी ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ यांच्या संपादकीय लेखनाने मला प्रेरित केले, असे सांगून त्यांच्या आग्रहामुळे मी हा कार्यक्रम स्वीकारला, अशी कृतज्ञता व्यक्त केली. कोणी बुवा-बाबा किंवा अंगात येणारे यांनी आपणा सर्वांना इतक्या दूरवरून एकत्र आणले नाही, तर हा विज्ञानाचा प्रताप आहे; पण नरेंद्र दाभोलकर यांचा खून करून आणि विचारवंतांना तुरुंगात टाकून सनातन्यांनी केलेल्या दुष्कृत्यांना समर्थपणे निष्प्रभ करणे, हे काम आपण सर्वांनी केले पाहिजे. सनातन्यांनी जे विष लोकांमध्ये पेरले आहे, ते सर्वत्र पसरू शकेल, या विषयावर आपण मात केली पाहिजे.

तरुणाईबरोबर संवाद साधत अंधश्रद्धेच्या अनेक प्रकारांबद्दल प्रबोधन करत सरांच्या पुस्तकातील लिखाण पुढे सरकत राहते. म्हणून हे पुस्तक युवकांद्वारे नव्या चळवळीला बळ देणारे ठरते, याबद्दल आर्डे सरांचे मी अभिनंदन करतो.

विवेक जेव्हा हरतो, तेव्हा धर्म प्रभावी होतो. भारतात धर्माच्या प्रभावामुळे ‘रिझन’ किंवा तर्कशक्ती मारली गेली. माझ्यासारखे अनेक लहानपणी धार्मिक अंधश्रद्धांना बळी पडत होते. पण जसजसा मोठा होत गेलो, तसतसा महात्मा फुले, आंबेडकर आणि पेरियार स्वामी यांच्यासारख्या विवेकवादाचे समर्थन करणार्‍या समाजसुधारकांच्या विचारांनी बदलत गेलो. पुढे आंतरराष्ट्रीय पातळीवर रिचर्ड डॉकिन्स, ख्रिस्तोफर रिचर्ड्स, जेम्स रँडी, सॅम हॅरिस या विवेकवाद्यांच्या विचाराच्या प्रभावाने मी पूर्ण विवेकवादी बनलो. आपल्याला धर्माची भीती लहानपणापासूनच समाजातून घातली जात असते. आपल्या विवेकवादी विचारशक्तीनेच आपण या भीतीवर मात करू शकतो. आर्डे सरांनी पुस्तकात नमूद केलेल्या सैलानी बाबाचा किस्सा जर मला लहानपणी वाचायला मिळाला असता, तर मी अशा बुवा-बाबांच्या खोट्या भोंदूगिरीवर कधीच विश्वास ठेवला नसता आणि माझ्या एका नातेवाईकाला होणार्‍या मानसिक त्रासाचे निराकरण हे अशा भोंदू बाबांकडे होत नसते, हे समजले असते. कारण माझ्या मामाच्या सांधेदुखीसाठी माझी आई त्याला बाबाकडे घेऊन गेल्यावर तो कोणताही वैज्ञानिक उपाय न सांगता फक्त दोन वर्षांनी आजार बरा होईल, इतकेच सांगत होता; ज्यामुळे मामाचा आजार कमी न होता बळावतच गेला. कारण सर्वसामान्य माणसाकडे असलेली भाबडी आशा हा असल्या बाबांचा खुराक असतो. कारण असे बुवा-बाबा हे सर्वसामान्य गरिबांना मानसिकरित्या संमोहित करूनच आपला फायदा करून घेत असतात.

अंधश्रद्धा ही फक्त एका धर्मापुरतीच मर्यादित नसून ती सर्व धर्मांतच आहे. यासाठी आपण आपल्या संविधानाने दिलेल्या कर्तव्याशी बांधील राहून प्रत्येकाने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार आणि अंगीकार करणे गरजेचे आहे. अंधश्रद्धा ही राजकीय प्रकारची सुद्धा आहे, हे नुकत्याच अमेरिकेत घडलेल्या घटनेवरून दिसून आले. पूर्व राष्ट्राध्यक्ष हे आपण निवडणूक हरलोच नाही, हे सांगण्यासाठी लोकांचा चुकीच्या पद्धतीने वापर करत होते, तशीच भारतातही धर्माच्या नावाखाली चाललेली अरेरावी ही समाजास घातक आहे. कारण ज्या सनातनी शक्तींनी डॉ. दाभोलकरांचा खून केला, त्या सनातनी शक्तींना आवर घालण्याची ताकद किंवा तयारी राजकीय पटलात दिसत नाही. जर्मनीचा हुकूमशहा हिटलर याने ज्यूंचा इतका छळ मांडला होता की, त्याच्या मृत्यूनंतर कित्येक वर्षे तेथील पालकांनी आपल्या एकाही मुलाला हिटलरचे नाव दिले नाही आणि अगदी त्याच्या उलट भारतात महात्मा गांधींचा खून करणार्‍या मारेकर्‍याच्या नावाने ग्रंथालय स्थापन करतात! हा विवेकवाद उघडपणे केलेला हल्ला आहे. कारण महात्मा गांधींचे मारेकरी आणि त्यांचे पुरस्कर्ते हे कधीच विवेकवादी विचारांचे नव्हते आणि नाहीत.

अंधश्रद्धेचा बळी ठरणारे दलित आणि त्याबरोबरच आदिवासी लोक हे सुद्धा प्रचंड तणावाखाली आपले जीवन जगत आहे, हे पुस्तकातील केलीबाई नावाच्या एका आदिवासी स्त्रीच्या कहाणीतून दिसून येते. अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या अंधश्रद्धांना खतपाणी घालून भांडवलशाही धोरण राबवून समाजाचे शोषण करणार्‍यांविरुद्ध विवेकवादी विचार करणार्‍या विचारवंतांना प्रबोधनासाठी हे पुस्तक नक्कीच उपयोगी पडेल.

नरेंद्र दाभोलकरांच्या कार्याचा गुरगौरव करणारे आणि प्रबोधन करणारे प्रा. आर्डे सरांचे हे पुस्तक फक्त मराठीतच नव्हे, तर इतर भाषांतही प्रकाशित झाले पाहिजे, असे सांगत सूरज येंगडे म्हणाले की, प्रत्येकाच्या हातात असायलाच हवे, असे हे पुस्तक सर्वांनी आवर्जून वाचावे.

समारंभाचे अध्यक्ष अ‍ॅड. उत्तमराव निकम यांनी दाभोलकर, आर्डे सर आणि ‘अंनिस’ यांच्याशी मराठा समाजाचा असलेला ऋणानुबंध व्यक्त केला. ‘मराठा समाज’ ‘अंनिस’च्या मदतीने समाजप्रबोधनाचे काम करत राहील याबद्दल ग्वाही दिली.

रुपाली आर्डे यांनी सर्वांचे आभार मानले. शशिकांत सुतार आणि आशा धनाले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तमरित्या केले.

प्रा. शशिकांत सुतार, सांगली


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]