मला झालेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख

सुभाष थोरात -

बाबासाहेबांचे नाव मी लहानपणी पहिल्यांदा ऐकले, ते आजोबांच्या तोंडून. आजोबा फॉरेस्ट हवालदार होते. त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती – त्यांना एक ब्रिटिश फॉरेस्ट अधिकारी खूप त्रास देत असे. एकदा त्याने आजोबांना विचारले, “तुला नोकरी कोणी लावली?” आजोबा हुशार होते त्यांनी सांगितले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी.” आजोबांनी असे सांगितल्यानंतर तो अधिकारी एकदम चकित झाला आणि त्यानंतर त्याने आजोबांना त्रास देणे पूर्ण बंद केले. त्यावेळी मला वाटले होते की, बाबासाहेब कोणीतरी मोठे अधिकारी असावेत. ओळख तेवढीच राहिली, पुढे सरकली नाही. कारण त्यावेळी बौद्ध धर्म स्वीकारला असला तरी आजी-आजोबांचे कुटुंब हिंदू धर्मपरंपरा पाळणारे होते. आजोबा रोज आंघोळ करताना हजारो देवांची नावे घेत. आजी काळुबाईची भक्त होती. तिच्या अंगात काळुबाई येत असे. भोरमध्ये (संस्थान) आणि आजूबाजूच्या परिसरात ती प्रसिद्ध होती. अनेक लोक तिच्याकडे येत. आजीचा माझ्यावर फार जीव, तसाच माझा तिच्यावर जीव. त्यामुळे मी आजीच्या पूर्ण प्रभावाखाली होतो, देवभक्त होतो. त्याचा फायदा असा झाला की, मी रामायण, महाभारत, पुराणे, शिवलीलामृत यांसारखी धार्मिक पुस्तके वाचून काढली. वाचनाची आवड त्यामुळे निर्माण झाली.

मी नववीत असताना आजीला कावीळ झाली. ती खूप बळावली. आजीला मुंबईला मावशीकडे नेले. आजीचे निधन झाले. त्यामुळे मी भोर सोडले आणि आई-वडिलांकडे गावी आलो. खेड तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील कान्हेवाडी बुद्रुक हे माझे छोटे गाव. या ठिकाणी अजूनही जातिभेदाची परिस्थिती थोड्याफार प्रमाणात टिकून होती. सवर्णाच्या घरी प्रवेश नसे. पाणी ओंजळीने प्यावे लागत असे. या गोष्टी भोरमध्ये नव्हत्या. परंतु शाळेतील मित्रमंडळी आणि इतर मुले असलं काही पाळत नसत. माझे मित्र तर त्यांच्या आई-वडिलांशी हुज्जत घालीत

माझे वडील शिक्षक होते. त्यांना राजकारणाची आवड होती. त्यांनी फुले-शाहू-आंबेडकर वाचलेले, ऐकलेले होते. मी त्यांच्याकडे आल्यानंतर ते मला फुले-आंबेडकर-शाहूंच्या गोष्टी सांगू लागले. त्यामुळे आमचे घर आजी-आजोबांच्या घरापेक्षा वेगळे होते. वडील जातिभेद जोपासणार्‍या रुढी-परंपरांविरुद्ध बोलत. बौद्ध धम्माचा उपदेश करीत. आजीचे निधन झाले, त्यावेळी मी गावी होतो. तिची माझी भेट झाली नाही. देवाची इतकी भक्ती करूनही अखेर तिची भेट झाली नाही, याचे मला खूप वाईट वाटले आणि देवाबद्दल संशय निर्माण झाला. त्यात वडील सांगत असलेल्या फुले-आंबेडकरांच्या कथांमुळे मी हळूहळू पुरोगामी विचारांकडे सरकू लागलो. नेमके अशावेळी मला धनंजय कीर लिखित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र वाचावयास मिळाले. त्यावेळी सरकारने असा निर्णय घेतला होता की, प्रत्येक शाळेत ग्रंथालय असावे. त्यामुळे एक कपाट आणि पुस्तके आमच्या गावाच्या शाळेने विकत घेतली. गावात शाळेला इमारत नव्हती. शाळा मारुतीच्या देवळात, मुक्ताबाईच्या देवळात भरत असे. त्यामुळे पुस्तकांचे कपाट कुठे ठेवावे, हा प्रश्न निर्माण झाला. तर ते कपाट आणि पुस्तके आमच्या घरी आली. आज इतक्या वर्षांनंतरही ते कपाट आणि त्यातली काही पुस्तके आमच्या घरी आहेत. या पुस्तकांमध्ये होते, धनंजय कीर लिखित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आणि माझी सर्वार्थाने ओळख झाली धनंजय कीर लिखित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रग्रंथातून. बाबासाहेबांबद्दल मी वाचलेले ते पहिले पुस्तक. हे पुस्तक सर्वार्थाने परिपूर्ण आहे. 1966 मध्ये 14 एप्रिल, बाबासाहेबांच्या जयंतीदिनी या पुस्तकाचे प्रकाशन झाले. पॉप्युलर प्रकाशनाचे हे पुस्तक चांगलेच गाजले आणि त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. तसेच इंग्रजी, जपानी, हिंदी या भाषांमधून त्याचे अनुवाद झाले आहेत. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे धनंजय कीर यांनी चरित्रग्रंथासाठी साधने गोळा करत असताना त्यांना डॉ. बाबासाहेबांशी काही गोष्टींबाबत चर्चा करता आली. त्यामुळे त्यांना त्यांचे व्यक्तिमत्त्व नेमक्या शब्दात जिवंत करता आले.

या पुस्तकात बाबासाहेबांच्या लेखनाची यादी; तसेच बाबासाहेबांवरील पूर्ण जीवनपट मांडला आहे. महाकाव्याला साजेशी ओघवती लेखन शैली; त्यामुळे हे पुस्तक वाचकांवर मोठा प्रभाव निर्माण करते.

या पुस्तकाचे गारूड माझ्या मनावर अजूनही कायम आहे आणि आजही नवीन मुलांना मी ते पुस्तक वाचण्याची शिफारस करतो. कारण या पुस्तकातील लिखाण भावनेची डूब असलेले आहे. ती खरे तर धनंजय कीर यांच्या लिखाणाची खासियत आहे. त्यांनी ज्या महापुरुषांची चरित्रे लिहिली आहेत, त्यात ते चरित्रनायकांशी भावनिकदृष्ट्या पूर्णपणे गुंतल्याचे आढळतात. त्यामुळे त्यांच्यावर टीकाही होते. पण ते असो. बाबासाहेबांचे हे चरित्र वाचताना वाचकही असा भावनिकदृष्ट्या गुंतत जातो आणि तो प्रभाव पुढे मिटता मिटत नाही. आपण मग त्या चरित्रनायकाचा इतर पुस्तकांतून, त्याने लिहिलेल्या पुस्तकातून शोध जारी ठेवतो.

पुढे, अर्थातच मी बाबासाहेबांबद्दल लिहिलले आणि बाबासाहेबांनी लिहिलेले ग्रंथवाचन आजतागायत चालू ठेवले आहे. प्रत्येक वेळी ते नवीन वाटते आणि मागे तर आपण वाचले होते; परंतु यातले हे आपल्या त्या वेळी लक्षात आले नाही, ही भावना होत राहते. पहिले प्रेम जसे कायम स्मरणात राहते, तसे धनंजय कीर यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रग्रंथाबद्दल म्हणता येईल. या पुस्तकातून बाबासाहेबांची ओळख झाली आणि बाबासाहेबांबद्दल आणखी अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली, यासाठी धनंजय कीर यांचे आभार मानले पाहिजेत.

अर्थात, मूळ प्रेरणा माझ्या वडिलांची. वर म्हटल्याप्रमाणे वडिलांनी पुरोगामी विचारांचे बीज माझ्या मनात रुजवले. फुले-आंबेडकर- शाहू यांचा दृष्टिकोन जातिव्यवस्थेचा नायनाट करण्याचा होता. त्यामुळे माझाही जातिव्यवस्थाविरोधी दृष्टिकोन घडत गेला. हा दृष्टिकोन पक्का करण्यात धनंजय कीर यांच्या बाबासाहेबांवरील चरित्रलेखनाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि या दृष्टिकोनाच्या प्रकाशात बालपण आणि शालेय वयात जातिव्यवस्थेसंदर्भात प्रत्यक्ष जे अनुभव आले, त्याकडे भावनिक न होता राजकीय दृष्टीने पाहू लागलो. उदा. परंपरेचे घोंगडे खांद्यावर घेऊन चालणार्‍या जनतेचा फार दोष नसतो, तर तो दोष आहे व्यवस्थेचा. ती बदलल्याशिवाय काही हाती लागणार नाही.

कधी-कधी वाटते, वाचनाची आवड नसती तर किंवा आवड असूनही विशिष्ट वयात धनंजय कीर लिखित डॉ. बाबासाहेबांचे चरित्र वाचावयास मिळाले नसते तर…? अर्थात ‘जर-तर’ला अर्थ नाही.

त्यावेळी धनंजय कीर यांच्या आंबेडकरांच्या चरित्रातील अनेक उतारे मी त्यावेळी लिहून काढले होते, पाठ केले होते. पुढील काळात; अगदी आजही हे उतारे वापरून मी वाद-विवादात समोरच्याला चकित करत आलो आहे. एकदा तुम्ही फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार समजून घ्यायला सुरुवात केली की, तुम्ही आपोआपच बुद्ध, चार्वाक, कबीर, चक्रधर, बसवेश्वर, तुकाराम यांच्या विचारांकडे वळता. बाबासाहेबांच्या लेखनात त्यांच्या विचारांचे अनेक संदर्भ येतात. बुद्ध, फुले, कबीर यांना तर त्यांनी गुरूच मानले आहे.

पुढे मार्क्सवादाकडे वळून कम्युनिस्ट झाल्यानंतर भारतीय संदर्भात मार्क्सवाद नीट समजून घ्यायचा असेल तर बुद्ध ते तुकाराम या ब्राह्मणवादाविरोधात झुंज घेणार्‍या थोर मानवांचे विचार आत्मसात करणे गरजेचे आहे. त्याशिवाय तुम्हाला ब्राह्मणवादी विचारसरणीच्या मानसिक गुलामीतून मुक्त होता येणार नाही.

विशिष्ट वेळी आणि विशिष्ट वयात तुमच्या आयुष्यात येणारी पुस्तके तुमच्या जीवनाला दिशा देऊ शकतात. माझ्यासंदर्भात धनंजय कीर लिखित बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रग्रंथाने मला पुरोगामी दिशेकडे वळवण्याची मोठी कामगिरी पार पाडली आहे.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]