डॉ. वीरा राठोड -

1. पुस्तकातल्या पानांमध्ये
पुस्तकातल्या पानांमध्ये
फुलपाखरे होती गोळा।
फडफडणारे पंख चिमुकले
शब्दांवरुनी घेती हिंदोळा॥1॥
इवल्याशा गोजिर्या देखण्या
रंगी-बेरंगी पंखांचा मेळा।
थव्या-थव्याने गवत फुलांवर
आनंदाचा सुख-सोहळा॥2॥
ओळी अशा जणू शेतांमधल्या
उगवलेल्या पिकांची रांग॥3॥
जणू वाहते नदीची धारा
पानोपानी ज्ञान अथांग ॥4॥
खोप्यामधून उडत येऊन
पिकांवरती बसती पाखरे।
तृप्त होती टिपून दाणे
जशी बालके गिरवून अक्षरे॥5॥
पुस्तकांशी करून मैत्री
फिरून येऊ उत्सववाटा।
पानोपानी भेटत जातो
जीवनाचा अमृतसाठा ॥6॥
2. अशी होते क्रांती

काठी घेऊन हातात गांधी
तडक निघाले थेट दांडी।
मीठ उचलले
क्रांती झाली देशभर ॥1॥
‘इन्कलाब…’चे दिले नारे
पेटून उठले तरुण सारे।
क्रांतीचे फुंकले रणशिंग
जळती मशाल भगतसिंग॥2॥
आदिवासींची बांधून मोट
इंग्रजांशी भिडला थेट।
उलगुलानचा हाती झेंडा
धरतीआबा बिरसामुंडा॥3॥
स्पर्श चवदार पाण्याचा
सूर मुक्तीच्या गाण्याचा।
संघर्षाचा भरला भाता
आंबेडकर समतेचा दाता॥4॥
लेखणी दिली दुबळ्या हाती
पेटवल्या ज्ञानाच्या वाती।
मस्तकात उजेड झाला
वंदन ज्योती-सावित्रीला॥5॥
3. मंद बुध्दीचा झाला ‘जिनिअस’

मंद बुध्दीचा होता बालक।
चिंतीत झाले त्याचे पालक॥
बोलायचा नाही राही मुका।
नुस्त्या करायचा हजार चुका॥
चुकता-चुकता शिकत गेला।
खूप मोठा वैज्ञानिक झाला॥
शाळेचा त्याला खूप कंटाळा।
डोक्यात त्याच्या प्रयोगशाळा॥
स्वभावाने होता विसरभोळा।
गणिताशी लागला त्याचा लळा॥
बुध्दीलाच मानायचा देव।
निसर्गाला लावायचा जीव॥
वाजवायचा तो व्हायोलीन।
नाव त्याचे आइनस्टाइन॥
अभ्यासाने मिळविले यश।
मंदबुध्दीचा झाला ‘जिनिअस’॥
4. शोधांची कहाणी

गरीब लोहाराचा होता पोर।
पुस्तकाचे शिवायचा कव्हर॥
पुस्तक शिवता शिकला विज्ञान।
बुध्दीच्या बळावर झाला महान॥
चुंबकातून केला आविष्कार।
निर्माण झाली त्यातून मोटार॥
(मायकल फॅराडे)
थॉमसला सदैव पडायचे कोडे।
घरचे दारचे म्हणायचे वेडे॥
हजारवेळा फसले शोध।
ज्यातून त्याने घेतला बोध॥
जिद्दीने उपसले अपार कष्ट।
साकार केली स्वप्नातली गोष्ट॥
ज्याचा वाटतो सर्वांंंंना हेवा।
जगाला दिला विजेचा दिवा॥
(थॉमस आल्वा एडिसन)
बाबांनी दिले उडणारे खेळणे।
कुतूहल जागवले खेळण्याने॥
लागला त्यांना एकच ध्यास।
पाखरांचा केला अभ्यास॥
पक्ष्यांसारखे लावले पंख।
हवेत उडणारे बणवले यंत्र॥
राईट बंधू ठरले महान।
ज्यांनी उडवले आकाशी विमान॥
(राईट बंधू)
5. नवे सारथी

नव्या युगाचे नवे सारथी
भविष्याची गाऊ आरती।
आम्ही आकार देऊ जगा
फुलवून नव्याने बागा ॥धृ॥
हा देश असे आमुचा
हे जगही असे आमचे।
ना कुणीच परके येथे
मानवाचे मित्र सच्चे
माणुसकीच्या त्या शत्रूंना
जा निरोप आमुचा सांगा ॥1॥
जातीच्या पाडून भिंती
धर्माची झुगारून नीती
देऊ आलिंगन सकलांना
बांधू विश्वासाची नाती
मोजून सागरी खोली
घालू साद उत्तुंग नभा॥2॥
हे जीवन नितांत सुंदर
डोईवर शुभ्र निलांबर
धरतीवर भरती उत्सव
आम्ही स्वप्नांचे सौदागर
नवी स्वप्ने पेरायाला
नसे कुठे अपुरी जागा ॥3॥
विज्ञानाचे पाईक बनुनी
अज्ञानाला काढू खणुनी
हिमतीला नसते सीमा
शौर्याची रचू कहाणी
तेजाने तळपणार्या
डोळ्यात सूर्याच्या बघा ॥4॥
6. आई, तुला सांगतो गंमत एक

आई, तुला सांगतो गंमत एक
सोड सगळी कामं, जरा माझं ऐक ॥धृ॥
रोजच असते तुझीच घाई
माझं कधीच ऐकत नाही
आराम कर थोडासा
हाताला लाव ‘ब्रेक’
सोड सगळी कामं, जरा माझं ऐक ॥1॥
एकदा एका कोकराला
भरली होती थंडी
त्याला त्याच्या आईने
शिवली नव्हती बंडी
कोकरू होते कुडकुडत
आई होती खूप रडत
ती बिचारी हळहळे
मी तिचे पुसले डोळे
पेटवून मी शेकोटी
दिला थोडा शेक
सोड सगळी कामं, जरा माझं ऐक ॥2॥
गल्लीतल्या कुत्र्याची
पिल्ली होती उपाशी
आजू-बाजूस बघितले
आई नव्हती त्यांच्यापाशी
पिल्लं दारात आल्यावर
तू झोपी गेल्यावर
मी त्यांना दूध दिले
घटा-घटा दूध पिले
दूध पिऊन खूष झाले
अन् माझे मित्र झाले
हाताने भरवला थोडासा केक
सोड सगळी कामं, जरा माझं ऐक ॥3॥
7. असे कसे होते?

असे कसे होते, असे कसे होते?
गवत खाऊन गाय दूध कशी देते?॥
असे कसे होते, असे कसे होते?
फुलांना रात्री रंगून कोण जाते?॥
असे कसे होते, असे कसे होते?
पक्ष्यांना हवेत कसे उडता येते?॥
असे कसे होते, असे कसे होते?
माशांना पोहायला कोण शिकवते?॥
असे कसे होते, असे कसे होते?
ढगांमध्ये पाणी कुठून बरे येते?॥
असे कसे होते, असे कसे होते?
बटन दाबताच लाईट कशी येते?॥
असे कसे होते, असे कसे होते?
उसात साखर कोण पेरून जाते?॥
असे कसे होते, असे कसे होते?
रडल्यावर डोळ्याला पाणी कसे येते?॥
असे कसे होते, असे कसे होते?
गुदगुल्या केल्यावर हसू कसे येते?॥
8. झाडे मोठी जादूगार

झाडे मोठीच जादूगार।
सावली त्यांची थंडगार॥
प्राणी येती, पक्षी येती।
घटकाभर विसावती॥
अंग त्याचे हिरवे-हिरवेगार।
कडक उन्हाला देती आधार॥
असले जरी वेडेवाकडे।
प्रेम करी सर्वांंवर बापुडे॥
खेळू देती बागडू देती।
झाडं मायेने कुशीत घेती।
कुणास खोपा, कुणास झोका।
फांदी हलवून देती हाका॥
झाडांकडे हजार कला।
रंग बदलता येती त्याला॥
झाडांचे किती मोठे मन!
फुकट वाटतात ऑक्सिजन॥
झाडे देतात रंगीत फुले।
फळे खाऊन खूष मुले॥
जादू करतात पृथ्वीवर।
आनंद पेरतात सृष्टीवर॥
एक-एक झाड जपूया।
झाडांशी मैत्री करूया॥
9.महाभूत – सृष्टीदूत

तापून-तापून सूर्याचा
चढून गेला तेज पारा।
किती पळू पळून-पळून
थांबतो म्हणाला वारा॥1॥
झुळझुळ, मंजुळ वाहणारे
वैतागून म्हणाले पाणी।
वाहून-वाहून थकलो बाबा
ऐकवा मला गाणी ॥2॥
पाने म्हणाली झाडांची
खूप झाली सळसळ।
दुखतंय सारं अंग-अंग
झोपतो गडे थोडा वेळ ॥3॥
आकाश नि माती म्हणाले
घेतो आता आम्ही कट्टी।
माणसांचा आलाय राग
महिनाभरची देतो सुट्टी ॥4॥
घाबरून गेले अवघे जन
करू लागले विनवणी।
वंदन तुम्हा सृष्टीदूतांनो
गातो आम्ही तुमची गाणी ॥5॥
10. असे लागती शोध

झाडावरचे सफरचंद
हळूच पडले खाली।
गुरुत्वाकर्षणाची कल्पना
आयझॅक न्यूटनला आली॥1॥
बेंजामिनने वादळात
उडविला होता पतंग।
कडाडली वीज आणि
हाताला लागला करंट ॥2॥
चुलीवरच्या केटलीचे
उडत होते झाकण।
त्यातून कळली जेम्सला
वाफेमधली ताकद ॥3॥
11. चला मुलांनो

चला मुलांनो खेळू खेळ।
भुर्रकन निघून जाईल वेळ॥
चला मुलांनो गाणे गाऊ।
आनंदाच्या गावी जाऊ॥
चला मुलांनो काढू चित्र।
निसर्गाला बनवू मित्र॥
चला मुलांनो करू प्रार्थना।
वंदन करूया महामानवा॥
चला मुलांनो करू अभ्यास।
विज्ञानाची धरूया कास॥
चला मुलांनो होऊ दूत।
या मातीचे खरे सपुत॥
12. शर्थ बांधू चल

अंगार पचव तू खोल
उजळेल तिमिर घनघोर।
सूर्यास गवसणी घाल
जरी असेल कोसो दूर ॥1॥
होता आले तर हो तू
वाहते नदीचे पात्र ।
खडकाला देणे धडका
हे शक्तिपीठाचे सूत्र ॥2॥
अडवतील वाट शर्थीची
नियतीचे वादळ वारे।
परी तुफान होऊन तूही
काळाला तुडवित जा रे ॥3॥
मग दिसेल: तेज पुंजका
जो विशाल एकचि एक
त्यासमान तळपणारा
जिंकतो तोचि नेक ॥4॥
डॉ. वीरा राठोड
जन्म ः 6 फेब्रुवारी, 1980
सावळी तांडा, जिंतुर तालुका, परभणी जिल्हा, महाराष्ट्र
हे एक मराठी कवी आहेत. त्यांचा जन्म एका लमाण-बंजारा कुटुंबात झाला. आरंभीचे शिक्षण आश्रम शाळेत झाले. त्यांचे दोन कवितासंग्रह व एक लेखसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. ‘सेनं सायी वेस’ म्हणजेच ‘सर्वांचं कल्याण होवो,’ असा ज्याचा अर्थ आहे. ही बंजारा लमाण जमातीची प्रार्थना आहे. व ‘पिढी घडायेरी वाते’ हा बंजारा बोलीभाषेतल्या कवितांचा संग्रह आहे. ‘हस्तक्षेप’ हा लेखसंग्रह त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या पहिल्या कविता संग्रहास दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीचा राष्ट्रीय साहित्य अकादमी युवा पुरस्कार- 2015 मिळाला आहे.
स्वतः सामाजिक कार्यात सहभागी राहून मानवतावादी दृष्टिकोनातून व लोकशाहीच्या संवर्धनासाठी ते जाणीवपूर्वक आदिवासींच्या व भटके, विमुक्त, दलित, वंचितांच्या प्रश्नावर सातत्याने लेखन करीत असतात.