डॉ. नितीन शिंदे - 9860438208
कोणत्याही भविष्यवेत्त्याने, ज्योतिषाने अथवा वास्तुतज्ज्ञाने भारतीय पातळीवर किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर कोरोनाबाबतचे भविष्य वर्तवलेलं नव्हतं, हे लक्षात घेण्याची गरज आहे.
भविष्यामध्ये अवैज्ञानिक गोष्टींचा प्रचार आणि प्रसार करणार्यांपासून सर्वसामान्यांची सुटका करणं हे महत्त्वाचं काम आहे. विज्ञान आणि संशोधनाकडे सकारात्मक द़ृष्टीने पाहणं गरजेचं आहे, हे कोरोनाचं आपल्याला तळमळीनं सांगणं आहे.
‘कोरोना’ हे नाव सध्या चांगलंच सुपरिचित झालेलं आहे. चांगल्या अर्थाने नक्कीच नाही. कोरोना या विषाणूने निर्माण केलेल्या ‘कोव्हिड-19’ या आजाराने आज सर्व जग अचंबित झालेलं आहे. जात, धर्म, लिंग, देश यांच्या सीमारेषा त्याने कधीच ओलांडलेल्या आहेत. मी यामध्ये ‘दिशा‘ पण टाकतो. सर्व दिशांनी कोरोना गावागावांत आणि घराघरांत शिरलेला आहे. वास्तुतज्ज्ञ आणि त्याच्या सल्ल्यानुसार ज्याने घर बांधलेलं आहे, ते सुध्दा याला अपवाद नाहीत. याबद्दल कोणाचच दुमत असेल, असं मला वाटत नाही.
कोणत्याही भविष्यवेत्त्याने, ज्योतिषाने अथवा वास्तुतज्ज्ञाने भारतीय पातळीवर किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर कोरोनाबाबतचे भविष्य वर्तवलेलं नव्हतं, हे लक्षात घेण्याची गरज आहे. मी आंतरराष्ट्रीय पातळीवर एवढ्यासाठीच म्हटलं, कारण तथाकथित जागतिक ज्योतिषी नॉस्ट्रडॅमस किंवा वेदोक्त ज्योतिषाच्या नावे भविष्यात काहीतरी छापून येण्याची शक्यता आहे, म्हणून सुरुवातीलाच हे स्पष्ट करतो. या भविष्यवाणीसाठी श्लोक, वेद, पुराण याचा दाखला पण दिला जाण्याची शक्यता आहे.
कोरोना ही नैसर्गिक आपत्ती संपूर्ण जगावर आलेली आहे. चीनमध्ये तिचा उगम झालेला असला, तरी ती चीनचीच निर्मिती आहे, असं आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिकृतरित्या मानलं जात नाही. पुराव्याशिवाय कोणतंही वक्तव्य करणं, हे बेजबाबदारीचं असल्यामुळे अजून तरी चीनवर अधिकृतरित्या ठपका पडलेला नाही.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी लॉकडाऊनसारख्या माध्यमाचा वापर करणारी यंत्रणा ही पूर्णपणे मानवनिर्मित आहे. अत्यंत प्रतिकूल आणि आणीबाणीच्या प्रसंगी, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केंद्र सरकार, राज्य सरकार, वैद्यकीय यंत्रणा, डॉक्टर, नर्स, स्वच्छता कर्मचारी आणि पोलीस जीव ओतून काम करत आहेत. ग्रह-तारे किंवा दिशा बघून ते बिलकूल काम करत नाहीत, हे वास्तव आहे. कोणत्याही ज्योतिषाचा अथवा वास्तुतज्ज्ञाच्या सल्ला या यंत्रणांनी घेतलेला नाही. राज्य पातळीवर, केंद्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरसुध्दा अशा प्रकारची अवैज्ञानिक सल्लागार समिती कोठेही कार्यरत नाही. प्रत्यक्षात फिल्डवर काम करणार्यालाच वास्तवतेचं भान असतं, घरात बसून पोथ्यापुराणांचा हवाला देणार्यांना याचं महत्त्व कसं काय कळणार म्हणा!
‘गो कोरोना’ म्हणून, गोमूत्र पिऊन, गोबर खाऊन, जप करून, टाळ्या वाजवून, दिवा लावून, कापूर जाळून आणि मृत्युंजय यंत्राचा गवगवा करून तो कदापिही जाणार नाही. त्याला घालवण्यासाठी लसच उपयुक्त ठरणार आहे आणि ती संशोधनातूनच मिळणार आहे, हे निर्विवाद. ही लस वरून कोठूनही पडणार नाही, तर तिला माणूसच शोधून काढणार आहे.
नोकरी लागणे, आजारी पडणे, लग्न न होणे, कर्जबाजारी होणे यांना ग्रह-तारे कारणीभूत ठरतात, असं सांगणारे ज्योतिषी; तसेच दिशा आणि वास्तू कारणीभूत ठरतात, असं सांगणारे वास्तुतज्ज्ञ हे दोघेही सर्वसामान्यांच्या भावनांशी खेळतात. सध्या मात्र हे दोघेही कोमातच गेलेले आहेत. वास्तू लाभदायक ठरते आणि ग्रह-तारे माणसाचं भविष्य ठरवतात, असं सांगून वैज्ञानिक संकल्पनांचा गैरवापर करणरे हे वास्तुविशारद आणि ज्योतिषी अक्षरश: उघडे पडलेले आहेत.
वास्तुपुरुष असतो आणि ज्या ठिकाणी घर बांधतात, त्या जागेमध्ये तो असतो. त्याच्या निवारणासाठी वास्तुतज्ज्ञाची गरज असते, असं सांगणार्या वास्तुतज्ज्ञाच्या वास्तुपुरुषाला, अत्यंत नगण्य असणारा नॅनो आकाराचा कोरोना व्हायरस सध्या तरी लोड गेलेला आहे, असंच म्हणावं लागेल. स्वयंपाकघर आग्नेयेला बांधलं की, सूर्याची किरणे जंतूचा नाश करतात, असं अवैज्ञानिक बरळणार्या प्रवृत्तींना, कोरोनाची एंन्टी सर्व बाजूंनी होते, हे सांगावं लागेल. स्वयंपाकघर आग्नेयेला बांधा, असं सांगणार्यांच्या आणि बांधणार्याच्या घरातच कोरोनाचे विषाणू शिरलेले असण्याची दाट शक्यता आहे. कोरोना हा विषाणू पृथ्वीवरचाच आहे. तो सर्व बाजूंनी आलेला आहे. एवढासा विषाणू थोपवण्याचं आपल्याला जमत नाही आणि हे ज्योतिषी आणि वास्तुविशारद माणसाच्या आयुष्यात घडणार्या चांगल्या-वाईट घटनांचा संबध ग्रह-तारे आणि दिशांचा संबंध जोडायला निघालेले आहेत.
वास्तूचा किंवा घराचा संबंध हा जागेची उपलब्धता, तिचे मजबूतपण, वास्तूमध्ये असणार्या सोयी-सुविधा, सुंदरपणा, घर बांधणार्याची आर्थिक कुवत आणि इंजिनिअरचं स्कील यापुरतंच महत्त्वाचं आहे. हे ज्ञान देणारा इंजिनिअरच खरा तज्ज्ञ आहे. वास्तू कशी असायला पाहिजे, हे सांगणारे एपसळपशशी ळी ींहश ीळसहीं र्रीींहेीळीूं. स्वत:ला वास्तुतज्ज्ञ समजणारा हा कधीच वास्तूमधील तज्ज्ञ असूच शकत नाही. तज्ज्ञ असल्याचा त्याने भास निर्माण केलेला आहे. सर्वसामान्य जनता त्यांनाच वास्तूचे तज्ज्ञ म्हणून समजत आहे, हे दुर्दैव!
संशोधन ः
संशोधन करणं किती महत्त्वाचं आहे, हे आज कोरोनाने दाखवून दिलेलं आहे. कोणतीही गोष्ट संशोधनातून सिध्द करायची असेल तर किती कठीण बाब असते, हे कोरोनाच्या निमित्ताने आपण अनुभवत आहोत. डिसेंबर 2019 मध्ये विषाणू सापडून आज जवळपास पाच महिने झाले, तरी लस सापडलेली नाही. सगळेजण कोणीतरी संशोधन करेल आणि आपली सुटका होईल, या विश्वासावरच मार्गक्रमण करत आहेत. आपल्याकडे संशोधनाच्या पातळीवर सगळंच आलबेल आहे. आपल संशोधन फक्त गाय, गोमूत्र आणि गोबर यावरच आहे.
अस्तित्वात असलेल्याचा शोध घेणं तुलनेनं सोप आहे. पण नसणार्याचा शोध घेण महाकठीण काम. खर्पींशपींळेप आणि ऊळीर्लेींशीू यामधील फरक कोरोनाच्या निमित्ताने जाणवतो. कोरोनाचा विषाणू सापडणं तुलनेनं सोपं आहे. पण त्यावर लस शोधून तुलनेनं अत्यंत जटिल होत आहे. त्यासाठी कोरोना विषाणूचे सर्वांगाने संशोधन करावं लागणार. त्याचे गुणधर्म तपासावे लागणार. त्या गुणधर्माला मारक ठरणारी औषध विकसित करावी लागणार. एखादी लस शोधलीच तर तिची चाचणी घेण्यासाठी उंदीर, गिनीपिग किंवा माकड या प्राण्यांचा बळी दिला जाणार. प्राण्यांवरील चाचणी यशस्वी झाल्यानंतरच माणसावर चाचणी केली जाणार. तद्नंतरच अधिकृत लस म्हणून बाजारात येणार. यासाठी बराचसा अवधी लागणार. ही लगेचच होणारी प्रक्रिया नाही. संशोधनातून सिध्द होण्यासाठी भरपूर कालावधी लागतो, धीर धरावा लागतो; पण आपल्याकडे कॅन्सर, कुत्रे चावले, साप चावला, कावीळ, हार्ट अॅटॅक यावर गावठी उपचार करणारी अनेक ठिकाणं (कु) प्रसिध्द आहेत. कोणत्याही चाचणीचा वापर न करता पेशंटला औषध दिले जाते. शिक्षित आणि उच्चशिक्षितसुध्दा यांच्याकडे हजेरी लावतात. पेशंट एकाचवेळी डॉक्टर आणि गावठी दोन्हीही उपचार घेत असल्यामुळे, बरं झालं तर गावठी भाव खाऊन जातो. भविष्यात सुध्दा हा धोका आहेच.
ऊठसूट कोणीही म्हणतो, ‘आम्ही हे संशोधनातून निर्माण केलेलं आहे.’ असं म्हणत असेल तर त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिकृतता लागते. केवळ आपण म्हणून ते चालत नाही. ते सत्य सार्वजनिक असावं लागतं. अवैज्ञानिक दावे करणारे ज्योतिषी आणि वास्तुतज्ज्ञ यांच्याकडे ती कुवत नसते.
‘जगा आणि जगू द्या’, ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’, असं म्हणायचा अधिकार आज तरी फक्त सरकार, पोलीस, डॉक्टर, संशोधक आणि अन्नधान्याची निर्मिती करणारा शेतकरी यांनाच आहे. ही भारतीय आणि जागतिक पातळीवर सिध्द झालेली बाब आहे. राजा, मानाचा, पावणारा, जागृत हे अलंकारिक शब्द फक्त संशोधकांनाच चिकटवले जाऊ शकतात. ज्यांच्यामागे हे शब्द चिकटवलेले आहेत, ते सगळे आज कुलूपबंद झालेले आहेत.
सर्वसामान्यांचा विज्ञानाकडे पाहण्याचा द़ृष्टिकोन तितकासा चांगला नाही. त्यामुळे अवैज्ञानिक दावे करणार्यांचा आणि दैववादी द़ृष्टिकोन पसरवणार्यांचा समाजावर जास्त प्रभाव आहे. असे दावे करणारे सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांच्याकडे उपाय असल्याचा आभास निर्माण करतात. त्यांची साधी, सोपी आणि भावनिक भाषाशैली सर्वसामान्यांवर प्रभाव टाकते.
विज्ञान किचकट आहे, असं म्हणणार्या सर्वसामान्यांचे आज अनेक वैज्ञानिक शब्द पाठ झालेले आहेत. कोरोना, कोरोना टेस्ट, सोशल डिस्टसिंग, कॉरंटाईन, होम कॉरंटाईन हे त्याची साक्ष देतात. किचकटसुध्दा अंगवळणी पडू शकतं, हे कोरोनाने सिध्द केलेलं आहे. विज्ञान सर्वसामान्यापर्यंत पोचलं तरच अवैज्ञानिक दावे करणारे उघडे पडू शकतात; अन्यथा नाही.
‘डॉक्टरांना देव म्हणा आणि रुग्णालयालाच मंदिर म्हणा,’ असा एक ट्रेेंड सध्या जोरात सुरू आहे. परंतु समाजाची मानसिकता विचारात घेतली, तर भारतात तरी हा ट्रेेंड फार काळ चालणार नाही. एकदा का कोरोनावर लस उपलब्ध झाली (लस शोधणारे बाहेरचे असणार!) की, आपलं परावलंबित्व संपलं आणि डॉक्टरांचं गुणगौरवत्वही तात्काळ समाप्त. ‘गरज सरो, वैद्य मरो’ याची प्रचिती येण्यासाठी डॉक्टरांनाही फार काळ वाट पाहायला लागणार नाही. अर्थात, डॉक्टरांना याची कल्पना आहेच आणि सर्वसामान्यांच्या तर हे अंगवळणीच पडलेलं आहे.
महत्त्वाची धोक्याची सूचना ः
कोरोनामुळे सर्वसामान्यांना प्रचंड फटका बसलेला आहे. आर्थिक आणि मानसिक दोन्ही पातळीवर. पण एकदा का लस तयार झाली की, वास्तुविशारद आणि ज्योतिषांना कोरोनाच्या रूपाने एक आयतंच कोलीत मिळणार.
आपल्या वास्तूची किंवा घराची कोरोनापासून मुक्ती करण्यासाठी वास्तुविशारद एखादी वस्तू बाजारात आणणार. कुबेर यंत्र, शनिसुरक्षा यंत्र, लक्ष्मी यंत्र यामध्ये आणखी एका नवीन यंत्राची भर पडणार. कोरोना यंत्र! हे यंत्र कसं लावायचं हे सुध्दा पाल्हाळ लावून ते सांगणार. प्रवेशव्दारासमोरील भिंतीवर, थोडंसं उजव्या बाजूला, चांगला दिवस (मुहूर्त) बघून, विधिवत पूजा करून हे यंत्र लावा म्हणून सांगणार. मुहूर्त बघणार्या ज्योतिषाचा आणि पूजा करून देणार्या पुरोहिताचा रोजगार सुरू. बिनभांडवली! आज आपल्याला हे हास्यास्पद वाटेल. पण हे करणारी पिढी भविष्यात येणार. तशी पिढी निर्माण करायची की नाही, हे आज आपल्या हातात आहे.
ज्योतिषी, वास्तुतज्ज्ञ, पुरोहित यांच्याबरोबरच ‘जेम्स स्पेशालिस्ट’वाले पण आपला बिझनेस सुरू करणार. कोरोना अंगठीच्या रूपाने!
मुहूर्त काढणारे ज्योतिषी, कोरोना यंत्रवाले वास्तुविशारद, यंत्राची पूजा घालणारे पुरोहित आणि कोरोना अंगठीवाले जेम्स स्पेशालिस्ट हे सर्वजण भविष्यातील कोरोनाचे ‘लाभार्थी’ असणार. विनाभांडवल! सरकारी पातळीवर कोणतीही योजना राबवलेली नसताना! कोणत्याची प्रकारची कागदपत्रे जवळ नसताना! भविष्यामध्ये कोरोनाबद्दल अनभिज्ञ असणारी तत्कालीन पिढी यामध्ये भरडली जाणार, हे निर्विवाद सत्य आहे.
भविष्यामध्ये अवैज्ञानिक गोष्टींचा प्रचार आणि प्रसार करणार्यांपासून सर्वसामान्यांची सुटका करणं हे महत्त्वाचं काम आहे. विज्ञान आणि संशोधनाकडे सकारात्मक द़ृष्टीने पाहणं गरजेचं आहे, हे कोरोनाचं आपल्याला तळमळीनं सांगणं आहे.