चमत्कारांच्या दाव्यांना भुलणार्‍यांचे मानसशास्त्र…

डॉ. हमीद दाभोलकर -

माझा एक उच्चविद्याविभूषित आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या पदावर काम करणारा मित्र आहे. तो लहानपणापासून अभ्यासू आणि विज्ञानवादी विचारसरणीचा राहिला आहे. खूप वर्षांनी मला तो भेटला, तेव्हा त्याने मला स्वत:ची एक गोष्ट सांगितली. काही वर्षांपूर्वी त्याच्या लहान मुलाला अचानक कर्करोगाचे निदान झाले. मित्र मुळातून विज्ञानवादी असल्यामुळे त्याने सर्वोत्तम म्हणता येतील, असे आधुनिक शास्त्रीय उपचार मुलाला उपलब्ध केले. हे सांगतानाच त्याने मला असे देखील सांगितले की, त्या वेळी मी माझ्या मुलाचा कर्करोग बारा व्हावा म्हणून आधुनिक वैद्यकीय उपचारांबरोबर मित्र-मैत्रिणी सांगतील, त्यामधले अनेक उपचार केले, मंत्र म्हटले, गंडे-दोरे बांधले, नैनितालजवळ एक बाबा आहेत, त्यांनादेखील भेटून आलो. काही करून चमत्कार व्हायला पाहिजे आणि माझा मुलगा बरा व्हायला पाहिजे, याशिवाय मला त्यावेळी दुसरे काहीही सुचत नव्हते. तो पुढे म्हणाला की, आज माझा मुलगा आधुनिक उपचारांनी बरा झाला आहे; पण मागे वळून पाहताना मला आश्चर्य वाटते की, इतका विज्ञानवादी असूनदेखील मी त्या वेळी काही चमत्कार होईल आणि आपला मुलगा बरा होईल, या विचारांमध्ये कसा काय वाहून गेलो? लोक चमत्कारांना का बळी पडतात, याच्या मानसशास्त्राचा विचार करताना माझ्या मित्राचे उदाहरण समजून घेण्यासारखे आहे.

ते समजून घेण्यासाठी आपल्याला आधी माणसाच्या मेंदूविषयी काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे. माणसाच्या मेंदूमध्ये एक भावनांचा मेंदू असतो, ज्याला ‘लीम्बिक कॉर्टेक्स’ म्हणतात. ढोबळ मानाने हा मेंदूचा भाग हा प्राण्यांच्या मेंदूच्या जवळ जाणारा असतो. उत्क्रांतीमध्ये याच्यावर निर्माण झालेला विचारांचा मेंदू ‘निओ कॉर्टेक्स’ असतो. जेव्हा मानवी मन ताण-तणावाने ग्रस्त असते, तेव्हा विचारांच्या मेंदूवर जणू एक ‘काळी सावली’ पडल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. मोबाईल जसा खूप सूचना एकच वेळी दिल्यावर hang होतो, तसे विचारांच्या मेंदूचेदेखील होते. चमत्कारांच्या दाव्याला बळी पडणार्‍या बहुतांश लोकांचे विचार करणारे मेंदू हे hang किवा भावनिक मेंदूकडून highjack झालेले असतात. दिसताना आपल्याला एक विचारी, विज्ञानवादी व्यक्तिमत्त्वाचा माणूस दिसतो; पण त्याचा मेंदू मात्र फक्त भावनेच्या पातळीवर काम करत असतो. या भावनिक मेंदूच्या राज्यात कार्यकारणभाव किंवा पुरावा तितका विश्वास, हे नियम फारसे चालत नाहीत. चमत्कारावर विश्वास ठेवणार्‍या बहुतांश लोकांच्या बाबतीत हेच घडत असते. वर, माझ्या ज्या मित्राच्या बाबतीत देखील हेच झाल्यामुळे त्याला आयुष्यात टोकाच्या ताणतणावांना सामोरे जायची वेळ आली, त्यावेळी त्याचे असे वर्तन झाले. स्वत:च्या मुलाच्या मृत्यूची भीती हा मानसिक ताणतणावाच्या बाबतीत अत्यंत टोकाचा ताण समजला जातो. अशा परिस्थितीत काही चमत्कार घडावा आणि आपले मूल वाचावे, अशी भावना मनात निर्माण होणे आणि त्यामधून अनेक वर्षेविज्ञानवादी विचार करण्याची सवय असलेला मेंदू काम करेनासा होणे, हे घडते. ते आपण समजून घेतले पाहिजे. ज्यांच्या मनाला विज्ञानवादी विचार करण्याची अनेक वर्षांची सवय आहे, त्यांच्या बाबतीत हे घडू शकते, तर इतर लोकांच्या बाबतीत हे घडते, यामध्ये नवल ते कोणते!

मानवी मनाची एक खूप मोठी क्षमता आहे. त्याला कल्पनाविलास करता येण्याची क्षमता किंवा fantacy thinking असे म्हणतात. बहुतांश साहित्य आणि कलांचा जन्म हा fantacy thinking मधून होत असतो. या स्वरुपाच्या विचारप्रक्रियेमध्ये कार्यकारणभावाला फारसा थारा नसतो. या fantacy thinking चा जसा कलानिर्मितीसाठी फायदा होतो, तसेच मानवी मन हे टोकाच्या तणावाच्या वेळी देखील दु:खद वास्तवापासून दूर पाळण्यासाठी या fantacy thinking चा आधार घेते. चमत्काराच्या दाव्यांना बळी पडणार्‍या मानसिकतेमध्ये fantacy thinking चा मोठा वाटा असतो.

मानसशास्त्रामध्ये आणखी एक महत्त्वाची कल्पना आहे, जिला व्यक्तिमत्त्वाचा भावनिक ताबाबिंदू (Locus of control) असे म्हणतात. जगभरात वेगवेगळ्या देशांत अभ्यास करून ही संकल्पना मानसशास्त्रात आली आहे. त्यानुसार मानवी व्यक्तिमत्त्वांची प्रामुख्याने दोन प्रकारे विभागणी केली जाते. यामध्ये लोकांमध्ये त्यांच्या भावनेचा ताबाबिंदू हा एक प्रकारे त्यांच्या स्वत:च्या ताब्यात असतो; तर अशा स्वरुपाचे व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्ती या साधारणपणे भूलथापांना बळी पडण्याची शक्यता कमी असते. व्यक्तिमत्त्वाचा दुसरा प्रकार म्हणजे ज्यांचा भावनिक ताबाबिंदू हा बाह्य गोष्टींच्या अधीन असतो. अशा स्वरुपाचे लोक हे आपल्या आयुष्यात घडणार्‍या गोष्टींच्या बाबतीत बाह्य कारणांवर विश्वास ठेवण्याची शक्यता अधिक असते. एखाद्या चमत्काराच्या माध्यमातून एखादी असाध्य गोष्ट सध्या होऊ शकते, अशा विचारांना बळी पडू शकतात.

चमत्काराच्या दाव्याला बळी पडण्यामागचे आणखी एक महत्त्वाचे कारण हे व्यक्तिमत्त्व दोष हे असते. मानसिक आजारांच्या क्षेत्रात काही व्यक्तिमत्त्व दोष हे असे असतात की, ज्यामध्ये त्या व्यक्तिमत्त्वाच्या माणसांमध्ये जादुई वाटणार्‍या विचारांवर (magical thinking) अशा लोकांचा विचार फार पटकन बसतो. या व्यक्तिमत्त्व दोषाला ‘स्कीझोटायपल’ असे म्हणतात. ‘स्किझोफ्रेनिया’ या आजारामध्ये याची अधिक तीव्रता दिसून येते, म्हणजे त्यांना प्रत्यक्षात भास आणि भ्रम होत असतात. पण ‘स्कीझोटायपल’ या व्यक्तिमत्त्व दोषामध्ये मात्र असे अनुभव नेहमीच्या जगण्याचा भाग म्हणून येत असतात. अशा लोकांचा चमत्कारांच्या दाव्यावर विश्वास बसण्याची खूप मोठी शक्यता असते.

स्वत:च्या स्वार्थाच्या बाबतीत अत्यंत सजग असलेला माणूस हा पैशाचा पाऊस पडणे किवा चमत्काराने मूल होणे यांसारख्या दाव्यांना कसे बरे बळी पडत असेल, असा आपल्याला नेहमी प्रश्न पडतो. यामागचे वैज्ञानिक सत्य आपण समजून घेतले पाहिजे. अर्थकारणाविषयी मानसशास्त्राच्या दिशेने होणारे आधुनिक संशोधन असे दाखवून देते की, सकृतदर्शनी स्वहिताची जपणूक करणारे वाटतात. असे अनेक निर्णय हे आपल्या ‘स्व’चीच हुशारीने फसवणूक करणारे असतात. पैशांच्या पावसासारख्या गोष्टींमध्ये निर्माण होणार्‍या लोभातून हे जेव्हा घडते, तेव्हा ते समजून घेणे थोडे सोपे असते. इतर वेळी जेव्हा अशा दाव्यांवर लोक विश्वास ठेवतात, तेव्हा त्यांचे ढळलेले मानसिक संतुलन तात्पुरते सांधण्यासाठी या चमत्कारावरील विश्वास ठेवण्याच्या भावनेचा त्यांना आधार वाटत असतो. त्यामध्ये थेट शोषण होत असले तरी विचारांचा मेंदू हा हरपस झाला असल्यामुळे ते मानवी मनाला सहजासहजी समजून येऊ शकत नाही. या पार्श्वभूमीवर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे, “अंधश्रद्धा निर्मूलनाला क्रोधापेक्षा करुणेची आणि उपहासापेक्षा आपुलकीची गरज आहे,” हे वाक्य खूपच महत्त्वाचे ठरते. चमत्कारांच्या दाव्याला बळी पडणार्‍या व्यक्तीची मानसिक अस्वस्था समजून त्यानुसार त्याला मदत करायला शिकणे, हे मानसमित्र/मैत्रीण म्हणून आपले सर्वांचे महत्त्वाचे उद्दिष्ट असले पाहिजे.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]