आत्मभान आणि समानुभूती

डॉ. चित्रा दाभोलकर -

आस्था वाटणे हे मनोसामाजिक कौशल्य समजले जाते. दुसर्‍याविषयी करुणा वाटणे किंवा त्या व्यक्तीची परिस्थिती/स्थिती बघून सहानुभूती वाटणे म्हणजे सहानुभूती नव्हे; तर दुसर्‍याच्या स्थितीचे पूर्ण आकलन झाल्यावर त्याच्या दृष्टिकोनातून, त्याच्या परिस्थितीकडे बघण्याची क्षमता किंवा कौशल्य असेल, तर त्याला संज्ञानात्मक आस्थाम्हणतात. समाजातील दुर्बल किंवा शोषित गटाच्या समस्या समजून घेताना हे कौशल्य अंगी रुजवण्याची आवश्यकता आहे. समाज एकत्रित गुण्यागोविंदाने राहण्यासाठी सर्वसमावेशकता अपेक्षित असेल, तर त्यासाठी प्रथम सर्वांप्रती संज्ञानात्मक आस्था असण्याची नितांत गरज आहे.

एका प्रथितयश शाळेतील नववीच्या मुलीने आत्महत्या केली, दहावीच्या परीक्षेत नापास होऊ, या भीतीने एका विद्यार्थ्याने घरातून पलायन केले, वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या… अशा अनेक बातम्यांनी दैनिक, वृत्तपत्रांचे रकाने भरले असतात. रोज एखाद-दुसरी तरी बातमी असतेच. या किशोरवयीन मुलांच्या समस्या सोडवायच्या असतील, तर या मुलांचा जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन बदलणे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच मुलांना आयुष्यात येणार्‍या कठीण प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी जीवनकौशल्य शिकवणे आवश्यक आहे. जीवनकौशल्ये ही मनोसामाजिक कौशल्ये आहेत. आपण प्रथम या जीवनकौशल्य शिक्षणाची निकड बघितली. त्यातील आत्मभान आणि आस्था किंवा सहानुभाव या जीवनकौशल्यांविषयी या प्रस्तुत लेखात सखोलपणे पाहूया.

आत्मभान म्हणजे ‘स्व’ची जाणीव. प्रत्येक माणसाला स्वत:च्या शारीरिक आणि मानसिक क्षमतांचे भान असणे आवश्यक आहे; तसेच स्वत:च्या भावना, वृत्ती समजून घेता येणेही आवश्यक आहे.

प्रत्येक माणसाने स्वत:ला नीट समजून घेतलं, तर वैयक्तिक समस्या खूप कमी होतील; पण स्वत:ला समजून घ्यायचे म्हणजे नक्की काय? तर आपण काय करू शकतो, आपल्या क्षमता काय आहेत, आपल्यात काय चांगले गुण आहेत, काय दोष आहेत, आपल्या उणिवा काय आहेत, आपली वृत्ती कशी आहे, स्वभाव कसा आहे, आपले आवडीचे क्षेत्र काय आहे, त्याचा धांडोळा घेणे. स्वत:ला समजून घेताना; म्हणजेच आत्मभान जागवताना डोळसपणे आपली बलस्थाने ओळखणे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढीच आपल्यातील कमतरता किंवा न्यून ओळखून ती कशी कमी करता येईल आणि त्यावर कशी मात मिळवता येईल, हे समजून घेणेही तेवढेच आवश्यक आहे. आपल्या मर्यादा ओळखता येणे हे पण कौशल्य आहे. स्वत:मधले गुण ओळखून त्यांचे संवर्धन करणे आणि दोष ओळखून ते कमी कसे करता येतील, यावर कष्ट घेणे माणूस म्हणून स्वत:ला घडवताना आवश्यक आहे.

स्वत:ला समजून घेताना आपल्या आवडी-निवडी काय आहेत, याची जाणीव असणेही महत्त्वाचे आहे. मला एखादी गोष्ट करायला आवडते; परंतु मला जमत नाही, अशा गोष्टींची जाणीव असावी. आपल्या काय करायला आवडतं आणि काय करायला आवडत नाही, हे सुद्धा माहीत असणे महत्त्वाचे आहे. कित्येक वेळा आवडी-निवडी या लिंगसापेक्ष असतात आणि त्यांच्या पाठीमागचे कारण सांस्कृतिक असू शकते. काही गोष्टी मुलीनेच करायच्या आणि काही गोष्टी मुलांनीच करायच्या, असे आपल्याला शिकवले जाते. परंतु आत्मभान जागवताना आपल्याला आतून काय करावेसे वाटते, याची जाणीव असणे खूप महत्त्वाचे आहे; आणि म्हणूनच आपण स्वत:ला जेव्हा समजून घेतो, तेव्हा निरपेक्षपणे विचार करण्याचे कौशल्य आत्मसात करणे गरजेचे ठरते. आपला कल ओळखून आत्मविकास साधणे योग्य ठरते. त्यामुळे आपल्या आवडीचे क्षेत्र आपल्याला ओळखता येते आणि जीवनाचा खरा अर्थ कळू शकतो.

जगात यशस्वी माणसाची गणना करताना फक्त आर्थिकदृष्ट्या यशस्वी, सामाजिकदृष्ट्या यशस्वी किंवा लौकिकार्थाने विविध क्षेत्रांतील प्रसिद्धी मिळालेल्या माणसांची यादी तयार केली जाते. परंतु खूप शिकलेला, खूप पैसे मिळवलेला, खूप प्रसिद्ध झालेला माणूस खर्‍या अर्थाने यशस्वी असतो, असे नाही. आनंदी, समाधानी, तृप्त आणि संतुलित व्यक्तिमत्त्व असलेला माणूस हा खरं तर आयुष्यात यशस्वी असतो. स्वत:ला समजून घेणे हे एक कौशल्य आहे. आपल्या क्षमता जाणून घेणे फार आवश्यक आहे. त्यासाठी औपचारिक शिक्षणाची गरज नसते, ते शिकून घेण्याजोगे कौशल्य आहे. अगदी बालवयापासून हे कौशल्य मुलांमध्ये रुजवले पाहिजे.

आपल्या आवडी-निवडी बदलू शकतात; नव्हे बदलतातच. त्या स्थल-काळ-वेळपरत्वे बदलत असतात, हे जाणून घेतले पाहिजे. स्वत:ला समजून घेताना नेहमी सकारात्मक असले पाहिजे. आपल्यामध्ये घडून येणारे बदल (चांगले आणि वाईट) आपल्याला जाणवतात, तेव्हा त्याकडे अलिप्तपणे बघता येण्याचे कौशल्य आत्मसात करता आले पाहिजे.

दुसरे जीवनकौशल्य म्हणजे आस्था किंवा समानुभूती (सहानुभाव). दुसर्‍या व्यक्तीला तिच्या दृष्टिकोनातून समजून घेण्याचे कौशल्य म्हणजे आस्था. दुसर्‍याची मन:स्थिती आणि दृष्टिकोन किंवा परिस्थिती समजून घेण्यासाठी आपल्याला तिच्या पार्श्वभूमीचे समग्र आकलन असावे लागते. करुणा किंवा सहानुभूती म्हणजे आस्था नव्हे.

आस्था वाटणे हे मनोसामाजिक कौशल्य समजले जाते. दुसर्‍याविषयी करुणा वाटणे किंवा त्या व्यक्तीची परिस्थिती/स्थिती बघून सहानुभूती वाटणे म्हणजे सहानुभूती नव्हे; तर दुसर्‍याच्या स्थितीचे पूर्ण आकलन झाल्यावर त्याच्या दृष्टिकोनातून, त्याच्या परिस्थितीकडे बघण्याची क्षमता किंवा कौशल्य असेल, तर त्याला ‘संज्ञानात्मक आस्था’ म्हणतात. समाजातील दुर्बल किंवा शोषित गटाच्या समस्या समजून घेताना हे कौशल्य अंगी रुजवण्याची आवश्यकता आहे. समाज एकत्रित गुण्यागोविंदाने राहण्यासाठी सर्वसमावेशकता अपेक्षित असेल, तर त्यासाठी प्रथम सर्वांप्रती संज्ञानात्मक आस्था असण्याची नितांत गरज आहे. तसेच भावनात्मक आस्था म्हणजे दुसर्‍याच्या भावना त्याच्या दृष्टिकोनातून समजून घेण्याचे कौशल्य. दुसर्‍याच्या भावनांचे आकलन होणे, दुसर्‍याच्या दु:खाने विव्हळ होणे, दुसर्‍याच्या कठीण प्रसंगात मनापासून मदत करावी वाटणे, या सार्‍या गोेष्टी भावनात्मक आस्था असलेली व्यक्ती करते. दैनंदिन आयुष्यात क्षणोक्षणी आढळणारे अनेक छोटे-मोठे संघर्ष हे समानुभूतीच्या कौशल्याच्या अभावामुळे घडत असतात, हे समजून घेतले पाहिजे. दुसर्‍याचा विचार करताना आपण उच्चासनावर बसायची गरज नसते. उलटपक्षी दुसर्‍याच्या जागी स्वत:ला ठेवून विचार करण्याची क्षमता जेव्हा माणसाच्या ठायी निर्माण होते; म्हणजेच ‘समानुभूती’चे कौशल्य अंगी बाणविले जाते, तेव्हा अनेक संघर्ष टाळणे सोपे जाते.

दैनंदिन आयुष्यातील नातेसंबंधांतील तेढ, स्त्री-पुरुष असमानता, वर्णभेद, धर्मभेद, जातिभेद, बौद्धिक वर्चस्व, गरीब-श्रीमंत भेदाभेद अशा समाजातील अनेकविध समस्यांच्या मुळाशी एकमेकांना समजून घेण्यातील कमतरता असते. इथे समानुभूतीच्या कौशल्याचे महत्त्व अधोरेखित होते.

समानुभूतीचे कौशल्य अंगी असलेली माणसे इतरांशी चांगल्याप्रकारे जुळवून घेऊ शकतात, त्यांच्याशी मैत्र जुळवता येते, सुरक्षित वाटते, भावनिक जवळीक वाटते. अशी माणसे गरजा समजून घेतात, चर्चा घडवून आणतात; तसेच ही माणसे निर्मितीक्षम असतात. समानुभूतीचे कौशल्य जनुकीय आहे, हे सिद्ध झाले आहे. स्त्रियांमध्ये ते अधिक प्रमाणात आढळते.

आत्मभान आणि आस्था ही दोन्ही जीवनकौशल्ये जागतिक आरोग्य संघटनेने अधोरेखित केलेल्या 10 मनोसामाजिक कौशल्यांमधील महत्त्वाची कौशल्ये आहेत.

डॉ. चित्रा दाभोलकर (बालरोग तज्ज्ञ)


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]