डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर – देव न मानणारा ‘देवमाणूस!’

प्रा. परेश शाह - 9421465864

7 सप्टेंबर 2020. सायंकाळी सहा वाजेपासूनच जवळपास सर्वच व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आणि व्यक्तिगतही ‘पोस्ट’ फिरायला लागल्या – ‘सुप्रसिद्ध सर्जन डॉ. टोणगावकर (दोंडाईचा) यांचे कोरोनामुळे दु:खद निधन.’ खानदेशभरातल्या मोबाईलधारकांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर ही बातमी वार्‍यासारखी पोचली. काळजात धस्स झालं; पण मन स्वीकारायला तयार नव्हतं. अजूनही आशा वाटत होती, नाना यावर मात करतील. असं नाही घडू शकणार. मी लगेचच डॉ. शशांक कुलकर्णींना फोन लावला. ते म्हणाले, “खरे आहे; पण अजून डिक्लेअर नाही केलेलं. सर्व ‘लाईफ सपोर्ट’ सुविधा काढल्या आहेत. फक्त व्हेंटिलेटर राहू दिले आहे. डॉ. राजेशदादा व पुण्याहून लहान मुलगा दोन्ही नाशिकला पोचल्यावर व्हेंटिलेटर काढतील व ‘ऑफिशिअल डिक्लेरेशन’ होईल.” म्हणजे घटना खरीच होती; पण वास्तव स्वीकारण्याची हिंमत होत नव्हती.

15 दिवस आधी, 23 ऑगस्टला रात्री स्वत: डॉ. नानांचाच मेसेज आला होता – ‘आम्ही चारही डॉक्टर्स कोरोनाने आजारी आहोत. मला आणि आशाला अशोका हॉस्पिटलमध्ये नाशिक येथे अ‍ॅडमिट केले आहे. आपल्या ग्रूपला कळवावे.’

आणि मी लगेचच ‘रिप्लाय’ दिला होता – ‘बाप रे! आदरणीय नाना, कृपया काळजी घ्या. लवकर बरे व्हा. संतुलित आहार, उचित व्यायाम, सकारात्मक विचार आणि योग्य उपचारांनी आपण निश्चितच कोरोनावर मात कराल, अशी खात्री आहे.’

डॉ. नानांशी झालेला हा शेवटचा संवाद… दरम्यान, नानांशी किंवा डॉ. काकींशी (आशाताई) बोलायची इच्छा असूनही हिंमत झाली नाही. ‘एक तर हॉस्पिटलमध्ये ते काय ताणात असतील किंवा काय स्थिती असेल? अशा वेळी फोन करणे उचित नाही,’ असा विचार करून प्रदीप मुणोत (हॉस्पिटलमधील मेडिकल स्टोअर्सचे मालक) व डॉ. शशांक कुलकर्णी, शहादा (नानांचे निकटचे स्नेही व आपले जिल्हाध्यक्ष) यांच्याकडून प्रकृतीची नियमित चौकशी करत होतो. क्रमाक्रमाने नानांची प्रकृती खालावत गेली, गुंतागुंत वाढत होती. मध्यंतरी डायलेसिसपण करावे लागले; पण प्रतिसाद फारसा नव्हता आणि आदल्या दिवशी एक मेसेज आला –

“Dr. Tongaonkar Sir is in ICU for last 15 days. Having multiple organs involved mainly kidney also, have atrial fibrillation and Gl. bleed Needs dialysis. Hoping for his recovery; but he is depressed and say, stop all my treatment and let me die in Ashoka Hospital, Nasik.”

मेसेज डॉ. राजेशदादांनीच पाठविल्याचे कळले. डॉ. नाना हळूहळू हिंमत हरत गेले आणि कोरोना जिंकत गेला. ‘आध्यात्मिकतेकडून विवेकवादाकडे’ वाटचाल करीत आयुष्य जगलेले डॉ. टोणगावकर नाना अखेरच्या क्षणी निरासक्ती आणि निर्मोही वृत्तीने आयुष्याच्या वाटचालीकडे कृतार्थपणे बघत जगण्याचीही ‘आशा’ सोडून गेले. अधिक सुंदर जगाचं भविष्यातील स्वप्न बघणारं सशक्त वर्तमान भूतकाळ बनून गेलं. 7 सप्टेंबर 2020, वयाच्या 81 व्या वर्षी डॉक्टरांनी अखेरचा श्वास घेतला.

समृद्ध वारसा

डॉ. रवींद्रनाथ टोणगावकरांचा जन्म एका स्वातंत्र्यसेनानी असलेल्या सच्च्या गांधीवादी कुटुंबात झाला. वडील रंगनाथ अण्णा टोणगावकर हे व्रतस्थ खादीधारी. हरिजन सेवक संघाचे कार्यकर्ते. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं, त्यावेळी धुळे जिल्हा कलेक्टर कचेरीवरील ब्रिटिशांचा ‘युनियन जॅक’ काढून त्या जागी ‘तिरंगा’ फडकविण्याचा सन्मान ज्यांना मिळाला, त्या अण्णासाहेब टोणगावकरांच्या पोटी नानांचा जन्म झाला. गांधी, विनोबा, साने गुरुजींचा पूर्ण प्रभाव. घरात रोज सकाळी ‘गीताई’चं वाचन होऊनच दिवसाला सुरुवात होई. जातिभेदाला त्या काळातही घरात थारा नव्हता. बहुजनांच्या मुलांसाठी शिक्षणाची सोय करावी म्हणून वडिलांनी ‘सोद्धारक विद्यार्थी संस्थे’ची स्थापना करून अक्षरश: झोळी घेऊन मदत मागितली होती.

डॉ. नानांच्या आई मंदाकिनी टोणगावकर तर तल्लख बुद्धिमत्ता असलेल्या अतिशय अभ्यासू होत्या. नानांकडे सर्वांत पहिल्यांदा भेटायला डॉ. नरेंद्र दाभोलकरांसोबतच गेलो होतो. साधारण 1992-93 ची गोष्ट असावी. दोन्ही डॉक्टर प्रथमच भेटत होते. त्यावेळी नानांच्या मातोश्री हयात होत्या. वय 85 च्या पुढे असावे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाची चर्चा सुरू होती. आई उठून घरात गेल्या. स्वत:च्या अभ्यासिकेतून एक फाईल घेऊन आल्या आणि काही वर्षांपूर्वी त्यांच्यातर्फे चालविल्या जाणार्‍या व्याख्यानमालेत ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ विषयावर व्याख्यान घेण्यात आल्याच्या बातमीचे कात्रण डॉ. दाभोलकरांना दाखविले. आधीच्याच वर्षी डॉ. श्रीराम लागूंसोबत झालेल्या ‘विवेक जागराचा वाद-संवाद’ कार्यक्रमाची आठवण सांगितलेली मला अजूनही आठवते. आई-वडिलांकडून लाभलेला असा संपन्न वारसा नानांनी पुढे तेवढाच समृद्ध ठेवला.

गुणवत्ता

डॉ. नानांची शैक्षणिक कारकीर्द तर अचंबित करणारी होती. वैद्यकीय शिक्षण घेताना प्रत्येक वर्षी सर्व विषयांत प्रथम क्रमांक ठरलेलाच; पण एम. बी. बी. एस. व एम. एस.च्या परीक्षेत सर्व विषयांत ‘गोल्ड मेडल’ मिळविले. बी. जे. मेडिकल कॉलेजच्या इतिहासात आजही हे रेकॉर्ड कायम आहे. गेली 55 वर्षेती श्रेणी कोणी मोडू शकलेले नाही. याबाबत सन्मान म्हणून विद्यापीठाने डॉ. टोणगावकरांसाठी एक स्वतंत्र विशेष प्रमाणपत्र तयार करून प्रदान केले होते. असे गुणवत्तेच्याबाबत नाना ‘एकमेवाद्वितीय’ होते. एवढी अद्वितीय गुणवत्ता असून देखील त्यांनी मुंबई-पुणे या मोठ्या शहरात न जाता आपल्या आईच्या इच्छेखातर गरीब आदिवासींच्या सेवेसाठी दोंडाईचासारख्या अतिग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसायाला सुरुवात केली.

नवीन शिकण्याची उमेद

1967 साली दोंडाईचा येथे दवाखाना सुरू झाला. त्या काळात धुळे सोडून जवळपास कोठेही शल्यचिकित्सक नव्हते. आधुनिक उपकरणे, सुविधांची वानवा होती. डॉक्टरांना सतत नाविन्याचा ध्यास होता. नवनवीन तंत्रज्ञान स्वत: शिकून आत्मसात करायचे. आपल्या अनेक नातेवाईकांना दोंडाईचात आणले. त्यांना स्वत: आत्मसात केलेले तंत्रज्ञान शिकवून कुशल तंत्रज्ञ बनविले. याच पद्धतीने आवश्यक कुशल कर्मचारी वृंद तयार केला. या भागातील रुग्णांना अत्याधुनिक दर्जाची सुविधा अल्प दरात उपलब्ध करून देण्याकडे नानांचा कटाक्ष असे. विविध अवयवांची ऑपरेशन्स स्पेशालिस्टकडून शिकून घ्यायला ते सतत उत्सुक असत. अगदी नवीन पदार्पण केलेल्या तरुण डॉक्टरांनाही, “मला हे शिकायचं आहे. शक्य असेल, तर रविवारी ऑपरेशन ठेव व माझ्या उपस्थितीत ते कर. मला शिकायचे आहे.” असे मोकळेपणाने सांगताना त्यांना कधीच कमीपणा वाटला नाही.

व्यवसायातील नैपुण्य, सचोटी आणि सेवाभाव या गुणांचा सुंदर मिलाफ

आज वैद्यकीय क्षेत्रात किती व्यावसायिकता आली आहे, हे आपण रोजच ऐकतो, अनुभवतो. अत्यंत सचोटीने आणि सेवाभावी वृत्तीने हा व्यवसाय करणारे आजच्या काळात विरळाच. यात प्रामाणिक असलेल्या व्यक्ती भेटल्याच तर त्या निष्णात असतीलच, असे नाही; आणि जो निष्णात आहे, तो सेवाभावी असेलच, असे नाही. पण डॉ. टोणगावकर नाना हे असं अजब रसायन होतं की, एकाच ठायी नैपुण्य, सचोटी आणि सेवाभाव यांचा सुंदर मिलाफ त्यांच्या व्यक्तिमत्त्वात ठासून भरलेला होता.

संशोधक वृत्ती

डॉ. टोणगावकरांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा आजन्म विद्यार्थी भाव आणि संशोधक वृत्ती. अगदी अखेरच्या काळापर्यंत नाना रात्र-रात्र इंटरनेटवर बसून अभ्यास करीत. पुस्तके विकत घेऊन अभ्यासत. ही बाब त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रापुरतीच नाही, तर साहित्यिक क्षेत्रातही तेवढीच प्रभावीपणे करीत. नानांची विशेषज्ञता होती, पोटांचे विकार आणि शस्त्रक्रिया यामध्ये. हर्नियाच्या ऑपरेशनकरिता साध्या, स्वच्छ मच्छरदाणीच्या कापडाचा वापर करून अतिस्वस्त दरात शस्त्रक्रिया याबाबतचे त्यांचे संशोधन ‘टोणगावकर मेश’ नावाने जगप्रसिद्ध आहे. त्याचे पेटंट घेऊन त्यांनी एकाधिकार नाही मिळवला; याउलट अनेक गरीब राष्ट्रांना हे तंत्रज्ञान आणि जाळी पुरविली. स्वत: हजारो यशस्वी शस्त्रक्रिया करून हे तंत्रज्ञान सिद्ध केले. त्याची दखल आणि नोंद या विषयावरील आंतरराष्ट्रीय समुदायाने आणि जर्नल्सने घेतली.

याबरोबरच आत्मा आणि देवाच्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी या संकल्पनांचा उगम, विकास, त्यामागील कारणे आणि वास्तव याचा शोध घेण्यासाठी, सत्य समजून घेण्यासाठी विविध धर्मांतील धर्मग्रंथांपासून आधुनिक तत्त्वज्ञांपर्यंतचे लिखाण वाचले. विविध धार्मिक/आध्यात्मिक पंथांच्या शिबिरांना प्रत्यक्ष भेट दिली, सहभागी झाले आणि त्यानंतर सत्य काय, ते निर्भीडपणे मांडले. यासाठी अगदी स्वाध्याय परिवार, विपश्यना, प्रजापिता ब्रह्माकुमारी या सर्व आध्यात्मिक मार्गात हजेरी लावली आणि स्वत:चा प्रवास ‘आध्यात्मिकतेतून विवेकवादा’कडे असा पूर्ण केला.

सनदशीर संघर्षशीलता आणि निर्भयता

एखाद्या योग्य गोष्टीसाठी सनदशीर मार्गाने पाठपुरावा आणि निर्भयपणे संघर्ष करणे हा नानांचा पिंड होता. कारण नाना अभ्यासाने विचारांती त्या मतावर आलेले असायचे. ग्रामीण भागात बाळंतपणात महिलांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असायचे, त्याचे कारण ‘अ‍ॅनिमिया.’ अशा प्रसंगी व इतरही शस्त्रक्रियांप्रसंगी रक्त देण्याची वेळ आली, तर ग्रामीण भागात नसते. त्याबाबतच्या केंद्र सरकारच्या कायद्यात बर्‍याच कठोर तरतुदी आहेत. त्यासाठी ग्रामीण भागात रक्त साठवणुकीला परवानगी द्यावी, यासाठी त्यांनी अगदी केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयापर्यंत अत्यंत अभ्यासपूर्ण व चिकाटीने पत्रव्यवहार, पाठपुरावा, प्रत्यक्ष भेटी, बैठका, संघर्ष केला आणि ग्रामीण भागातील भारतातील पहिल्याच रक्त साठवणूक केंद्राची परवानगी टोणगावकर हॉस्पिटलला मिळाली.

डॉ. विजय भटकर हे प्रसिद्ध संगणक शास्त्रज्ञ. पण त्यांनी आत्म्याबाबतची केलेली वक्तव्ये आणि दावे डॉ. टोणगावकरांना आवडले नाहीत. त्यांच्याशी पत्रव्यवहार केला; पण एकदा डॉ. भटकर धुळ्यात येणार होते, तर ‘महा. अंनिस’ म्हणून आपण त्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घ्यायचे निश्चित केले. नाना स्वत: दोंडाईचाहून पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले आणि भटकरांना ‘आत्मा आहे हे सिद्ध करा,’ असे जाहीर आव्हान दिले.

अगदी आता ‘कोविड-19’च्या जागतिक महामारी प्रसंगात आयुष मंत्रालयाने होमिओपॅथिक उपचार पद्धतीची शिफारस केली. त्यावेळी देखील नानांनी वार्तापत्रांसाठी, ‘विवेकजागर’ विशेषांकासाठी विस्तृत लेख लिहिला. या पॅथीबद्दलचे वैद्यकीय क्षेत्रातील जगन्मान्य जर्नल्सचे आणि संशोधकांचे दाखले देत प्रश्न उपस्थित केले. एवढ्यावरच न थांबता थेट आयुष मंत्रालयालाच नोटीस दिली. याबाबत अनेक प्रतिक्रिया समाजमाध्यमातून, ‘ई-मेल’द्वारे त्यांच्या विरोधात आल्या. काहींनी हेतुत: ‘ट्रोल’ केले; पण नानांनी या वयात देखील अतिशय शांतपणे, अभ्यासपूर्ण प्रतिवाद केला. याबाबत त्यांची भूमिका ‘नम्रपणे; पण ठामपणे’ अशीच राहिली. अत्यंत ग्रामीण भागात होमिओपॅथिक डॉक्टर रुग्णसेवेचे खूप महत्त्वाचे काम करून गरज भागवितात. त्यांच्या कामाबद्दल आदरच आहे; प्रश्न मंत्रालयाच्या उथळ आणि बेजबाबदार वर्तनाचा आहे, हे नानांनी पटवून दिले.

व्यक्तिमत्त्व

डॉ. टोणगावकरांच्या व्यक्तिमत्त्वाची अनेक गुणवैशिष्ट्ये होती, जी सर्वांनीच शिकण्यासारखी होती. अजातशत्रू, शांत-सुस्वभावी, निर्मळ, अंतर्बाह्य सच्चेपणा, साधेपणा, व्यावसायिक मूल्यांची कधीही प्रतारणा होऊ दिली नाही. यासोबतच अतिशय शिस्तप्रिय जीवनशैली, रोज नियमित व्यायाम, वाचन, चिंतन, यासोबतच कठोर परिश्रम आणि सेवाव्रती. त्यांच्या हॉस्पिटलचे दृश्य कधीही सिव्हिल हॉस्पिटलपेक्षा कमी नसायचे; अगदी मंत्र्यांचे कुटुंबीय असो की, गरीब आदिवासी, सर्वांना सारखीच ट्रीटमेंट. त्यामुळे अगदी खानदेश, नजीकचा गुजरात व मध्य प्रदेशातूनही रुग्ण येत. अनेक रुग्ण पुणे-मुंबई-अहमदाबाद-सुरतला जाऊन आले, तरी ‘एकदा टोणगावकरांना दाखवायचेच आहे,’ अशा विश्वासानं त्यांच्याकडे येत. एवढी प्रचंड व्यावसायिक विश्वासार्हता अन्य कोठेही बघायला मिळत नाही.

अर्थात, यामध्ये सर्व परिवाराचे – म्हणजे डॉ. आशाताई, मुलगा डॉ. राजेशदादा, स्नुषा डॉ. ज्योत्स्नाताई यांचेही – योगदान त्याच तोलामोलाचे. ही सर्व पारदर्शिता, सेवाभाव आणि प्रामाणिकता त्यांनीही पुरेपूर जोपासली आहे. त्यामुळे रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत ‘ओपीडी’ चालते. लोक शब्दश: अंथरूण-पांघरूण घेऊन येतात. तेथेच थांबतात, आपला नंबर येईपर्यंत मध्यरात्रीपर्यंत थांबून राहतात. समाधानाने परत जातात.

टोणगावकर कुटुंबीयांचे दातृत्व आणि कुटुंबवत्सलता

डॉ. टोणगावकरांच्या परिवाराची खासीयत अशी की, दररोजचे एवढे ‘बिझी शेड्यूल’ असूनदेखील सर्व कुटुंब दिवसातला काही वेळ सोबत राहत, शक्य असेल, तर भोजन सोबत घेत. एकमेकांतील कौटुंबिक जिव्हाळा तर पराकोटीचा; अगदी आजोबा ते नातवंडे सर्वांचेच ‘फ्रेंडली रिलेशन.’ डॉक्टरांच्या वेगवेगळ्या सेमिनार्समधील रिसर्च पेपर्स वाचनाची सर्वच पूर्वतयारी किंवा देश-विदेशातील दौर्‍यानिमित्ताची तयारी डॉ. आशाताई व डॉ. राजेशदादा उत्साहाने करून देत. आशाताई अगदी सावलीसारख्या त्यांच्यासोबत राहिल्या. डॉक्टरांच्या कर्तृत्वात पाठीच्या कण्याची भूमिका ताईंनी बजावली आहे. आनंद- सुख-दु:ख वाटून घेणे हा स्थायीभाव. घरातील निर्णय सामुदायिक चर्चेतून-एकमताने घेण्याची पद्धत. सर्वच गोष्टी परस्परांशी ‘शेअर’ करणे, अनौपचारिक गप्पा हे रोजचेच. विशेष म्हणजे आपल्यासारखे कोणीही कार्यकर्तेभेटायला गेले किंवा कोणत्या वैद्यकीय कामासाठी जरी गेले तर तपासणीनंतर थेट घरी घेऊन जात, गप्पा होत. चहा-नाश्ता होई. ‘जेवला आहेस का,’ ही विचारणा होई. हे एरव्ही अगदी दुर्मिळ चित्र नित्याचेच होते.

हॉस्पिटलचा बहुतेक स्टाफ सुरुवातीपासूनचा किंवा अनेक वर्षांपासून आहे. जणू हा सर्व एक परिवारच. सर्वांच्या निवासाच्या व्यवस्था हॉस्पिटलच्या आवारातच आहेत.

टोणगावकर कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक संस्था-संघटना-चळवळींना मुक्तहस्ते मदत केली, हे करताना त्याच्या कधी गाजावाजा केला नाही की, प्रसिद्धी केली नाही. डॉ. नाना, डॉ. काकी ‘रोटरी’मध्ये सक्रिय. ‘दोंडाईचा रोटरी’ने त्यांच्या नेतृत्वात अनेक रचनात्मक आणि संस्थात्मक प्रकल्प उभे केले. दोंडाईचा येथे रोटरी आय हॉस्पिटलच्या उभारणीत या परिवाराचा सिंहाचा वाटा. स्वत:च्या डोळ्यांचे ऑपरेशन तेथेच केले. रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल उभारली. त्यासाठी 51 लक्ष रुपयांची देणगी दिली. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केले. त्यासाठी 20 लक्ष रुपये एकरकमी दिले. आपल्या परिसरात समाजासाठी गुणवत्तापूर्ण आरोग्य आणि शिक्षणाची सुविधा निर्माण होण्यासाठीची तळमळच त्या पाठीमागे होती.

जी माणसं समाजबदलासाठी झटतात, वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करतात, त्यांना भरीव मदत करणे, त्यांच्या पाठीशी आधारवड म्हणून उभे राहणे, ही संवेदनशीलता टोणगावकर कुटुंबीयांमध्ये ठासून भरलेली आहे. स्काऊट गाईड चळवळ, नर्मदा बचाव आंदोलन, रोटरी यांना त्यांनी सातत्याने मदत केली. साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाच्या युवा श्रमसंस्कार छावणीत दरवर्षी व्याख्यानाला येत.

डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर यांनी अनेक संस्था- संघटनांत महत्त्वाची पदे भूषविली. विशेष उल्लेखनीय म्हणजे असोसिएशन ऑफ रुरल सर्जन ऑफ इंडिया याचे अध्यक्षपद आणि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रुरल सर्जरी या आंतरराष्ट्रीय संघटनेचे देखील ते भूतपूर्व अध्यक्ष होते.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर

डॉ. टोणगावकर नाना जवळपास 25 वर्षे‘महाराष्ट्र अंनिस’च्या कामाशी जोडलेले होते; अगदी सुरुवातीची ‘आत्मा – पुनर्जन्म – प्लँचेट’ ही प्रा. प. रा. आर्डे आणि डॉ. दाभोलकरांची छोटी पुस्तिका वाचून ते खूपच प्रभावित झाले आणि समितीच्या नजीक आले. डॉ. दाभोलकरांसोबत पत्रव्यवहार, फोन संपर्क होऊ लागला आणि आपल्या कामाशी जोडले गेले. जवळपास 15 वर्षेधुळे, नंदुरबार जिल्ह्याचे अध्यक्ष आणि त्यानंतर राज्याचे उपाध्यक्षपद ही सन्मानाची पदे त्यांनी भूषविली. गेली काही वर्षेते खूप आग्रहाने, ‘मला आता पद नको, मी कायम सोबतच आहे,’ अशी भूमिका घेत होते. या राज्य कार्यकारिणी निवडीवेळी त्यांनी आग्रहाने हे पद नाकारले आणि उत्तर महाराष्ट्रातून उत्तम कांबळे राज्य उपाध्यक्ष झाले.

इतर संस्था-संघटनांना ते मदत करीत; पण महा. अंनिसच्या ते केवळ पदावर नव्हते, तर हा विचार प्रत्यक्ष जगत होते, याचा प्रत्यय सहजपणे येत असे. त्यांच्या हॉस्पिटलच्या दर्शनी भागात आपल्या समितीचे ‘21 लाख रुपयांचे चमत्काराला आव्हान’ आणि त्याची कलमे लिहिलेला भला मोठा ‘फ्लेक्स’ दृष्टीस पडतो. डॉक्टरांना राज्य-राष्ट्रीय पातळीवरचे अनेक सन्मान मिळाले; अगदी महाराष्ट्र शासनाचा आरोग्य क्षेत्रातील सर्वोच्च आनंदीबाई जोशी पुरस्कार. त्याचे सन्मानपत्र जेवढ्या अभिमानाने त्यांच्या दर्शनी भागात शोकेसमध्ये आहे, तेवढ्याच गौरवाने आपल्या वार्तापत्राचे ‘शतकवीर’ पुरस्काराचे सन्मानचिन्ह देखील तेथे आहे.

असलम बाबा, चादरवाले बाबा, दैवी उपचार करण्याचा दावा करणारे बाबा या सर्वांना डॉक्टर स्वत: पत्रव्यवहार करून थेट आव्हान देत. त्यांच्याकडे येणार्‍या रुग्णांना यापासून परावृत्त करीत.

आपल्या कामात सक्रिय सहभागी होता येत नाही; किंबहुना दोंडाईचा येथे शाखा सुरू होऊ शकली नाही, याची त्यांना खंत होती; मात्र ही मर्यादा भरून काढण्यासाठी आपल्या वार्तापत्राच्या विशेषांकासाठी गेली अनेक वर्षेहिरिरीने आणि सातत्याने भरीव जाहिराती आणि देणग्या मिळवून देत आहेत. विशेष म्हणजे हे सर्व काम घरचेच आहे, असे समजून डॉ. आशाताई या वयात देखील अगदी आत्मीयतेने करतात; किंबहुना नानांना याबाबत फारशी माहिती नसे. देणग्या जमा करणे, त्यांची व्यवस्थित यादी करणे, रोख, चेक वेगळे करणे, जाहिरातीचा मजकूर, अंक छापून आल्यावर तो सर्वांना पोचता करणे हे सर्व काम डॉ. आशाताई या वयातही अतिशय उत्साहाने आणि तळमळीने करतात.

पुरेशा आधी कळविले असेल आणि कल्पना दिली असेल, त्या दिवशी स्वत:ची ‘ओपीडी’ बंद ठेवून अगत्याने जिल्हा बैठका, प्रेरणा मेळावे, राज्य कार्यकारिणी बैठक, राज्य अधिवेशन, परिषदांना आवर्जून उपस्थित राहत.

महत्त्वाची आणि सर्वांसाठी आनंददायी बाब म्हणजे गेल्यावर्षी ‘महाराष्ट्र अंनिस’च्या त्रिदशकपूर्तीनिमित्त झालेल्या अधिवेशनासोबत आपण विवेकवादावरील आंतरराष्ट्रीय परिषद घेतली. तिला अध्यक्ष म्हणून समितीचे अध्यक्ष डॉ. भाई एन. डी. पाटील सर नियोजित होते. त्यांच्या प्रकृतीची अडचण लक्षात घेऊन आपण त्यांना पुण्याहून विमानाने मुंबईला आणण्याचीही तयारी केली होती.

पण त्याचवेळी उद्भवलेल्या महापुराच्या परिस्थितीमुळे त्यांना येणे जवळपास अशक्य आहे, हे लक्षात आले तेव्हा सर्वप्रथम डॉ. टोणगावकरांचे नाव डोळ्यांसमोर आले. डॉक्टरांना विनंती केली आणि डॉक्टरांनी आनंदाने आंतरराष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षस्थान भूषविले. हा आपल्यासाठी आणि डॉ. टोणगावकरांसाठी दोघांसाठी आनंदाचा-अभिमानाचा क्षण होता. डॉ. अभय बंग, डॉ. प्रकाश बाबा आमटे यांसारखी व्यक्तिमत्त्वे ज्यांना ‘प्रकाशाची बेटे’ संबोधले जाते, त्याच तोलामोलाचे एक ‘प्रकाशाचे बेट’ आपल्याही अवतीभोवती होते, आपल्या चळवळीसोबत होते, हे आता डॉ. टोणगावकरांच्या जाण्यानंतर लख्खपणे जाणवते. त्यांच्या स्मृती जागवीत राहणे आता केवळ आपल्या हाती आहे.

विनम्र अभिवादन!

– प्रा. परेश शाह (राज्य कार्यवाह, महा. अंनिस)

‘माणूस बदलतो’ या प्रक्रियेवरचा आपला विश्वास दृढ व्हावा, याची दोन मूर्तिमंत उदाहरणे म्हणजे एक साथी नागेश सामंत (चाळीसगाव) – एक सुखवस्तू उद्योजक ‘अंनिस’च्या चळवळीशी जोडला गेला. अंतर्बाह्य बदलाला वर्तन आणि जीवनशैली आरपार बदलून गेली आणि दुसरे उदाहरण म्हणजे डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर यांचे. एका छोट्या पुस्तिकेच्या प्रभावातून कामाशी जोडले गेले आणि स्वत:ची वाटचाल ‘आध्यात्मिकतेकडून विवेकवादा’कडे अशी करीत त्यावर संशोधन-लिखाण करीत, चळवळीच्या सोबत राहत. या कामाला अधिष्ठान मिळवून दिले.

डॉक्टरांच्या जाण्याने चळवळीची मोठी हानी झाली आहे. डॉक्टरांनी ‘रोटरी’सारख्या संस्थेतून कामाची सुरुवात केली. या सर्व संस्था- संघटनांना मदत केली; पण डॉक्टर ‘अंनिस’सोबत जगले, जीवनशैली म्हणून ‘अंनिस’चा विचार स्वीकारला, त्याचा पुरस्कार केला, हे विशेष.

त्यांच्या स्मृती जागविण्यासाठी आपण दरवर्षी त्यांच्यासारख्या सेवाव्रती, वैद्यकीय क्षेत्रात एथिकल प्रॅक्टीस आणि सामाजिक बांधिलकी जोपासणार्‍या एका डॉक्टरला डॉ. टोणगावकरांच्या नावाचा पुरस्कार सुरू करीत आहोत. त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी पहिला पुरस्कार दोंडाईचा येथेच कुटुंबीयांच्या उपस्थितीत देण्याचा मानस आहे. त्याचसोबत त्यांचे अप्रकाशित साहित्य ‘तसेच माझी आध्यात्मिक वाटचाल ः गुढाकडून वास्तवाकडे’ या पुस्तकाचा हिंदी, इंग्रजी अनुवाद प्रकाशित करण्याचा प्रकल्पही हाती घेत आहोत.

महत्त्वाचे म्हणजे डॉ. टोणगावकरांच्या नेतृत्वात आपण ‘छद्मविज्ञान आणि अंधश्रद्धा’ (विशेषत: आरोग्य क्षेत्राशी संबंधित) याबाबतच्या स्वतंत्र कामाची पायाभरणी करणार होतो. त्याबाबतचे प्राथमिक नियोजनही झाले होते. हा स्वतंत्र विभाग सुरू करून हे भविष्यवेधी काम गतिमान करणे, हे आता आपल्यापुढील एक आव्हान आहे. त्यासाठी गुंतवणूक करून हे काम पुढे येणे, ही डॉक्टर टोणगावकरांना कृतिशील आदरांजली ठरेल!

– अविनाश पाटील राज्य कार्याध्यक्ष, महा. अंनिस