का मंत्रेचि वैरी मरे?

डॉ. हमीद दाभोलकर -

अमुक देव-देवतेचे यंत्र वापरले की, आयुष्यातील सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटतील, असे दावे करणार्‍या वस्तुविक्रय जाहिराती माध्यमांतून झळकतात. यातून होणारी फसवणूक रोखण्यासाठी आता उच्च न्यायालयाच्या अलिकडच्या एका निकालाने कायदेशीर हस्तक्षेप शक्य झाला आहेच; पण महाराष्ट्रासह जगभरातील विवेकवादी चळवळीला हा निकाल दिशादर्शक ठरेल.

विशेष दैवी शक्ती असल्याचा दावा करणार्‍या यंत्र-तंत्रांची आपल्याकडे अजिबात कमी नाही. अनेक माध्यमे या जाहिराती व्यवसायाचा भाग म्हणून प्रसारित करताना आपण पाहतो. अमुक देव-देवतेचे यंत्र किंवा मशीन वापरले की, तुमच्या आयुष्यातील सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटतील, व्यवसायातील अडचणी दूर होतील, संसार सुखाचा होईल, आरोग्याचे प्रश्न आपोआप मिटतील… असे असंख्य दावे त्यात केलेले असतात. थोडीदेखील चिकित्सक बुद्धी वापरून विचार करणार्‍या व्यक्तीला त्यातील फोलपणा आणि फसवणूक लक्षात येते. असे असले तरीही, दिवसाउजेडी चाललेली ही फसवणूक थांबवण्यासाठी कायदेशीररित्या फारसा काही हस्तक्षेप करणे शक्य नव्हते; परंतु मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 5 जानेवारी रोजी देव-देवतांच्या नावाने यंत्रा-तंत्राच्या जाहिराती प्रसारित करणे बेकायदेशीर ठरवणारा निवाडा दिला आहे; त्यामुळे आता अशा जाहिरातींवर थेट कायदेशीर कारवाई करणे शक्य होणार आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीमधील मैलाचा दगड ठरावा, असा हा निकाल आहे. तो नीट समजून घ्यायला हवा.

त्याचे झाले असे की, राजेंद्र अंभोरे यांनी 2015 मध्ये औरंगाबाद येथे राज्य सरकार, केंद्र सरकार, यंत्रे विकणारे टेलिशॉपिंग कॉर्पोरेशन, त्यांची जाहिरात करणारे अनुप जलोटा, अनुराधा पौडवाल हे ‘सेलेब्रिटी’ आदी 22 जणांना प्रतिवादी करून एक याचिका दाखल केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी ‘हनुमान चालिसा यंत्रा’ची जाहिरात बघून ते खरेदी केले होते. त्या जाहिरातीत असे दाखवले होते की, “बाबा मंगलनाथ नावाच्या एका विभूतीने हे यंत्र तयार केले आहे. या मंगलनाथ बाबा यांना विशेष सिद्धी प्राप्त असून त्यांना देव प्रसन्न झाला आहे. त्यामुळे हे यंत्र घरात आणणे म्हणजे प्रत्यक्षात मारुतीरायाला घरी आणल्यासारखे आहे. केवळ एवढेच नाही, तर या यंत्रावर जर्मन भाषेत ‘हनुमान चालिसा’ लिहिली आहे आणि ती कधीही पुसली जात नाही.” तसेच हे यंत्र सोन्याचा मुलामा दिलेले असून ते घरी आणल्यामुळे आपले सर्व प्रश्न सुटतील, असे आश्वासनदेखील त्यामध्ये देण्यात आले होते. याचिकाकर्ते अंभुरे यांनी 5,200 रुपयांना हे यंत्र विकत घेतले आणि थोड्याच दिवसांत त्यांच्या लक्षात आले की, प्रत्यक्षात हे यंत्र घरात आणून आपल्याला काहीही फायदा झालेला नाही, म्हणून त्यांनी ही याचिका दाखल केली होती. ती त्यांनी तीन वर्षांनी मागे घेण्याचे ठरवले; परंतु यात गुंतलेले व्यापक समाजहित ध्यानात घेऊन न्यायालयाने या अर्जाची सुनावणी चालूच ठेवण्याचा निर्णय घेतला. वरिष्ठ अधिवक्ता व्ही. डी. सपकाळ यांनी या खटल्यासाठी न्यायमित्र (Amicus Curiae) म्हणून काम पाहिले. (न्यायमित्र म्हणजे अशी व्यक्ती, जी त्या खटल्यामध्ये पक्षकार नसते व जी आपल्याकडील माहिती, तज्ज्ञता, मर्मदृष्टी यांचा उपयोग करून न्यायालयाला मदत करते.) अनेक वेळा मूळ तक्रारदाराने तक्रार मागे घेतली, तर न्यायालय तो खटला रद्द करते; पण देवा-धर्माचे प्रस्थ राजकारण आणि समाजकारणात मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या कालखंडात न्यायालयाने अशा संवेदनशील प्रकरणाची सुनावणी सुरूच ठेवण्याची घेतलेली भूमिका आश्वासक आहे. केवळ तेवढेच नाही, मानवी श्रद्धा आणि शोषण यांच्यामधील पुसट सीमारेषा स्पष्टपणे कायद्याच्या भाषेत नोंदवण्याच्या दृष्टीनेही हे अत्यंत महत्त्वाचे होते.

हा निकाल देताना उच्च न्यायालयाने जादूटोणाविरोधी कायद्याचा आधार घेतला आहे. या निकालात स्पष्टपणे म्हटले आहे : कुठल्याही देवाच्या किंवा बाबा-बुवांच्या नावाने असलेले यंत्र; त्यात जादुई, अतिमानवी गुण असल्याचा दावा करणे; त्यामुळे बरकत येईल असा दावा करून ते विकणे – हे जादूटोणाविरोधी कायद्याच्या कलम तीन अन्वये बेकायदेशीर आहे. तसेच अशा स्वरुपाची जाहिरात प्रक्षेपित करणे बेकायदेशीर आहे आणि अशा जाहिराती प्रसारित करणार्‍या दूरचित्रवाहिन्यांसही या गुन्ह्यासाठी जबाबदार धरले जाईल. केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातील आणि जगभरातील विवेकवादी चळवळीला दिशादर्शक ठरेल, असा एक भाग या प्रकरणात आहे, तो समजून घेऊया…

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी देव-धर्म नाकारूनच काम करावे लागेल, अशी भारतातील; तसेच जगभरातील बहुसंख्य विवेकवादी संघटनांची भूमिका राहिली आहे. महाराष्ट्रातील श्रीराम लागू यांच्यासारखे प्रखर बुद्धिवादीदेखील हीच भूमिका मांडत असत. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी मात्र सातत्याने मांडलेली आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने लावून धरलेली भूमिका ही त्यापेक्षा वेगळी आहे. त्या भूमिकेनुसार भारतीय संविधानाने सांगितल्याप्रमाणे देव आणि धर्म मानण्याचा किंवा न मानण्याचा अधिकार येथील प्रत्येक नागरिकाला आहे; पण देवाच्या किंवा धर्माच्या नावावर कोणी दुसर्‍याचे शोषण करत असेल तर मात्र त्याला विरोध करणे, हे आपले संवैधानिक कर्तव्य आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वातील दीर्घकालीन लढाईनंतर आणि अंतिमत: त्यांच्या बलिदानानंतर महाराष्ट्रात पारित झालेल्या जादूटोणाविरोधी कायद्यामध्येही हीच भूमिका अधोरेखित आहे. न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. एम. जी. शेवलीकर यांनी दिलेल्या निकालाने ही भूमिका आणखी ठळक झाली आहे. विधायक कृतिशील धर्मचिकित्सेची ही भूमिका आहे. जगभरातील बहुतांश धर्मांचा मूळ उद्देश मानवी मनातील चांगुलपणाला आधार देणे हा आहे. मात्र अनेकदा त्याच्या नावावर जनसामान्यांचे शोषण झालेले दिसते. हे सर्वच धर्मांमध्ये कमी-अधिक प्रमाणात घडून येताना आपण पाहतो. हे शोषण टाळण्याचा आपल्याकडे उपलब्ध असलेला एकमेव मार्ग म्हणजे, आपल्या देव आणि धर्म या संकल्पनांची सातत्याने तपासणी करणे आणि त्यामधील जे कालसुसंगत नसेल, मानवी प्रतिष्ठेला बाधा आणणारे असेल ते त्यागणे. ही प्रत्येक माणसाने आणि समाजाने सातत्याने करण्याची प्रक्रिया आहे आणि त्यामधून मानवी समाज अधिक उन्नत व टप्प्या-टप्प्याने अंधश्रद्धेपासून दूर होऊ शकतो. त्यासाठी दरवेळी देव आणि धर्म नाकारण्याची गरज नाही, ही भूमिका ठाशीवपणे पुढे येते.

दैवी शक्तीच्या नावे यंत्रे, स्टोन्स, गंडे-दोरे, ताईत वापरून आपले प्रश्न सोडवण्याची हमी हे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात आणि युरोप-अमेरिका; तसेच आखाती देशांतदेखील मोठ्या प्रमाणात दिसून येते. न्यू यॉर्कसारख्या प्रगत शहरातही अशा जाहिरातींचा सुळसुळाट दिसतो. त्यामुळे वरील प्रकरणी न्यायालयाने दिलेला निकाल देशपातळीवरच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील दिशादर्शक ठरू शकतो. या निकालाचे आणखी एक महत्त्वाचे अंग म्हणजे, यात न्यायालयाने राज्य सरकार व जादूटोणाविरोधी कायद्याखाली नेमण्यात आलेल्या दक्षता अधिकार्‍यांना (प्रत्येक ठाण्याचे पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी) असे निर्देश दिले आहेत की, अशा वस्तूंच्या जाहिराती करणार्‍या आणि त्या विकणार्‍यांविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्याखाली गुन्हे नोंदविण्यात यावेत; तसेच राज्य व केंद्र सरकारला सूचना केली आहे की, मुंबई येथे एक विशेष कक्ष स्थापून दूरचित्रवाहिन्यांवरील अशा जाहिरातींच्या प्रसारणावर लक्ष ठेवावे. त्याची अंमलबजावणी करणे ही आता सरकारची जबाबदारी आहे.

महाराष्ट्राला संत आणि समाजसुधारकांची मोठी परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर महाराज हे सातशे वर्षांपूर्वी म्हणून गेले आहेत –

का मंत्रेचि वैरी मरे।

तरी का वायाचि बांधावी कटारे।

रोग जाय दुध साखरे।

तरी निंब का पियावा॥

इतका साधा कार्यकारणभाव आपण लक्षात घेतला, तर या फसवणुकीपासून आपला बचाव होऊ शकतो; पण अडचणींमुळे तणावग्रस्त झालेल्या माणसाचा कार्यकारणभाव असा चालेल, याची खात्री देता येत नाही, म्हणूनच हा दिशादर्शक निर्णय स्वागतार्ह आहे.

लेखक संपर्क – hamid.dabholkar@gmail.com

या याचिकेमध्ये टेलिशॉपिंग कंपन्या व त्यांचा प्रसार करणारे सेलिब्रिटी यांच्यासोबत भारत सरकार, महाराष्ट्र सरकार, सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र सरकार, कायदा आणि न्याय विभाग, महाराष्ट्र सरकार, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र, पोलीस आयुक्त मुंबई, advertising standards council, मुंबई, इंडियन ब्रॉडकास्टिंग फौंडेशन, नवी दिल्ली, झी टीव्ही या सर्वांना प्रतिवादी करण्यात आलेले होते. हा निकाल त्यांना कळविण्यात आलेला असून त्यातील आदेशांचे पालन करणे, ही त्यांची जबाबदारी आहे.

टीव्हीवरील ‘हनुमान चालिसा’ यंत्रासारख्या यंत्रांची जाहिरात व विक्री यावर बंदी घालणे, या स्वरुपाच्या जाहिराती जादूटोणाविरोधी कायदा 2013 व केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियंत्रण कायदा 1995 नुसार बेकायदेशीर आहेत, असे जाहीर करणे, या जाहिराती थांबविण्याचे निर्देश देणे, या जाहिरातींचे प्रसारण रोखण्यासाठी राज्य व केंद्र पातळीवर एक ‘मॉनिटरिंग सेल’ तयार करणे, जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होऊन या जाहिरातींचे प्रक्षेपण रोखले जाईल, यासाठी महाराष्ट्र सरकारला निर्देश देणे आदी हेतू समोर ठेवून ही याचिका करण्यात आलेली होती.

निकालात असे म्हटले आहे की, या जाहिरातीत नमूद केलेल्या यंत्राची माहिती बघितली असता लक्षात येते की, यात नमूद केलेल्या यंत्रात विशेष, चमत्कारी व अतींद्रिय गुण असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. विक्रेत्याला या वस्तूत हा गुण असल्याचे सिद्ध करता येणार नाही, याबाबत कोर्टाच्या मनात कोणताही संदेह नाही. अडचणीत असलेल्या ज्या व्यक्तींना असे वाटते की, कोणत्या तरी अतिनैसर्गिक शक्तीमुळे आपण या अडचणीतून बाहेर पडू, अशा व्यक्तींना फसविण्याच्या हेतूनेच ही जाहिरात करण्यात आलेली आहे. या जाहिरातीत म्हटले आहे की, एका बाबांना सिद्धी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी हे यंत्र तयार केले आहे. पैसे कमावण्यासाठी तथाकथित चमत्कार करणे, हा जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा आहे. जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम तीन केवळ तथाकथित जादूटोणा करण्यावर बंदी घालते, असे नाही तर अशा गोष्टींचा प्रचार, प्रसार देखील या कायद्यानुसार गुन्हा आहे. कलम 3(2) नुसार अशा गोष्टींचा प्रचार करण्याचा प्रयत्न करणे, हा देखील गुन्हा आहे. त्यामुळे टीव्ही चॅनल्स देखील या कृत्याला जबाबदार ठरतात.

जादूटोणाविरोधी कायद्याच्या कलम पाच (दोन) मध्ये दक्षता अधिकार्‍याची कर्तव्ये नमूद केलेली आहे. हा निकाल ती सर्व कर्तव्ये पुन्हा उद्धृत करतो व पुढे असे म्हणतो की, या कायद्यात म्हटल्याप्रमाणे गुन्हे रोखण्याचा अधिकार; म्हणजे त्यात अशा प्रकारच्या जाहिराती रोखण्याचा अधिकार देखील आला. या कायद्यातील कलम सहा हे दक्षता अधिकार्‍याला गुन्ह्याशी संबंधित साधने जप्त करण्याचा अधिकार देते. अशा जाहिराती करणारे लोक देवाचे, बाबाचे, यंत्राचे नाव बदलून अशा जाहिराती करत राहतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारे अशा जाहिराती करणे हा गुन्हा असल्याचा उल्लेख या निकलपत्रात केलेला आहे. हे कृत्य ही फसवणूक असून जादूटोणाविरोधी कायद्याची अंमलबजावणी करून ही फसवणूक थांबवावी, असे निकालपत्रात म्हटले आहे.

अ‌ॅड. व्ही. डी सपकाळ (न्यायमित्र)


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]